सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

---------------------------------------------------------------------
वाचाल तर वाचाल---८

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"द नाईव्ह ऍंड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट"
लेखक: ओरहान पामुक ( नोबेल पारितोषिक, २००६)
पेनग्विन बुक्स, २००९,( भारतात २०११), पृ.२००, किं: १५ डॉलर,
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाबडा व बेरका कादंबरीकार ( ले: ओरहान पामुक, नोबेल विजेता,२००६)
आज इतकी वर्षे झाली दरवर्षी नोबेल पारितोषिके दिली जात आहेत, पण त्यांचा वकूब, मान, चांगलाच राखलेला आहे. त्यात वरील शीर्षकाचे पुस्तक असेच एका टर्किश लेखकाचे असून ते त्याने आपल्या आवडत्या कसबावर, कादंबरी लेखनावर, लिहिलेले आहे. नोबेल मिळाल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठाने नॉर्टन लेक्चर्ससाठी २००९ साली पामुक ह्यांना बोलावले होते. तीच ही भाषणे पुस्तकबद्ध केली आहेत.
द व्हाइट कॅसल; द ब्लॅक बुक; द न्यू लाइफ; माय नेम इज रेड; स्नो; इस्तंबूल:मेमरीज ऍंड द सिटी; आणि द म्युझियम ऑफ इनोसन्स ही ह्या लेखकाची पुस्तके प्रसिद्ध झालेली असून ह्या लेखकाला उदंड यश लाभलेले आहे. ( ७० लाख प्रती, ५० भाषात भाषांतरे, सिनेमे वगैरे). अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात लेखक तौलनिक वाङमयाचे प्राध्यापक असून वरील पुस्तक ज्या मॅन बुकर विजेत्या किरण देसाई ह्यांना अर्पिले आहे, त्यांजबरोबर ( २०१० पासून) शरीर-संबंध ठेवून आहेत. लेखकाने आजवर भरपूर विवाद भोगलेले आहेत. त्याच्यावर वाङमय-चौर्याचा आरोप झालेला आहे, आर्मेनियन व कर्डस्‌ लोकांची पूर्वी ओटोमन साम्राज्यात कशी कत्तल झालेली होती ह्या पामुक ह्यांच्या विधानावरून खटले दाखल झाले होते, आणि टर्कीच्या युरोपियन युनियन मध्ये प्रवेश देण्याच्या काळातच पामुक ह्यांना नोबेल मिळालेले होते. ह्या विवादांच्या झाकोळांतून अंमळ दूर सरूनच आपल्याला कादंबरीवरच्या एका कादंबरीकाराच्या मतांना सामोरे जाणे भाग पडते.
पामुक ह्यांचे एक लाडके तत्व आहे की दोन प्रकारचे कादंबरीकार असतात. एक उस्फूर्तपणे झपाटून भावनेच्या भरात लिहिणारा व दुसरा जीवनाचे तत्व जणू सापडल्याप्रमाणे त्या तत्वांबरहुकूम लिहिणारा ( बेरका). स्वत: पामुक एक प्राध्यापक, क्रिटिकल थियरी शिकलेले व शिकवणारे. तशात विषय एका प्रमुख साहित्यप्रकाराचा. नोबेलच्या मरातबाने अभ्यासपूर्ण असण्याची जबाबदारी पेलणारी ही भाषणे. त्यामुळे पुस्तकाकडून अपेक्षा भरमसाठ असतात. त्यामुळे सबंध भाषणभर लेखक जाणत्या व्यक्तिमत्वांच्या समर्थनाआडून आपली मते मांडतो आहे. जसे त्यात शिलरची मते आहेत तशीच टॉलस्टॉय, फ्लॉबर्ट, फॉर्स्टर, बोर्जेस, इलियट,फॉकनर, फूको, हाबरमास, डोस्टोव्हस्की, नॅबोकोव्ह, प्राउस्ट, लुकास, वगैरे दांडग्या मातब्बरांची तत्वेही समर्थनार्थ घेललेली आहेत. आपण कादंबरी वाचत असताना त्यातल्या मनोहारी देखाव्यांची जरूर दखल घेतो पण त्यापलीकडे कादंबरीचे काही केंद्र आहे का ह्याचा शोध घेत असतो असे लेखकाचे म्हणणे आहे. वाचकवादाचा पुरस्कार करीत लेखक म्हणतो की शब्दांना मूर्त चित्रे आपण वाचकच करीत असतो व ह्या कादंबरीच्या केंद्राकडे आपणच कादंबरीला नेत असतो. कादंबरीतल्या घडामोडी वास्तवाच्या निकषावर आपणच तर्काने पडताळून पहात असतो. तर्क कुतर्काच्या निबिड वास्तवात आपणच एका आशावादाने कादंबरीत मार्ग काढीत असतो. कादंबरीतली पात्रे जी वागतात त्यासंबंधी वा एकूणच नैतिकतेविषयी कादंबरीत नैतिक निवाडे जरूर असावेत पण ते एखाद्या देखाव्यासारखे कादंबरीतच असावेत. त्यांनी वाचक प्रभावित होऊन त्याने ते नैतिक निवाडे पात्रांना लागू करू नयेत असे पामुक ह्यांचे म्हणणे आहे. इथे अशाच एका प्राध्यापकाने व लिटररी थियरीवर बेतून कादंबरी लिहिणार्‍या नेमाडेंची हमखास आठवण होते. ते त्यांच्या "हिंदू" या कादंबरीत ज्ञानेश्वर, रामदास, बुद्ध, गांधी वगैरे मान्यवरांवर त्यांच्या पात्रांकरवी, निरनिराळ्या मतलबापोटी, यथेच्छ नैतिक फतवे काढतात व त्यात वाचकालाही आवाहन करतात. इथे पामुक ह्यांचा सल्ला बराच रास्त वाटतो तो असा की पात्रांनी त्यांचे नैतिक फतवे जरूर ठोकावेत पण लेखकाने त्यांचे समर्थन करीत वाचकांनाही त्यात गुंतवण्याचे प्रयोजन नव्हते. त्यामुळे कादंबरी हिणकसाकडे झुकते. कादंबरीच्या संहितेत उत्तम साहित्यिक गुण असतील तर त्यामुळे वाचकाला काही अप्रतीम सापडल्याचे भान येते व त्यामुळे तो कादंबरीतल्या इतर अनाकलनीय वा फसलेल्या भागांकडे दुर्लक्ष्य करू शकतो. हे पामुक ह्यांचे निरिक्षणही हिंदूत छान लागू होते कारण नेमाडेंचे त्यात काही हातखंडा असलेले साहित्यप्रकार असल्याने वाचकांना ते सुखावतात हे आपण पाहतोच.
पामुक ह्यांनी असाही एक सल्ला दिलेला आहे की कादंबरीच्या कथात्मकतेत इतके माफकच घटक असावेत की त्यामुळे वाचकाला पात्रांची सरमिसळ, त्यांची नाती वगैरेंची अडचण येऊ नये. तसेच ह्या कथात्मकतेमुळेच कादंबरीची व्याप्ती ठरते. उत्तर आधुनिकतावादाशी हे मत बरेच अनुकूल असून नेमाडेंच्या हिंदूत आपल्याला हे पडताळता येते. प्रचंड व्याप्ती असलेल्या ह्या कादंबरीत कथानक कसे व का जुजबी आहे, त्याचा आपल्याला आता उलगडा होईल. पामुक ह्यांच्या मते ही कथात्मकता बेताचीच/नेमकीच ठेवल्याने कादंबरीचे केंद्र वाचकाला चाचपडता येते.
पामुक ह्यांच्या मते जीवनाचा अर्थ शोधणे वाचकाला कादंबरीच्या केंद्राकडे घेऊन जाते. हे पामुक ह्यांच्या मते वाचकाने आपल्या विवेकाने करावे व त्यावर तत्वज्ञानाचा वा धर्माचा धाक पडला न पाहिजे व एकप्रकारे लोकशाहीच्या नीतीने हे व्हायला हवे. आता हा निकष आपण जर नेमाडेंच्या हिंदूला लावून पाहिला तर दिसते की त्यांच्या कादंबरीचे केंद्र त्यांच्या देशीवादाभोवती व वर्णव्यवस्थेच्या सततच्या जाणीवेभोवतीच घोटाळत राहते.ई.एम.फॉर्स्टर ह्यांचे एक वचन लेखक वाखाणतो ते असे: कादंबरीने आपल्या जीवनाविषयीच्या कल्पना व जाणीवा ह्या प्रत्यक्षात असल्याप्रमाणेच जाणवून द्याव्यात व वाचकालाही त्या तशाच जाणवाव्यात. ह्या पार्श्वभूमीवर सध्याच्या जीवनात वर्णव्यवस्थेचे भूत आपल्याला निवळलेले दिसत असले तरी त्याचेच स्तोम नेमाडे माजवीत आहेत हे त्यांच्या कादंबरीत सहजी दिसते व ह्या निकषावर ती कादंबरी वाखाणणे अवघड होऊन बसते.
स्वत: एक यशस्वी पटकथा-लेखक असल्याने पामुक ह्यांनी शब्दांनी कसे प्रतिमांचे साक्षात चित्र उभे करावे ह्या कसबाचे जे कौतुक मांडले आहे ते कोणाही होतकरू कादंबरी लेखकाला मोलाचे ठरावे. ह्या उहापोहात लेखक भाषाशास्त्राच्या अनुषंगाने जी कोलेरिज, टॉलस्टॉय ह्यांची साक्ष काढतो ते व्यासंगपूर्ण आहे. तो स्वत:चे अनुभवही कथन करतो ज्यात तो रेडीओवरून फुटबॉलच्या खेळाची कॉमेंट्री ऐकण्याचे उदाहरण देतो. असेच मला आठवते ते आम्ही लहानपणी इंग्रजी फारसे येत नसताना तल्यारखान, विझी व विजय मर्चंट ह्यांचे इंग्रजीतले रेडीओवरचे धावते वर्णन ऐकून प्रत्यक्ष खेळ पहात असल्याचे जाणवत असू. शब्दांनी चित्रे रेखाटण्याचे हे कसब मात्र दाद देण्यासारखे असून कादंबरीकाराच्या पदरी हे असायलाच हवे.
पामुक ह्यांची द इनोसन्स ऑफ म्युझियम नावाची कादंबरी एका खरोखरच्या वस्तुसंग्रहावर आधारलेली असून पामुक ह्यांचे म्हणणे माणसांच्या सहवासातल्या वस्तूही बरेच काही महत्वाचे सांगून जातात. ह्या लेखकाने पुराणकाळातल्या वस्तूंचे संग्रहालय केले व त्याचीच कादंबरी केली हे कल्पकतेचे चांगलेच परिमाण म्हणायला हवे. आणि ह्या उलट जमा झालेल्या वस्तूंना नेमाडे ह्यांनी हिंदू त त्यांना समृद्ध अडगळ म्हणून कमी लेखावे हे त्यांच्या कल्पकतेचे दुर्भिक्षच म्हणावे लागेल.
पामुक हे स्वत: तौलनिक वाङमयाचे प्राध्यापक असल्याने त्यांनी वरील विवेचन हे वाचकवादाच्या समीक्षेच्या सिद्धान्ताने केले आहे हे सहजीच ध्यानात येते. पण वाचकवादाची जी मूलभूत तत्वे आहेत त्यातली महत्वाची तत्वे इथे लेखकाने सपशेल दुर्लक्षली आहेत अस जाणवते. जसे: आयझर ह्यांचा अध्याहृत वाचकाचा सिद्धान्त इथे विचारातच घेतलेला नाही.तसेच थॉमस कुन्ह ह्यांच्या पॅरेडाईम-शिफ्टच्या महत्वाच्या प्रतिपादनाकडेही लेखक कानाडोळा करतो. उत्तर आधुनिकतावादात सांस्कृतिक कथनांचा र्‍हास, व रूपहीनतेचा गौरव करतात व इथे तर बाळबोध जीवनाचा अर्थ वगैरे लेखक बघण्याचे सांगतो आहे, हे व्यासंगाचा उथळपणाच दाखविते व आधीच वादग्रस्त असलेल्या पण नोबेल पारितोषिक मिळालेल्या ह्या लेखकाचे वरील प्रतिपादन किती प्रामाण्याने घ्यावे ह्याचा वाचकाला संभ्रम पडतो. बरे ज्या होमी भाभा ह्यांनी त्यांना ह्या भाषणांना आमंत्रित केले होते, ते गृहस्थही असेच वादग्रस्त ठरलेले आहेत व आता हार्वर्ड विद्यापीठात नाहीतही.( त्यांना न कळणार्‍या संज्ञा वापरून "वाईट लिखाणाचे" पारितोषिकही देण्यात आलेले आहे. ) . अर्थात केवळ त्यांनी आमंत्रण दिलेले आहे म्हणून आपण पामुक ह्यांना कमीपणा देऊ शकत नाही, हे खरे असले तरी भाषणात जे सर्वत्र सुलभीकरण प्रकर्षाने जाणवते त्याने संभ्रम अधिकच वाढतो.

--------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

------------------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, ३१ मे, २०११

------------------------------------------------------------------------------------
वाचाल तर वाचाल----७

एंपरर ऑफ ऑल मॅलडीज
लेखक: सिद्धार्थ मुखर्जी
स्क्रिबनर प्रकाशन, (नोव्हेंबर २०१०),
पृ.५५०, किंमत: र ४९९/२९९(फ्लिपकार्ट)

सर्व रोगांचा बादशहा : कर्क-रोग
ह्याच महिन्यात ह्या पुस्तकाला कोलंबिया विद्यापीठाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. शिवाय एका भारतीय डॉक्टराने लिहिलेले, अशा दुहेरी आकर्षणामुळे, हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे झाले आहे.
कर्क-रोग आताशा कमी भयकारी वाटत असला तरी त्याच्या नुसत्या कल्पनेने अजूनही आपला थरकांप होतोच. आपण आजूबाजूला प्रत्यही अनेक माणसे ह्याने बाधित होऊन लढताना पाहतो. त्यांचे वेडेवाकडे झालेले चेहरे, डोक्याला बांधलेले फडके, त्यांचे वारंवारचे केमोथेरपी प्रकरण, रेडियेशन थेरपीचे छळ, होणार्‍या भयंकर वेदना, उलटया, व एकंदरीतच त्रस्त करण्याने, हा रोग आपल्याला तर नाहीच पण जगातल्या कोणालाच होऊ नये, असे पसायदान मागवणारा हा रोग, सर्व रोगांचा बादशहा कसा आहे ह्या कल्पनेने लिहिलेले हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकात कर्करोगाचे जणु चरित्रच रेखाटलेले आहे. आणि ही माहीती अगदी तांत्रिक असली तरी, थोडयाशा चिकाटीने, सामान्यांना समजेल अशा इंग्रजीत वाचताना एखादे ललित वाङमयच वाचतो आहोत असा भास होतो.
गेली शंभर वर्षे अत्यंत हुशार डॉक्टरांना व शास्त्रज्ञानांना चकमा देणारा हा रोग आहे. आज जरी बहुतेक सर्व कर्करोगांवर औषधोपचार उपलब्द असले तरी हा समूळ नष्ट करणे किंवा होऊच नये अशी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अजूनही दुरापास्तच. त्यामुळे अशा हटटी रोगावरचे एक पुस्तक वाचून सगळे ज्ञान होईल हे जरी संभवनीय नसले तरी असे प्रयत्न आजतागायत कसे झाले व त्याला कसे यशापयश येत गेले, आणि हा रोग कसा चोर पावलांनी शरीर काबीज करतो हे खुद्द एका डॉक्टराने, अतिशय सजग भावनेने लिहिलेले आहे. ह्यात रोग्यांच्या कळवळ्यापेक्षा ह्या रोगाचे वागणे, पसरणे, त्यावरचे उपाय, वगैरे तांत्रिक बाबी एक प्रकारच्या उत्तरदायीत्वाच्या भावनेने लेखकाने ठळक केल्या आहेत. त्यात संशोधकाच्या माहीतीचे अवडंबर माजवण्यापेक्षा मूलभूत विचार कसा करावयाचा ह्याचे लेखक प्रत्यंतर आणतो.
ह्या रोगावर अथक परिश्रम करून मेहनतीने व हुशारीने औषधे शोधून काढणार्‍या डॉक्टरांच्या गाथा ( कधी यशाच्या तर कधी अपयशाच्या ) वाचताना जसे नोबेल प्राइज मिळवणार्‍या फार्बर ह्यांची माहीती वाचताना रोमांचित व्हायला होते, तसेच १९२० साली अमेरिकेत गेलेल्या श्री.येल्ला सुब्बाराव ह्या डॉक्टराने रक्तक्षयावरचे फॉलिक ऍसिडवाले औषध कसे शोधले हे वाचताना ( पृ.४१), आपल्याला भारतीय असण्याची धन्यता वाटते.
ह्या रोगाने माणसाला व डॉक्टरांना कसे चकवले हे वाचताना वाचकांचा धीरच सुटावा अशी पाळी येते व त्यावर लेखक फार मूलभूत असे जे हिपोक्रॅटसचे भाष्य आहे त्याची आपल्याला ओळख करून देतो. औषधोपचारावर हिपोक्रॅटस ( पृ. ३५२) म्हणतो, "आर्स लॉंगा, व्हिटा ब्रेव्हिस" ( औषधोपचाराची कला लंबीचौडी, वेळखाऊ आहे, व जीवन छोटे आहे; संधी सारखी निसटती असते; प्रयोग फसतात; व निर्णय चुकतात. ). तसेच ऑंकॉलॉजी ह्या नावाचा उलगडाही मोठा मनोज्ञ वाटतो. ऑंकस ह्या ग्रीक मूळ शब्दाचा अर्थ होतो, एक ओझे, बोजा, जे कर्करोग झालेल्याला कायमच वागवावे लागते. ह्या तांत्रिक मूलभूत माहीतीमुळे हा बोझा थोडा पेलवल्यासारखा तरी भासतो.
सिगरेट मुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो हे आता आपल्याला चांगलेच पटलेले आहे. पण अमेरिकेत ह्यावर तेव्हा कसे जंग छेडावे लागले व त्यावर कसे उपचार शोधले गेले, ह्याची मनोरंजक माहीती ( २८३-३१८) ह्या प्रकरणात वाचून थक्क व्हायला होते. हे वाचताना परळच्या टाटा कर्करोग इस्पितळात त्यांनी जे फलक लावले आहेत, (गुटखा सेवनाने घशाचा कर्करोग कसा होतो त्यासंबंधी), त्याचे स्मरण होते. गुटखा खाणे, तयार करणे ह्यावर अशीच चळवळ करून बंदी आणायला पाहिजे, हे तीव्रतेने जाणवते. सिगरेट उत्पादकांची बाजू जशी तत्कालीन सरकारे घेत, त्याच प्रमाणे सध्याचे आपले सरकार किती बेफिकीरीने गुटखा उत्पादकांची बाजू घेते आहे हे पाहिल्यावर माणसांच्या नशीबी ही दुर्दशा का येते ह्याचे वैषम्य वाटते.
गुंतागुंतीची माहीती अगदी सुगम करण्यात ह्या तरुण लेखकाला चांगलीच हातोटी लाभलेली दिसते. निरनिराळ्या विषारी रसायनांचे मिश्रण ( कॉकटेल) करून करायच्या केमोथेरपीचे विवेचन करताना, ओव्हर-डायग्नोसिस व अंडर-डायग्नोसिसचे संतुलन कसे सांभाळावे लागते हे विशद करताना लेखक ( पृ.३२९-३४८) कोळ्याच्या जाळ्याची उपमा देतो. कोळ्याने जाळे जर फारच बारीक ( दाट ) विणले तर माशीच काय लहान चिलटे, कचरा, धूळही जाळ्यात अडकेल व जाळे फारच दूरदूर ( विरळ ) विणले तर माशाही सटकून जातील. असेच योग्य प्रमाणात औषधांचा डोस डॉक्टरला प्रत्येक पेशंटच्या केसप्रमाणे योजावा लागतो. व म्हणूनच हे प्रकरण खूपच अवघड होते.
प्रतिबंधक उपाय योजना, लसी, कमी साईड-इफेक्टची औषधे, संशोधन, रोग्यांचा पाठपुरावा, अशा कितीतरी तरकीबी अजूनही कर्क-रोगाशी लढताना करायच्या बाकी आहेत हे कबूल, पण ह्या शत्रूशी लढताना आता हा कसा ओळखीचा वाटतो व त्याच्या सगळ्या लहरी, गनीमी लढाया, आता आपल्याला अवगत झालेल्या आहेत असेच हे पुस्तक वाचल्यानंतर वाटायला लागते व ही मोठीच उपलब्धी आहे हे नि:संशय !

------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव *( सोबत चित्र मुखपृष्ठाचे )
arunbhalerao67@gmail.com

१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व), मुंबई : ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, ११ मे, २०११

वाचाल तर वाचाल----८
"परत मायभूमीकडे"
लेखक: डॉ.संग्राम पाटील
समकालीन प्रकाशन (मार्च,२०११), पृ.१०७, किं:१२५र
एक वेगळा प्रवास
आजकाल वेगळेपण दिसणं हे फार कष्टाचं झालं आहे. जिकडे पाहावे तिकडे "जनांचे प्रवाहो" घोळक्याने व एकाच दिशेने घोंघावत चाललेले दिसतात. त्यात कोणाचे वेगळेपण टिपणे, थोडे थांबून त्यांचे कौतुक करणे हे फार अगत्याचे असते, हेही आपण ह्या धुमश्चक्रीत विसरतो. इंजिनियर, डॉक्टर मंडळींनी परदेशी जाणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्यात त्यांचे परत येणेही ( प्रमाणाने कमी असले तरी ) निरनिराळ्या कारणाने नजरेत भरते. बर्‍याच जणांच्या परत येण्यामागच्या खंता न लपता स्पष्ट दिसून येतात, तर ह्या पुस्तकातल्या तरुण डॉक्टर दांपत्याचे असेच परत येणे, आवर्जून खेडे गावात प्रॅक्टीस सुरू करणे, थोडे आपल्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणीवेचे भान दाखवणे हे खासे वेगळे तर आहेच, पण बरेच सुखावणारेही आहे. ह्या बद्दल ह्या दांपत्याचे व समकालीन प्रकाशनाचे कौतुक करायलाच हवे. हे पुस्तक वाचायलाच हवे.
खेडेगावातून, गरीबीतून एक मुलगा, संग्राम पाटील, शिक्षणाची कास धरतो, मेहनत करतो, डॉक्टर होतो, नूपूर ह्या डॉक्टर जोडीदारीणीबरोबर पुढील शिक्षणासाठी अनुभवासाठी व जरा कर्ज फेडण्यासाठी चार पैसे मिळविण्यासाठी ब्रिटनला जातो व मायदेशाच्या ओढीने दोघेही परत येऊन एरंडोल येथे एक सुसज्ज हॉस्पिटल व शाळा सुरू करतात अशा ह्या वेगळ्या प्रवासाची ही कहाणी आहे. ती मनोरंजक तर आहेच पण ह्या डॉक्टर दांपत्याचे सत्चरित्र दाखवते व वाचकाला त्यांच्या मोहात पाडते. त्यांच्या ह्या वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाला आपण अभिष्ट-चिंतन द्यायलाच हवे, कारण त्याने नवीन समाजाचे चित्र निश्चितच सुखकर होणारे आहे.
अगदी अडचणीत राहून इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व नोकरी करताना डॉक्टर संग्राम पाटील एक आदर्श राहणीमानाची आपल्याला जाणीव करून देतात. त्यापैकी मुतारीचे पैसे वाचविण्यासाठी ते थंडीत लघवी रोकून ठेवतात, टपालपेटीची वेळ साधण्यासाठी एवढ्या थंडीत मैल दोन मैल पळत जातात वगैरे मनोनिग्रहाचे नमूने वाचकांना आदर्श साधकाचे पाठच देऊन जातात. डॉक्टर अभय बंग ह्यांच्या प्रभावाखाली हे डॉक्टर दांपत्य सेवाव्रताची जाणीव बाणतात, हेही वाचताना अजूनही चांगल्या लोकांचा बराच प्रभाव समाजात पडू शकतो हा दिलासा मिळतो. तसेच हे डॉक्टर दांपत्य समाजातल्या, डॉक्टरी व्यवसायातल्या अनिष्ट प्रथांना बळी पडत नाही हे वाचून चांगुलपणावरचा विश्वास हमखास वाढतो व आजकालच्या वातावरणात ह्याची अत्यंत गरज भासते.
पण पुस्तकाच्या मांडणीत जरा गफलत झाल्यासारखे वाटते. पुस्तकाचा रोख शीर्षकाप्रमाणे ( परत मायभूमीकडे ) मायभूमीतल्या कामावर असावयास हवा होता. पण पारंपारिक आत्मचरित्राच्या थाटात तो इंग्लंडमधल्या आरोग्यव्यवस्था, तिथला समाज, त्यांचे आचार-विचार, तिथले भ्रष्टाचार-मुक्त व्यवहार, ह्याचेच चित्रण करण्यात जातो. त्याने लेखकाला अजूनही तीच ओढ खुणावतेय की काय असा संशय चाटून जातो. पुस्तकाच्या आवाक्यात एकच शेवटचे ( ते ही छोटे-खानी ) प्रकरण मायभूमीतल्या प्रयत्नांसंबंधी असावे हे खटकते अशासाठी की पुस्तकाचा मुख्य रोख ( फोकस ) त्यामुळे बदलतो. इंग्लंडमधल्या अनुभवात लोकांना वेगळेपण दिसणे तितके लोभावत नाही, जितके ते मायभूमीच्या मनसुब्यांवर ठासून वेगळे दिसले असते. तसेच डॉक्टर दांपत्य आता एरंडोल येथे जो दवाखाना चालवताहेत त्यात किती फीस घेतात, मोफत इलाज किती जणांना देतात, तसेच सामाजिक उत्तर-दायित्वाच्या कल्पनेने मलेरियावर काय सार्वजनिक उपाययोजना आखतात, हे विस्ताराने वाचायला वाचकाल आवडले असते. शिवाय त्याने इतर डॉक्टरांनाही मोलाचे दिशादर्शन झाले असते. खैर, ह्या तरुण डॉक्टर दांपत्याचा प्रवास नुकताच कुठे सुरू झालेला असल्याने ते लवकरच वेगळ्या प्रवासातले मैलाचे दगड आपल्या नजरेत आणून देतील अशी आशा करू या व त्यांना शुभेच्छा देऊया.


----------------------------------------------------------------
अरूण अनंत भालेराव * सोबत: पुस्तकाचे मुखपृष्ठाचे चित्र
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, १ मार्च, २०११

"आपुला चि वाद आपणांसी"
लेखक: चंद्रकांत वानखडे, मनोविकास प्रकाशन, पाने:२१६, किं: २०० र

"सामर्थ्य आहे चळवळेचे । जो जी करील तयाचे".
आजकाल चळवळींचे दुर्भिक्ष्य आहे असे आपण म्हणावे तोच ईजिप्त, लिबिया, बाहरीनचे जनतेचे उठाव, जैतापूर प्रकल्पग्रस्तांची हजोरोंनी निदर्शने, तेलंगणाचे धुमसणे वगैरे चळवळी प्रकर्षाने डोळ्यासमोर येतात. इतके चळवळींचे सामर्थ्य आहे, हे संत रामदासांचे वचन मग लगेच पटावे. काठावर राहून मजा पाहणार्‍यांच्या सांगण्यापेक्षा, त्या मंजधारेत तावून सुलाखून होरपळलेल्या एखाद्या सच्च्या कार्यकर्त्याने ह्याबाबत काही सांगावे, हे आजकाल विरळाच. तसा योग नुकताच श्री. चंद्रकांत वानखडे ह्यांच्या "आपुला चि वाद आपणांसी" ह्या आत्मकथनाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन होताना आला.
चंद्रकांत वानखडे हे मोठे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व ह्यासाठी आहे की त्यांना फारच मोठमोठया व्यक्तिमत्वांचा नुसताच सहवास लाभला असे नाही तर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. आणि ही माणसेही अशी ताडमाड उंचीची व देवत्वाचा स्पर्श झालेली होती. जसे: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले एस.एम. जोशी ; ना.ग.गोरे ; दादा धर्माधिकारी ; विनोबा भावे ; जयप्रकाश नारायण ; व्ही.पी.सिंग ; शेतकरी संघटनेचे शरद जोशी ; ग.प्र.प्रधान ;बाबासाहेब ; अण्णा रेड्डी-तारा रेड्डी वगैरे. आपल्याकडे कोणी वारीला जाऊन आलेला वारकरी भेटला तर त्याला दंडवत घातला तर तो विठ्ठलाला पोचतो असा समज आहे. त्याप्रमाणे ह्या सर्व विभूतींना मानाचा मुजरा करायचा असेल तर चंद्रकांत वानखडेंचे कौतुक करायला हवे, त्यांची प्रशस्ती करायला हवी. कारण ह्या सर्वांचे तत्वज्ञान ते प्रत्यक्ष जगले आहेत आणि त्याचीच हे पुस्तक म्हणजे एक अप्रतीम दास्तान आहे.
मी नोकरी करणार नाही असे ठरवतोय, पण न जाणो एखाद्या कमकुवत क्षणी माझा भरोसा तुटला तर उगाच ती तशी करणेच जमू नये, असे किल्ला सर झाल्यावर दोर कापून टाकण्यासारखे आपल्या निर्णयावरचे धैर्य आजकाल कुठेच पाहायला मिळत नाही. आणि इथे फारशी खळखळ व बोभाटा न करता वानखडे चक्क आपली एम.ए. अर्थशास्त्राची पदवी जाळून टाकतात, ह्या अपार धैर्याचे दर्शन होते. शिवाय त्याबद्दल कुठल्याही मोहाच्या क्षणी उपरतीचे बोल येत नाहीत. ही टोकाची निष्ठा मोठी विलोभनीय आहे.
माझ्या आदर्श व्यक्तींचे तत्वज्ञान मी ऐकण्यापेक्षा आचरले, असे अभिमानाने म्हणत असतानाच जमीनीवरचे भान ठेवणारा हा कार्यकर्ता जेव्हा म्हणतो की मी माझ्या आदर्शांना माझ्या उरावर बसू दिले नाही, तेव्हा त्यांच्या ह्या स्थितप्रज्ञेचे करावे तेवढे कौतुक कमीच पडते. एस.एम.जोशींचा अपमान होतो, पण तरीही तो माफ करताना ते म्हणतात की माझा अपमान माझ्याशिवाय दुसरा कोण करणार ? किंवा जयप्रकाश नारायण ह्यांच्या पत्नींनी गांधीजींसमोर ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती, म्हणून तिचा जयप्रकाश जन्मभर आदर करतात, ह्या प्रसंगांतून त्या देव माणसांचे अलौकिकत्व जसे दिसते तशीच वानखडेंची मर्मग्राही विद्यार्थ्याची दृष्टीही दिसते. हे ह्या मोठ्या माणसांचे पैलू अजून तरी कोणी असे सांगितलेले मला माहीत नाही. पुस्तकात ह्याच मोठ्या व्यक्तींचे मातीचे पायही लेखकाने उद्विगतेने दाखविलेले आहेत. तरीही, ज्या शरद जोशींचे मातीचे पाय वानखडे दाखवतात त्यांना "१०० टक्के महिला ग्रामपंचायतीचे" श्रेय देताना सौ. माया वानखडे नतमस्तक होतात. हा कधी न दिसणारा समतोल, ह्या जोडप्यात पाहून कोणालाही धन्य व्हावे.
सत्याच्या लढाईत त्या त्या क्षणी आपल्याला जे सत्य म्हणून वाटलेले असते ते नंतर तितके सत्य वाटत नाही हे कबूल करण्याला फार मोठे खुले मन असावे लागते व ते वानखडेंकडे आहे. हे दिसते, जेव्हा ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीसंबंधी लिहितात. त्याक्षणी त्यांना विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे व त्याने समता स्थापावी असे मनोमन वाटलेले असते. ( गंमत ही की ह्या नामांतराला माझ्या वडिलांनी विरोध केलेला होता, तो का, हे मला कधी कळले नाही. ). त्या चळवळीत वानखडे कारावास भोगतात, निवडणूक लढवतात, हरतात वगैरे हे सर्व रणधुमाळीत होते. नामांतर होतेही. पण आज ते म्हणतात की नामांतराने समता स्थापन व्हायला काही मदत झाली असे दिसले नाही. म्हणजे चळवळ रूढ अर्थाने यशस्वी होते पण तत्वार्थाने फसते ! असेच मोठे मार्मिक निरिक्षण ते शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे करतात. अनेक कारणांनी शेतकर्‍यांची चळवळ फसली, शरद जोशी शेतकर्‍यांच्या कच्च्या मालाच्या पिळवणुकीला उठाव देण्यात यशस्वी झाले, हे ते कबूल करतात व त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही एक प्रकारची मूक चळवळच होती व तीच यशस्वी होतेय ह्या त्यांच्या निरिक्षणातली एक प्रकारची खिन्न काव्यात्मकता पाहून गहिवरायला होते.
कोणत्या तत्वांसाठी कार्यकर्त्याने त्यांच्या व्यक्तिगत जीवनात कसे जगावे ह्याचा आदर्श वस्तुपाठच जणु, ह्या वानखडे दांपत्याची ही जीवनगाथा आहे. आजकालच्या लौकिक प्रथेत असे जगणारे हे बहुदा शेवटचेच जोडपे ठरावे इतके भयाण बदल सध्याच्या सामाजिक कार्यात आपण पाहतो आहोत. त्यामुळेच जेव्हा वानखडे म्हणतात की आता लोक खेटराने बदडतील ते पहिल्यांदा एनजीओ वाल्यांना तेव्हा त्यांच्या नेमक्या निदानाचे महत्व पटते.
पुस्तक एकादमात वाचून होते व पटते की सोसलेल्याला कळांचा इतिहास भूगोल ज्यास्त जवळून माहीत असतो. ह्या न्यायाने, आजकालच्या मरगळीत, चळवळींच्या योग्यायोग्यतेचा उहापोह वानखडे दांपत्याने, नव्या जोमाने, व नव्या पिढीसाठी नवीन प्रकारच्या चळवळींसंबंधी करावा असे सुचवावेसे वाटते. ( जसे: मगरपटट्यासारखे शेतकर्‍यांना भागीदारी देणारे प्रकल्प, किंवा परदेशात शेती करून शेतमाल आयात करणे, किंवा कंत्राटी सामूहिक/सामुदायिक शेती करणे, लव्हासा सारखी शहरे वसवण्यासाठी शेतकर्‍यांनी भागीदारी स्वीकारणे वगैरे ). कारण आजकालची स्थिती रामदास म्हणतात तशीच आहे:
"अखंड ऐशी घालमेली । पूर्वापार होत गेली ॥ आताहि तैशीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥"


--------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

---------------------------------------------
सोबत: पुस्तकाचे मुखपृष्ठाचे चित्र

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

वाचाल तर वाचाल----४ "शाळा"
लेखक: मिलिंद बोकील
मौज प्रकाशन, पाने:३०३ किं:२०० र
बोकीलांची कादंबरीची "शाळा"
"त्याने माझी शाळाच घेतली", असे आपण कधी म्हणतो तेव्हा "शाळा" म्हणजे पाठ असे असते. मिलिंद बोकील ह्यांची "शाळा" ही कादंबरी, ही एक प्रकारची "कादंबरीची शाळाच" आहे.
पौगंडावस्थेतल्या एका शाळकरी मुलाचे जग असून असून कितीसे मोठे असेल, असे वाटत, आपण वाचायला सुरुवात करतो न करतो तोच, ३०० पाने केव्हा सरली ते ध्यानातही येत नाही. एका शाळकरी मुलाच्या वासरू-प्रेमाची ( काफ-लव्ह ) ही कहाणी मोठी सोज्वळ व अगदी खरी, अशी चितारलेली आहे. चार टवाळक्या करणारे मित्र, शाळेतले नमूनेदार शिक्षक-शिक्षिका, वर्गातली मुलं-मुली ह्यांचे पोरकट वागणे, कुटुंबाचा मोठ्या होणार्‍या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोण, मुलींबद्दल वाटणारे हुरहूर लावणारे पहिलेवहिले प्रेम, ऐकीव माहीतीवर आधारलेल्या लैंगिकतेचा साक्षात्कार, त्या लैंगिकतेचे पहिलेवहिले धडे गिरवणे, आणि ह्या सगळ्या जाणिवेकडे एका निखालस प्रामाणिकपणे व उत्कटतेने पाहणे, असे हे साधेसुधे जग आहे. त्यातील जाणीवांना विश्वरूप देऊन, वाचकाला खिळवत ठेवण्याचे कसब कादंबरीत दाखवणे अवघडच होते. पण ते बोकीलांनी फार अप्रतीमपणे इथे साधले आहे व एका अगदी साध्या विषयावरही कादंबरी कशी लिहावी ह्याचा एक आदर्श वस्तुपाठच दिला आहे.
पौगंडावस्थेतल्या नववीतल्या मुलाचे जाणीव-विश्व भोळेपणाचे तर खरेच पण ते तितक्याच प्रामाणिकपणे मांडण्यासाठी हा मुलगाच निवेदन करतो आहे अशी कादंबरीची अभिव्यक्ती ठेवली आहे. कथानकाच्या ओघात काही काही भाकितेही लेखकाने उलगडली आहेत. जसे, आपण मित्र कसे व कोणते मिळवतो. योगायोगाने, समानधर्म पाहून, निवडून की एखाद्या अनामिक ओढीने ? इथे नायकाला वर्गातल्या धटिंगण, चालू मुलांचेच आकर्षण का वाटते हे मोठ्या खुबीने दाखविले आहे. ह्याच्यामुळे त्याला शाळा सोडायची पाळी येते, बेदम मार बसतो, तो म्हणतोही की तुझ्या सल्ल्यामुळे हे झाले, पण त्या सल्ल्यामागचा हुरहुर कमी करण्याचा प्रांजळ प्रयत्नही त्याला दिसलेला असतो व त्यालाच दाद म्हणून टिकलेली ही मैत्री असते. मित्रांचे दिलदारपण कसे केव्हा मोहक दिसेल त्याचा हा लेखाजोखा आहे व तेच मैत्रीचे रहस्य आहे.
ह्या वयातल्या लैंगिकतेचे वर्णन, समर्थन, चित्रण हे मोठेच जोखमीचे काम आहे. ते वर्णिताना लेखकाने भीडभाड न ठेवता मुले बोलतात तशीच बोली वापरली आहे. त्यामुळे ते खरे ठरते. कथानकाचा काळ आणीबाणीतला ( १९७७ ), म्हणजे जवळ जवळ तीस वर्षांपूर्वीचा. मुला-मुलींनी एकमेकाकडे चोरून पाहणे, वर्गात मुलामुलींच्या जोड्या जमवणे व त्यावरून चिडवणे, मुलींचे मास्तरांवर प्रेम असणे, त्यासाठी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणे, मुलींचा पाठलाग करणे, त्यांच्याशी बोलू पाहणे, तरूण नातेवाईकाने सलगीने प्रोत्साहन देणे, स्लीव्हलेस घातलेल्या शिक्षिकेचे उरोज दिसण्यासाठी पोरांनी फळ्यावर ( विषय, तारीख वगैरे ) उंचीवर लिहिणे, भाजी विकणार्‍या पोराने वाकलेल्या स्त्रियांचे भोपळे पाहणे, पोरांच्या कामुक विचाराने बाटल्या फुटणे, वगैरे सर्व प्रसंग मोठ्या संयमित रितीने लेखकाने हाताळलेले आहेत. त्यांना शारिरिक कामुकतेचे स्पर्श होऊ न देता ते एकप्रकारे सोवळे ठेवले आहेत. आजच्या लैंगिक उदारमतवादी जमान्यात ही शारिरिक घसट कटाक्षाने टाळणे हे त्याकाळाचे सोवळे रूप दाखवण्याचा प्रयत्न म्हणायचा की हे शारिरिक घसटीला घाबरणे म्हणायचे ? मुलामुलींना कधीच चुंबन घ्यावे, तसे प्रयत्न करावेत असे न वाटणे हे अनैसर्गिकच वाटते व त्याला मग वासरू-प्रेमाचा रंग राहिला नसता ह्या भीतीपोटी लेखकाने ते टाळावे हे मात्र खटकते. बाटल्या फुटतात ते बेधडक लिहिले आहे, मग हस्तमैथुन करणे, चुंबन, लगट करणे, शाळेतल्या मुलींनी गर्भार राहणे, ह्यात भीड का ? त्याकाळी ते कमी प्रमाणात असेल, पण होतच नव्हते, हे मात्र जरूर न पटण्यासारखे आहे. आत्ताची वासरं फारच लवकर मोठी होतात. त्यामुळे त्यांचं वासरू-प्रेम हे तितके सोज्वळ राहत नाही ही खरी ह्यामागची अडचण आहे.
असेच जरा अनैसर्गिक पण उदात्त जाणिवेचे खटकते ते कुटुंब-जाणिवेचे. कादंबरीत मुलं-मुली आपापल्या कुटुंबात अगदी प्रामाणिकपणे आईवडिलांशी, मोठ्या भावाबहिणींशी अतीव मायेने, ममतेने वागताना चितारलेले आहे. पण त्याकाळीही पौगंडावस्थेला, भावंडाबद्दल असूया, आई-वडिलांबद्दल वैषम्य, ह्या जाणिवेंचे शाप होतेच. कारण ते तसे पुरातनच आहेत. पण त्यांचे चित्रण सोयीचे नसल्याने कटाक्षाने टाळलेले आहे. त्यामुळे आजच्या पालकांना आजकाल आपल्याच मुलांत हे दोष आहेत की काय असे वाटेल. चित्र सोज्वळ ठेवण्याच्या मोहापायी हे जोखीम न घेणे, सोयीस्कर झाले आहे. पण नायकाला आवडणार्‍या मुली बरोबर लागलीच संसार वगैरे थाटण्याची त्याला स्वप्ने पडावीत, नाईट स्कूल मध्ये जाऊन त्याने चौकशी करावी, पळून जाण्याचे मनसुबे रचावे हे मात्र कमालीचे गोड वाटणारे आहे.
कथाशयाला अनुरूप राहण्यासाठी निवेदन शैली ओघवती ठेवण्याची नितांत आवश्यकता होती. त्या निकडीमुळे लेखकाने बोली व प्रमाण भाषेचे मिश्रण कमालीच्या कौशल्याने केलेले आहे. जसे: एकेठिकाणी वाक्य आहे : "त्या वेळी सगळीकडे गारेगार हिरवं झालेले असे". बोलीतल्या "झालेलं"च इथे "झालेले" असे प्रमाणित रूप आहे. तर दुसरीकडे " तिने सुरवातीला विचारलं..." ह्यातली "सुरवात" बोलीतली तर नंतर "...लगेच तिकडे बसायला सुरुवात केली." ह्या ठिकाणी परत ती प्रमाणित होते. निवेदनात कुठेच पाल्हाळ लावलेले नाही. सर्व निवेदन "टु द पॉइंट" थाटाचे थेट वळणाचे आहे. त्यामुळे ते ओघवते राहते. ही रूढ शाळा चालू असताना मनातल्या शाळेत मुलं प्रेमाबद्दल शिकतात हे जसे मोहक वाटते, तसेच अजून ती नात्यांबद्दल, पैशाबद्दल, राजकारणाबद्दल, लैंगिकतेबद्दल काय काय शिकतात ते लेखकाने दाखवले असते तर अजूनही ते रोचक झाले असते !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

वाचाल तर वाचाल---२
"डिसग्रेस" ( बेअब्रू ) ले: कोएटझी जे.एम.
कोएटझी हे साउथ आफ्रिकन असून सध्या ऑस्ट्रेलियात राहतात. त्यांना २००३ सालचे नोबेल पारितोषिक ( साहित्य ) मिळाले असून दोन वेळा बुकर प्राइझहि मिळालेले आहे. ते फारसे लोकात मिसळत नाहीत व बुकर प्राइझ घेण्यासाठी ते हजरही नव्हते. ते शाकाहारी व पशुमित्र असून ते त्यांच्या साहित्यात मुक्तपणे पहायला मिळते. व्हिएतनाम युद्धाविरुद्ध आंदोलने केल्यामुळे त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले तर नाहीच उलट अमेरिका सोडून त्यांना साउथ आफ्रिकेत प्राध्यापक म्हणून जावे लागले. अमेरिकेतले त्यांचे पीएच.डी. सॅम्युएल बेकेट ह्याच्या साहित्यशैलीवर होते. त्यांच्या सर्व कादंबर्‍यात "डिसग्रेस" ही कादंबरी खूप गाजलेली ( १९९९) आहे.
दोन लग्ने, दोन घटस्फोट, आणि स्वछंदी जीवन जगणार्‍या साउथ आफ्रिकेतल्या एका उतारवयातल्या प्राध्यापकाची ही गोष्ट आहे. कादंबरीला सुरुवात होते तीच मुळी वेश्येकडे जाण्यावरून. पण त्यातही वेगळेपण असे की हे तसे संयमितच वाटावे अशा प्रकारची ही वेश्या व आठवड्यातून एकदाच ते जाणे. मग हे वासूपण जरा बहकते व तो नकळत एका पोरीच्या नादी लागतो. ती त्याची विद्यार्थीच असते. सहज घरी येते, कॉलेजात भेटत राहते. शरीरसंबंध वाढत जातात. तिचा एक मित्र असतो ज्याला हे पसंत नसते व मुलगीही घाबरते. मग ती कॉलेजच सोडते. तिचे वडील येऊन तक्रार नोंदवतात. चौकशी होऊन ह्याची नोकरी जाते. पण तो प्रकरण नाकबूल करीत नाही तर परिमार्जन म्हणून सोडून जातो. काही क्षण आपण ईरॉस देवतेचे गुलाम झालो होतो असे म्हणत तो वासनेचे थोडा काळ समर्थन करतो, प्राण्यात हे कसे नैसर्गिक आहे वगैरेचे दाखले देतो खरे, पण बेअब्रू झाल्याची त्याला अपार टोचणी लागून राहते.
तो मग भटकत भटकत आपल्या मुलीकडे जातो. ही एका माळरानावर प्राण्यांची देखभाल करीत त्यांचे पांजरापोळ-सारखा कॅंप चालवीत असते. २०/२२ वर्षांची व एकटीच असते. तो तिथे राहून तिला मदत करतो. दरम्यान काही गुंड हल्ला करतात, तिच्यावर बलात्कार करतात. मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे त्याला स्वत: केलेल्या स्वैराचाराचे अतीच दु:ख व्हायला लागते. तो एक प्रकारचा आपण केलेला बलात्कारच होता अशी तो स्वत:ची निर्भत्सना करतो. मुलगी ह्या बलात्कारातून गर्भवती होते पण बलात्कार करणार्‍याचा फारसा तिरस्कार करत नाही. शेवटी तिथूनही तो मुक्काम हलवतो. ज्या मुलीमुळे त्याची बेअब्रू झालेली असते तिच्या गावात येऊन तिच्या आईवडिलांनाच परिमार्जन म्हणून येऊन भेटतो. जिचे आयुष्य आपण बरबटवले तिच्याच आईवडिलांच्या घरी जेवायला जावे व क्षमा मागावी हा देखावाच अपार गोंधळाच्या भावना दाखविणारा आहे. त्याची माफी त्यांना दिलेल्या दु:खाबद्दल तर असतेच पण झाल्या प्रकाराबद्दल त्याची भावना वेगळीच असते. मी तुमच्या मुलीशी आलेल्या संबंधात ( वयातला फरक असूनही ) संगीत ( लिरिकल ) भरू शकलो नाही, नुसताच शरीरसंबंध आला ही खंत व्यक्त करतो. मुलीच्या वडिलांना एका खर्‍या ख्रिश्चनाप्रमाणे ह्याला माफी द्यावी असा विचार येतो व तुला परत नोकरी मिळविण्यासाठी तक्रार मागे घेऊ का असे तो विचारतो. पण प्राध्यापक म्हणतो मी फक्त माझ्या भावना कळवायला आलो होतो, व असे म्हणून तिथून प्रयाण करतो. कादंबरीच्या शेवटाला प्राध्यापक परत कॉलेजात जाऊन सगळे कसे आलबेल चालले आहे ते पाहून येतो. त्याला बायरन कवीच्या रखेलीवर एक ऑपेरा लिहायचा असतो त्या तुलनेने ज्या मुलीवर ह्याने अत्याचार केला असतो तिचे नाटक पाहून येतो. शेवटी प्राध्यापकाची मुलगी बाळंत होणार असते म्हणून तिच्याकडे जातो व तिथे काळजी घेता येत नाही म्हणून सोडून द्याव्या लागणार्‍या कुत्र्यावर शेवटाचे दृश्य कादंबरी दाखवते जे एक प्रकारे प्राध्यापकाचेच रूपक असल्यासारखे वाटते.
कादंबरीत लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे पैलू हरघडी दिसतात. जसे टाकलेल्या कुत्र्यांची काळजी घेताना लेखक म्हणतो की त्यांना फसवण्याचा विचारही करू नका कारण जनावरांना तुमच्या विचारांचाही वास येतो. हे एका प्रेमळ पशुमित्राची छबीच दाखवते. लेखक भाषाशास्त्राचा प्राध्यापक होता ह्याची जाण सबंध कादंबरीभर खुणावत राहते. जसे एके ठिकाणी लेखक म्हणतो की आत्ताचा फ्रेंड हा शब्द पूर्वी फ्रेऑन व नंतर फ्रेऑन्ड असा बदलत बदलत झाला आहे. तसेच वर्डस्वर्थ व बायरन कवींची खास वर्णने आपल्याला पहायला मिळतात.
उतारवयात एक साहस म्हणून आपण आपल्याच शिष्येशी संबंध ठेवला व त्यापायी सर्व आयुष्याची वाताहत करून घेतली ह्याबद्दल लेखक पस्तावा कमी दाखवतो व एखाद्या क्षणीच्या भावनेच्या भरात आपण वाहून गेलो त्याला चांगले रूप देऊ शकलो नाही ह्याची खंत प्राध्यापकाला ज्यास्त बोचत राहते व इथेच नेहमीच्या बलात्कार्‍याबद्दल वाटणारी घृणा जाऊन आपल्याला ह्या अजब प्राध्यापकाबद्दल एक अजीबसी कणव वाटायला लागते. हा भावनेचा एक वेगळाच पोत दाखवणे ह्या कादंबरीचे खासे वैशिष्ट्य आहे व ते नक्कीच उठावदार झालेले आहे. इंग्रजी अगदी खास शैलीची असून खुमासदार आहे. वाचलेच पाहिजे असेच हे पुस्तक आहे.

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

" डिसग्रेस " ले: जे.एम. कोएटझी
पेन्ग्विन प्रकाशन, १९९९, ( बुकर पुरस्कार प्राप्त )
पाने २२४ किं: २५० रु. ( ऑनलाइन उपलब्ध )

मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

कायद्याची बाब, कबूलीजबाब ! "द कन्फेशन"
( ई-बुक द्वारे)
लेखक: जॉन ग्रिशॅम
डबल-डे, प्रकाशन,न्यू-यॉर्क,
पाने:३७५ किंमत: १५डॉलर
मला वॉल स्ट्रीट जर्नलचा मागच्या आठवड्यात एक ई-मेल आला. त्यात ह्या महिन्याच्या ठळक बातम्या होत्या तिथल्या. त्यात एक होती की, मागच्याच महिन्यात अमेरिकेत प्रसिद्ध कादंबरीकार श्री.जॉन ग्रिशॅम ह्यांचे २४ वे पुस्तक "द कन्फेशन" हे एकाचवेळी पक्क्या बांधणीत व ई-बुक द्वारे प्रसिद्ध झाले. अमेरिकेत सध्या पुस्तक विक्रेत्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत, ते ई-बुक मुळे. तिथे शाळकरी मुले, तरुण व सर्वचजण आजकाल पुस्तके ई-बुक स्वरूपातच वाचतात. ह्या प्रकाशकांना एक अजब अनुभव आला की एकाचवेळी ई-बुक प्रसृत करूनही पारंपारिक पुस्तकाची मागणी घटली नाही तर उलट वाढली. ह्या अगोदर द फर्म, द पेलिकन ब्रीफ, द चेंबर, द रेनमेकर, द स्ट्रीट लॉयर, द असोशिएट, अशी कायदेजगतातली बेस्ट सेलर्स देणारा हा सिद्धहस्त लेखक, आणि त्याचे हे २४ वे पुस्तक ! ( वॉल स्ट्रीट जर्नलच्या ई-मेल नंतर मी हे पुस्तक ई-बुक म्हणून उतरवूण घेतले व ते ई-बुकच वाचले व ही पुस्तक-ओळख संगणकाद्वारेच पाठवीत आहे. असा हा सर्व डिजिटल मामला !)
एका मुलीवर बलात्कार होऊन तिचा खून होतो, ( तिचा मृतदेह मात्र सापडत नाही ), तिच्याच कॉलेजातल्या एका मुलाच्या साक्षीवरून दुसर्‍या एका मुलाला अटक होते. त्यांचे प्रेमसंबंध असतात, व नंतर तो असूयेपोटी तिला मारतो असा संशय असतो. त्याचा तुरुंगात दबाव आणून कबूलीजबाब घेतात, साक्ष व कबूलीजबाब ह्याच्या जोरावर खटला भरून त्याला देहांताची शिक्षा होते. एक वकील त्याचा खटला, अपीले, सार्वजनिक हितापोटी चालवतो. व अनेक अपीले होऊन शेवटी त्याला खतम करण्याचा दिवस येऊन ठेपतो. नेमके दोन दिवस आधी एका चर्च मध्ये पाद्रयाला भेटायला एक माणूस येतो. त्याला कबूलीजबाब ( चर्च मधला) द्यायचा असतो की त्यानेच त्या मुलीचा खून केला आहे. ह्या माणसाला ब्रेन टयूमर झालेला असतो व तो आता केव्हाही मरणार असतो. त्याने आतापर्यंत बरेच बलात्कार केलेले असतात व त्यातलीच शिक्षा भोगून झाल्याने तो दुसर्‍याच दिवशी सुटणार असतो. मरताना तरी काही खोटेपणा नको म्हणून त्याला ह्या मुलीचा खून कबूल करायचा असतो. शिवाय चुकीच्या माणसाला उगाच फाशी देताहेत त्याचेही खापर त्याच्यावर येऊ नये व तो निरपराध मुलगा सुटावा असे त्याला वाटत असते. हे ऐकून पाद्रयाची पंचायत होते. नुसता खुन्याचा कबूलीजबाब ऐकून घेतला व पोलिसांना सांगितले नाही तर डबल संकट अवतरणार असते. चुकीच्या खुन्याची शिक्षा रद्द करण्यात मदत केली नाही व खर्‍या गुन्हेगाराला पकडून दिले नाही म्हणून. तो खर्‍या खुन्याशी बर्‍याचवेळा भेटतो, त्याला सहानुभूती दाखवतो, मदत करतो. त्यात अजून माहीती मिळते की मुलीवर बलात्कार करून त्याने तिला कुठे पुरले आहे ते त्यालाच माहीत असते.
मग पाद्रयाची धावपळ सुरू होते. तो वकीलाला गाठतो. तशात दोघे खुनी काळे असतात व पोलीस व ज्यूरी गोरे असतात. त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण झालेला असतो. अमेरिकेत फाशीची शिक्षा सगळ्याच प्रांतात रद्द झालेली नाही म्हणून मानव-अधिकार वाली मंडळी फाशीविरुद्ध चळवळ करीतच असतात. पण गोरे अधिकारी बधत नाहीत. तणाव ज्यास्तच वाढतो. अपीले रद्द होतात. तरुण खुन्याला ( चुकीच्या ) इंजेक्शन देऊन देहांताची शिक्षा होतेही. कोणी काहीही करू शकत नाही. पाद्रय़ावरचे व वकीलावरचे धर्म-संकट अधिकच दाट होते. मग ते खर्‍या खुन्याला घेऊन मुलीला जिथे पुरले होते ते शोधून काढतात. त्यालाही नऊ वर्षे होऊन गेलेली असतात, तशात खुन्याला ब्रेन-टयूमरमुळे चकरा वगैरे त्रास होत असतो. पोलीस हे सगळे करायला तयार नसतात म्हणून वकील व पाद्री साक्षीदारांच्या साक्षीने व व्हिडीओवर हे सर्व करतात. शेवटी हे सर्व प्रकरण मीडीयात जाऊन दाखवतात तेव्हा पोलीस व न्यायसंस्थेतले अधिकारी खडबडून जागे होतात. प्रॉसिक्यूटर व न्यायाधीश बाई ह्यांचे प्रेमसंबंध असल्याचे उघडकीला येते व मग रीतसर वकील सर्वांवर खटले भरतो, खर्‍या खुन्याला अटक होते, चुकीच्या माणसाला फाशी दिल्याबद्दल न्यायाधीश क्षमा मागतात वगैरे सर्व न्यायाला धरून शेवट होतो.
अमेरिकेसारख्या प्रगत देशातही केवळ कामाच्या सोयीसाठी पोलीस-तपास अधिकारी कसे दबाव आणून कबूलीजबाब लिहून घेतात, साक्षीदारांना खोटी प्रलोभने दाखवून साक्षी कशा फिरवून घेतात, वर्णद्वेशाच्या पार्श्वभूमीवर अजूनही तिथे कसे काळे-गोरे हे वाद टिकून आहेत, आणि केवळ माणुसकीपोटी कसा एक पाद्री व मरणारा खरा खुनी खर्‍या खुनाला वाचा फोडतो हे या कादंबरीत फार बारकाईने नोंदवलेले आहे. कादंबरीतल्या घटना २००७ साली घडलेल्या आहेत, तरीही अमेरिकेत फाशीची शिक्षा होणे, वर्णद्वेशाच्या दंगली होणे, अशा नोंदी संशय निर्माण करतात. अशी कपोलकल्पित कथानक असलेली कादंबरी आपण का वाचावी ? केवळ मनोरंजनासाठी ? का हेच आपले कठोर वास्तव आहे व त्यातले बारकावे आपल्या लक्षात यावेत म्हणून ? खोटे वाटत असेल तर नुकतेच गाजत असलेले दिल्लीच्या डिआयजी राठोड ह्यांचे प्रकरण आठवून पहा. त्यांनी मुलीवर बलात्कार केला, तिला आत्महत्या करायला भाग पाडले, नातेवाईकांवर खोटे खटले भरले व आता तर सीबीआय ने त्यांच्याविरुद्ध पुरावा नाही म्हणून केसच बंद केली आहे, व त्यांना जामीनही मिळाला आहे. मानवाअधिकारासाठी गुजरात दंगलीचे खटले लढणार्‍या तीस्ता सेटलवाडच्या एकेकाळच्या सहकार्‍याने भेद खोलला आहे की तिने साक्षीदारांना पढवले व हवालाद्वारे पैसे दिले. ह्याच गुजरात दंगलींच्या बेस्ट बेकरी केस मध्येही ज्या मुलीच्या कबूलीजबाबामुळे खटला निकाली लागला त्याच मुलीला शेवटी साक्ष फिरवल्यामुळे शिक्षा झाली. असे प्रत्यही घडत असताना ह्या वास्तवाला आपल्याला कायदेशीरपणे सामोरे जाणे भाग आहे, खरे खोटे आपल्याला तुंबळ प्रतिवादानंतरच कळणार आहे व त्यासाठीच कायद्याचा पुरेपूर उहापोह असलेली ही कादंबरी वाचणे गरजेचे आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
सोबत: कादंबरीच्या मुखपृष्ठाचे चित्र