सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

---------------------------------------------------------------------
वाचाल तर वाचाल---८

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"द नाईव्ह ऍंड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट"
लेखक: ओरहान पामुक ( नोबेल पारितोषिक, २००६)
पेनग्विन बुक्स, २००९,( भारतात २०११), पृ.२००, किं: १५ डॉलर,
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाबडा व बेरका कादंबरीकार ( ले: ओरहान पामुक, नोबेल विजेता,२००६)
आज इतकी वर्षे झाली दरवर्षी नोबेल पारितोषिके दिली जात आहेत, पण त्यांचा वकूब, मान, चांगलाच राखलेला आहे. त्यात वरील शीर्षकाचे पुस्तक असेच एका टर्किश लेखकाचे असून ते त्याने आपल्या आवडत्या कसबावर, कादंबरी लेखनावर, लिहिलेले आहे. नोबेल मिळाल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठाने नॉर्टन लेक्चर्ससाठी २००९ साली पामुक ह्यांना बोलावले होते. तीच ही भाषणे पुस्तकबद्ध केली आहेत.
द व्हाइट कॅसल; द ब्लॅक बुक; द न्यू लाइफ; माय नेम इज रेड; स्नो; इस्तंबूल:मेमरीज ऍंड द सिटी; आणि द म्युझियम ऑफ इनोसन्स ही ह्या लेखकाची पुस्तके प्रसिद्ध झालेली असून ह्या लेखकाला उदंड यश लाभलेले आहे. ( ७० लाख प्रती, ५० भाषात भाषांतरे, सिनेमे वगैरे). अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात लेखक तौलनिक वाङमयाचे प्राध्यापक असून वरील पुस्तक ज्या मॅन बुकर विजेत्या किरण देसाई ह्यांना अर्पिले आहे, त्यांजबरोबर ( २०१० पासून) शरीर-संबंध ठेवून आहेत. लेखकाने आजवर भरपूर विवाद भोगलेले आहेत. त्याच्यावर वाङमय-चौर्याचा आरोप झालेला आहे, आर्मेनियन व कर्डस्‌ लोकांची पूर्वी ओटोमन साम्राज्यात कशी कत्तल झालेली होती ह्या पामुक ह्यांच्या विधानावरून खटले दाखल झाले होते, आणि टर्कीच्या युरोपियन युनियन मध्ये प्रवेश देण्याच्या काळातच पामुक ह्यांना नोबेल मिळालेले होते. ह्या विवादांच्या झाकोळांतून अंमळ दूर सरूनच आपल्याला कादंबरीवरच्या एका कादंबरीकाराच्या मतांना सामोरे जाणे भाग पडते.
पामुक ह्यांचे एक लाडके तत्व आहे की दोन प्रकारचे कादंबरीकार असतात. एक उस्फूर्तपणे झपाटून भावनेच्या भरात लिहिणारा व दुसरा जीवनाचे तत्व जणू सापडल्याप्रमाणे त्या तत्वांबरहुकूम लिहिणारा ( बेरका). स्वत: पामुक एक प्राध्यापक, क्रिटिकल थियरी शिकलेले व शिकवणारे. तशात विषय एका प्रमुख साहित्यप्रकाराचा. नोबेलच्या मरातबाने अभ्यासपूर्ण असण्याची जबाबदारी पेलणारी ही भाषणे. त्यामुळे पुस्तकाकडून अपेक्षा भरमसाठ असतात. त्यामुळे सबंध भाषणभर लेखक जाणत्या व्यक्तिमत्वांच्या समर्थनाआडून आपली मते मांडतो आहे. जसे त्यात शिलरची मते आहेत तशीच टॉलस्टॉय, फ्लॉबर्ट, फॉर्स्टर, बोर्जेस, इलियट,फॉकनर, फूको, हाबरमास, डोस्टोव्हस्की, नॅबोकोव्ह, प्राउस्ट, लुकास, वगैरे दांडग्या मातब्बरांची तत्वेही समर्थनार्थ घेललेली आहेत. आपण कादंबरी वाचत असताना त्यातल्या मनोहारी देखाव्यांची जरूर दखल घेतो पण त्यापलीकडे कादंबरीचे काही केंद्र आहे का ह्याचा शोध घेत असतो असे लेखकाचे म्हणणे आहे. वाचकवादाचा पुरस्कार करीत लेखक म्हणतो की शब्दांना मूर्त चित्रे आपण वाचकच करीत असतो व ह्या कादंबरीच्या केंद्राकडे आपणच कादंबरीला नेत असतो. कादंबरीतल्या घडामोडी वास्तवाच्या निकषावर आपणच तर्काने पडताळून पहात असतो. तर्क कुतर्काच्या निबिड वास्तवात आपणच एका आशावादाने कादंबरीत मार्ग काढीत असतो. कादंबरीतली पात्रे जी वागतात त्यासंबंधी वा एकूणच नैतिकतेविषयी कादंबरीत नैतिक निवाडे जरूर असावेत पण ते एखाद्या देखाव्यासारखे कादंबरीतच असावेत. त्यांनी वाचक प्रभावित होऊन त्याने ते नैतिक निवाडे पात्रांना लागू करू नयेत असे पामुक ह्यांचे म्हणणे आहे. इथे अशाच एका प्राध्यापकाने व लिटररी थियरीवर बेतून कादंबरी लिहिणार्‍या नेमाडेंची हमखास आठवण होते. ते त्यांच्या "हिंदू" या कादंबरीत ज्ञानेश्वर, रामदास, बुद्ध, गांधी वगैरे मान्यवरांवर त्यांच्या पात्रांकरवी, निरनिराळ्या मतलबापोटी, यथेच्छ नैतिक फतवे काढतात व त्यात वाचकालाही आवाहन करतात. इथे पामुक ह्यांचा सल्ला बराच रास्त वाटतो तो असा की पात्रांनी त्यांचे नैतिक फतवे जरूर ठोकावेत पण लेखकाने त्यांचे समर्थन करीत वाचकांनाही त्यात गुंतवण्याचे प्रयोजन नव्हते. त्यामुळे कादंबरी हिणकसाकडे झुकते. कादंबरीच्या संहितेत उत्तम साहित्यिक गुण असतील तर त्यामुळे वाचकाला काही अप्रतीम सापडल्याचे भान येते व त्यामुळे तो कादंबरीतल्या इतर अनाकलनीय वा फसलेल्या भागांकडे दुर्लक्ष्य करू शकतो. हे पामुक ह्यांचे निरिक्षणही हिंदूत छान लागू होते कारण नेमाडेंचे त्यात काही हातखंडा असलेले साहित्यप्रकार असल्याने वाचकांना ते सुखावतात हे आपण पाहतोच.
पामुक ह्यांनी असाही एक सल्ला दिलेला आहे की कादंबरीच्या कथात्मकतेत इतके माफकच घटक असावेत की त्यामुळे वाचकाला पात्रांची सरमिसळ, त्यांची नाती वगैरेंची अडचण येऊ नये. तसेच ह्या कथात्मकतेमुळेच कादंबरीची व्याप्ती ठरते. उत्तर आधुनिकतावादाशी हे मत बरेच अनुकूल असून नेमाडेंच्या हिंदूत आपल्याला हे पडताळता येते. प्रचंड व्याप्ती असलेल्या ह्या कादंबरीत कथानक कसे व का जुजबी आहे, त्याचा आपल्याला आता उलगडा होईल. पामुक ह्यांच्या मते ही कथात्मकता बेताचीच/नेमकीच ठेवल्याने कादंबरीचे केंद्र वाचकाला चाचपडता येते.
पामुक ह्यांच्या मते जीवनाचा अर्थ शोधणे वाचकाला कादंबरीच्या केंद्राकडे घेऊन जाते. हे पामुक ह्यांच्या मते वाचकाने आपल्या विवेकाने करावे व त्यावर तत्वज्ञानाचा वा धर्माचा धाक पडला न पाहिजे व एकप्रकारे लोकशाहीच्या नीतीने हे व्हायला हवे. आता हा निकष आपण जर नेमाडेंच्या हिंदूला लावून पाहिला तर दिसते की त्यांच्या कादंबरीचे केंद्र त्यांच्या देशीवादाभोवती व वर्णव्यवस्थेच्या सततच्या जाणीवेभोवतीच घोटाळत राहते.ई.एम.फॉर्स्टर ह्यांचे एक वचन लेखक वाखाणतो ते असे: कादंबरीने आपल्या जीवनाविषयीच्या कल्पना व जाणीवा ह्या प्रत्यक्षात असल्याप्रमाणेच जाणवून द्याव्यात व वाचकालाही त्या तशाच जाणवाव्यात. ह्या पार्श्वभूमीवर सध्याच्या जीवनात वर्णव्यवस्थेचे भूत आपल्याला निवळलेले दिसत असले तरी त्याचेच स्तोम नेमाडे माजवीत आहेत हे त्यांच्या कादंबरीत सहजी दिसते व ह्या निकषावर ती कादंबरी वाखाणणे अवघड होऊन बसते.
स्वत: एक यशस्वी पटकथा-लेखक असल्याने पामुक ह्यांनी शब्दांनी कसे प्रतिमांचे साक्षात चित्र उभे करावे ह्या कसबाचे जे कौतुक मांडले आहे ते कोणाही होतकरू कादंबरी लेखकाला मोलाचे ठरावे. ह्या उहापोहात लेखक भाषाशास्त्राच्या अनुषंगाने जी कोलेरिज, टॉलस्टॉय ह्यांची साक्ष काढतो ते व्यासंगपूर्ण आहे. तो स्वत:चे अनुभवही कथन करतो ज्यात तो रेडीओवरून फुटबॉलच्या खेळाची कॉमेंट्री ऐकण्याचे उदाहरण देतो. असेच मला आठवते ते आम्ही लहानपणी इंग्रजी फारसे येत नसताना तल्यारखान, विझी व विजय मर्चंट ह्यांचे इंग्रजीतले रेडीओवरचे धावते वर्णन ऐकून प्रत्यक्ष खेळ पहात असल्याचे जाणवत असू. शब्दांनी चित्रे रेखाटण्याचे हे कसब मात्र दाद देण्यासारखे असून कादंबरीकाराच्या पदरी हे असायलाच हवे.
पामुक ह्यांची द इनोसन्स ऑफ म्युझियम नावाची कादंबरी एका खरोखरच्या वस्तुसंग्रहावर आधारलेली असून पामुक ह्यांचे म्हणणे माणसांच्या सहवासातल्या वस्तूही बरेच काही महत्वाचे सांगून जातात. ह्या लेखकाने पुराणकाळातल्या वस्तूंचे संग्रहालय केले व त्याचीच कादंबरी केली हे कल्पकतेचे चांगलेच परिमाण म्हणायला हवे. आणि ह्या उलट जमा झालेल्या वस्तूंना नेमाडे ह्यांनी हिंदू त त्यांना समृद्ध अडगळ म्हणून कमी लेखावे हे त्यांच्या कल्पकतेचे दुर्भिक्षच म्हणावे लागेल.
पामुक हे स्वत: तौलनिक वाङमयाचे प्राध्यापक असल्याने त्यांनी वरील विवेचन हे वाचकवादाच्या समीक्षेच्या सिद्धान्ताने केले आहे हे सहजीच ध्यानात येते. पण वाचकवादाची जी मूलभूत तत्वे आहेत त्यातली महत्वाची तत्वे इथे लेखकाने सपशेल दुर्लक्षली आहेत अस जाणवते. जसे: आयझर ह्यांचा अध्याहृत वाचकाचा सिद्धान्त इथे विचारातच घेतलेला नाही.तसेच थॉमस कुन्ह ह्यांच्या पॅरेडाईम-शिफ्टच्या महत्वाच्या प्रतिपादनाकडेही लेखक कानाडोळा करतो. उत्तर आधुनिकतावादात सांस्कृतिक कथनांचा र्‍हास, व रूपहीनतेचा गौरव करतात व इथे तर बाळबोध जीवनाचा अर्थ वगैरे लेखक बघण्याचे सांगतो आहे, हे व्यासंगाचा उथळपणाच दाखविते व आधीच वादग्रस्त असलेल्या पण नोबेल पारितोषिक मिळालेल्या ह्या लेखकाचे वरील प्रतिपादन किती प्रामाण्याने घ्यावे ह्याचा वाचकाला संभ्रम पडतो. बरे ज्या होमी भाभा ह्यांनी त्यांना ह्या भाषणांना आमंत्रित केले होते, ते गृहस्थही असेच वादग्रस्त ठरलेले आहेत व आता हार्वर्ड विद्यापीठात नाहीतही.( त्यांना न कळणार्‍या संज्ञा वापरून "वाईट लिखाणाचे" पारितोषिकही देण्यात आलेले आहे. ) . अर्थात केवळ त्यांनी आमंत्रण दिलेले आहे म्हणून आपण पामुक ह्यांना कमीपणा देऊ शकत नाही, हे खरे असले तरी भाषणात जे सर्वत्र सुलभीकरण प्रकर्षाने जाणवते त्याने संभ्रम अधिकच वाढतो.

--------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

------------------------------------------------------------------------------------------------------