मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

वाचाल तर वाचाल----

"डिक्टेटर्स हॅंडबुक ( व्हाय बॅड बिहेवियर इज ऑलमोस्ट ऑलवेज गुड पॉलिटिक्स )"
लेखक:ब्रूस ब्यूनो डी मेस्क्विटा
पब्लिक अफेअर्स, पेरसेयस बुक्स ग्रुप, अमेरिका, पाने:४६० किंमत:३० डॉलर

"राजकारणी असे का वागतात"
    आपल्या डॉक्टर रफिक झकेरियांचा मुलगा, सिएनएन वर "फरीद झकेरिया--जीपीएस" नावाचा एक दर्जेदार कार्यक्रम ( शनि/रवीवारी) पेश करत असतो. ग्लोबल पब्लिक स्क्वेअर म्हणजे वैश्विक चौक/कट्टा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असून त्यात जगाच्या राजकारणाची मोठमोठ्या विद्वानांशी चर्चा केलेली असते. तसेच दर कार्यक्रमात फरीद झकेरिया एका पुस्तकाची ओळख करून देतात. त्यामुळे पुस्तक-प्रेमी लोकांसाठी ही खास मेजवानीच असते. पंधरवाड्यापूर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांनी वरील पुस्तकाची माहीती दिली व लेखकाची मुलाखत घेतली. गणितात व अर्थशास्त्रात गेम थियरी नावाचे प्रकरण आहे. त्यात दिलेल्या प्रसंगी, दोन लोक, कसे वागतील व का त्याचे गणिताच्या सहाय्याने विश्लेषण केलेले असते. नोबेल विजेते नॅश ह्यांचे नॅश इक्विलिब्रियम हे ह्यात खूप प्रसिद्ध आहे. राजकारण्यांच्या वागण्यात त्यांचा काय स्वार्थ असतो त्याप्रमाणेच ते वागतात हे त्यातले मुख्य सूत्र असते. तर ह्या गेम थियरीचा उपयोग करून अमेरिकेतल्या ब्यूनो ह्या प्राध्यापकाने केलेले हे विवेचन असून त्याने ते सध्याच्या राजकारण्यांच्या, विशेषत: हुकुमशहांच्या वागण्याला लागू केलेले आहे. कौटिल्य चाणक्याची आठवण करून देणारे हे विवेचन आहे.
    पुस्तकात जी गृहीतके धरलेली आहेत त्याला पुस्ती देणारी सध्याच्या हुकुमशहांची उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे हे नुसतेच पुस्तकी विवेचन न राहता त्याला एक वस्तुस्थितीची चौकट लाभलेली आहे. गंमत म्हणजे लोकशाहीत ज्या व्यक्ती सत्ता काबीज करतात व टिकवितात त्यांनाही ह्या पुस्तकातली प्रमेये लागू पडतात. त्यामुळे पुस्तक वाचताना आपल्याला आजूबाजूची राजकीय परिस्थिती कळत जाते व हे लोक असे का वागतात त्याचा उलगडा व्हायला लागतो. लॉस एंजेलेस ( अमेरिका) जवळच्या एका बेल नावाच्या छोट्या नगरपालिकेतले सत्ताधारी आपल्याला अनुकूल असे नियम करून कसे प्रचंड पैसे कमावतात हे उदाहरण देऊन लेखक एक नियम आपल्याला सांगतो की ज्याच्या हाती सत्ता असते तो ती टिकविण्यात त्याला सोयीस्कर व फायद्याचे काय आहे असेच नियम करतो. आपल्याला ते किती जाचक आहेत हे कळून घेण्याचे त्याचे काम नसते. इथे कोणालाही आपल्याकडच्या जनलोकपाल बिलाची पटकन्‌ आठवण यावी. सत्ताधार्‍यांवर वचक बसविणारा लोकपाल कोणाच सत्ताधार्‍याला नकोसा आहे. त्यामुळेच ते आता त्याबद्दल नाना कारणे निर्माण करून देत आहेत. तसेच अण्णा हजारेंच्या आंदोलनाने लोकसभेच्या खासदारांवरच गदा येत असल्याने ते ह्या लोकपालाविरुद्ध एक होत आहेत.
    कोणताही सत्ताधीश हा एकटा सत्ता हाकू शकत नसतो. त्याला सहाय्याला लागतात विश्वासू माणसे. सत्तेच्या ह्या खेळात महत्वाचे असतात (नावाचे) निवडून देणारे, खरे निवडून देणारे, व चौकडीत सामील होणारे विश्वासू सहकारी. भारतातल्या वाचकांना तात्काळ समजेल की जरी आम जनता ही निवडून देणारी असली तरी खरी निवडून देणारी जनता ही वेगळीच व मोजकीच असते. जसे काही ठिकाणी दलितांचा जोर असतो, काही ठिकाणी मुसलमानांचा जोर असतो तर काही ठिकाणी मराठा समाजाचा. तमाम जनतेचे समर्थन घेण्यापेक्षा ह्या मोजक्याच एकगठठा मतदारांचे म्हणूनच सत्ताकांक्षींना लांगूलचालन करावे लागते व नंतरही सत्ता टिकवण्यासाठी ह्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले की ते सोयीस्कर ठरते. तसेच सत्तेत राहण्यासाठी तमाम लोकांच्या फायद्याचे बघायचे तर ते एक मोठे जिकिरीचे काम असते. त्याऐवजी जे मोजके आमदार, खासदार आहेत त्यांना हाताशी ठेवले की सत्ता हवी तशी वापरता येते. ह्यामुळेच तर भाववाढ होत असताना, लोकांच्या फायद्याचा विचार करण्या ऐवजी सत्ता नेहमी कर कसे लादता येतील त्याचाच विचार करते कारण सरकारगाडा चालायला पैसा हवाच असतो व त्यातूनच आपले पैसे वेगळे काढून ठेवायचे असतात. बरोबरच्या आमदार, खासदारांसाठी थोडी शिते जरा फेकली की झाले. हे आपल्याला मोघम व शास्त्रीय वाटेनासे वाटू नये म्हणून लेखक मग प्रत्यक्ष घडलेली लायबेरीया सारखी उदाहरणे देतो.
    हुकुमशाही किंवा लोकशाहीत करांचे महत्व कसे व किती असते त्यावर लेखक विदारक प्रकाश टाकतो. सरकार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच व त्याच उत्पन्नासाठी कर लादणे आवश्यकच असते. खरे तर सत्ता टिकण्यासाठी कर कमी केले तर जनता सुखी व्हावी पण मग ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला पैसे कमी पडणार. त्यासाठी सत्ताधीशांचा नियम असा की कर बिनधास्त लादायला हवेत व त्यातून आपला मलिदा मिळायला हवा. इथे लेखक पाकीस्तानच्या झरदारींचा दाखला देताना म्हणतो की तिथली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली असली तरी झरदारींची वैयक्तिक मालमत्ता ४ बिलियन डॉलरची झाली आहे. आत्ता आपल्या ध्यानात येईल की महागाई वाढत असताना आपला कॉंग्रेस पक्ष पेट्रोलचे भाव सारखे का वाढवत असतात. कारण त्यातूनच सरकारी तिजोरी भरत असते. आता तिजोरीतून पैसे कसे व केव्हा काढायचे त्यात तर हातखंडा हवाच.
    ज्यांना सत्ता टिकवून ठेवायची आहे त्यांना आपले स्वास्थ्य कसे अबाधित ठेवायला लागते त्याची अनेक उदाहरणे लेखक देतो. त्यात कित्येक उदाहरणात सत्ता हडप करणार्‍याला सध्याच्या सत्ताधीशाच्या तब्येतीची माहीती असणे कसे फायद्याचे होते ह्याची मोठी मजेशीर उदाहरणे दिली आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या ध्यानात येईल की नुकत्याच झालेल्या कॅंन्सरच्या आजाराची सोनिया गांधींनी किती बेमालूमपणे गुप्तता बाळगली होती. कारण त्या आजारी आहेत असे कळते, तर बंडखोरांना आयतेच फावले असते. इथे हिंदुस्थान टाईम्सचे एक संपादक विनोद शर्मा ह्यांचे नुकतेच झालेल्या दूरदर्शनच्या चर्चेची आठवण येते. ते सांगत होते की त्यांनी मनमोहनसिंगांच्या तिसर्‍या बायपास ऑपरेशनची सविस्तर हकीकत पेपरात दिली खरी, पण त्याबद्दल त्यांना भयंकर तंबी देण्यात आली होती. ह्याच पार्श्वभूमीवर सोनियांजींच्या आजारपणाबद्दल अजूनही कोणी ब्र का काढत नाही ते लगेच समजते.
    ज्या देशांत नैसर्गिक संपत्ति भरपूर आहे त्यांची जीडीपी वाढ कशी बेताची होते व ज्यांच्याकडे काही नसते त्यांची वाढ कशी ज्यास्त होते हे विरोधाभासात्मक उदाहरण लेखक एका प्रकरणात छान रंगवून सांगतो. तसेच भ्रष्टाचार हा सत्ता टिकवून ठेवायला कसा उपयोगी पडतो, हे वाचल्यावर तर कौटिल्यीय अर्थशास्त्राची महती पटून आपल्याला सगळे कसे लख्ख दिसायला लागते. ह्या असल्या वैचारिक आतंकवादाने सध्याचे हुकुमशहा हे कसे यशस्वी होत आहेत व त्यातले किती रण सोडून पळताहेत हे लेखकाने अप्रतीम विवेचन करून दाखवले आहे.
    हे सगळे आतल्या गाठीचे राजकारण असे उघड झाल्यावर आपण कसे जागरूक रहायला हवे व सत्तालोलुपांची खरी चाल आपण कशी ओळखली पाहिजे असे कळीचे आवाहन लेखक करतो ते खूप भावणारे आहे. लबाडांची लाज काढणारे हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे व ते लिहिलेले आहे अतिशय मनोरंजक शैलीत.

--------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा