वाचाल तर वाचाल----८
"परत मायभूमीकडे"
लेखक: डॉ.संग्राम पाटील
समकालीन प्रकाशन (मार्च,२०११), पृ.१०७, किं:१२५र
एक वेगळा प्रवास
आजकाल वेगळेपण दिसणं हे फार कष्टाचं झालं आहे. जिकडे पाहावे तिकडे "जनांचे प्रवाहो" घोळक्याने व एकाच दिशेने घोंघावत चाललेले दिसतात. त्यात कोणाचे वेगळेपण टिपणे, थोडे थांबून त्यांचे कौतुक करणे हे फार अगत्याचे असते, हेही आपण ह्या धुमश्चक्रीत विसरतो. इंजिनियर, डॉक्टर मंडळींनी परदेशी जाणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्यात त्यांचे परत येणेही ( प्रमाणाने कमी असले तरी ) निरनिराळ्या कारणाने नजरेत भरते. बर्याच जणांच्या परत येण्यामागच्या खंता न लपता स्पष्ट दिसून येतात, तर ह्या पुस्तकातल्या तरुण डॉक्टर दांपत्याचे असेच परत येणे, आवर्जून खेडे गावात प्रॅक्टीस सुरू करणे, थोडे आपल्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणीवेचे भान दाखवणे हे खासे वेगळे तर आहेच, पण बरेच सुखावणारेही आहे. ह्या बद्दल ह्या दांपत्याचे व समकालीन प्रकाशनाचे कौतुक करायलाच हवे. हे पुस्तक वाचायलाच हवे.
खेडेगावातून, गरीबीतून एक मुलगा, संग्राम पाटील, शिक्षणाची कास धरतो, मेहनत करतो, डॉक्टर होतो, नूपूर ह्या डॉक्टर जोडीदारीणीबरोबर पुढील शिक्षणासाठी अनुभवासाठी व जरा कर्ज फेडण्यासाठी चार पैसे मिळविण्यासाठी ब्रिटनला जातो व मायदेशाच्या ओढीने दोघेही परत येऊन एरंडोल येथे एक सुसज्ज हॉस्पिटल व शाळा सुरू करतात अशा ह्या वेगळ्या प्रवासाची ही कहाणी आहे. ती मनोरंजक तर आहेच पण ह्या डॉक्टर दांपत्याचे सत्चरित्र दाखवते व वाचकाला त्यांच्या मोहात पाडते. त्यांच्या ह्या वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाला आपण अभिष्ट-चिंतन द्यायलाच हवे, कारण त्याने नवीन समाजाचे चित्र निश्चितच सुखकर होणारे आहे.
अगदी अडचणीत राहून इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व नोकरी करताना डॉक्टर संग्राम पाटील एक आदर्श राहणीमानाची आपल्याला जाणीव करून देतात. त्यापैकी मुतारीचे पैसे वाचविण्यासाठी ते थंडीत लघवी रोकून ठेवतात, टपालपेटीची वेळ साधण्यासाठी एवढ्या थंडीत मैल दोन मैल पळत जातात वगैरे मनोनिग्रहाचे नमूने वाचकांना आदर्श साधकाचे पाठच देऊन जातात. डॉक्टर अभय बंग ह्यांच्या प्रभावाखाली हे डॉक्टर दांपत्य सेवाव्रताची जाणीव बाणतात, हेही वाचताना अजूनही चांगल्या लोकांचा बराच प्रभाव समाजात पडू शकतो हा दिलासा मिळतो. तसेच हे डॉक्टर दांपत्य समाजातल्या, डॉक्टरी व्यवसायातल्या अनिष्ट प्रथांना बळी पडत नाही हे वाचून चांगुलपणावरचा विश्वास हमखास वाढतो व आजकालच्या वातावरणात ह्याची अत्यंत गरज भासते.
पण पुस्तकाच्या मांडणीत जरा गफलत झाल्यासारखे वाटते. पुस्तकाचा रोख शीर्षकाप्रमाणे ( परत मायभूमीकडे ) मायभूमीतल्या कामावर असावयास हवा होता. पण पारंपारिक आत्मचरित्राच्या थाटात तो इंग्लंडमधल्या आरोग्यव्यवस्था, तिथला समाज, त्यांचे आचार-विचार, तिथले भ्रष्टाचार-मुक्त व्यवहार, ह्याचेच चित्रण करण्यात जातो. त्याने लेखकाला अजूनही तीच ओढ खुणावतेय की काय असा संशय चाटून जातो. पुस्तकाच्या आवाक्यात एकच शेवटचे ( ते ही छोटे-खानी ) प्रकरण मायभूमीतल्या प्रयत्नांसंबंधी असावे हे खटकते अशासाठी की पुस्तकाचा मुख्य रोख ( फोकस ) त्यामुळे बदलतो. इंग्लंडमधल्या अनुभवात लोकांना वेगळेपण दिसणे तितके लोभावत नाही, जितके ते मायभूमीच्या मनसुब्यांवर ठासून वेगळे दिसले असते. तसेच डॉक्टर दांपत्य आता एरंडोल येथे जो दवाखाना चालवताहेत त्यात किती फीस घेतात, मोफत इलाज किती जणांना देतात, तसेच सामाजिक उत्तर-दायित्वाच्या कल्पनेने मलेरियावर काय सार्वजनिक उपाययोजना आखतात, हे विस्ताराने वाचायला वाचकाल आवडले असते. शिवाय त्याने इतर डॉक्टरांनाही मोलाचे दिशादर्शन झाले असते. खैर, ह्या तरुण डॉक्टर दांपत्याचा प्रवास नुकताच कुठे सुरू झालेला असल्याने ते लवकरच वेगळ्या प्रवासातले मैलाचे दगड आपल्या नजरेत आणून देतील अशी आशा करू या व त्यांना शुभेच्छा देऊया.
----------------------------------------------------------------
अरूण अनंत भालेराव * सोबत: पुस्तकाचे मुखपृष्ठाचे चित्र
arunbhalerao67@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा