मंगळवार, ३१ मे, २०११

------------------------------------------------------------------------------------
वाचाल तर वाचाल----७

एंपरर ऑफ ऑल मॅलडीज
लेखक: सिद्धार्थ मुखर्जी
स्क्रिबनर प्रकाशन, (नोव्हेंबर २०१०),
पृ.५५०, किंमत: र ४९९/२९९(फ्लिपकार्ट)

सर्व रोगांचा बादशहा : कर्क-रोग
ह्याच महिन्यात ह्या पुस्तकाला कोलंबिया विद्यापीठाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. शिवाय एका भारतीय डॉक्टराने लिहिलेले, अशा दुहेरी आकर्षणामुळे, हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे झाले आहे.
कर्क-रोग आताशा कमी भयकारी वाटत असला तरी त्याच्या नुसत्या कल्पनेने अजूनही आपला थरकांप होतोच. आपण आजूबाजूला प्रत्यही अनेक माणसे ह्याने बाधित होऊन लढताना पाहतो. त्यांचे वेडेवाकडे झालेले चेहरे, डोक्याला बांधलेले फडके, त्यांचे वारंवारचे केमोथेरपी प्रकरण, रेडियेशन थेरपीचे छळ, होणार्‍या भयंकर वेदना, उलटया, व एकंदरीतच त्रस्त करण्याने, हा रोग आपल्याला तर नाहीच पण जगातल्या कोणालाच होऊ नये, असे पसायदान मागवणारा हा रोग, सर्व रोगांचा बादशहा कसा आहे ह्या कल्पनेने लिहिलेले हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकात कर्करोगाचे जणु चरित्रच रेखाटलेले आहे. आणि ही माहीती अगदी तांत्रिक असली तरी, थोडयाशा चिकाटीने, सामान्यांना समजेल अशा इंग्रजीत वाचताना एखादे ललित वाङमयच वाचतो आहोत असा भास होतो.
गेली शंभर वर्षे अत्यंत हुशार डॉक्टरांना व शास्त्रज्ञानांना चकमा देणारा हा रोग आहे. आज जरी बहुतेक सर्व कर्करोगांवर औषधोपचार उपलब्द असले तरी हा समूळ नष्ट करणे किंवा होऊच नये अशी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अजूनही दुरापास्तच. त्यामुळे अशा हटटी रोगावरचे एक पुस्तक वाचून सगळे ज्ञान होईल हे जरी संभवनीय नसले तरी असे प्रयत्न आजतागायत कसे झाले व त्याला कसे यशापयश येत गेले, आणि हा रोग कसा चोर पावलांनी शरीर काबीज करतो हे खुद्द एका डॉक्टराने, अतिशय सजग भावनेने लिहिलेले आहे. ह्यात रोग्यांच्या कळवळ्यापेक्षा ह्या रोगाचे वागणे, पसरणे, त्यावरचे उपाय, वगैरे तांत्रिक बाबी एक प्रकारच्या उत्तरदायीत्वाच्या भावनेने लेखकाने ठळक केल्या आहेत. त्यात संशोधकाच्या माहीतीचे अवडंबर माजवण्यापेक्षा मूलभूत विचार कसा करावयाचा ह्याचे लेखक प्रत्यंतर आणतो.
ह्या रोगावर अथक परिश्रम करून मेहनतीने व हुशारीने औषधे शोधून काढणार्‍या डॉक्टरांच्या गाथा ( कधी यशाच्या तर कधी अपयशाच्या ) वाचताना जसे नोबेल प्राइज मिळवणार्‍या फार्बर ह्यांची माहीती वाचताना रोमांचित व्हायला होते, तसेच १९२० साली अमेरिकेत गेलेल्या श्री.येल्ला सुब्बाराव ह्या डॉक्टराने रक्तक्षयावरचे फॉलिक ऍसिडवाले औषध कसे शोधले हे वाचताना ( पृ.४१), आपल्याला भारतीय असण्याची धन्यता वाटते.
ह्या रोगाने माणसाला व डॉक्टरांना कसे चकवले हे वाचताना वाचकांचा धीरच सुटावा अशी पाळी येते व त्यावर लेखक फार मूलभूत असे जे हिपोक्रॅटसचे भाष्य आहे त्याची आपल्याला ओळख करून देतो. औषधोपचारावर हिपोक्रॅटस ( पृ. ३५२) म्हणतो, "आर्स लॉंगा, व्हिटा ब्रेव्हिस" ( औषधोपचाराची कला लंबीचौडी, वेळखाऊ आहे, व जीवन छोटे आहे; संधी सारखी निसटती असते; प्रयोग फसतात; व निर्णय चुकतात. ). तसेच ऑंकॉलॉजी ह्या नावाचा उलगडाही मोठा मनोज्ञ वाटतो. ऑंकस ह्या ग्रीक मूळ शब्दाचा अर्थ होतो, एक ओझे, बोजा, जे कर्करोग झालेल्याला कायमच वागवावे लागते. ह्या तांत्रिक मूलभूत माहीतीमुळे हा बोझा थोडा पेलवल्यासारखा तरी भासतो.
सिगरेट मुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो हे आता आपल्याला चांगलेच पटलेले आहे. पण अमेरिकेत ह्यावर तेव्हा कसे जंग छेडावे लागले व त्यावर कसे उपचार शोधले गेले, ह्याची मनोरंजक माहीती ( २८३-३१८) ह्या प्रकरणात वाचून थक्क व्हायला होते. हे वाचताना परळच्या टाटा कर्करोग इस्पितळात त्यांनी जे फलक लावले आहेत, (गुटखा सेवनाने घशाचा कर्करोग कसा होतो त्यासंबंधी), त्याचे स्मरण होते. गुटखा खाणे, तयार करणे ह्यावर अशीच चळवळ करून बंदी आणायला पाहिजे, हे तीव्रतेने जाणवते. सिगरेट उत्पादकांची बाजू जशी तत्कालीन सरकारे घेत, त्याच प्रमाणे सध्याचे आपले सरकार किती बेफिकीरीने गुटखा उत्पादकांची बाजू घेते आहे हे पाहिल्यावर माणसांच्या नशीबी ही दुर्दशा का येते ह्याचे वैषम्य वाटते.
गुंतागुंतीची माहीती अगदी सुगम करण्यात ह्या तरुण लेखकाला चांगलीच हातोटी लाभलेली दिसते. निरनिराळ्या विषारी रसायनांचे मिश्रण ( कॉकटेल) करून करायच्या केमोथेरपीचे विवेचन करताना, ओव्हर-डायग्नोसिस व अंडर-डायग्नोसिसचे संतुलन कसे सांभाळावे लागते हे विशद करताना लेखक ( पृ.३२९-३४८) कोळ्याच्या जाळ्याची उपमा देतो. कोळ्याने जाळे जर फारच बारीक ( दाट ) विणले तर माशीच काय लहान चिलटे, कचरा, धूळही जाळ्यात अडकेल व जाळे फारच दूरदूर ( विरळ ) विणले तर माशाही सटकून जातील. असेच योग्य प्रमाणात औषधांचा डोस डॉक्टरला प्रत्येक पेशंटच्या केसप्रमाणे योजावा लागतो. व म्हणूनच हे प्रकरण खूपच अवघड होते.
प्रतिबंधक उपाय योजना, लसी, कमी साईड-इफेक्टची औषधे, संशोधन, रोग्यांचा पाठपुरावा, अशा कितीतरी तरकीबी अजूनही कर्क-रोगाशी लढताना करायच्या बाकी आहेत हे कबूल, पण ह्या शत्रूशी लढताना आता हा कसा ओळखीचा वाटतो व त्याच्या सगळ्या लहरी, गनीमी लढाया, आता आपल्याला अवगत झालेल्या आहेत असेच हे पुस्तक वाचल्यानंतर वाटायला लागते व ही मोठीच उपलब्धी आहे हे नि:संशय !

------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव *( सोबत चित्र मुखपृष्ठाचे )
arunbhalerao67@gmail.com

१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व), मुंबई : ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा