रविवार, १५ जानेवारी, २०१२




---------------------------------------------------------------------------------------------
पोस्ट अमेरिकन वर्ल्ड--२.०( सुधारित आवृत्ती-२.० )
ले: फरीद झकेरिया
नॉर्टन ऍंड कं, प्रकाशन, पाने:२८२, किं:र ११६७(फ्लिपकार्ट)


वाचाल तर वाचाल---१०
अमेरिकेनंतरचे विश्व
    आपल्या टीव्हीवरची भांडणे ऐकून भंडावल्या गेल्यासारखे होते व त्या पार्श्वभूमीवर सीएनएन वरचा रविवारचा फरीद झकेरिया ( आपल्या महाराष्ट्र सरकारचे मंत्री, औरंगाबादचे, असलेले श्री. रफिक झकेरिया ह्यांचे धाकटे चिरंजीव ) ह्यांचा जीपीएस ( ग्लोबल पब्लिक स्क्वेअर, म्हणजेच वैश्विक चावडी ) नावाचा कार्यक्रम फार सुखद व वैचारिक थोरवीचा असतो. ह्या कार्यक्रमात ते नोबेल विजेते, हार्वर्डसारख्या प्रसिद्ध विद्यापीठाचे प्रोफेसर्स, राजकीय पुढारी वगैरेंशी संवाद साधतात व जो कोणता विषय असतो त्याची सांगोपांग चर्चा, शिरा न ताणता, करतात. शिवाय एक महत्वाचे पुस्तकही ते दर आठवडयाला सुचवतात. ही पुस्तके मोठी विद्वत्तापूर्ण व वाचनीय असतात. त्यांनी सहा वर्षांपूर्वी लिहिलेले व नुकतीच सुधारित आवृत्ती काढलेले वरील पुस्तक अर्थातच, त्यांनी स्वत: सुचवलेले आहे.
    जगाच्या राजकारणात अमेरिकेचे वर्चस्व किती आहे, ते आपण जाणतोच. पण जॉर्ज बुश ह्यांच्या फसलेल्या इराक युद्धानंतर व अमेरिकेतल्या आर्थिक संकटानंतर, त्यांची जी दाणादाण झाली व जगात अमेरिका सोडून इतर राजकीय सत्ता कशा आता पुढे येत आहे त्याचे सविस्तर व विश्लेषणात्मक विवेचन ह्या पुस्तकात फरीद झकेरिया ह्यांनी केले आहे. एकेकाळी अमेरिकेला नुसती शिंक आली तर सगळ्या जगाला कशी हुडहुडी भरायची, तेथपासून आता चीनची अर्थव्यवस्था कशी अमेरिकेला आव्हान देते आहे, त्याचबरोबर भारताची प्रगतीही कशी भरभराट आणते आहे व हळूहळू जगाच्या आर्थिक वजनाच्या गुरुत्वाकर्षणाचा मध्यबिंदू कसा आशियात सरकतो आहे हे ह्या पुस्तकात "ब्रेकिंग-न्यूज" च्या थरारात सांगितले आहे. उदा: जगातल्या मुख्य २५ कंपन्या कोणत्या असणार आहेत ते सांगताना ते सांगतात:ब्राझील, मेक्सिको, साउथ कोरिया व तैवान ह्यांच्या चार-चार कंपन्या, तीन भारताच्या, चीनच्या दोन, व प्रत्येकी एक अर्जेंटिना, चिली, मलेशिया व साउथ-आफ्रिकेतल्या. असेच नाटयपूर्ण सांगणे आहे की जगातली सगळ्यात उंच इमारत आता अमेरिकेत नसून दुबईला आहे, जगातला सर्वात मोठा मॉल चीनमध्ये, सर्वात श्रीमंत माणूस मेक्सिकन, सर्वात मोठी पब्लिक कंपनी चीनमध्ये, सर्वात मोठे विमान रशियात, तर सर्वात मोठी रिफायनरी भारतात. अर्थात हे सगळे प्रतिपादन अमेरिकेच्या दृष्टिकोनातून, आता अमेरिकेने कसे वागावे, ह्या नीतीतून होणे साहजिकच आहे. कारण झकेरिया आता अमेरिकन नागरिक आहेत.
    झकेरियांच्या टीव्ही कार्यक्रमामुळे त्यांच्या प्रतिपादनात एक प्रकारचा मोघमपणा आलेला दिसतो, जो पांडित्यपूर्ण व सत्यशोधनाच्या दृष्टीने पुस्तकाचे चारित्र्यच बदलून टाकतो. झकेरिया भारतीय वंशाचे असल्याने भारत व चीन संबंधांबाबत त्यांनी इतिहासाची उजळणी करावी हे साहजिकच आहे. ते करीत असताना ते नेहरूंचे चीन बद्दलचे मत हे कसे वास्तवापेक्षा भावनेवर अवलंबून होते असे ते दाखवतात . सुधारित आवृत्तीत त्यावर टिप्पणी करताना ते असा उल्लेख देतात की शशी थारूर ह्यांनी त्यांच्या पुस्तकात नेहरूंनी अमेरिकेची संयुक्त राष्ट्रसंघातली सेक्युरिटी कौंसिलची देऊ केलेली सीट कशी अव्हेरली ह्याचा दाखला दिलेला आहे. ह्याबाबतीत झकेरियांसारखेच एक तरुण भारतीय लेखक, श्री. ब्रह्मा छेलानी ह्यांनी त्यांच्या "द एशियन जगरनॉट" ह्या पुस्तकात नेहरूंचे सविस्तर वाभाडे काढले आहेत. त्यात नेहरूंची ही घोडचूक कशी होती हे सांगून झाल्यावर त्यांच्याच "सिलेक्टेड वर्क्स ऑफ नेहरू " ह्या ग्रंथातील खालील उतारा दिला आहे : "अमेरिकेने अनधिकृतपणे सांगितले आहे की चीनला संयुक्त राष्ट्रसंघात स्थान द्यावे, पण सेक्युरिटी कौंसिल मध्ये नाही. आणि त्याऐवजी भारताला त्याजागेवर सेक्युरिटी कौंसिलची सीट द्यावी. आम्ही हे मान्य करू शकत नाही कारण असे करण्याने आम्ही चीनपासून दुरावले जाऊ व चीन सारखा महान देश कौंसिलमध्ये नसावा हे अन्यायाचे ( अनफेअर ) होईल.". हे मत कसे नुसते भावनेवर नाही, तर दुराग्रहाचे होते हे दाखवताना छेलानी, ग्लोबल-टाईम्स ह्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या मुखपत्राचा ( २००९ सालच्या ६०व्या वर्धापन-दिनानिमित्ताच्या प्रकाशनात ) दाखला देऊन सांगतात की ज्या ६० विदेशी व्यक्तींमुळे चीनला फायदा झाला त्यात जवाहरलाल नेहरू आहेत, हे खुद्द त्यांची कम्युनिस्ट पार्टीच अभिमानाने सांगत आहे. त्यानंतर छेलानी नेहरूंच्या "पंचशील" चे चीनने कसे हसे उडवले त्याचा इतिहास सांगतात. राजकारणात भले एखाद्या व्यक्तीबद्दल, आदरामुळे मोघम बोलणे सोयीचे असेल, पण रोखठोक व परखड विश्लेषण करताना जर दाखले कोणाची चूक दाखवीत असतील तर ती त्यांच्या पदरात घालावीच लागते, तरच ते प्रांजळ मत म्हणता येईल. हे अर्थातच झकेरियांना परवडले नसते.
    तसेच चीन-भारत संबंधात कसे बदल होत आहेत व कसे होतील हे दाखवताना झकेरिया जपान-चीनच्या बिघडलेल्या संबंधांमुळे भारताला कसा फायदा होतो आहे त्याचा उल्लेखही करीत नाहीत. हे त्यांच्या वैश्विक राजकारणाचे वरकरणीचे समज, दाखवणारे आहे. उदाहरणार्थ जपान-चीन ह्यांच्या संघर्षानंतर जपानने भारताबरोबरचे आर्थिक संबंध कसे सुधारले आहेत हे काही आकडयांवरून कळणारे आहे. लिप्पर ह्या रायटर्स ग्रुपच्या कंपनीने म्हटले आहे की २००५ साली जपानने भारतीय स्टॉक मार्केट मध्ये ५०० बिलियन येन गुंतवले, जे एकूण विदेशी गुंतवणुकीच्या ४० टक्के एवढ्या विपुल प्रमाणात भरते. सखोल संशोधनांती केलेल्या लिखाणात अशी सर्वांगीणता अपेक्षित असते. त्यामानाने नुसत्या मोघम समजावर झकेरिया वाचकाची बोळवण करतात.
    मागे वळून पहात ( हिंड-साईटने) गतेतिहासाचे विश्लेषण करणे ही एक मोठीच आरामदायी बाब असते व त्यात उल्लेखनीय वेल्हाळपणा आणणे कुठल्याही पंडिताला सहजी जमण्यासारखे आहे. त्यामुळे ढोबळ घटना व त्यावर आधारित भाकिते ह्यात झकेरियांना मोहक कसब प्राप्त झालेले आहे. पण राजकीय घटना ह्या अनेक वेळा अनाकलनीय असतात. जसे रशियाची घसरण, अमेरिकेचा २००८ सालचा आर्थिक राडा, अरब राष्ट्रात पसरत चाललेली लोकशाहीची चाहूल वगैरे. अशा माहोलात माणसाच्या जीवीतात मूलगामी निकषांना महत्व येते व तेच अशा काळी कामी यावेत. जसे निरनिराळ्या प्रगत राष्ट्रात असलेले लोकांचे वैयक्तिक प्राप्तीतले असुंतलन ( इन-इक्वालिटी इंडेक्स ). संयुक्त राष्ट्रसंघाचा ह्युमन डेव्हलमेंट रिपोर्ट मध्ये एक जिनी इंडेक्स ह्यासाठी वापरतात. ० म्हणजे सगळ्यांची समान सुधारणा तर १०० म्हणजे अगदी पराकोटीची असुंतलित सुधारणा. अशा इंडेक्स मध्ये चीनचा इंडेक्स ४२ आहे. कम्युनिस्ट विचारसरणी व एकाच पक्षाची सत्ता असूनही कमाईत लोकांची इतके असुंतलन असावे हे भयावह आहे. सिंगापूर सारख्या वरवर आलबेल असलेले छोटेखानी राज्य ही ४२.५ वर आहे, तर सगळ्यात संतुलित राज्ये आहेत : डेन्मार्क ( २४.७); स्वीडन ( २५); नॉर्वे ( २५.८); फिनलॅंड ( २६.९). ह्या क्रमवारीत कुपोषणाची समस्या अजूनही भारताच्या बालकांना भेडसावत असतानाही भारतासाठी हा इंडेक्स ( ३६) चीनपेक्षा बरा असावा ह्यावरून पुढचे भाग्य कोणालाही सहज दिसावे. एकपक्षीय राजवटीत असूनही चीनमध्ये त्यांच्याच आकड्यावरून भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की एकूण १ लाख ७०हजार पार्टीच्या सभासदांवर खटले भरलेले आहेत व त्यापैकी फक्त ३ टक्के लोकांवर त्यांनी कारवाई केलेली आहे. पोलादी पडद्यामागे काहीही करता येते हेच ह्यावरून दिसून येते. चीनच्या ऑलिंपिंकमध्येही हे दिसून आलेले आहे ( जसे एका छोट्या मुलीने म्हटलेले गाणे हा नुसता देखावा होता.). भव्य पूल, लांबरुंद रस्ते, टोलेजंग इमारती ह्या प्रगतीच्या खुणा भल्या आहेत पण त्यामागे केलेली दडपशाही, मध्ये येणारी घरे एका रात्रीत पाडणे वगैरे सोपे प्रकार राजवटीचा खरा चेहरा कधी ना कधी दाखवतातच. अमेरिकेत एका स्वतंत्र संस्थेने ( फंड फॉर पीस ) ह्यांनी १७७ देशांचा एक फेल्ड स्टेट इंडेक्स तयार केला आहे ज्यात कोणत्या देशात संघर्षाचे परिणाम किती खोलवर होऊ शकतात त्याची क्रमवारी दिलेली आहे. त्यात अपेक्षेप्रमाणे सगळ्या खालचा नंबर सोमालियाचा आहे तर सगळ्यात स्थिर देश नॉर्वे आहे असे आढळले. ह्या क्रमवारीत अस्थैर्यात पाकिस्तानचा क्रमांक ७वा आहे तर भारताचा ८७वा ( म्हणजे आपले स्थैर्य चांगले आहे.). ह्या क्रमवारीत चीनचा नंबर १७७ देशात ५७ वा आहे तर रशियाचा ७१ वा आहे. कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्यामागे ही जी मूलभूत वैषम्ये दडलेली आहेत त्यामुळे आज भले चीनचा उदो उदो होत असला तरी वैगुण्ये अनेक आहेत. तसेच पर्यावरणाला पायदळी तुडवणे, अनेक देशांची कदर न करता जगातली मोठी धरणे बांधणे हा उद्दामपणा चीनला एकना एक दिवस भोवणाराच आहे.
    अमेरिकेला आता आपले लक्ष्य आशियात करावे लागणार आहे ह्या झकेरियांच्या निष्कर्षाबाबत मात्र कोणाचेच दुमत होणार नाही. आजच एक बातमी आली आहे की अमेरिकेचे एक अर्थशास्त्रज्ञ ( ज्यांनी २००८ सालच्या आर्थिक घसरणीचे भवितव्य वर्तवले होते), रुबीनी, हे आता भारतात त्यांची संशोधन संस्था काढत आहे. हे त्यांनी सिंगापूर, हॉंगकॉंग, व चीनचे पर्याय डावलून केले आहे त्यावरून कोणत्या देशाचे काय मोल आहे ह्याचा पडताळा येतोच. खैर आशियाचे परत एकदा चांगले दिवस आले आहेत ह्या झकेरियांच्या प्रतिपादनाबद्दल कोणालाही अभिमानच वाटेल. त्यासाठी तरी हे पुस्तक अवश्य वाचनीय आहे.

------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

--------------------------------------------------------------------

 

1 टिप्पणी: