गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

वाचाल तर वाचाल---९

-------------------
"स्टीव्ह जॉब्स" ले: वाल्टेर आयझॅक्सन
सिमोन ऍंड शुस्टर प्रकाशन, पाने ६००, किंमत र ७९९ ( फ्लिपकार्ट: र ५६०)
-------------------------------
आयझॅक्सनचा स्टीव्हला ई-मान
------------------------------------------
वाल्टेर आयझॅक्सन ही फार थोर असामी आहे. ते सीएनएन चे सर्वेसर्वा होते. तसेच सध्या एस्पेन संस्थेचे मुख्य आहेत. ( ही संस्था जगातल्या विद्वानांची शोध-संस्था आहे ). ह्यांनी आत्तापावेतो आइनस्टाइन, बेंजामिन फ्रॅंकलिन व हेन्‌री किसिंजर ह्यांची चरित्रे लिहिली आहेत. आयझॅक्सन ह्यांनी स्टीव्ह जॉब्सचे चरित्र लिहावे ह्यातच स्टीव्हचा मोठेपणा सिद्ध व्हावा इतका ह्या लेखकाचा दबदबा आहे. लेखक कबूलच करतो की चरित्र लिहिण्याचा लकडा स्टीव्ह जॉब्सनेच त्याच्यामागे लावला होता. पण त्याचबरोबर लेखक हेही सांगतो की त्याने एका अक्षरानेही पुस्तकात बदल केला नाही की काही दबाव आणला नाही. ( फक्त मरताना पुस्तकावरचे चित्र जरा त्याच्या इच्छेप्रमाणे बदलले तेव्हढेच.). ह्या लेखकाचा असा बोलबाला आहे की हे प्रत्यक्ष प्रमाण पाहूनच लिहितात. त्यामुळे स्टीव्ह जॉब्सच्या नाना आख्यायिकांना ह्या पुस्तकात फाटा मिळतो व जे पुराव्यावरून, मुलाखतीतून सिद्ध झाले तेच ह्यात उतरले आहे.
स्टीव्ह जॉब्स हा नाना विसंगतींचा मेळ असलेला गृहस्थ होता. ह्याचे सर्वच अगदी टोकाचे असे. यश मिळाले तेही इतक्या टोकाचे की अजून कित्येक दशके त्याचे नाव संगणक क्षेत्रात मानानेच घेतल्या जाईल. त्याच्या ऍपल कंपनीत सध्या जी रोख शिल्लक आहे ती सबंध अमेरिका देशाची सध्याची तूट भरून काढील इतकी प्रचंड आहे. स्वत:च्या कंपनीतून ज्याला कंपनीने काढून टाकले त्यानेच दहा वर्षानंतर ह्या कंपनीला यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन बसविले. ज्याने एवढे प्रचंड यश कमावले तो वृत्तीने इतका अपरिग्रह करणारा होता की त्याने आपले स्वत:चे घर कैक वर्षे बिना-फर्निचर ठेवले होते व कंपनीचा मुख्याधिकारी म्हणून तो केवळ एक डॉलर वार्षिक पगार घेई. भारतात येऊन त्याने बौद्ध धर्माचा प्रभाव स्वीकारला होता व त्याचविरुद्ध तो राजरोसपणे ड्रग्जही घेत असे. फुकट मिळते म्हणून मंदिरातून त्याने जेवणही घेतलेले आहे. व्यक्तिगत जीवन तर त्याचे इतके नाट्यमय घटनांनी भरलेले होते की त्यावर सहजी कित्येक कादंबर्‍या लिहाव्यात. वयाच्या २७ व्या वर्षी त्याला आपण दत्तक घेतल्या गेलेलो आहेत ते कळते व मग तो खर्‍या आई-वडिलांचा शोध घेतो व तितक्याच निष्ठेने दत्तक आईवडिलांचे ऋण मानतो.त्याच्या मैत्रिणीही पाचसहा असतात. त्यापैकी एकीकडून त्याला वयाच्या २३ व्या वर्षी एक मुलगी होते, पण तिला तो नाकारतो. कारण त्याच्या मैत्रिणीचे इतरांशीही संबंध असतात. जेव्हा कौंटी तिच्यातर्फे त्याच्यावर खटला भरते तेव्हा तो तिची सोय करतो व केवळ नवीन वैज्ञानिक चाचणी आली आहे म्हणून डिएनए टेस्ट करून घेतो.( इथे अमेरिकेतल्या कौंटींचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे). पितृत्व सिद्ध झाल्यावर मुलीचा तो स्वीकार करतो, एवढेच नाही तर पुढे चालून नवा संगणक करतो त्याचे नावही मुलीचे ( लिसा ) ठेवतो. तिची काळजी घेतो. स्वत: अतिशय प्रामाणिकपणे निरंहकारी, विनयशील जीवनशैली स्वीकारत व्हेजिटेरियन राहतो, उपास तापास करतो त्याच भरात प्रचंड पैसेही कमावतो. स्वत: शिक्षण अर्धवट सोडूनही स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्यांना भाषण देताना एका मुलीच्या प्रेमात पडतो व तिच्याशी लग्नही करतो. एखाद्या रोमॅंटिक सिनेमात शोभावे असे हे जीवन. एरव्ही मृदू असणारा हा स्टीव्ह जॉब्स एखाद्या विषयासंबंधी टीका करताना अजिबात दयामाया न ठेवता वाभाडे काढीत असे व कठोर टीका करताना शिव्याही घालीत असे.
बुद्धीच्या हुशारपणाचे मोजमाप करणे हे भारीच जोखमीचे काम असते. ते करताना पारंपारिक रीत म्हणून आपण शैक्षणिक हुशारीलाच महत्व देतो पण संगणक क्षेत्रात जेव्हढे पुस्तकी पढीक आहेत त्यापेक्षा ज्यास्त शिक्षण सोडलेले लोक दिसून येतात. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्‌, फेसबुकचे झुकरबर्ग, ओरॅकलचे लॅरी एलिसन व ऍपलचे स्टीव्ह जॉब्स ह्यांच्यात हुशार कोण हे ठरवणे फारच अवघड आहे. बरे यशस्वी कोण झाले ह्यावरून हुशारी ठरवावी तर सगळेच प्रचंड यशस्वी झालेले आहेत. नवनवीन उत्पादनांचे पेटंटस्‌ ज्याच्या नावावर अधिक त्यावरून हुशारी जोखायची तर ह्याबाबतही सगळे तुल्यबळच म्हणावे लागतील. पण स्वत:ला कॅन्सर झालेला असताना, व हा विषय वैद्यकीय ज्ञानाचा, नवखा, असताना स्टीव्ह जॉब्स त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांची जी मीटींग घेऊन उपचाराचे दिशादिग्दर्शन करतो व त्याचे समर्थन देतो ते त्याच्या बुद्धिमत्तेच्या लांब पल्ल्याची चुणूक दाखविणारे आहे. त्यात कॅंसरवर तो मात करू शकत नाही व त्यातच त्याचा दु:खद शेवट होतो ही एक मोठीच शोकांतिका ठरते.
सृजनाच्या क्षेत्रात हटके विचार करण्याचे इतके अप्रूप आहे की सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करणे ( आउट ऑफ द बॉक्स ) हे अपार मोलाचे ठरते. आजकाल व्यवस्थापन शास्त्रातही ह्याला महत्व आले आहे. त्यामुळेच स्टीव्ह जॉब्सचे कंपनीतले वागणे, सतत नवनवीन उत्पादने शोधून काढणे, ती फटाफट नेमून दिलेल्या वेळेत बाजारात आणणे आणि बाजाराने त्यांना उस्फूर्त प्रतिसाद देणे ह्या योगायोगामागे केवळ काही दैवी असण्यापेक्षा त्याच्या यशाचे काही गमक असणारी रीत असावी असे वाटणे साहजिक आहे. एकेकाळी संगणक क्षेत्रात सगळे नेमून दिलेल्या रीतीने करण्याची, कॅटलॉगप्रमाणे उत्पादने वापरण्याची परंपराच निर्माण झालेली होती. पण स्टीव्ह जॉब्सने ह्याविरुद्ध गोष्टी इतक्या सोप्या व सहज करण्याचा हातखंडा बांधला की ह्याची आयपॉड, आयफोन व आयपॅड ही उत्पादने विना-कॅटलॉग कोणीही वापरू शकतो. केवळ जादू सारखे हे कसब ऍपल कंपनीची ही उत्पादने आपल्याला दाखवतात तेव्हा थक्क व्हायला होते. माझा आठ वर्षांचा अमेरिकेतला नातू पहिल्यांदाच आयपॅड हातात घेऊन जेव्हा मला सांगू लागतो की आजोबा, हे बघा इथे जर एखादा शब्द आपल्याला अवघड असला तर त्यावर फक्त बोट ठेवा व लगेच ते डिक्शनरीमधला त्याचा अर्थ आपल्याला सांगते, तेव्हा स्टीव्ह जॉब्सच्या अपार कल्पकतेची चुणूक दिसून येऊन दिपायला होते. आणि हे सार्‍या जगाला दिपवणे, ऍपलची ही उत्पादने अजून कैक वर्षे करीत राहणार आहेत. सृजनाच्या ह्या यशाला दाद द्यावी तितकी कमीच आहे. व ह्या यशामुळे त्याच्या अमानुष वागण्याच्या तर्‍हांना माफीच द्यावी लागते.
एखाद्या कल्पनेला ती चुकीची आहे असे ठामपणे म्हणणे हे कोणाला सृजनतेच्या दृष्टीने अमानुषतेचे वाटू शकते व ह्या निकषावर स्टीव्ह जॉब्सचे कंपनीतले वागणे खूप जणांना न पटणारे व अतिउद्धटपणाचे वाटणे साहजिक आहे. पण हे केवळ कल्पनेच्या स्तरावर तो करीत असे, वैयक्तिक स्तरावर तो अपार सहानुभूतीचाच रक्षक राहत आलेला आहे असे दाखविणारा एक किस्सा अपार महत्वाचा आहे. त्याच्या टीकेने घायाळ झालेल्या संशोधकांनी त्यांच्यातले सर्वोत्तम जसे दिले तसेच त्यामुळे त्यांना अगणित वेदना होत असत हे तर एव्हाना सर्वपरिचितच झालेले आहे. त्याचा एक संशोधक सहकारी तर शेवटी वेडा होतो. रस्त्याने नागडा हिंडू लागतो. तो स्टीव्ह जॉब्सच्या घरी येऊन दगडे मारू लागतो. एकदा तो बरेच दिवस परागंदा होतो. बर्‍याच दिवसांनी सहकार्‍यांना खबर लागते की तो पोलीस-स्टेशनात बंदिस्त आहे. मग स्टीव्ह जॉब्सवर त्याचे सहकारी त्याला सोडवण्याचे दडपण आणतात. मग स्टीव्ह जॉब्स ओळखी वापरत त्याला सोडवितो. ह्यावर तो त्यांना म्हणतो की कदाचित पुढे मागे मी जर असाच वेडा झालो तर तुम्ही मलाही अशीच मदत कराल ना ? सह-संवेदनांचे माणूसपण इथे स्टीव्ह जॉब्सच्या ह्या कृतीत व उक्तीत जे दिसते ते त्याच्या उद्धटपणाइतकेच मोहकही वाटू लागते.
धुमच्छक्रीचे जीवन जगत असताना स्टीव्ह जॉब्स एखाद्या तत्ववेत्त्यालाही लाजवेल अशा तत्वज्ञानाचे आपल्याला दर्शन देतो, हे ह्या पुस्तकात आयझॅकसनसारखा लेखक अपार कौशल्याने रेखतो. संगणकीय उत्पादनात स्टीव्ह जॉब्सला ऑन-ऑफ स्विचेस आवडत नसत, हे सांगताना त्यामागचे तत्वज्ञान लेखक आपल्याला समजून सांगतो. त्याअगोदर हे ऑन-ऑफ स्विच प्रकरण थोडे उदाहरणाने समजून घेण्यासारखे आहे. जसे गाडीचा दरवाजा उघडला की आतले लाईट लागतात व दरवाजा बंद केला की ते मिटतात, हे साधे उदाहरण घ्या. आतल्या लाईटला ऑन-ऑफ करणारे स्विच असतेच पण ते न वापरता आपण ही सोय अवलंबितो व ते किती सोयीचे होते, ते आता आठवा. स्टीव्ह जॉब्सच्या विचारांनुसार प्रत्येक माणूस जीवनात जे प्रयत्नांती कमावतो, त्याचे हे संचित, ते त्याच्या स्विच-ऑफ होण्याने, मृत्यूने, नुसतेच मिटले जाणे हे न्यायाचे नाही. इथे आपल्याला वाटते स्टीव्ह जॉब्स त्याच्या बौद्ध जाणीवांनी पुन:र्जन्माबद्दल तर बोलत नाही ना ? तर तो एखाद्या व्यवस्थापनशास्त्राच्या थाटात सांगतो की कंपनीच्या कर्त्याधर्त्याच्या मृत्यूनंतर, नवनवीन कल्पक उत्पादने येतच राहिली पाहिजेत अशी, ऑन-ऑफ स्विच विनाची व्यवस्था असली पाहिजे. मग तो ऍपल कंपनी एकापाठोपाठ नवनवीन कल्पक उत्पादने कशी करू शकतात, त्यामागच्या व्यवस्थेची आपल्याला उकल करून देतो. ह्यात कल्पक विचारांना सहानुभूती हवी, हे गृहितक तर आहेच पण त्याचबरोबर चुकीच्या कल्पनेवर, रोखठोकपणे कठोर प्रहार हवा हे तत्वही तो सांगतो. असल्या व्यवस्थेचे आदर्श असलेली डिस्ने ही कंपनी जे सिनेमा क्षेत्रात करू शकली नाही ते स्टीव्ह जॉब्स पिक्सार ह्या त्याच्या कंपनीमार्फत टॉय-स्टोरी, फाईंडिंग नेमो, ए बग्ज लाईफ, टॉय-स्टोरी-२, असे एकापेक्षा एक व्यावसायिक यशाचे व मनोरंजनात अत्युच्च कोटीचे असलेले सिनेमे तयार करतो. असेच त्याच्या मृत्यूनंतर नुकतेच बाजारात आलेले आयफोन ४-एस हे उत्पादन ह्याच निकषावर दाखवून देते की कल्पकतेला मरण नसलेलीच ही ऍपल कंपनी आहे.
जनरीतीप्रमाणे ह्या पुस्तकाच्या उलटही अनेक मते आली आहेत. पण ती स्टीव्ह जॉब्सच्या विचित्र वागण्याने दुखावलेल्यांची असण्याची शक्यता ज्यास्त आहे. किंवा त्याचे तत्वज्ञान मंजूर नसलेल्यांची . एका कसलेल्या लेखकाला स्टीव्ह जॉब्सचे जीवन इतके समृद्ध भासावे व त्यातले रोमांचक क्षण व त्यामागचे दुवे नीट आपल्यासाठी उलगडून दाखवावेत, त्याच्या विचित्रतेच्या मागची तत्वे सांगावीत, हे क्वचितच आढळणारे निरपेक्ष निवेदन मोठे मनोहारी आहे, हे तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावरच कळेल. अवश्य वाचा व एका अवलियाला ई-मान द्या !.

-----------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

---------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा