वाचाल तर वाचाल---२
"डिसग्रेस" ( बेअब्रू ) ले: कोएटझी जे.एम.
कोएटझी हे साउथ आफ्रिकन असून सध्या ऑस्ट्रेलियात राहतात. त्यांना २००३ सालचे नोबेल पारितोषिक ( साहित्य ) मिळाले असून दोन वेळा बुकर प्राइझहि मिळालेले आहे. ते फारसे लोकात मिसळत नाहीत व बुकर प्राइझ घेण्यासाठी ते हजरही नव्हते. ते शाकाहारी व पशुमित्र असून ते त्यांच्या साहित्यात मुक्तपणे पहायला मिळते. व्हिएतनाम युद्धाविरुद्ध आंदोलने केल्यामुळे त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले तर नाहीच उलट अमेरिका सोडून त्यांना साउथ आफ्रिकेत प्राध्यापक म्हणून जावे लागले. अमेरिकेतले त्यांचे पीएच.डी. सॅम्युएल बेकेट ह्याच्या साहित्यशैलीवर होते. त्यांच्या सर्व कादंबर्यात "डिसग्रेस" ही कादंबरी खूप गाजलेली ( १९९९) आहे.
दोन लग्ने, दोन घटस्फोट, आणि स्वछंदी जीवन जगणार्या साउथ आफ्रिकेतल्या एका उतारवयातल्या प्राध्यापकाची ही गोष्ट आहे. कादंबरीला सुरुवात होते तीच मुळी वेश्येकडे जाण्यावरून. पण त्यातही वेगळेपण असे की हे तसे संयमितच वाटावे अशा प्रकारची ही वेश्या व आठवड्यातून एकदाच ते जाणे. मग हे वासूपण जरा बहकते व तो नकळत एका पोरीच्या नादी लागतो. ती त्याची विद्यार्थीच असते. सहज घरी येते, कॉलेजात भेटत राहते. शरीरसंबंध वाढत जातात. तिचा एक मित्र असतो ज्याला हे पसंत नसते व मुलगीही घाबरते. मग ती कॉलेजच सोडते. तिचे वडील येऊन तक्रार नोंदवतात. चौकशी होऊन ह्याची नोकरी जाते. पण तो प्रकरण नाकबूल करीत नाही तर परिमार्जन म्हणून सोडून जातो. काही क्षण आपण ईरॉस देवतेचे गुलाम झालो होतो असे म्हणत तो वासनेचे थोडा काळ समर्थन करतो, प्राण्यात हे कसे नैसर्गिक आहे वगैरेचे दाखले देतो खरे, पण बेअब्रू झाल्याची त्याला अपार टोचणी लागून राहते.
तो मग भटकत भटकत आपल्या मुलीकडे जातो. ही एका माळरानावर प्राण्यांची देखभाल करीत त्यांचे पांजरापोळ-सारखा कॅंप चालवीत असते. २०/२२ वर्षांची व एकटीच असते. तो तिथे राहून तिला मदत करतो. दरम्यान काही गुंड हल्ला करतात, तिच्यावर बलात्कार करतात. मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे त्याला स्वत: केलेल्या स्वैराचाराचे अतीच दु:ख व्हायला लागते. तो एक प्रकारचा आपण केलेला बलात्कारच होता अशी तो स्वत:ची निर्भत्सना करतो. मुलगी ह्या बलात्कारातून गर्भवती होते पण बलात्कार करणार्याचा फारसा तिरस्कार करत नाही. शेवटी तिथूनही तो मुक्काम हलवतो. ज्या मुलीमुळे त्याची बेअब्रू झालेली असते तिच्या गावात येऊन तिच्या आईवडिलांनाच परिमार्जन म्हणून येऊन भेटतो. जिचे आयुष्य आपण बरबटवले तिच्याच आईवडिलांच्या घरी जेवायला जावे व क्षमा मागावी हा देखावाच अपार गोंधळाच्या भावना दाखविणारा आहे. त्याची माफी त्यांना दिलेल्या दु:खाबद्दल तर असतेच पण झाल्या प्रकाराबद्दल त्याची भावना वेगळीच असते. मी तुमच्या मुलीशी आलेल्या संबंधात ( वयातला फरक असूनही ) संगीत ( लिरिकल ) भरू शकलो नाही, नुसताच शरीरसंबंध आला ही खंत व्यक्त करतो. मुलीच्या वडिलांना एका खर्या ख्रिश्चनाप्रमाणे ह्याला माफी द्यावी असा विचार येतो व तुला परत नोकरी मिळविण्यासाठी तक्रार मागे घेऊ का असे तो विचारतो. पण प्राध्यापक म्हणतो मी फक्त माझ्या भावना कळवायला आलो होतो, व असे म्हणून तिथून प्रयाण करतो. कादंबरीच्या शेवटाला प्राध्यापक परत कॉलेजात जाऊन सगळे कसे आलबेल चालले आहे ते पाहून येतो. त्याला बायरन कवीच्या रखेलीवर एक ऑपेरा लिहायचा असतो त्या तुलनेने ज्या मुलीवर ह्याने अत्याचार केला असतो तिचे नाटक पाहून येतो. शेवटी प्राध्यापकाची मुलगी बाळंत होणार असते म्हणून तिच्याकडे जातो व तिथे काळजी घेता येत नाही म्हणून सोडून द्याव्या लागणार्या कुत्र्यावर शेवटाचे दृश्य कादंबरी दाखवते जे एक प्रकारे प्राध्यापकाचेच रूपक असल्यासारखे वाटते.
कादंबरीत लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे पैलू हरघडी दिसतात. जसे टाकलेल्या कुत्र्यांची काळजी घेताना लेखक म्हणतो की त्यांना फसवण्याचा विचारही करू नका कारण जनावरांना तुमच्या विचारांचाही वास येतो. हे एका प्रेमळ पशुमित्राची छबीच दाखवते. लेखक भाषाशास्त्राचा प्राध्यापक होता ह्याची जाण सबंध कादंबरीभर खुणावत राहते. जसे एके ठिकाणी लेखक म्हणतो की आत्ताचा फ्रेंड हा शब्द पूर्वी फ्रेऑन व नंतर फ्रेऑन्ड असा बदलत बदलत झाला आहे. तसेच वर्डस्वर्थ व बायरन कवींची खास वर्णने आपल्याला पहायला मिळतात.
उतारवयात एक साहस म्हणून आपण आपल्याच शिष्येशी संबंध ठेवला व त्यापायी सर्व आयुष्याची वाताहत करून घेतली ह्याबद्दल लेखक पस्तावा कमी दाखवतो व एखाद्या क्षणीच्या भावनेच्या भरात आपण वाहून गेलो त्याला चांगले रूप देऊ शकलो नाही ह्याची खंत प्राध्यापकाला ज्यास्त बोचत राहते व इथेच नेहमीच्या बलात्कार्याबद्दल वाटणारी घृणा जाऊन आपल्याला ह्या अजब प्राध्यापकाबद्दल एक अजीबसी कणव वाटायला लागते. हा भावनेचा एक वेगळाच पोत दाखवणे ह्या कादंबरीचे खासे वैशिष्ट्य आहे व ते नक्कीच उठावदार झालेले आहे. इंग्रजी अगदी खास शैलीची असून खुमासदार आहे. वाचलेच पाहिजे असेच हे पुस्तक आहे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
" डिसग्रेस " ले: जे.एम. कोएटझी
पेन्ग्विन प्रकाशन, १९९९, ( बुकर पुरस्कार प्राप्त )
पाने २२४ किं: २५० रु. ( ऑनलाइन उपलब्ध )
----------प्रसिद्ध,दर्जेदार पुस्तकांची दर्जेदार परिक्षणे -------------------------- (लोकसत्ता "ग्रंथविश्व"मध्ये येतात )
मंगळवार, २५ जानेवारी, २०११
मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०
कायद्याची बाब, कबूलीजबाब ! "द कन्फेशन"
( ई-बुक द्वारे)
लेखक: जॉन ग्रिशॅम
डबल-डे, प्रकाशन,न्यू-यॉर्क,
पाने:३७५ किंमत: १५डॉलर
मला वॉल स्ट्रीट जर्नलचा मागच्या आठवड्यात एक ई-मेल आला. त्यात ह्या महिन्याच्या ठळक बातम्या होत्या तिथल्या. त्यात एक होती की, मागच्याच महिन्यात अमेरिकेत प्रसिद्ध कादंबरीकार श्री.जॉन ग्रिशॅम ह्यांचे २४ वे पुस्तक "द कन्फेशन" हे एकाचवेळी पक्क्या बांधणीत व ई-बुक द्वारे प्रसिद्ध झाले. अमेरिकेत सध्या पुस्तक विक्रेत्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत, ते ई-बुक मुळे. तिथे शाळकरी मुले, तरुण व सर्वचजण आजकाल पुस्तके ई-बुक स्वरूपातच वाचतात. ह्या प्रकाशकांना एक अजब अनुभव आला की एकाचवेळी ई-बुक प्रसृत करूनही पारंपारिक पुस्तकाची मागणी घटली नाही तर उलट वाढली. ह्या अगोदर द फर्म, द पेलिकन ब्रीफ, द चेंबर, द रेनमेकर, द स्ट्रीट लॉयर, द असोशिएट, अशी कायदेजगतातली बेस्ट सेलर्स देणारा हा सिद्धहस्त लेखक, आणि त्याचे हे २४ वे पुस्तक ! ( वॉल स्ट्रीट जर्नलच्या ई-मेल नंतर मी हे पुस्तक ई-बुक म्हणून उतरवूण घेतले व ते ई-बुकच वाचले व ही पुस्तक-ओळख संगणकाद्वारेच पाठवीत आहे. असा हा सर्व डिजिटल मामला !)
एका मुलीवर बलात्कार होऊन तिचा खून होतो, ( तिचा मृतदेह मात्र सापडत नाही ), तिच्याच कॉलेजातल्या एका मुलाच्या साक्षीवरून दुसर्या एका मुलाला अटक होते. त्यांचे प्रेमसंबंध असतात, व नंतर तो असूयेपोटी तिला मारतो असा संशय असतो. त्याचा तुरुंगात दबाव आणून कबूलीजबाब घेतात, साक्ष व कबूलीजबाब ह्याच्या जोरावर खटला भरून त्याला देहांताची शिक्षा होते. एक वकील त्याचा खटला, अपीले, सार्वजनिक हितापोटी चालवतो. व अनेक अपीले होऊन शेवटी त्याला खतम करण्याचा दिवस येऊन ठेपतो. नेमके दोन दिवस आधी एका चर्च मध्ये पाद्रयाला भेटायला एक माणूस येतो. त्याला कबूलीजबाब ( चर्च मधला) द्यायचा असतो की त्यानेच त्या मुलीचा खून केला आहे. ह्या माणसाला ब्रेन टयूमर झालेला असतो व तो आता केव्हाही मरणार असतो. त्याने आतापर्यंत बरेच बलात्कार केलेले असतात व त्यातलीच शिक्षा भोगून झाल्याने तो दुसर्याच दिवशी सुटणार असतो. मरताना तरी काही खोटेपणा नको म्हणून त्याला ह्या मुलीचा खून कबूल करायचा असतो. शिवाय चुकीच्या माणसाला उगाच फाशी देताहेत त्याचेही खापर त्याच्यावर येऊ नये व तो निरपराध मुलगा सुटावा असे त्याला वाटत असते. हे ऐकून पाद्रयाची पंचायत होते. नुसता खुन्याचा कबूलीजबाब ऐकून घेतला व पोलिसांना सांगितले नाही तर डबल संकट अवतरणार असते. चुकीच्या खुन्याची शिक्षा रद्द करण्यात मदत केली नाही व खर्या गुन्हेगाराला पकडून दिले नाही म्हणून. तो खर्या खुन्याशी बर्याचवेळा भेटतो, त्याला सहानुभूती दाखवतो, मदत करतो. त्यात अजून माहीती मिळते की मुलीवर बलात्कार करून त्याने तिला कुठे पुरले आहे ते त्यालाच माहीत असते.
मग पाद्रयाची धावपळ सुरू होते. तो वकीलाला गाठतो. तशात दोघे खुनी काळे असतात व पोलीस व ज्यूरी गोरे असतात. त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण झालेला असतो. अमेरिकेत फाशीची शिक्षा सगळ्याच प्रांतात रद्द झालेली नाही म्हणून मानव-अधिकार वाली मंडळी फाशीविरुद्ध चळवळ करीतच असतात. पण गोरे अधिकारी बधत नाहीत. तणाव ज्यास्तच वाढतो. अपीले रद्द होतात. तरुण खुन्याला ( चुकीच्या ) इंजेक्शन देऊन देहांताची शिक्षा होतेही. कोणी काहीही करू शकत नाही. पाद्रय़ावरचे व वकीलावरचे धर्म-संकट अधिकच दाट होते. मग ते खर्या खुन्याला घेऊन मुलीला जिथे पुरले होते ते शोधून काढतात. त्यालाही नऊ वर्षे होऊन गेलेली असतात, तशात खुन्याला ब्रेन-टयूमरमुळे चकरा वगैरे त्रास होत असतो. पोलीस हे सगळे करायला तयार नसतात म्हणून वकील व पाद्री साक्षीदारांच्या साक्षीने व व्हिडीओवर हे सर्व करतात. शेवटी हे सर्व प्रकरण मीडीयात जाऊन दाखवतात तेव्हा पोलीस व न्यायसंस्थेतले अधिकारी खडबडून जागे होतात. प्रॉसिक्यूटर व न्यायाधीश बाई ह्यांचे प्रेमसंबंध असल्याचे उघडकीला येते व मग रीतसर वकील सर्वांवर खटले भरतो, खर्या खुन्याला अटक होते, चुकीच्या माणसाला फाशी दिल्याबद्दल न्यायाधीश क्षमा मागतात वगैरे सर्व न्यायाला धरून शेवट होतो.
अमेरिकेसारख्या प्रगत देशातही केवळ कामाच्या सोयीसाठी पोलीस-तपास अधिकारी कसे दबाव आणून कबूलीजबाब लिहून घेतात, साक्षीदारांना खोटी प्रलोभने दाखवून साक्षी कशा फिरवून घेतात, वर्णद्वेशाच्या पार्श्वभूमीवर अजूनही तिथे कसे काळे-गोरे हे वाद टिकून आहेत, आणि केवळ माणुसकीपोटी कसा एक पाद्री व मरणारा खरा खुनी खर्या खुनाला वाचा फोडतो हे या कादंबरीत फार बारकाईने नोंदवलेले आहे. कादंबरीतल्या घटना २००७ साली घडलेल्या आहेत, तरीही अमेरिकेत फाशीची शिक्षा होणे, वर्णद्वेशाच्या दंगली होणे, अशा नोंदी संशय निर्माण करतात. अशी कपोलकल्पित कथानक असलेली कादंबरी आपण का वाचावी ? केवळ मनोरंजनासाठी ? का हेच आपले कठोर वास्तव आहे व त्यातले बारकावे आपल्या लक्षात यावेत म्हणून ? खोटे वाटत असेल तर नुकतेच गाजत असलेले दिल्लीच्या डिआयजी राठोड ह्यांचे प्रकरण आठवून पहा. त्यांनी मुलीवर बलात्कार केला, तिला आत्महत्या करायला भाग पाडले, नातेवाईकांवर खोटे खटले भरले व आता तर सीबीआय ने त्यांच्याविरुद्ध पुरावा नाही म्हणून केसच बंद केली आहे, व त्यांना जामीनही मिळाला आहे. मानवाअधिकारासाठी गुजरात दंगलीचे खटले लढणार्या तीस्ता सेटलवाडच्या एकेकाळच्या सहकार्याने भेद खोलला आहे की तिने साक्षीदारांना पढवले व हवालाद्वारे पैसे दिले. ह्याच गुजरात दंगलींच्या बेस्ट बेकरी केस मध्येही ज्या मुलीच्या कबूलीजबाबामुळे खटला निकाली लागला त्याच मुलीला शेवटी साक्ष फिरवल्यामुळे शिक्षा झाली. असे प्रत्यही घडत असताना ह्या वास्तवाला आपल्याला कायदेशीरपणे सामोरे जाणे भाग आहे, खरे खोटे आपल्याला तुंबळ प्रतिवादानंतरच कळणार आहे व त्यासाठीच कायद्याचा पुरेपूर उहापोह असलेली ही कादंबरी वाचणे गरजेचे आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
सोबत: कादंबरीच्या मुखपृष्ठाचे चित्र

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)