"वार्याने हलते रान "*
अकादमीचा ग्रेसफुल सन्मान !
प्रसिद्ध कवी ग्रेस ( उर्फ माणिक गोडघाटे ) ह्यांच्या "वार्याने हलते रान" ह्या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. पुस्तक ललित निबंधांचे असले तरी हा पुरस्कार एका कवीलाच/काव्यालाच आहे. कवितेचे विश्व केवळ तुटक तुटक ओळींनी छापलेले साहित्य, एवढयाच बाह्य रूपापुरते मर्यादित असत नाही तर कवितेची निर्मिती कशी होते, कवीला आपल्याच कवितांबद्दल काय वाटते हे सुद्धा काव्याचे एक महत्वाचे अंग आहे. किंवा हे काव्याच्या मुळांवरचे गद्य आहे असे म्हणता येईल. हे पुस्तक गद्यात, ललित निबंधाने अवतरले तरी ते काव्याच्याच विश्वासंबंधी आहे. त्यामुळे प्रथम जरा आश्चर्याचे वाटले तरी एका कवीला त्याच्या गद्य लिखाणासाठी पुरस्कार मिळावा ह्यात साहित्य अकादमीच्या खुल्या मनाची प्रचीती येते व त्याला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.
चित्रकाराला "तुम्हाला चित्रे कशी सुचतात", किंवा कवीला "तुम्हाला कविता कशा सुचतात" असे विचारण्याची आपली एक साहजिकच परंपरा आहे. हे आपल्याला कलेच्या निर्मितीच्या कुतुहूलापोटी वाटत असते व ते आपण प्रत्यही कलाकाराला विचारत असतो. ह्या कुतुहूलाचे निराकरण वेळ प्रसंगी अनेकांनी आपल्या मगदूराप्रमाणे केलेले आहे. जसे तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत की, "आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥ साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥ तुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥". हे सांगणे थोडे देवभोळेपणाचे आपणास वाटत असेल, तर नुकतेच "महाराष्ट्र-काव्यभूषण" किताब मिळालेले कवी मंगेश पाडगावकर निर्मितीचे रहस्य उलगडताना सांगतात की, एखादी ओळ अचानकच सुचते व मग ती अनेक दिवस रुंजी घालते व मग त्या विषयानुरूप ते त्याची कविता करतात. आता हा रहस्यभेद सुलभ भाषेत सांगितलेला असला तरी निर्मितीची नेमकी प्रक्रिया आपल्याला कळतच नाही. हलणार्या राना कडे पाहताना ह्या रानाला हलवणारा जो वारा आहे ( निर्मिती ), त्या वार्याला पकडता येईल का , म्हणजे कार्यकारण भावाने निर्मितीचे आदी अंत पकडता येतील का ह्या प्रयत्नातून प्रस्तुत पुस्तक कवी ग्रेस लिहीत आहेत, असे ते आरंभीच सहीशिक्क्यानिशी घोषित करीत आहेत.
कवीने कवितेतून एखादा विचार मांडला तर त्याला एरव्ही गद्य निबंधांत जे विचारांचे, तर्कसंगतीचे नियम लागू होतात, ते लागू करता येत नाहीत. कारण त्याची कविता ही एक भावभावनांचे अविष्करण असते, ते काही एखादा तार्किक विषय मांडणे नसते. "सौंदर्यमीमांसा" ह्या सौंदर्यशास्त्रावरच्या गंभीर अभ्यासात श्री.रा.भा.पाटणकर ( पृ.३५१) म्हणतात की ऍरिस्टॉटलने सांगितल्याप्रमाणे, "अनुकृती व ती जिची अनुकृती आहे ती गोष्ट यांच्यात निश्चित साम्य असते. कलाकृती ही अनुकृती असली, आणि तिच्यात व मूळ गोष्टीत साम्य असले, तरी त्यांच्यात एक महत्वाचा भेद आहे. कलाकृतीचा संबंध मूळ गोष्टीच्या केवळ ऐंद्रीय स्वरूपाशी असतो." पुढे पाटणकर बुचर ह्यांची साक्ष काढीत म्हणतात की "कलाकृती आपले लौकिकतेपासून विमोचन करते". ह्याचे सोपे उदाहरण घ्यायचे झाले तर कै.अरूण काळे ह्यांनी एका कवितेत शहरातल्या पॉश अशा मॉल मध्ये एका मोळी-विक्याला जागा मिळत नाही, त्यावरच्या दु:खावर एक कविता केलेली आहे. आता समाजशास्त्राच्या अगर पर्यावरणाच्या शास्त्रीय निरिक्षणांनी पाहिले तर शहरात मोळी-विक्या असणे दुरापास्त व गॅस ऐवजी लाकडांचे सरपण वापरणे नुकसानकारक, हे कोणीही मानील. पण मोळी-विक्याचे दु:ख ( कवितेतले ) तितकेच मनोहारी व प्रभावी आहे, हेही आपण नाकारू शकत नाही. कवी ग्रेस ह्यांना कलेविषयी व निर्मिती प्रक्रियेविषयी खरेच काही गहन लिहायचे असते तर त्यांनी ते सौंदर्यशास्त्रीय लेखनाच्या पठडीत लिहिलेही असते. ते स्वत: फाइन आर्टस्च्या वर्गाला सौंदर्यशास्त्र शिकवीतही असत. पण त्यांनी ह्या पुस्तकात ललित-निबंधांच्या अंगाने किंवा एका प्रकारे काव्याच्या माध्यमातच आपले भाव मांडले आहेत. इथे सय होते ती विंदा करंदीकरांच्या ज्ञानपीठाची. ते दिले गेले होते "अष्टदर्शने" ह्या तत्वज्ञान्यांची ओळख करून देणार्या काव्याला. त्या पुस्तकाचे माध्यम जरी कविता असले तरी ते होते तत्वज्ञानाचे. विंदा करंदीकरांनी "ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र"ही लिहिले आहे. काव्याबद्दलची मते ते चाहते तर कवितेनेच व्यक्त करू शकले असते. पण ते त्यांनी रीतसर निबंधातून केले. इथे ग्रेस ह्यांनी त्यांचे मनोगत लालित्यपूर्ण अशा ललित निबंधातून केले असल्याने त्यात त्यांच्या भावभावनापेक्षा इतर तर्कविषयक बाबी शोधणे किंवा त्यांचे वैगुण्य दाखवणे अप्रस्तुतच होते.
कवी ग्रेस हे एक अवघड कवी आहेत. त्यांचे ललित निबंधही तितकेच अवघड असतात. तशी वाक्ये सोपीच असतात, पण अर्थ क्वचितच हाती लागतो. आता निर्मिती संबंधी त्यांनी ह्या पुस्तकात ठिकठिकाणी काही भाष्ये केली आहेत ती पाहून काही उलगडा होतो का ते पाहू, किंवा वर म्हटल्याप्रमाणे निर्मितीविषयी त्यांच्या भावनांना दाद देऊ :
१) ( पृ.२) "कलाकृतीची निर्मितीपूर्व अवस्था आणि निर्मिती झाल्यानंतरची रूपचर्या, एकातून एक निघावे म्हटले तरी त्यांच्यात खरे तर कुठलेही दिलाशाचे किंवा संशयाचे साम्य आढळूनच येत नाही. असे का व्हावे ?"
आता हे काही स्पष्टीकरण नसून केवळ एक निरिक्षण आहे व ते कवीला पडलेले एक कोडे आहे, असेच वाटते. एरव्हीच्या कलावंत नसलेल्या सामान्य माणसाने "करायला गेलो गणपती आणि झाले माकड" म्हणावे, तसेच हे भाष्य वाटते. ह्यातून एवढेच प्रतीत होते की निर्मिती ही एक गूढ प्रक्रिया असून त्यात आधीचे रूप व नंतरचे रूप ह्यात अभावानेच साम्य आढळते. ह्या प्रांजळ जाणीवेचे कौतुकच करायला हवे.
२) ( पृ.३) "एखाद्यावेळी शब्दाला थोडासा स्पर्श केला की त्याच्या आतील रक्तवाहिन्या एकदमच थरारून उठाव्यात आणि आपल्याला श्वास घ्यायची मुभा न देताच त्यांनी आपल्या पेशीचा तुकडा, चिमुकला तुकडा, तोडून त्याची बालकवीय, बोन्साय, प्रतिमा तयार करावी, तसे काहीसे ?"
शब्दांच्या लोभावण्याचे कर्तब अनेक कवींनी ह्या अगोदर वाखाणलेले आहे. जसे तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग: "आह्मां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥ शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥तुका ह्मणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥". कवी ग्रेस ह्यांचे वैशिष्टय असे की ते सध्या प्रचारात नसलेले अनेक शब्द वापरतात. हे भाषेच्या संवर्धनासाठी खासच महत्वाचे व प्रसंशनीय आहे. शिवाय ग्रेस ह्यांचे काही आवडते शब्द आहेत. जसे "वाकणे". ते इतक्या ठिकाणी वापरतात की कित्येक ठिकाणी हे लौकिकातले वाकणे, वाचकाला असंभवनीय वाटावे. जसे ( पृ.१८) वरच्या ह्या ओळी पहा:
"हले काचपात्रातली वेल साधी
निनादून घंटा तशा वाकल्या,"
आता घंटा वाकवण्याचे कवीचे कसब वाखाणावे का पुढच्या ओळींशेवटी त्याने "खिळ्यांना दिसेना कुठे क्रूस न्यावा / प्रभूने अशा पापण्या झाकल्या..." ह्या योजनेला "वाकल्या" चांगले जुळते, ही निकड महत्वाची मानावी ? खैर, शब्दांत अनेक अर्थ दडलेले असतात व ते कवीला प्रसंगी सादावतात ही निर्मितीतली प्रक्रिया मात्र आपण इथे सहजी ( वाकून ? ) मान्य करू शकतो.
ग्रेस ह्यांच्या शब्दकळेत काही फार गोजिरे शब्द वास करून असतात. जसे: पडशाळा, स्मरणशाळा, साऊल, सारणी, अन्वयरीत,गोंदणगाव, गोंदणधून, सृजनगंध, वाळवीची कुळे, स्पर्शभुलीचे हुंकार, वगैरे. त्यांची ही निर्मिती-घनता नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
३) ( पृ.३) "प्रत्येक अनुभवाला अंतर्रचनेच्या बांधणीचे एक सूत्रनाते असावे, असा माझा अंदाज आहे. आणि ह्या सूत्रनात्याची संघटना निव्वळ सेंद्रीय गुणधर्म अंगानेच होत असावी."
हे मोठे प्रांजळ व सरळ कथन आहे. जात्यावर बसल्यावर ओवीच सुचते असे आपण म्हणतो, तेव्हा ह्याच तत्वाने ते होत असते. आता अर्थात कोणी जात्यावर "कोलावेरी, कोलावेरी...डी" म्हटले तर तेही खपेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. पण सामान्यत: जसा भाव असेल त्याच अंगांच्या रचनेची कविता होते हे सार्थच म्हणावे लागेल. ह्याचसाठी तर सात्विक भावांसाठी अजूनही आजचे कवी अभंगांचा वापर करतात. प्रेमाला ग़जलच चांगली ठरते. इथे पु.ल.देशपांडेंचे एक वाक्य आठवते. ते म्हणत की कधी काळी जर वाघ माणसांच्या भाषेत बोलला तर तो उर्दूतच बोलेल. इतका उर्दूचा लेहेजा आहे. कदाचित ह्याच कारणाने असेल निर्मितीच्या, कलेच्या विश्लेषणासाठी, कवी ग्रेस ह्यांनी सौंदर्यशास्त्रीय निबंधाची निवड न करता ललित निबंधाची निवड केली असावी.
४) ( पृ.४) "कलाकृती जीवनातूनच निर्माण होते, हे खरे आहे. पण कलाकृतीत व्यक्त झालेले जीवन हे साक्षात जीवनाशी निगडित असले, तरीही त्याचे ते कुठल्याही सबबीवर बांधील नसते."
( पृ.९५) "कला ही जीवनाची पुनर्निर्मिती आहे. थेट निर्मिती सदोष असणारच. पुनर्निर्मिती सदोष राहणार नाही, तर तिचा कल अपर्यायी, परिपूर्णतेकडे झुकणारा असेल, म्हणून रेम्ब्रां, रिल्के, टॉलस्टॉय, व्हिन्सेंट या रंगशब्दपुत्रांना कुर्निसात करताना कुणीतरी सूफी फकिराच्या बाण्याने ओरडलेच आहे. जीवन हे निर्माण आहे, निर्मिती नाहीच, पुनर्निर्मिती तर मुळीच नाही. "
ऍरिस्टॉटल व बुचर ह्यांच्या सौंदर्यशास्त्रीय मतांनुसार हे विधान एकदम तार्किकतेचे आहे व ते कुठल्याही गंभीर विवेचनात मान्य व्हावे असेच आहे. सामान्यांना "कवी तो होता कसा आननी" हे कुतुहूल खूप दाट असते खरे, व कदाचित म्हणूनच आपल्याकडे म्हण तयार झालेली असावी की "नदीचे मूळ व ऋषीचे कूळ शोधू नये". आता प्रत्यक्ष जीवन व कवीचे काव्यजीवन हा विषय निघालाच आहे तर काही गोष्टींचा निर्देश करायला हरकत नाही. पहिले म्हणजे कवी ग्रेस हे एकमेव असे कवी आहेत की जे आपले काव्यजीवन व प्रत्यक्ष जीवन टोपणनावानेच जगतात. फार थोडयांना त्यांचे नाव--माणिक गोडघाटे--आहे हे माहीत असते. हे बेमालूमपणे प्रत्यक्षात काल्पनिकता मिसळणे, हे कसब कवी ग्रेस अगत्याने जोपासतात. त्यांच्या कवितांतून, ललित-निबंधातून भेटणारी नावे, ( जसे: रामदास ( भटकळ), केशव ( जोशी ), मधुकर ( केचे), विराणी, मिथिला, ह्रदयनाथ ( मंगेशकर), दुर्गा ( भागवत), जी.ए.( कुलकर्णी), लता मंगेशकर, राघव, वेल्लोरचे हॉस्पिटल वगैरे ) ही नावे प्रत्यक्षात असलेल्या व्यक्तींची असतात व ती त्यांच्या काव्यात मुक्तपणे येत असतात. शिवाय ते ह्रदयनाथांबरोबर एक अनोखा कार्यक्रमही पेश करतात. ह्या सरमिसळतेत मग वाचकांना काही प्रत्यक्षातल्या गोष्टीही कळत जातात. जसे त्यांना नुकताच झालेला कॅंसर व त्यावरचे मंगेशकर हॉस्पिटलातले उपचार. कवीच्या कलाकृतींवर कदाचित ह्या आजाराचा परिणाम नसेल होत, पण वाचकांना ते कळल्यावर जी साहजिक करुणेची सहानुभूती निर्माण होऊ शकते, त्याचे काय होत असावे हा प्रश्न राहतोच. पुरस्कारांचेही एक वेगळेच जग असते. जेव्हा तरुण कवीची निर्मितीक्षमता व कल्पना भरार्या घेणारी असते, तेव्हा हे पुरस्कार मिळत नसतात तर अगदी अंत:काळीच बरसतात. विंदांनी जेव्हा कविता करणे सोडून दिले, त्यानंतर त्यांना ज्ञानपीठ मिळाले. ऑलिंपिक असे एकच क्षेत्र आहे जिथे तरुणांना तिथल्या तिथच्या कामगिरीवर सुवर्णपदके देतात. एरव्हीच्या जगात त्यासाठी कवीचे संचित गोळा व्हावे लागते.
५) ( पृ.४) "कला अशा जीवनाची पुननिर्मिती करते. आणि या प्रक्रियेत तो अनुभव, जीवनाची जी आकृती कलारूपात साकार होते ती निर्दोष आणि परिपूर्ण असते. तेव्हा कलारूपातील जीवन, हा साक्षात जीवनापुढचा मोठा भयावह दंडक, आणि चिरकालिक आदर्श असतोच. कारण जीवनाच्या फटी आणि उणिवा बुजविण्याचे कार्य करणे, हेच कलाकृतीचे धर्म असतात. "
कलेवर हे धर्म लादणे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने विवादास्पद आहे. कांटच्या म्हणण्याप्रमाणे कलेत हेतुरहित हेतूपूर्णता असते असे मानले तर मग जीवनाच्या फटी व उणीवा बुजविणे हे कलेचे धर्म कसे मानता येतील ? तर्काने इथे विवाद उत्पन्न होत असला तरी जीवनाच्या फटी आणि उणीवा बुजविणे हे कलाकृतीत घडतच नाही असेही आपण म्हणू शकत नाही इतके ते हरघडी होत असते.
६) ( पृ.८) "अस्पष्टता, धुकेपण, संदिग्धता, गूढता या सर्व अनुभवसिद्धीच्या मालिका म्हणजे वास्तवाच्या विरोधात ठाकलेल्या कैदाशिणी आहेत असे आपण समजून बसलो आहोत. आणि मग गूढसंमोहनमार्गातील या कैदाशिणीच्या, हडळींच्या नग्ननृत्यापेक्षा, वास्तवातील शामियान्यात सुरू असलेला नजरबंद अप्सरांचा नाच, ( इट बीइंग फुल ऑफ क्लॅरिटी ), उत्तमच राहणार."
गूढतेचे, ग्रेस ह्यांच्या कवितेत पदोपदी भेटणार्या दुर्बोधतेचे इथे कवी उत्तम समर्थन करीत आहे. त्यांचे टोपण नाव, कवितेत प्रत्यक्षातल्या व्यक्तींचे उल्लेख, खर्या घटनांचे उल्लेख, अफलातून शब्द, हे त्यांचे गूढता वाढवण्याचे हमखासचे हातखंडे आहेत. त्यात अनवधानाने मुद्राराक्षसाच्या चुकाही त्यांना मदत करतात. जसे: ( पृ.९३) "हर मुद्दई के वास्ते दारो रसन नही", इथे "दारो रन" हवे होते. त्याचे "रसन" केल्याने ते दुर्बोध होते. किंवा "कोनाडयात विंचू आणि तिथे निरांजन / नांगीसाठी ज्योत झाली विधात्याचे घन" ही मूळ पुस्तकातली छपाई ते आता सुधारून "घन"ची "धन" करतात. जे मूळ पुस्तकाबरहुकूम "घन"शी झटत राहिले त्यांची अवस्था विचारूच नका. म.वा.धोंडांनी तर ह्या धुकेपणाचे कौतुक केल्याने धुकेच वास्तव शिल्पापेक्षा विलोभनीय ठरले आहे, असा ह्या दुर्बोधतेचा महिमा आहे.
७) ( पृ.१७) "निर्मितीच्या क्षेत्रात अशी कुठलीच सोय नाही. कारण इथे व्युत्पत्ती, व्याकरण, सुबोधता, आणि लौकिकाची सभ्यता यांचा मागमूसही नसतो. भाषा इथे कार्यकारी असते. ती लौकिकातलीच भाषा असते; पण तिच्या मांडणीचे, सर्व विभाव, अनुभाव, लौकिकातील जगण्याच्या जीवनविनिमयाशी संबंधित निर्मितीतील भाषा प्रतिमांच्या संभवामुळे आणि कलावंताच्या कल्पक सृजन उद्भवामुळे, आपले स्वत:चे सौंदर्यसन्मुख, अबाधित, पुननिर्माण करीत असते. त्यामुळे तिचा अनुक्रम, तिची प्रतवारी लावताना व्याकरण, व्युत्पत्ती, यांच्या नियमाप्रमाणे जीवनासक्तीचा क्रियावंत आग्रहही धरता येत नाही. ती प्रतिमांच्या द्वारे सतत सौंदर्यबंधांचे जोडपूल निर्माण करीत जाते. म्हणून जितकी ती जीवनाशी सलगी करत जाते तितकीच ती जीवनाशी लगटही टाळत जाते ."
( पृ.४६) "ही संभाव्य, असंभाव्य, कलावंताच्या निर्मितीतील तरलता पकडण्यासाठी खरेच का जीवाला मृतांच्या धर्मांची शाल पांघरूनच वावरावे लागते ? आणि ही तरलता संतांच्या, महंतांच्या, प्रेषितांच्या कुडीत संभवत नाही. ती फक्त कलावंताच्या निर्मितिशील आत्म्याची कायम, कायमची माहेरवाशीण असते."; "कलावंताच्या निर्मितीप्रक्रियेत, या विदग्ध लहरीत, तरलतेला एकाकीपणाचे वरदान लाभले आहे. वादच नाही. पण या एकाकीपणाला एकट, एकाकी होण्याची अभेद्य अटळ जोड देण्याशिवाय ही तरल लहर चिमटीत पकडताच येत नाही."
कदाचित कलावंतांना भोवणारी एकाकी पणाची जाणीव ही ह्याच "जीवनाशी लगटही टाळत" जाण्याने होत असावी. आणि समाजाचा भाग म्हणून कलावंताला जीवनाशी सलगी करावी लागते त्यामुळे ह्या द्वंद्वाने एक प्रकारचा लहरीपणाही कलावंतांना येत असावा. तशात तरलतेचा शाप कलावंतांना असतो हे आपण प्रत्यही पाहतोच. ह्या तरलतेपायी परत एकाकीपण कसे येते हे सांगणे हा मोठाच आत्मानुभव मानावा लागेल. हे निरिक्षण कलावंताची अडचण सांगणारे नक्कीच आहे.
८) ( पृ.२३) "सृजनभाषा गवसली तर तेवढयाने खरोखरच सृजनाचा ठाव घेता येतो ?"; "कुठलाही सृजनगंध लाभलेला अनुभव पाठीचा नसतो आणि पोटाचा नसतो. तो मुळात निरंगी आणि निराकार असतो. त्याला एखाद्या झाडाला फांद्या फुटाव्यात , सजीव गर्भाला अवयव फुटावेत त्याप्रमाणे त्या अनुभवाचे चित्र, कृती आणि आकारबंधामध्ये रूपांतर होत जाते आणि हा निरंगी अनुभव स्वत:च आकाराचा निराकार स्वामी आहे, असा भास होऊ लागतो."
( पृ.७३) "कलावंत आपल्या निर्मितीतून कोणत्याच शक्तीची शक्यता गोंजारत नाही. शक्ती वेगाने येते आणि वेगानेच कोसळत निघून जाते. कलावंताचा बाणा शक्तीवर नाही तर क्षमतेवर अवलंबून असतो. अनंत क्षमतांची शक्यता निर्मित जाणे, हेच कलेचे कार्य आहे. क्रिएटिव्हिटी नेव्हर डिमान्डस द स्ट्रेंग्थ बट ओन्ली कॅपॅसिटी."
इथे कवीने स्वत:चे भाव मोठ्या स्पष्टतेने प्रगट केले आहेत. आलेला विचार कसा आकार घेईल त्याचे नेमके वर्णन पाटणकर एके ठिकाणी फार मार्मिकतेने करतात. ते "उर्मी"ला वा संकल्पनेला झाडातून स्त्रवणार्या डिंकाची उपमा देतात. काही अनामिक वेदनेने हे स्त्रवणे होत असते व ते कसा आकार घेईल त्याचे काहीच सांगता येत नाही. कधी डिंकाची लांबट तार निघेल तर कधी घट्ट गोळा आकारास येईल. वरील ग्रेस ह्यांचे प्रकटन ह्याच अर्थाचे आहे व ते अगदी पटणारे आहे.
९) ( पृ.५९) "संकल्पना हे माझ्या जीवनव्यवहाराचे आणि निर्मिती व्यवहाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे, हे आता जणू काही ठरून गेल्यासारखेच आहे.";
( पृ.६१) "मी माझ्या तथाकथित निर्मितीसंकुलात असताना, वावरत असताना, बांधणी तत्वांच्या मागे असलेली व्यवस्था कधीही भेदाने, वेधाने नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला नाही.";
( पृ.७२) "भूतकाळाचा त्याग करणे ही माझी जीवनप्रेरणा नाही. ती माझी निर्मिती प्रक्रियाही नाही."
( पृ.३७) "कलाकृतीची निर्मिती अशी होत असते. त्याचप्रमाणे अतीव सावधानतेने कलावंत जीवनाची पुनर्मांडणी करीत नसतो. आणि पुनर्मांडणीच्या रूपाने तो जीवनाची नीतिसंपन्न मांडणीच केवळ करीत नसतो तर त्याची अंतिम सौंदर्यसंपन्नता प्रस्तावित करीत असतो. जीवनाला हा साक्षात्कारी चमत्कार कधीच साधत नसतो. पण अशा साक्षात्कारी चमत्कारांची मांडणी करीत जाणे, हेच कलेचे अधिष्ठान असते."
सगळ्याच माणसांच्या मनात विचार येत असतात. पण इथे ग्रेस त्याला संकल्पना असे संबोधून सांगत आहेत की आलेले विचार त्यांनी प्रामाणिकपणे अमलात आणले आहेत. आणि हे कलावंताचे व्यवच्छेदक लक्षण आहे हे आपण त्यांच्या हेकेखोरपणावरून सहजी मान्य करू. तसेच त्या विचाराला लौकिक भेदाभेदाचे निकष त्यांनी लावले नाही, हेही कोणाही कलाकाराबाबत आपल्याला पटण्यासारखेच आहे. मात्र ते जेव्हा म्हणतात की मी भूतकाळातच रमतो, तेव्हा ते चांगले की वाईट हे समजत नाही. त्यांचे सगळे ललित निबंध पाहिले तर त्यात सर्व ३०/३५ वर्षांपूर्वीच्या कवितांचेच जणू समर्थन सापडते. सृजनाच्या दृष्टीने विचार केला तर हे प्रतिभा संपल्यासारखेच वाटू शकते. ह्रदयनाथांबरोबरच्या कार्यक्रमातही ते जे कविता बोलत असतात त्या सगळ्या ३०/३५ वर्षांपूर्वीच्याच असतात. हे कोणाला भूतकाळात रमण्याबरोबरच प्रतिभा आटल्यासारखे वाटू शकते. स्वत: कवी ग्रेस आपल्या अर्पण पत्रिकेखाली सही करून तारीख देतात : ११ सप्टेंबर २००७ व त्याला म्हणतात : अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी...अस्तपर्वाचे हे त्यांचे प्रांजळ जाण असणे मोठे मोहक आहे.
असेच त्यांच्या रात्री अपरात्री होणार्या, कविता सुचण्याच्या साक्षात्काराचा खूप बोलबाला आहे. कविता सुचणे, तेही रात्री अपरात्री, ह्याला खुद्द दुर्गा भागवतांनी दैवी म्हटलेले आहे. आणि सृजनाच्या भाषेत ते खरेच दैवी आहेही. पण समीक्षेत सुचलेली कविता ज्यास्त मानाची व जुळवलेली कविता कमी मानाची असे काही दर्जे केलेले नसतात. त्यामुळे त्यांचे हे साक्षात्कार दैवी मानले, तरी साहित्यात ते केवळ अवेळी सुचलेले आहेत, म्हणून आपण ते मोठे ठरवणे देवभोळेपणाचे होईल. कवी ग्रेसनाही ते आवडू नये असे हे कारण आहे.
१०) ( पृ.१०३) "कलावंताची निर्मितीप्रक्रियाही आतून केवढी घनदाट, व्यामिश्र आणि आततायी असते याचा अदमासच घेता येत नाही. निर्मितेप्रक्रियेमध्ये टाहो असतोच. पण एक प्रकारचा त्या टाहोला वरच्या वर, अधांतरी तरंगत ठेवणारा एक धा धा वो असतो. म्हणजे त्या त्या अनुभवांच्या हंबरातील धावा मुखर होत असतो."; "ही एक वाट आहे. या वाटेने जाताना, निर्मितीचा विश्वप्रदेश कितपत तुम्हाला सापडेल, हे त्या त्या कलावंताच्या भावानुभूतीच्या अदमास आवाक्यावर अवलंबून असते. आणि त्यावरूनच कलावंतांच्या परी, परिमिती, आणि परिमाणे निश्चित होत असतात."
हेच तत्व कवी ग्रेस त्यांच्या ह्रदयनाथांबरोबरच्या कार्यक्रमात मोठ्या आर्ततेने सांगतात. त्यासाठी ते तुकारामाने अंगावर कढत पाणी फेकले तेव्हा धावा केला त्याचे उदाहरण देतात. तुकाराम महाराज म्हणाले होते: जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥ पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥ घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहींहीं न चले येथें ॥ तुका ह्मणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥"
भावनेच्या उत्कटतेचा हा मरातब कवी ग्रेसना आविष्काराच्या सच्चेपणासाठी मोठा महत्वाचा वाटतो. ह्या वाटण्याच्या प्रखरतेच्या प्रमाणांवरून कलावंतांचे मोजमाप करावे असेही ते सुचवतात. कोणाही कलंदर कलावंताचे लौकिक आयुष्य पाहिले तर ते त्यातले दु:ख किंवा पीडा ह्या आविष्काराच्या सच्चेपणापोटीच सहन करतात की काय असा संशय बळावतो.
परमेश्वराची इच्छा नसेल तर झाडाचे पानही हालत नाही, असे कधी कधी वारा नसला की आपण म्हणतो. ते देवाची महत्ता ठरवणारे असले, तरी रान कशाने हलते हा मुळचा सृजन-शोध पूर्ण होतच नाही. निर्मितीची उर्जा म्हणजे वारा, व त्या वार्याने हालते रान, अशी कवी ग्रेस ह्यांची कल्पना आहे व त्या वार्याला चिमटीत पकडण्यासाठी ते ह्या पुस्तकात एक प्रकारे "रान" उठवत आहेत, हे मात्र निर्विवादपणे वाचकाला जाणवत राहते. त्या रानात घुमलेली ही एक शीळच !
(कवी ग्रेस ह्यांची ख्याती अशी की ह्यांचे शब्दांकडे इतके बारीक लक्ष असते की एक पुस्तक प्रसिद्ध अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिला अर्पण करताना तिच्या नावाचे स्पेलिंग ई पासून आहे की आय पासून ह्याबद्दल जी.ए.कुलकर्णींशी खल करून त्यांनी चक्क तिच्या पी.ए.लाच पत्र लिहिले होते. अशा कवीच्या व पॉप्युलरसारख्या दर्जेदार प्रकाशकाच्या इतक्या चुका ह्या पुस्तकात असाव्यात हे खेदाचे आहे. ते इतर वाचकांसाठी म्हणून कोणाला तरी एकदा सांगणे भागच आहे. म्हणून चुकांची ही यादी : ( पृ.०) "रसन"--पृ.९५वर उदध्रुत केल्याप्रमाणे "दारो रन" हवे; ( पृ.३) "झुळका" हे "झुळुका" हवे ; ( पृ.७) "तारेचे" हे "तारेने" हवे ; ( पृ. १२) "साऊलने काळाचा आधार घेऊन...." हे बोध न होणारे वाक्य ; ( पृ.१२) "अनुकंपा साकार करतो" हे "अनुकंपा साकार करते" असे हवे; ( पृ.१३) "..विचारात पडलो की,.." हे "विचारात पडतो" हवे; ( पृ.१४) "She definately" हे "definitely" हवे ; ( पृ.१५) "नेहेमीच" हे "नेहमीच" असे हवे; ( पृ.१७) "तार्किक हिरिमिरीने" हे "तार्किक तिरिमिरीने"असे हवे; ( प्रु.१९) "घंटा तशा वाकल्या" ह्यात घंटा वाकू शकत नाहीत हे खटकते ; ( पृ.२०) "तोंडीतोंडीच" ऐवजी "तोंडातोंडीच" हवे; ( पृ.२३) "गोंदण सुर्यांचा" ऐवजी "गोंदण सुयांचा" हवे; ( पृ.३१) "तिने कन्येला दिलेला" ऐवजी "मी तिच्या कन्येला" असे हवे; ( पृ. ३२) "...then just" ऐवजी "than just" असे हवे; ( पृ. ३२) "...मधुर अन्वयार्थ त्यांनी" ह्यात "त्यांनी" गाळावे; ( पृ.७५) "..जाहीर करून टाकला. त्याचबरोबर..." इथे पूर्ण विराम नको आहे; ( प्रु.७८) "Let the sun be over our heads.." ह्यात वाक्य पूर्ण होत नाही; ( पृ.८०) "proved" ऐवजी "proven" हवे; ( पृ.८०) "raindear" चे स्पेलिंग "reindeer" असे असायला हवे; ( पृ.८४) "देहलीवरून" इथे "देहलीजवरुन" हवे; ( पृ.८५) "पोवळेपण" ऐवजी "पोळलेपण" हवे; ( पृ.८५) "..नसताच, जिथे" इथे पूर्णविराम हवा; ( पृ. १००) "करयचा" ऐवजी "करायचा" हवे; ( पृ. १०५) "even too" ऐवजी "do" हवे; ( पृ.१०८) "fulfil" ऐवजी "fulfill" हवे; ( पृ.१०९) "तर तर ते" ऐवजी "तर ते" हवे; ( पृ.११८) "माझा प्रस्तुत" ऐवजी "माझ्या प्रस्तुत" हवे; ( पृ.१२१) "tringle" ऐवजी "triangle" हवे; ( पृ.१२२) "tombe" ऐवजी "tomb" हवे; ( पृ.१२२) "gloria" ऐवजी "glories"हवे.)
----------------------------------------------------------------------------
*"वार्याने हलते रान"
कवी: ग्रेस,
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन, पाने:१२२, किंमत:१५०र
--------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडियानगर, घाटकोपर ( पूर्व), मुंबई: ४०००७७
( भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा