वाचाल तर वाचाल----४ "शाळा"
लेखक: मिलिंद बोकील
मौज प्रकाशन, पाने:३०३ किं:२०० र
बोकीलांची कादंबरीची "शाळा"
"त्याने माझी शाळाच घेतली", असे आपण कधी म्हणतो तेव्हा "शाळा" म्हणजे पाठ असे असते. मिलिंद बोकील ह्यांची "शाळा" ही कादंबरी, ही एक प्रकारची "कादंबरीची शाळाच" आहे.
पौगंडावस्थेतल्या एका शाळकरी मुलाचे जग असून असून कितीसे मोठे असेल, असे वाटत, आपण वाचायला सुरुवात करतो न करतो तोच, ३०० पाने केव्हा सरली ते ध्यानातही येत नाही. एका शाळकरी मुलाच्या वासरू-प्रेमाची ( काफ-लव्ह ) ही कहाणी मोठी सोज्वळ व अगदी खरी, अशी चितारलेली आहे. चार टवाळक्या करणारे मित्र, शाळेतले नमूनेदार शिक्षक-शिक्षिका, वर्गातली मुलं-मुली ह्यांचे पोरकट वागणे, कुटुंबाचा मोठ्या होणार्या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोण, मुलींबद्दल वाटणारे हुरहूर लावणारे पहिलेवहिले प्रेम, ऐकीव माहीतीवर आधारलेल्या लैंगिकतेचा साक्षात्कार, त्या लैंगिकतेचे पहिलेवहिले धडे गिरवणे, आणि ह्या सगळ्या जाणिवेकडे एका निखालस प्रामाणिकपणे व उत्कटतेने पाहणे, असे हे साधेसुधे जग आहे. त्यातील जाणीवांना विश्वरूप देऊन, वाचकाला खिळवत ठेवण्याचे कसब कादंबरीत दाखवणे अवघडच होते. पण ते बोकीलांनी फार अप्रतीमपणे इथे साधले आहे व एका अगदी साध्या विषयावरही कादंबरी कशी लिहावी ह्याचा एक आदर्श वस्तुपाठच दिला आहे.
पौगंडावस्थेतल्या नववीतल्या मुलाचे जाणीव-विश्व भोळेपणाचे तर खरेच पण ते तितक्याच प्रामाणिकपणे मांडण्यासाठी हा मुलगाच निवेदन करतो आहे अशी कादंबरीची अभिव्यक्ती ठेवली आहे. कथानकाच्या ओघात काही काही भाकितेही लेखकाने उलगडली आहेत. जसे, आपण मित्र कसे व कोणते मिळवतो. योगायोगाने, समानधर्म पाहून, निवडून की एखाद्या अनामिक ओढीने ? इथे नायकाला वर्गातल्या धटिंगण, चालू मुलांचेच आकर्षण का वाटते हे मोठ्या खुबीने दाखविले आहे. ह्याच्यामुळे त्याला शाळा सोडायची पाळी येते, बेदम मार बसतो, तो म्हणतोही की तुझ्या सल्ल्यामुळे हे झाले, पण त्या सल्ल्यामागचा हुरहुर कमी करण्याचा प्रांजळ प्रयत्नही त्याला दिसलेला असतो व त्यालाच दाद म्हणून टिकलेली ही मैत्री असते. मित्रांचे दिलदारपण कसे केव्हा मोहक दिसेल त्याचा हा लेखाजोखा आहे व तेच मैत्रीचे रहस्य आहे.
ह्या वयातल्या लैंगिकतेचे वर्णन, समर्थन, चित्रण हे मोठेच जोखमीचे काम आहे. ते वर्णिताना लेखकाने भीडभाड न ठेवता मुले बोलतात तशीच बोली वापरली आहे. त्यामुळे ते खरे ठरते. कथानकाचा काळ आणीबाणीतला ( १९७७ ), म्हणजे जवळ जवळ तीस वर्षांपूर्वीचा. मुला-मुलींनी एकमेकाकडे चोरून पाहणे, वर्गात मुलामुलींच्या जोड्या जमवणे व त्यावरून चिडवणे, मुलींचे मास्तरांवर प्रेम असणे, त्यासाठी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणे, मुलींचा पाठलाग करणे, त्यांच्याशी बोलू पाहणे, तरूण नातेवाईकाने सलगीने प्रोत्साहन देणे, स्लीव्हलेस घातलेल्या शिक्षिकेचे उरोज दिसण्यासाठी पोरांनी फळ्यावर ( विषय, तारीख वगैरे ) उंचीवर लिहिणे, भाजी विकणार्या पोराने वाकलेल्या स्त्रियांचे भोपळे पाहणे, पोरांच्या कामुक विचाराने बाटल्या फुटणे, वगैरे सर्व प्रसंग मोठ्या संयमित रितीने लेखकाने हाताळलेले आहेत. त्यांना शारिरिक कामुकतेचे स्पर्श होऊ न देता ते एकप्रकारे सोवळे ठेवले आहेत. आजच्या लैंगिक उदारमतवादी जमान्यात ही शारिरिक घसट कटाक्षाने टाळणे हे त्याकाळाचे सोवळे रूप दाखवण्याचा प्रयत्न म्हणायचा की हे शारिरिक घसटीला घाबरणे म्हणायचे ? मुलामुलींना कधीच चुंबन घ्यावे, तसे प्रयत्न करावेत असे न वाटणे हे अनैसर्गिकच वाटते व त्याला मग वासरू-प्रेमाचा रंग राहिला नसता ह्या भीतीपोटी लेखकाने ते टाळावे हे मात्र खटकते. बाटल्या फुटतात ते बेधडक लिहिले आहे, मग हस्तमैथुन करणे, चुंबन, लगट करणे, शाळेतल्या मुलींनी गर्भार राहणे, ह्यात भीड का ? त्याकाळी ते कमी प्रमाणात असेल, पण होतच नव्हते, हे मात्र जरूर न पटण्यासारखे आहे. आत्ताची वासरं फारच लवकर मोठी होतात. त्यामुळे त्यांचं वासरू-प्रेम हे तितके सोज्वळ राहत नाही ही खरी ह्यामागची अडचण आहे.
असेच जरा अनैसर्गिक पण उदात्त जाणिवेचे खटकते ते कुटुंब-जाणिवेचे. कादंबरीत मुलं-मुली आपापल्या कुटुंबात अगदी प्रामाणिकपणे आईवडिलांशी, मोठ्या भावाबहिणींशी अतीव मायेने, ममतेने वागताना चितारलेले आहे. पण त्याकाळीही पौगंडावस्थेला, भावंडाबद्दल असूया, आई-वडिलांबद्दल वैषम्य, ह्या जाणिवेंचे शाप होतेच. कारण ते तसे पुरातनच आहेत. पण त्यांचे चित्रण सोयीचे नसल्याने कटाक्षाने टाळलेले आहे. त्यामुळे आजच्या पालकांना आजकाल आपल्याच मुलांत हे दोष आहेत की काय असे वाटेल. चित्र सोज्वळ ठेवण्याच्या मोहापायी हे जोखीम न घेणे, सोयीस्कर झाले आहे. पण नायकाला आवडणार्या मुली बरोबर लागलीच संसार वगैरे थाटण्याची त्याला स्वप्ने पडावीत, नाईट स्कूल मध्ये जाऊन त्याने चौकशी करावी, पळून जाण्याचे मनसुबे रचावे हे मात्र कमालीचे गोड वाटणारे आहे.
कथाशयाला अनुरूप राहण्यासाठी निवेदन शैली ओघवती ठेवण्याची नितांत आवश्यकता होती. त्या निकडीमुळे लेखकाने बोली व प्रमाण भाषेचे मिश्रण कमालीच्या कौशल्याने केलेले आहे. जसे: एकेठिकाणी वाक्य आहे : "त्या वेळी सगळीकडे गारेगार हिरवं झालेले असे". बोलीतल्या "झालेलं"च इथे "झालेले" असे प्रमाणित रूप आहे. तर दुसरीकडे " तिने सुरवातीला विचारलं..." ह्यातली "सुरवात" बोलीतली तर नंतर "...लगेच तिकडे बसायला सुरुवात केली." ह्या ठिकाणी परत ती प्रमाणित होते. निवेदनात कुठेच पाल्हाळ लावलेले नाही. सर्व निवेदन "टु द पॉइंट" थाटाचे थेट वळणाचे आहे. त्यामुळे ते ओघवते राहते. ही रूढ शाळा चालू असताना मनातल्या शाळेत मुलं प्रेमाबद्दल शिकतात हे जसे मोहक वाटते, तसेच अजून ती नात्यांबद्दल, पैशाबद्दल, राजकारणाबद्दल, लैंगिकतेबद्दल काय काय शिकतात ते लेखकाने दाखवले असते तर अजूनही ते रोचक झाले असते !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा