मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

कायद्याची बाब, कबूलीजबाब ! "द कन्फेशन"
( ई-बुक द्वारे)
लेखक: जॉन ग्रिशॅम
डबल-डे, प्रकाशन,न्यू-यॉर्क,
पाने:३७५ किंमत: १५डॉलर
मला वॉल स्ट्रीट जर्नलचा मागच्या आठवड्यात एक ई-मेल आला. त्यात ह्या महिन्याच्या ठळक बातम्या होत्या तिथल्या. त्यात एक होती की, मागच्याच महिन्यात अमेरिकेत प्रसिद्ध कादंबरीकार श्री.जॉन ग्रिशॅम ह्यांचे २४ वे पुस्तक "द कन्फेशन" हे एकाचवेळी पक्क्या बांधणीत व ई-बुक द्वारे प्रसिद्ध झाले. अमेरिकेत सध्या पुस्तक विक्रेत्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत, ते ई-बुक मुळे. तिथे शाळकरी मुले, तरुण व सर्वचजण आजकाल पुस्तके ई-बुक स्वरूपातच वाचतात. ह्या प्रकाशकांना एक अजब अनुभव आला की एकाचवेळी ई-बुक प्रसृत करूनही पारंपारिक पुस्तकाची मागणी घटली नाही तर उलट वाढली. ह्या अगोदर द फर्म, द पेलिकन ब्रीफ, द चेंबर, द रेनमेकर, द स्ट्रीट लॉयर, द असोशिएट, अशी कायदेजगतातली बेस्ट सेलर्स देणारा हा सिद्धहस्त लेखक, आणि त्याचे हे २४ वे पुस्तक ! ( वॉल स्ट्रीट जर्नलच्या ई-मेल नंतर मी हे पुस्तक ई-बुक म्हणून उतरवूण घेतले व ते ई-बुकच वाचले व ही पुस्तक-ओळख संगणकाद्वारेच पाठवीत आहे. असा हा सर्व डिजिटल मामला !)
एका मुलीवर बलात्कार होऊन तिचा खून होतो, ( तिचा मृतदेह मात्र सापडत नाही ), तिच्याच कॉलेजातल्या एका मुलाच्या साक्षीवरून दुसर्‍या एका मुलाला अटक होते. त्यांचे प्रेमसंबंध असतात, व नंतर तो असूयेपोटी तिला मारतो असा संशय असतो. त्याचा तुरुंगात दबाव आणून कबूलीजबाब घेतात, साक्ष व कबूलीजबाब ह्याच्या जोरावर खटला भरून त्याला देहांताची शिक्षा होते. एक वकील त्याचा खटला, अपीले, सार्वजनिक हितापोटी चालवतो. व अनेक अपीले होऊन शेवटी त्याला खतम करण्याचा दिवस येऊन ठेपतो. नेमके दोन दिवस आधी एका चर्च मध्ये पाद्रयाला भेटायला एक माणूस येतो. त्याला कबूलीजबाब ( चर्च मधला) द्यायचा असतो की त्यानेच त्या मुलीचा खून केला आहे. ह्या माणसाला ब्रेन टयूमर झालेला असतो व तो आता केव्हाही मरणार असतो. त्याने आतापर्यंत बरेच बलात्कार केलेले असतात व त्यातलीच शिक्षा भोगून झाल्याने तो दुसर्‍याच दिवशी सुटणार असतो. मरताना तरी काही खोटेपणा नको म्हणून त्याला ह्या मुलीचा खून कबूल करायचा असतो. शिवाय चुकीच्या माणसाला उगाच फाशी देताहेत त्याचेही खापर त्याच्यावर येऊ नये व तो निरपराध मुलगा सुटावा असे त्याला वाटत असते. हे ऐकून पाद्रयाची पंचायत होते. नुसता खुन्याचा कबूलीजबाब ऐकून घेतला व पोलिसांना सांगितले नाही तर डबल संकट अवतरणार असते. चुकीच्या खुन्याची शिक्षा रद्द करण्यात मदत केली नाही व खर्‍या गुन्हेगाराला पकडून दिले नाही म्हणून. तो खर्‍या खुन्याशी बर्‍याचवेळा भेटतो, त्याला सहानुभूती दाखवतो, मदत करतो. त्यात अजून माहीती मिळते की मुलीवर बलात्कार करून त्याने तिला कुठे पुरले आहे ते त्यालाच माहीत असते.
मग पाद्रयाची धावपळ सुरू होते. तो वकीलाला गाठतो. तशात दोघे खुनी काळे असतात व पोलीस व ज्यूरी गोरे असतात. त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण झालेला असतो. अमेरिकेत फाशीची शिक्षा सगळ्याच प्रांतात रद्द झालेली नाही म्हणून मानव-अधिकार वाली मंडळी फाशीविरुद्ध चळवळ करीतच असतात. पण गोरे अधिकारी बधत नाहीत. तणाव ज्यास्तच वाढतो. अपीले रद्द होतात. तरुण खुन्याला ( चुकीच्या ) इंजेक्शन देऊन देहांताची शिक्षा होतेही. कोणी काहीही करू शकत नाही. पाद्रय़ावरचे व वकीलावरचे धर्म-संकट अधिकच दाट होते. मग ते खर्‍या खुन्याला घेऊन मुलीला जिथे पुरले होते ते शोधून काढतात. त्यालाही नऊ वर्षे होऊन गेलेली असतात, तशात खुन्याला ब्रेन-टयूमरमुळे चकरा वगैरे त्रास होत असतो. पोलीस हे सगळे करायला तयार नसतात म्हणून वकील व पाद्री साक्षीदारांच्या साक्षीने व व्हिडीओवर हे सर्व करतात. शेवटी हे सर्व प्रकरण मीडीयात जाऊन दाखवतात तेव्हा पोलीस व न्यायसंस्थेतले अधिकारी खडबडून जागे होतात. प्रॉसिक्यूटर व न्यायाधीश बाई ह्यांचे प्रेमसंबंध असल्याचे उघडकीला येते व मग रीतसर वकील सर्वांवर खटले भरतो, खर्‍या खुन्याला अटक होते, चुकीच्या माणसाला फाशी दिल्याबद्दल न्यायाधीश क्षमा मागतात वगैरे सर्व न्यायाला धरून शेवट होतो.
अमेरिकेसारख्या प्रगत देशातही केवळ कामाच्या सोयीसाठी पोलीस-तपास अधिकारी कसे दबाव आणून कबूलीजबाब लिहून घेतात, साक्षीदारांना खोटी प्रलोभने दाखवून साक्षी कशा फिरवून घेतात, वर्णद्वेशाच्या पार्श्वभूमीवर अजूनही तिथे कसे काळे-गोरे हे वाद टिकून आहेत, आणि केवळ माणुसकीपोटी कसा एक पाद्री व मरणारा खरा खुनी खर्‍या खुनाला वाचा फोडतो हे या कादंबरीत फार बारकाईने नोंदवलेले आहे. कादंबरीतल्या घटना २००७ साली घडलेल्या आहेत, तरीही अमेरिकेत फाशीची शिक्षा होणे, वर्णद्वेशाच्या दंगली होणे, अशा नोंदी संशय निर्माण करतात. अशी कपोलकल्पित कथानक असलेली कादंबरी आपण का वाचावी ? केवळ मनोरंजनासाठी ? का हेच आपले कठोर वास्तव आहे व त्यातले बारकावे आपल्या लक्षात यावेत म्हणून ? खोटे वाटत असेल तर नुकतेच गाजत असलेले दिल्लीच्या डिआयजी राठोड ह्यांचे प्रकरण आठवून पहा. त्यांनी मुलीवर बलात्कार केला, तिला आत्महत्या करायला भाग पाडले, नातेवाईकांवर खोटे खटले भरले व आता तर सीबीआय ने त्यांच्याविरुद्ध पुरावा नाही म्हणून केसच बंद केली आहे, व त्यांना जामीनही मिळाला आहे. मानवाअधिकारासाठी गुजरात दंगलीचे खटले लढणार्‍या तीस्ता सेटलवाडच्या एकेकाळच्या सहकार्‍याने भेद खोलला आहे की तिने साक्षीदारांना पढवले व हवालाद्वारे पैसे दिले. ह्याच गुजरात दंगलींच्या बेस्ट बेकरी केस मध्येही ज्या मुलीच्या कबूलीजबाबामुळे खटला निकाली लागला त्याच मुलीला शेवटी साक्ष फिरवल्यामुळे शिक्षा झाली. असे प्रत्यही घडत असताना ह्या वास्तवाला आपल्याला कायदेशीरपणे सामोरे जाणे भाग आहे, खरे खोटे आपल्याला तुंबळ प्रतिवादानंतरच कळणार आहे व त्यासाठीच कायद्याचा पुरेपूर उहापोह असलेली ही कादंबरी वाचणे गरजेचे आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
सोबत: कादंबरीच्या मुखपृष्ठाचे चित्र