"आपुला चि वाद आपणांसी"
लेखक: चंद्रकांत वानखडे, मनोविकास प्रकाशन, पाने:२१६, किं: २०० र
"सामर्थ्य आहे चळवळेचे । जो जी करील तयाचे".
आजकाल चळवळींचे दुर्भिक्ष्य आहे असे आपण म्हणावे तोच ईजिप्त, लिबिया, बाहरीनचे जनतेचे उठाव, जैतापूर प्रकल्पग्रस्तांची हजोरोंनी निदर्शने, तेलंगणाचे धुमसणे वगैरे चळवळी प्रकर्षाने डोळ्यासमोर येतात. इतके चळवळींचे सामर्थ्य आहे, हे संत रामदासांचे वचन मग लगेच पटावे. काठावर राहून मजा पाहणार्यांच्या सांगण्यापेक्षा, त्या मंजधारेत तावून सुलाखून होरपळलेल्या एखाद्या सच्च्या कार्यकर्त्याने ह्याबाबत काही सांगावे, हे आजकाल विरळाच. तसा योग नुकताच श्री. चंद्रकांत वानखडे ह्यांच्या "आपुला चि वाद आपणांसी" ह्या आत्मकथनाच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन होताना आला.
चंद्रकांत वानखडे हे मोठे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व ह्यासाठी आहे की त्यांना फारच मोठमोठया व्यक्तिमत्वांचा नुसताच सहवास लाभला असे नाही तर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. आणि ही माणसेही अशी ताडमाड उंचीची व देवत्वाचा स्पर्श झालेली होती. जसे: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले एस.एम. जोशी ; ना.ग.गोरे ; दादा धर्माधिकारी ; विनोबा भावे ; जयप्रकाश नारायण ; व्ही.पी.सिंग ; शेतकरी संघटनेचे शरद जोशी ; ग.प्र.प्रधान ;बाबासाहेब ; अण्णा रेड्डी-तारा रेड्डी वगैरे. आपल्याकडे कोणी वारीला जाऊन आलेला वारकरी भेटला तर त्याला दंडवत घातला तर तो विठ्ठलाला पोचतो असा समज आहे. त्याप्रमाणे ह्या सर्व विभूतींना मानाचा मुजरा करायचा असेल तर चंद्रकांत वानखडेंचे कौतुक करायला हवे, त्यांची प्रशस्ती करायला हवी. कारण ह्या सर्वांचे तत्वज्ञान ते प्रत्यक्ष जगले आहेत आणि त्याचीच हे पुस्तक म्हणजे एक अप्रतीम दास्तान आहे.
मी नोकरी करणार नाही असे ठरवतोय, पण न जाणो एखाद्या कमकुवत क्षणी माझा भरोसा तुटला तर उगाच ती तशी करणेच जमू नये, असे किल्ला सर झाल्यावर दोर कापून टाकण्यासारखे आपल्या निर्णयावरचे धैर्य आजकाल कुठेच पाहायला मिळत नाही. आणि इथे फारशी खळखळ व बोभाटा न करता वानखडे चक्क आपली एम.ए. अर्थशास्त्राची पदवी जाळून टाकतात, ह्या अपार धैर्याचे दर्शन होते. शिवाय त्याबद्दल कुठल्याही मोहाच्या क्षणी उपरतीचे बोल येत नाहीत. ही टोकाची निष्ठा मोठी विलोभनीय आहे.
माझ्या आदर्श व्यक्तींचे तत्वज्ञान मी ऐकण्यापेक्षा आचरले, असे अभिमानाने म्हणत असतानाच जमीनीवरचे भान ठेवणारा हा कार्यकर्ता जेव्हा म्हणतो की मी माझ्या आदर्शांना माझ्या उरावर बसू दिले नाही, तेव्हा त्यांच्या ह्या स्थितप्रज्ञेचे करावे तेवढे कौतुक कमीच पडते. एस.एम.जोशींचा अपमान होतो, पण तरीही तो माफ करताना ते म्हणतात की माझा अपमान माझ्याशिवाय दुसरा कोण करणार ? किंवा जयप्रकाश नारायण ह्यांच्या पत्नींनी गांधीजींसमोर ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती, म्हणून तिचा जयप्रकाश जन्मभर आदर करतात, ह्या प्रसंगांतून त्या देव माणसांचे अलौकिकत्व जसे दिसते तशीच वानखडेंची मर्मग्राही विद्यार्थ्याची दृष्टीही दिसते. हे ह्या मोठ्या माणसांचे पैलू अजून तरी कोणी असे सांगितलेले मला माहीत नाही. पुस्तकात ह्याच मोठ्या व्यक्तींचे मातीचे पायही लेखकाने उद्विगतेने दाखविलेले आहेत. तरीही, ज्या शरद जोशींचे मातीचे पाय वानखडे दाखवतात त्यांना "१०० टक्के महिला ग्रामपंचायतीचे" श्रेय देताना सौ. माया वानखडे नतमस्तक होतात. हा कधी न दिसणारा समतोल, ह्या जोडप्यात पाहून कोणालाही धन्य व्हावे.
सत्याच्या लढाईत त्या त्या क्षणी आपल्याला जे सत्य म्हणून वाटलेले असते ते नंतर तितके सत्य वाटत नाही हे कबूल करण्याला फार मोठे खुले मन असावे लागते व ते वानखडेंकडे आहे. हे दिसते, जेव्हा ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीसंबंधी लिहितात. त्याक्षणी त्यांना विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे व त्याने समता स्थापावी असे मनोमन वाटलेले असते. ( गंमत ही की ह्या नामांतराला माझ्या वडिलांनी विरोध केलेला होता, तो का, हे मला कधी कळले नाही. ). त्या चळवळीत वानखडे कारावास भोगतात, निवडणूक लढवतात, हरतात वगैरे हे सर्व रणधुमाळीत होते. नामांतर होतेही. पण आज ते म्हणतात की नामांतराने समता स्थापन व्हायला काही मदत झाली असे दिसले नाही. म्हणजे चळवळ रूढ अर्थाने यशस्वी होते पण तत्वार्थाने फसते ! असेच मोठे मार्मिक निरिक्षण ते शेतकर्यांच्या आत्महत्येचे करतात. अनेक कारणांनी शेतकर्यांची चळवळ फसली, शरद जोशी शेतकर्यांच्या कच्च्या मालाच्या पिळवणुकीला उठाव देण्यात यशस्वी झाले, हे ते कबूल करतात व त्याचबरोबर शेतकर्यांच्या आत्महत्या ही एक प्रकारची मूक चळवळच होती व तीच यशस्वी होतेय ह्या त्यांच्या निरिक्षणातली एक प्रकारची खिन्न काव्यात्मकता पाहून गहिवरायला होते.
कोणत्या तत्वांसाठी कार्यकर्त्याने त्यांच्या व्यक्तिगत जीवनात कसे जगावे ह्याचा आदर्श वस्तुपाठच जणु, ह्या वानखडे दांपत्याची ही जीवनगाथा आहे. आजकालच्या लौकिक प्रथेत असे जगणारे हे बहुदा शेवटचेच जोडपे ठरावे इतके भयाण बदल सध्याच्या सामाजिक कार्यात आपण पाहतो आहोत. त्यामुळेच जेव्हा वानखडे म्हणतात की आता लोक खेटराने बदडतील ते पहिल्यांदा एनजीओ वाल्यांना तेव्हा त्यांच्या नेमक्या निदानाचे महत्व पटते.
पुस्तक एकादमात वाचून होते व पटते की सोसलेल्याला कळांचा इतिहास भूगोल ज्यास्त जवळून माहीत असतो. ह्या न्यायाने, आजकालच्या मरगळीत, चळवळींच्या योग्यायोग्यतेचा उहापोह वानखडे दांपत्याने, नव्या जोमाने, व नव्या पिढीसाठी नवीन प्रकारच्या चळवळींसंबंधी करावा असे सुचवावेसे वाटते. ( जसे: मगरपटट्यासारखे शेतकर्यांना भागीदारी देणारे प्रकल्प, किंवा परदेशात शेती करून शेतमाल आयात करणे, किंवा कंत्राटी सामूहिक/सामुदायिक शेती करणे, लव्हासा सारखी शहरे वसवण्यासाठी शेतकर्यांनी भागीदारी स्वीकारणे वगैरे ). कारण आजकालची स्थिती रामदास म्हणतात तशीच आहे:
"अखंड ऐशी घालमेली । पूर्वापार होत गेली ॥ आताहि तैशीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥"
--------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
---------------------------------------------
सोबत: पुस्तकाचे मुखपृष्ठाचे चित्र