वाचाल तर वाचाल---२
"डिसग्रेस" ( बेअब्रू ) ले: कोएटझी जे.एम.
कोएटझी हे साउथ आफ्रिकन असून सध्या ऑस्ट्रेलियात राहतात. त्यांना २००३ सालचे नोबेल पारितोषिक ( साहित्य ) मिळाले असून दोन वेळा बुकर प्राइझहि मिळालेले आहे. ते फारसे लोकात मिसळत नाहीत व बुकर प्राइझ घेण्यासाठी ते हजरही नव्हते. ते शाकाहारी व पशुमित्र असून ते त्यांच्या साहित्यात मुक्तपणे पहायला मिळते. व्हिएतनाम युद्धाविरुद्ध आंदोलने केल्यामुळे त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले तर नाहीच उलट अमेरिका सोडून त्यांना साउथ आफ्रिकेत प्राध्यापक म्हणून जावे लागले. अमेरिकेतले त्यांचे पीएच.डी. सॅम्युएल बेकेट ह्याच्या साहित्यशैलीवर होते. त्यांच्या सर्व कादंबर्यात "डिसग्रेस" ही कादंबरी खूप गाजलेली ( १९९९) आहे.
दोन लग्ने, दोन घटस्फोट, आणि स्वछंदी जीवन जगणार्या साउथ आफ्रिकेतल्या एका उतारवयातल्या प्राध्यापकाची ही गोष्ट आहे. कादंबरीला सुरुवात होते तीच मुळी वेश्येकडे जाण्यावरून. पण त्यातही वेगळेपण असे की हे तसे संयमितच वाटावे अशा प्रकारची ही वेश्या व आठवड्यातून एकदाच ते जाणे. मग हे वासूपण जरा बहकते व तो नकळत एका पोरीच्या नादी लागतो. ती त्याची विद्यार्थीच असते. सहज घरी येते, कॉलेजात भेटत राहते. शरीरसंबंध वाढत जातात. तिचा एक मित्र असतो ज्याला हे पसंत नसते व मुलगीही घाबरते. मग ती कॉलेजच सोडते. तिचे वडील येऊन तक्रार नोंदवतात. चौकशी होऊन ह्याची नोकरी जाते. पण तो प्रकरण नाकबूल करीत नाही तर परिमार्जन म्हणून सोडून जातो. काही क्षण आपण ईरॉस देवतेचे गुलाम झालो होतो असे म्हणत तो वासनेचे थोडा काळ समर्थन करतो, प्राण्यात हे कसे नैसर्गिक आहे वगैरेचे दाखले देतो खरे, पण बेअब्रू झाल्याची त्याला अपार टोचणी लागून राहते.
तो मग भटकत भटकत आपल्या मुलीकडे जातो. ही एका माळरानावर प्राण्यांची देखभाल करीत त्यांचे पांजरापोळ-सारखा कॅंप चालवीत असते. २०/२२ वर्षांची व एकटीच असते. तो तिथे राहून तिला मदत करतो. दरम्यान काही गुंड हल्ला करतात, तिच्यावर बलात्कार करतात. मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे त्याला स्वत: केलेल्या स्वैराचाराचे अतीच दु:ख व्हायला लागते. तो एक प्रकारचा आपण केलेला बलात्कारच होता अशी तो स्वत:ची निर्भत्सना करतो. मुलगी ह्या बलात्कारातून गर्भवती होते पण बलात्कार करणार्याचा फारसा तिरस्कार करत नाही. शेवटी तिथूनही तो मुक्काम हलवतो. ज्या मुलीमुळे त्याची बेअब्रू झालेली असते तिच्या गावात येऊन तिच्या आईवडिलांनाच परिमार्जन म्हणून येऊन भेटतो. जिचे आयुष्य आपण बरबटवले तिच्याच आईवडिलांच्या घरी जेवायला जावे व क्षमा मागावी हा देखावाच अपार गोंधळाच्या भावना दाखविणारा आहे. त्याची माफी त्यांना दिलेल्या दु:खाबद्दल तर असतेच पण झाल्या प्रकाराबद्दल त्याची भावना वेगळीच असते. मी तुमच्या मुलीशी आलेल्या संबंधात ( वयातला फरक असूनही ) संगीत ( लिरिकल ) भरू शकलो नाही, नुसताच शरीरसंबंध आला ही खंत व्यक्त करतो. मुलीच्या वडिलांना एका खर्या ख्रिश्चनाप्रमाणे ह्याला माफी द्यावी असा विचार येतो व तुला परत नोकरी मिळविण्यासाठी तक्रार मागे घेऊ का असे तो विचारतो. पण प्राध्यापक म्हणतो मी फक्त माझ्या भावना कळवायला आलो होतो, व असे म्हणून तिथून प्रयाण करतो. कादंबरीच्या शेवटाला प्राध्यापक परत कॉलेजात जाऊन सगळे कसे आलबेल चालले आहे ते पाहून येतो. त्याला बायरन कवीच्या रखेलीवर एक ऑपेरा लिहायचा असतो त्या तुलनेने ज्या मुलीवर ह्याने अत्याचार केला असतो तिचे नाटक पाहून येतो. शेवटी प्राध्यापकाची मुलगी बाळंत होणार असते म्हणून तिच्याकडे जातो व तिथे काळजी घेता येत नाही म्हणून सोडून द्याव्या लागणार्या कुत्र्यावर शेवटाचे दृश्य कादंबरी दाखवते जे एक प्रकारे प्राध्यापकाचेच रूपक असल्यासारखे वाटते.
कादंबरीत लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे पैलू हरघडी दिसतात. जसे टाकलेल्या कुत्र्यांची काळजी घेताना लेखक म्हणतो की त्यांना फसवण्याचा विचारही करू नका कारण जनावरांना तुमच्या विचारांचाही वास येतो. हे एका प्रेमळ पशुमित्राची छबीच दाखवते. लेखक भाषाशास्त्राचा प्राध्यापक होता ह्याची जाण सबंध कादंबरीभर खुणावत राहते. जसे एके ठिकाणी लेखक म्हणतो की आत्ताचा फ्रेंड हा शब्द पूर्वी फ्रेऑन व नंतर फ्रेऑन्ड असा बदलत बदलत झाला आहे. तसेच वर्डस्वर्थ व बायरन कवींची खास वर्णने आपल्याला पहायला मिळतात.
उतारवयात एक साहस म्हणून आपण आपल्याच शिष्येशी संबंध ठेवला व त्यापायी सर्व आयुष्याची वाताहत करून घेतली ह्याबद्दल लेखक पस्तावा कमी दाखवतो व एखाद्या क्षणीच्या भावनेच्या भरात आपण वाहून गेलो त्याला चांगले रूप देऊ शकलो नाही ह्याची खंत प्राध्यापकाला ज्यास्त बोचत राहते व इथेच नेहमीच्या बलात्कार्याबद्दल वाटणारी घृणा जाऊन आपल्याला ह्या अजब प्राध्यापकाबद्दल एक अजीबसी कणव वाटायला लागते. हा भावनेचा एक वेगळाच पोत दाखवणे ह्या कादंबरीचे खासे वैशिष्ट्य आहे व ते नक्कीच उठावदार झालेले आहे. इंग्रजी अगदी खास शैलीची असून खुमासदार आहे. वाचलेच पाहिजे असेच हे पुस्तक आहे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" डिसग्रेस " ले: जे.एम. कोएटझी
पेन्ग्विन प्रकाशन, १९९९, ( बुकर पुरस्कार प्राप्त )
पाने २२४ किं: २५० रु. ( ऑनलाइन उपलब्ध )