बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४


-----------------------------
नेमाडेपंथी वेंडी डोनिगर
----------------------------
नुकतेच साहित्यिक वर्तुळात एक वादळ उठले व शमले. डॉ. वेंडी डॉनिगर ह्या बाईंचे एक पुस्तक २००९ साली आले होते ( पेन्ग्विन इंडिया तर्फे ) "द हिंदूज: ऍन आल्टरनेटिव्ह हिस्टरी" नावाचे. बाईंचा हिंदू धर्माचा अभ्यास हा संस्कृत भाषेच्या अंगाने व मूलत: भाषांतरित साहित्याच्या अंगाने झालेला आहे. पण त्यांच्या हाताखाली त्यांनी हिंदू धर्माच्याच विषयात असंख्य विद्यार्थ्यांना पिएच.ड्या. दिलेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेत ( शिकॅगो विद्यापीठ ) त्यांचा हिंदू धर्माबाबत फार दबदबा/दादागिरी आहे. तरीही अनेक हिंदूंनी ह्या पुस्तकाला विरोध केला. कारण होते त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे. चार वर्षे कोर्टात खटला दाखल झालेला होता. तो आता फौजदारीत वर्ग होणार होता. तशात प्रकाशकांनी माघार घेत सगळी पुस्तके नष्ट करण्याचे ( स्वखर्चाने पुस्तके लोकांकडून परत घेऊन त्याचा लगदा करण्याचे ) मान्य करीत कोर्टाबाहेर समझौता केला. कोण आहेत ह्या वेंडी डॉनिगर व असे काय होते ह्या पुस्तकात ?
आपल्या राज्यघटनेत ज्या विद्यापीठांना अनुदान ( सरकारी मदत/पैसा ) मिळते तिथे एखाद्या धर्माचा विषय शिकवायला कायद्याने बंदी आहे. आपण निधर्मी ( सेक्युलर ) असल्याने असा नियम आहे. ( आता मदरशांत इस्लामचे शिक्षण कसे देतात हा प्रश्न अजून आलेला नाही.). त्यामुळे आपल्याकडच्या विद्यापीठात धर्माबाबत एम.ए. वा पिएच.डी असे अभ्यासक्रम असत नाहीत. पण अमेरिकेत असे नसल्याने की काय शिकॅगो विद्यापीठात "एशीयन रिलीजन्स" असे विद्यासन आहे व त्याच्या प्रमुख आहेत ह्या वेंडी बाई. त्या एका प्रकाशकाच्या कन्या होत्या व त्यांची आजपर्यंत १६ पुस्तके ( जाड बाडे ) प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातली गाजलेली आहेत, कामसूत्रावर, व रुग्वेदावर. ह्या बाईंना संस्कृत येते ( म्हणून त्या फिलॉलॉजिस्ट ) व त्या अनुषंगाने त्या हिंदू धर्माबाबत लिहीत असतात. (नेमाडेही फिलॉलॉजिस्ट, त्यांचा शिकायचा विषय इंग्रजी तर शिकवण्याचा इंग्रजी, मराठी होता व हिंदू ही एका धर्मावरची कादंबरी आहे, हे सारखेपण मोठे मनोहारी आहे. ).  त्यांची एकूण शैली ही सायकोऍनालिसिसची असून हिंदू धर्मातल्या सेक्स बद्दल त्या नेहमी लिहीत असतात. वरील पुस्तक त्यांचे २००९ साली प्रसिद्ध झाल्यावर त्यावर अनेक हिंदूंनी विरोध दर्शवला ( त्यात प्रमुख आहेत एक राजीव मलहोत्रा नामक उद्योगपती ) व दिल्लीला शिक्षा बचाव आंदोलन समीतीने चार वर्षांपूर्वीच ह्या पुस्तकाने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या ह्या मुद्यावरून सिव्हिल खटला दाखल केला. त्यावर कालच पेन्ग्विन इंडिया ह्या त्यांच्या प्रकाशकांनी सपशेल माघार घेत समझोता केला आहे. खरे तर, विचार स्वातंत्र्याच्या कलमाखाली कोणत्याही पुस्तकावर बंदी येणे हे चांगले नाही, पण त्या आड जर एखाद्या धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या तर मग नाईलाज होतो. हे आपण चित्रकार हुसेन ह्यांच्या चित्रांविरुद्ध केलेल्या खटल्यांदरम्यान पाहिलेच आहे. चित्रकाराला कसेही चित्र काढायची परवानगी असतेच, पण त्याने नेमक्या हिंदू देवतेचे ( सरस्वतीचे ) नागडे चित्र काढले तर साहजिकच हिंदूंच्या भावना दुखावल्याने, त्याला विचार-स्वातंत्र्याचा टेकू मिळू नये असेच कायदा सांगतो. तसेच काहीसे इथे घडले असावे, नसता पेन्ग्विन सारखी मातब्बर कंपनी अशी पुस्तक मागे घ्यायला तयार झाली नसती.
मला ह्या पुस्तकाचा माग बडोद्याच्या दादूमियां ह्यांच्या फोनमुळे लागला. ( महिनाभरापूर्वी ) मी त्यांच्याशी बोलत असताना नेमाडेंचा विषय निघताच त्यांनी ह्या पुस्तकाविषयी सांगितले व ते नेमाडे ह्यांच्याशी त्याबाबत बोलले होते हेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दहा पंधरा दिवसांनी मला हे पुस्तक मिळाले व त्याच्या वाचनानंतर आता ही बातमी ( हे पुस्तक मागे घेतल्याची ) आली. त्यामुळे ह्या पुस्तकाचा परामर्श घेणे क्रमप्राप्त झाले. शिवाय हे पुस्तक, त्याची लेखिका व नेमाडे ह्यांची शैली व वृत्ती ही साम्यस्थळे ह्या अभ्यासात प्रखरतेने जाणवली व साहित्य जगतात हे एक धोक्याचेच वळण असल्याने त्याचा इथे परामर्श घेण्याचे योजले आहे.
"द हिंदूज : ऍन आल्टरनेटिव्ह हिस्टरी" ह्या पुस्तकाची लेखिका डॉ.वेंडी डॉनिगर ह्या विदुषी अगदी नेमाडेपंथी वळणाच्या आहेत. नेमाडेंना जशी इतिहास लेखनाची शिस्त पाळणे नको असते, पण इतिहासाला आपल्या कलाप्रमाणे वळवणे हवे असते, तसेच ह्या बाईंचे आहे. नेमाडे ह्यांच्या कादंबरीचे नाव "हिंदू : एक समृद्ध अडगळ" तर ह्या बाईंच्या पुस्तकाचे शीर्षक "द हिंदूज : ऍन आल्टरनेटिव्ह हिस्टरी" असे आहे. म्हणजे उपशीर्षकही समान अर्थाचेच आहे. नेमाडेंची म्हणायला कादंबरी आहे पण ती आत्मचरित्रपर असल्याने ती प्रत्यक्ष हकीकतीच सांगणारी आहे, तर ह्या बाईंचे पुस्तक हे अधिकृत रित्या नॉन-फिक्शन असले तरी ते त्यांचे लांबलचक स्वगतच आहे. दोन्हीही पुस्तके काही "इतिहास" नाहीत. दोघेही इतिहासाची शिस्त पाळीत नाहीत व दोघेही तेव्हढेच इतर इतिहासकारांबद्दल  आक्रमक आहेत. जसे हिंदू कादंबरीच्या प्रमोशनच्या मुलाखतीत नेमाडे म्हणतात की इतिहासकार राजवाडे हा मोठा धूर्त ब्राह्मण होता. त्याने ज्ञानेश्वरीची मूळ प्रत जाळून टाकली व त्यांनीच आपल्या ओव्या ह्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या म्हणून ह्या प्रतीत घुसवल्या असाव्यात. नेमाडेंना स्वत: इतिहासाच्या ज्ञानशाखेचे गम्य नाही व त्या शाखेची शिस्त तर अजिबात नाही. पण इतिहासात ढवळाढवळ मात्र त्यांना संभाजी ब्रिगेडच्या तोडीचीच करायची आहे. ह्या वेंडी डॉनिगर बाई ह्या प्रोफेसर आहेत "एशिअन धर्म" विषयाच्या पण त्या नेमाडेपंथी वळणाने हिंदूंच्या "इतिहासा"ला त्यांना पाहिजे तशी कलाटणी देऊ इच्छितात.
दुसर्‍या धर्माची चिकित्सा आपण करू नये असे काही बंधन नाही. पण चिकित्सेत व चेष्टेत निश्चितच फरक ठेवायला हवा. ह्या वेंडी बाईंनी जी निरिक्षणे केली आहेत ती काही खोटी आहेत असे नाही पण ती चेष्टा करण्याच्या मिषाने वा वाकुल्या दाखवण्याच्या प्रकारच्या आहेत. ती काही शास्त्रीय चिकित्सा म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ त्यांनी पुस्तकात पेरलेली ही निरिक्षणे पहा : वेंडी डॉनिगर बाई ह्या पुस्तकात ठिकठिकाणी हिंदू धर्माला आवडणार नाही अशा गोष्टी मोठ्या त्वेषाने सांगतात. त्यातल्या काही अशा : १) गीता हे पुस्तक अहिंसा नव्हे तर हिंसा कशी करावी ते सांगते. २) कृष्ण हा देव मारामार्‍या कशा कराव्यात युद्धे कशी करावीत ते सांगतो व गीतेत त्याचे समर्थन देतो. ३) पूर्वी सगळी ब्राह्मण मंडळी गाईचे मास खात असत. ४) स्वामी विवेकानंद हे गोमांस भक्षण करण्यास प्रोत्साहन देत असत. ५) विवेकानंद हे समलिंगि-संभोग करणारे होते ६) रामकृष्ण परमहंस हे समलिंगी संभोग करणारे होते. ७) गांधीजी त्यांच्या मुलीच्या वयाच्या तरुण मुलींसोबत नागडे झोपत असत. ८) हिंदू लोक हे अजिबात सहिष्णू नव्हते. ९) हिंदू लोकात स्त्रियांना अजिबात स्वातंत्र्य नाही व त्या केवळ वासनेसाठी मानल्या जातात. १०) रामाबरोबर कायम राहणार्‍या लक्ष्मणाला सीतेबद्दल सुप्त आकर्षण वाटत असते. ( आता हे ह्या बाईंना कसे कळले ? ). ११) हिंदू धर्म हा कुठल्याही मूलभूत तत्वावर आधारलेला नसून काही थातुरमातुर चालीरीतीतून तो उभा राहिलेला आहे.  ह्या कुठल्याही प्रतिपादनाला काहीही शास्त्राधार वा पुरावा लेखिका देत नाही तर हे ठाम वैयक्तिक मत म्हणून दडपून सांगते. एकेकाळी रामकृष्ण परमहंस म्हणे इस्लामची चिकित्सा करू इच्छित होते तेव्हा त्या आधी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, स्वत: मुस्लिम झाले व त्या भावनेने इस्लामकडे पाहात त्यांनी अभ्यास केला. हे खरे खोटे करण्यापेक्षा  धर्मशरण प्रवृत्तीने नेहमीच धर्मचिकित्सा संभवनीय असणार नाही हे आपण मानू शकतो. पण निदान ती चिकित्सा कोणताही कटू पूर्वग्रह न बाळगता करावी हे तर कोणीही मान्य करील. ह्या वेंडी डॉनीगर बाईंना हे पथ्य पाळणे जमलेले नाही हे त्यांच्या काही पुस्तकांच्या शीर्षकांकडे पाहिले तरी लक्षात येईल. जसे त्यांचे एक पुस्तक आहे "द ओरिजिन ऑफ इव्हिल इन हिंदू मायथॉलॉजी". दुसरे एक पुस्तक आहे "बेडट्रिक" नावाचे, ज्यात सर्व काही पलंगावरल्या करामतीच असतात असे सेक्सची व्याप्ती दाखवणारे कथन आहे. मुळात इव्हिल आणि गुड ( चांगले आणि वाईट ) ह्यांच्या कायमच्या लढाईत जगातले अनेक धर्म, अनेक लोकांबरोबर जखडल्या जातात हे खरे असले तरी एखाद्या पाहणीत आढळलेले इव्हिल ( वाईट ) हे काही कायमचेच वाईट असत नाही हे कोणाही धर्माच्या चालीरीतींचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. सतीची चाल, केशवपन, विधवा-विवाह-बंदी ह्या काही हिंदू धर्मातल्या चांगल्या चालीरीती निश्चितच नव्हत्या पण त्या कालांतराने हिंदूंनीच मोडल्या व धर्मावर आलेले सांवट दूर केले. असेच सगळ्या धर्मात चालीरीतींची उत्क्रांती होत होतच रीती उत्पन्न होतात व लयास जातात. हे जणु काही एखाद्या सजीव जीवाच्या जीवनात घडते ( उत्क्रांतीत काही वाईट गोष्टी गळून पडतात तसे ) तसेच धर्म ह्या संस्थेतही घडत असते. चिकित्सा करणार्‍याने त्याच्या समजुतीनुसार चांगले वाईट हयाचा निवाडा करायचा असतो. त्यात अभिनिवेष आणून काही साधत नसते. इथेच वेंडी बाईंची फसगत होते.
शैली व मांडणीमागची भूमिका ह्याबाबतीत नेमाडे व ह्या बाईंचे खूपच सारखेपण आहे. ह्या बाई हिंदू धर्म व त्याच्या इतिहासाकडे मानसोपचार तज्ज्ञाच्या दृष्टीने पाहतात. सायको-ऍनालिसिस च्या तंत्राने त्या धर्माचे व इतिहासाचे विश्लेषण करतात. शिवाय सबंध पुस्तक त्या संवादाच्या शैलीच्या अंगाने लिहितात. वाचकाला स्वत:ची मते सुनावतात व पटवतात. त्यातून हा पहा असाच इतिहास होता असे त्यांना सिद्ध करायचे आहे. नेमाडेही अशाच वळणाने कादंबरीत आपली मते पेरीत जातात. उदाहरणार्थ हिंदू कादंबरीतले ज्ञानेश्वरांचे हे प्रकरण पहा : "हिंदू"त जातीयते मुळे जातीजातींचा एकमेकावरचा दाब कसा उफाळून येतो हे दाखवणारा खास नेमाडपंथी वळणाचा एक किस्सा ( पृ.१५६) दिलाय. तो असा : "एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. " इथे केवळ कादंबरीतले एखादे पात्र हा प्रमाद करीत नसून लेखक त्याचा अर्थ आपल्याला मानसशास्त्रांच्या आडवळणाने आपल्याला समजून सांगत आहे. ज्ञानेश्वरीत खरेच अशा ओव्या आहेत काय ? ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्यात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो. काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे. काव्यशास्त्रात दृष्टांत हा अलंकार, व्याख्या करताना, म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला, असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. इथे हा वेसकर ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते.शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर, निवडून, ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा, तर "दाब वर येणे" दिसणे शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना"!. त्यात महानुभावी पंथाचे नेमाडे वा नायक खंडेराव व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " . असा अर्थ काढून दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच. शिवाय ज्या अकादेमीच्या मानसन्मानासाठी कादंबरीचा आटापिटा आहे, तिच्या सौंदर्यात काडीचीही अशा कलागतींनी भर पडत नाही.
ह्याच पार्श्वभूमीवर डॉ.आनंद यादव ह्यांचे तुकारामवरच्या पुस्तकाचे प्रकरण आठवून पहा. इथे डॉ.यादव हे स्वत: तुकाराम भक्त. पण अनवधानाने कादंबरीकरण करताना तरुण तुकाराम दुकानात आलेल्या मुलींना गोळ्या ( चॉकलेट ) देता देता हाताने स्पर्शतो असे लिहिल्याने वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या गेल्या व यादवांना पुस्तकच काय संमेलनाचे अध्यक्षपदही गमवावे लागले. कामभावना ही  सर्वव्यापी असते व त्यातून देवांचीही सुटका नसते हे जरी वैश्विक सत्य असले तरी देवांनी अशा भावनेला बळी पडल्याचे कोणत्या धर्मानुयायाला आवडेल ? त्यात देवावरची श्रद्धा असण्याबरोबरच , मानवी कमजोरींवर देवाने मिळवलेला विजय ह्या आदर्शाचेच आपण कौतुक करीत असतो. वेंडी बाई जेव्हा रामाबरोबर असलेल्या लक्ष्मणाला सीतेबद्दल लैंगिक आकर्षण वाटते असे म्हणतात तेव्हा त्याचा शास्त्राधाराने पुरावा देण्यापेक्षा ही एक चेष्टा करण्याचाच प्रकार होतो. कारण ह्या निरिक्षणातून हिंदू धर्माची अवहेलना करण्याचाच मानस दिसतो.
असल्याच सायको-ऍनालिसिस पद्धतीने वेंडी डॉनिगर ह्या बाई त्यांच्या पुस्तकात आपल्याला रामकृष्ण परमहंस ह्यांच्या बद्दल सांगतात. ते सांगताना त्या म्हणतात की रामकृष्ण परमहंस हे होमोसेक्स्युअल होते व त्यात ते शिष्यांचा उपयोग करून घेत. आणि ह्याच्या समर्थनात त्या विवेकानंदांनाही ओढतात. हे ऐतिहासिक सत्य म्हणून दडपून सांगताना त्या आपल्या मानसशास्त्राच्या ज्ञानाचा आधार घेतात. शिष्यांशी केलेले स्पर्श वाचून ती वागणूक समलिंगी माणसांची आहे असे ठासून देतात. आज अमेरिकेत भले होमोसेक्युअलिटी हा वंद्य प्रकार असेल पण हिंदूंना कुठल्याही ऐतिहासिक पुराव्याअभावी त्यांचे एक वंदनीय संत असे होमोसेक्स्युअल होते अशी बदनामीकारक माहीती स्वत:च्या सायको-ऍनालिसिसच्या सहाय्याने दणाकावून द्यायची ही पद्धत वर दिलेल्या नेमाडे ह्यांच्या वळणाचीच आहे. बरे दोघेही काही सायकिअट्रिस्ट नाहीत वा त्या विषयाच्या शिस्तीतून ते हे निवेदन करीत नाहीत तर शिळोप्याच्या गोष्टीसारखे ठोकून देत आहेत.
ह्या प्रणालीच्या पार्श्वभूमीवर एक प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार आहेत भैरप्पा त्यांचे सायकोऍनालिसिसचे कसब पहा.  ब्राह्मणांविरुद्ध दाब वर येण्याचा, भैरप्पांच्या "जा ओलांडुनी" मधला, ( पृ.२२६) हा संवाद पहा. कथेची नायिका असलेल्या सत्या चा भाऊ ( जो ब्राह्मण व पुजारी असतो ) तो निवडणुकात ब्राह्मण-विरोधात कसा प्रचार करतात ते सांगताना म्हणतो: "हजारो वर्ष घरात बसून ब्राह्मणांच्या बायकांनी आपली कातडी गोरी करून घेतली आहे, आमच्या बायका उन्हातान्हात शेतात राबून काळ्या झाल्या आहेत. त्या बिचार्‍या बामणांची घरची खरकटी भांडी घासत होत्या. माझ्या हातात आणखी दहा वर्ष सत्ता येऊ दे. बामणांच्या बायकांना आमच्या घरचे केरवारे करून खरकटी भांडी घासायला लावतो, आमच्या शेतांवर उन्हा-तान्हात राबायला लावतो--". आता भैरप्पांच्या कादंबरीचा मूळ रोख, प्रत्येक जात ब्राह्मणासारखे वागायचे प्रयत्न करते, असा वेगळाच असला तरी ब्राह्मण-विरोधाचा प्रसंग वर्णन करताना इथे पहा ते कसे सांगोपांग तर्क देत आहेत. असलेच तर हे खरे "दाब वर येणे " म्हणता येईल. ह्याला फ्राइडचा वरदहस्त नको किंवा ओढून ताणून ज्ञानेश्वरांचे विडंबन करायला नको. शिवाय सगळे कसे सभ्यतेत बसणारे आहे. बरे ह्या कादंबरीला खुद्द साहित्य अकादेमीनेच पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे ती तुल्यबळ आहेच. भले नेमाडे आता शिकण्यापल्याड असतील पण नवशिक्या कादंबरीकारांना, एखादे विद्रोहाचे कसे वर्णन करावे, व समर्थनाचा पाया कसा मजबूत असावा, त्याचा हा आदर्श असा वस्तुपाठच आहे. आणि तो वेंडी बाईंनीही पाळण्यायोग्य आहे.
प्रस्तुत "द हिंदूज" हे पुस्तक लिहायच्या आधी वेंडी बाईंनी कामसूत्रावर सुधीर काकरासोबत एक मोठ्ठे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे व सायको-ऍनालिसिसची एकदा कास धरलेली असल्यामुळे की काय बाईंच्या सर्वच विवेचनात कामुकतेचे ( सेक्सुअलिटीचे ) प्रचंड स्तोम माजते. त्या हिंदू धर्मात सगळीकडे लिंगाची पूजा कशी चालते ते दाखवत सगळ्या धार्मिक विचारात कामुकता कशी व्यापून आहे, असे आपले मत दडपून सांगतात. आता ह्याला त्या काही शास्त्राधार देत नाहीत तर जे प्रत्यक्ष दिसणारी प्रतीके आहेत ( जसे शिवलिंग वगैरे ) त्यावरून सायकोऍनालिसिसने हे सांगत आहेत. हे हिंदूंना कसे पटावे ?
असेच काहीसे नेमाडेही हिंदू मध्ये करतात. जगात निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे ह्या एकाच निकषावर, खरे तर, कोणाही लेखकाची स्त्रीवादाकडे पाहण्याची व तसे चित्रण करण्याची जबाबदारी खूपच वाढते. पण नेमाडेंच्या कादंबरीत स्त्री-पात्रे अगदी वावडे असल्यासारखी, मख्खपणे, वावरतात. एकवेळ नायक खंडेराव लग्न करीत नाही, हा आपण समर्थांचा प्रभाव म्हणून सोडून देऊ.( समर्थांची ते टिंगल-टवाळी करीत असले तरी !) पण कथानकात प्रभाव पाडणारे स्त्रीपात्र नसावे हे "कास्टिंग कौच" चे गौडबंगाल अनाकलनीय आहे. त्यात भर म्हणजे कथानकात जी पात्रे भरपूर पाने व्यापून राहिली आहेत ती आहेत, कामोत्तेजित करणार्‍या "लभान्या" ( किंवा लमाणी स्त्रिया ), गावातल्या झेंडी, बनी रांड वगैरे नावाच्या वेश्या. ह्यांना करून करून किती उदात्त करणार ? दुसर्‍या आहेत, नात्यातल्या आत्या, आजी वगैरे स्त्रिया, ज्यांची हयात व कर्तबगारी घरकाम व रगाडयातच जाते. त्यातल्या आत्या हे पात्र लग्नानंतर लगेच माघारी येते, घरात अडगळीला राहून राब-राब राबते व इतके करून इस्टेटीत तिला वाटा देत नाहीत. नायक खंडेराव ह्याबाबत खंत बाळगतो पण त्याचे परिमार्जन काही करत नाही. अर्थात नायकाने कसे वागावे हा सर्वस्वी लेखकाच्या अखत्यारीतला प्रश्न असला तरी नेमाडे हे निश्चित नैतिक भूमिकेचे श्रेय मिरवणारे असल्याने नायकही तसे वागेल असे वाटत होते. तशात ही आत्मचरित्रपर कादंबरी असल्याने लेखक व नायक हे एकच आहेत असे समजण्यास वाव राहतो. गंमत म्हणजे ते आवर्जून वडिलांनी त्यांच्या डोळ्याच्या इजा (लहानपणी ) होण्यावर घेतलेली काळजी छान रंगवतात पण त्याच जोडीला आईचे काही सांगत नाहीत. ( आणि तरीही त्यांना साने गुरुजींबद्दल, श्यामच्या आईबद्दल, आदर आहे !). कथेत नायक म्हातारा झाल्यावर त्याचा मुलगा त्याला दहिसरला रहा म्हणतो, गावी येत नाही, असे वर्णन येते ( म्हणजे यथावकाश नायकाने लग्न केलेच असणार ). पण ते आपल्या पत्नीचे, नायकाच्या आईचे एक अवाक्षरही काढीत नाहीत. हे एक प्रकारचे स्त्री-तुसडेपण कादंबरीभर मिरवण्याचे प्रयोजन मात्र दिसत नाही, शोभत तर नाहीच. इतके असूनही रीतीप्रमाणे ("पोलिटिकली करेक्ट") असण्याचा धाक/रेटा असा आहे की स्त्रीवादाचे सेमिनार ते कथेत दाखवतात, त्यानिमित्ताने समर्थ रामदास काय किंवा गौतम बुद्ध काय ह्यांची टवाळी करतात. तसेच काही काही आवश्यक कल्पना, रम्यपणे, पण न फुलवता, नुसत्या उदघोषित करतात. जसे : "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे की जीवशास्त्रीय ?" असा एक सवाल ते वाचकांना टाकून जातात. एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याने परिक्षेत प्रश्न सोडवल्या-(अटेंप्ट)-केल्यासारखा, काठावर (पासिंग) मार्क मिळवण्यासारखा हा यत्न राहतो ! पण सेक्स्युअलिटी दाखविण्याचा जो खपाचा भरवसा देणारा प्रकार असतो त्याच्यासाठी नेमाडे "तसले" प्रकार हमखास योजतात, ते असे :
(पृ.२६):"मुक्त ह्या संस्कृत शब्दाऐवजी आपला देशी शब्द मोकाटच ह्या संदर्भात वापरला पाहिजे. बस. तेवढ एक झालं की आपल्या मुली सुधारल्याच समज. लैंगिकदृष्ट्या लहानपणापासून ह्या बायका मोकाट असल्यानं पुढे काही भीड राहत नाही. व्यभिचाराचीही शक्यता ह्यात गृहित धरली जाते. प्रत्यक्षात लैंगिक अतिचार अशाच बाया करतात."
(पृ.१५७):"...अरे, पण सुईच्या मर्जीशिवाय दोरा जाईल काय ? "
(पृ.२०६):"..ह्या मारवाड्याच्या सारख्या दिसणार्‍या पोरांना गावातल्या शेतकर्‍यांच्या कामानं रंजलेल्या बायका, रे, इकडे ये बरं. तू कोणाचा ? असं विचारायच्या, मग त्यानं बापाचं नाव सांगितलं, की सगळ्य़ा पोट धरधरून हसायच्या. धनमत्सर. "
(पृ.२५७):"गाय आणि बायको---संध्याकाळशी दावणीला पाह्यजे."
(पृ.२६३):"आता दोन राण्याही गेल्या, त्यामुळे हल्ली एकाच बायकोत आवडती आणि नावडती दोघी आलटून पालटून पाहावं लागतं."
(पृ.२८०):"...मला पहा अन फुलं वाहा....लभान्यांनो, सवतीची फुगडी अन फेडा एकमेकीची लुगडी."
(पृ.३४०):" कि अबला वरतारे दाबली नं खाले भलत्याची नार."
(पृ.३४६):"...हे पहा वहिनी, कुलूप एकीकडे अन किल्ली एकीकडे असं चालतं का ?"
(पृ.३९०):"स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनी चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती" हे वाक्य केळ्यांवरून सुचणे हे म्हणजे अश्लीलतेची कमालच.
(पृ.४२२):"..का वं ए नागरगोंडी, लई छाती काढून दबोयती का आम्हले ?....उंदरं खाता साल्या, त्याच्यागुनं पाहा कशा घागरी याहिच्या.." ( स्त्रीपात्रे अशीच ठेवल्यामुळे लेखकाला सर्वत्र पहा कशा इरसाल शिव्या वाहता आल्या आहेत.).
(पृ.४३८):"...गुरुची शिष्या गुरूला फळली..."
(पृ.४५२):"...दक्षिणेतूनच स्त्रीदाक्षिण्य हा शब्द आला असावा..."
(पृ.५३८.):"...बायकोला मी सोडून दुसर्‍यापासून मूल नाही होऊ शकत ?...ही नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे."
खळबळजनक मसाला टाकला की पुस्तक बेस्ट-सेलर सहजी होते हा होरा प्रत्येक लेखकाला प्रकाशाला असतो व थोड्याफार प्रमाणात लोक हा प्रकार सर्रास वापरात. पण हे करीत असताना एक पथ्य असे पाळावे लागते की जी सर्वमान्य व्यक्ती आहे त्याबाबत शक्यतो हे प्रकार टाळावेत. कारण त्याने एखाद्या समाजाच्या भावना दुखू शकतात. उदाहरण म्हणून दाखवायचे तर ह्या वेंडी बाई त्यांच्या पुस्तकात महात्मा गांधी हे कसे तरुण स्त्रियांसोबत नागडे झोपत असत व ते तंत्रशास्त्राच्या आधारे स्वत:च्या कामुकतेवर विजय मिळवण्यासाठी कसे असे असा मसाला देतात. महात्मा गांधीवर आज इतिहासाने कितीही अन्याय केलेला असला तरी वैयक्तिक चारित्र्याबाबत शंका घेण्यासारखे ह्या माणसाच्या जीवनात काही नव्हते असेच हिंदूंना वाटते. भले एका हिंदूनेच त्यांचा खून केलेला असला तरी तमाम हिंदूंच्या लेखी महात्मा गांधींचे चरित्र धुतल्या तांदळासारखे होते हीच भावना आहे. ती तुम्ही असे किस्से इतिहासाच्या नावाने घुसवून त्यांच्या भावना दुखवू शकत नाही. कॉंग्रेसकडे सध्या वैचारिक दारिद्रय असल्याने एका हिंदुत्ववादी ग्रुपलाच ह्यासंबंधी तक्रार करावी वाटली व हे प्रकरण कोर्टात गेले. तरी पण इतिहास सांगण्याच्या मिषाने अशा भाकडकथा रंगवीत सर्वमान्य लोकांच्या बदनाम्या कराव्यात हे धोरण निश्चितच वैचारिक बाटलेपण दाखविणारे आहे. वेंडी बाईंनी अशा बदनाम्या करायला नको होत्या.
नेमाडेही बाईंच्या पावलावर पाय ठेवून महात्मा गांधींचा निष्कारण असा पाणउतारा करतात. मग महात्मा गांधी भले राष्ट्राचे पिता असले तर त्याचे काय हो ? पृ.२५३, हिंदू मध्ये हे पहा : "शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस..." साहित्यिकांना रांडेचे अप्रूप असणे समजू शकते ( कारण बहुतेकांच्या धर्मपत्न्या सोडून गेलेल्या असतात ). पण हे पात्र काही "ब्राह्मणांनी हिंदु धर्म बिघडवला" ह्या मध्यवर्ती "निश्चित नैतिक’ भूमिकेशी फारसे जवळचे नाही. शिवाय कायम हरिजनांचा कैवार घेणारे महात्मा गांधी काही लेवा पाटिलांच्या विरोधातले नव्हते. बरे एखाद्या रांडेने पैसे न देणार्‍या कादंबरीकाराला अशा शिव्या हासडल्या तर ते क्षम्य करता येईल. पण तिने डायरेक्ट महात्मा गांधीलाच हात लावावा हे असंभव व अर्वाच्य ! महात्मा गांधींवर अनेकांनी टीका केलेली आहे. पण ही अगदी खालच्या पातळीची तळ गाठते. महात्मा गांधींचे चित्र असलेला साहित्य अकादेमीचा पुरस्कार घ्यायला आता नेमाडे मोकळे आहेत ! नेमाडे केवळ महात्मा गांधींचाच अपमान करून थांबत नाहीत, तर संत रामदास, गौतम बुद्ध ह्यांचीही ते निंदा करतात ती अशी :  पृ.४५० वर पहा: "रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै..." असा शिष्टाचार आहे की जनमानसात ज्यांना मान आहे अशा संत व्यक्तींना संबोधताना आदरार्थी वचन, भाषा वापरावी. पण नेमाडेंनी तर "निश्चित नैतिक" भूमिका घेतलेली. मग ते काय नरमतात किंवा नम्रतात ? पळपुट्या काय नागड्या काय ! मनाचे श्लोकला जनाचे श्लोक करणे, तर खूपच मऊ. बरे समर्थ रामदास एकवेळ ब्राह्मण ( व ब्राह्मणांना सध्या वाईट दिवस म्हणून ) एकवेळ जाऊ दिले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्माचे पुनरुथ्थान केले त्यातल्या गौतम बुद्धाने काय घोडे मारले आहे ? मुलगा झाल्यानंतर बायकोला सोडले, तर स्त्रीवादाचा पुळका आलेल्या नेमाडेंना तो अनादरणीय व नेमाडे बायकोला सोडून गेले, त्यांचा अमेरिकेतला मुलगा त्यांना विचारेनासा झाला तर ती आत्मनिष्ठा व गौरव करणारी बाब ? हा न्याय खासा नेमाडेपंथी असला तरी धिक्कार करण्या योग्यच ! ब्राह्मणांनी व बुद्ध धर्मीयांनी. नेमाडेंचा शूरपणा पहायचा तर त्यांनी मोहमदा संबंधी असे लिहून दाखवावे व मग आपण त्यांना मानू . तूर्त धिक्कारूच !
एकदा का टिंगल टवाळी करणे म्हणजेच चिकित्सा असा लेखकाचा/लेखिकेचा ग्रह झाला की मग समीक्षा व टिंगल ह्यातला फरक अस्पष्ट होतो हे आपण नेमाडेंच्या "टीकास्वयंवर" मधल्या त्यांनी मराठीतल्या तमाम साहित्यिकांवर झाडलेल्या दुगाण्या पाहिल्या की सहजी लक्षात येते. ही टिंगल करायची सवय मग लेखकाला इतकी धीट बनवते की ज्या कुसुमाग्रजांचा पुरस्कार नेमाडेंनी घेतला त्याच कुसुमाग्रजांना त्यांनी त्यांच्या "बिढार" कादंबरीत कसे नीच पातळीवर नेऊन ठेवले होते हे ही तो लेखक विसरतो. जसे: बिढार ( पृ.४१) : "सकाळपासून कुसुमाग्रजाला शिव्या देतोय, कुठं म्हातारं तडफडायला आलं आमच्या नवीन पोरांच्यात ! मग मी त्याला एक क्लासिक उपमा सांगितली. भाद्रपदात नवीनवी कुत्री प्रयत्न करत असतात एखाद्या कुत्रीवर, तेव्हढ्यात एखादं म्हातारं आडदांड निब्बर कुत्रं मध्ये घुसून ताव मारून निघून जातं, तसं प्रधानचं झालं ! खरं म्हणजे सगळीकडे म्हातारी कुत्री बोकाळलीयत. साहित्य परिषदात तीच, बक्षीसात तीच, रेडिओवर , साहित्य अकादमीत, साहित्य संमेलनात---सगळीकडे हेच बाप्ये मनमुराद. तिकडे नेहरू आणि इकडे साले हे." हे उदाहरण ह्या साठी लागू आहे की ह्या वेंडी डॉनीगर बाईंना आंतरराष्ट्रीय नव्हे तर भारतातही रामनाथ गोएंका ऍवॉर्ड मिळालेले आहे व तरीही ह्या टिंगल टवालीच्या स्वभावामुळे त्या चिकित्सेऐवजी हिंदू धर्माची अवहेलनाच करतात.
असेच काहीसे नेमाडेही हिंदू पुस्तकात व त्यानिमित्तच्या प्रमोशनमधून प्रसृत करतात की ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला. हिंदू धर्मात असंख्य परंपरांची समृद्ध अडगळ जमा झालेली आहे, वगैरे. अमेझॉन.कॉम वर वेंडी बाईंच्या ह्या पुस्तकावर टिप्प्णी करताना एका वाचकाने मोठा मार्मिक अभिप्राय दिला आहे. तो म्हणतो "द हिंदूज" ह्या डॉनिगर बाईंच्या पुस्तकात "क्षुल्लकपणाची समृद्धी आहे" ( Abundance of pettiness " ). नेमाडेंनी तर त्यांच्या शीर्षकातच "समृद्ध अडगळ" नमूद केलेली आहे.  नेमाडे हे नमूद करताना काही शास्त्राधार वा शास्त्रचर्चा करीत नाहीत. वरील साम्यस्थळे पाहिल्यावर वेंडी डॉनिगर ह्या बाई अमेरिकेतल्या नेमाडेपंथी लेखिकाच आहेत व त्यांच्या पुस्तकावर माघार घ्यायची वेळ आली ते बरेच आहे असे कोणाही वाचकाला वाटेल व अशीच वेळ नेमाडेंच्या हिंदूवर येवो अशी तो अपेक्षा करील !
--------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२
-------------------------------




गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२




"वार्‍याने हलते रान "*
अकादमीचा ग्रेसफुल सन्मान !
    प्रसिद्ध कवी ग्रेस ( उर्फ माणिक गोडघाटे ) ह्यांच्या "वार्‍याने हलते रान" ह्या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. पुस्तक ललित निबंधांचे असले तरी हा पुरस्कार एका कवीलाच/काव्यालाच आहे. कवितेचे विश्व केवळ तुटक तुटक ओळींनी छापलेले साहित्य, एवढयाच बाह्य रूपापुरते मर्यादित असत नाही तर कवितेची निर्मिती कशी होते, कवीला आपल्याच कवितांबद्दल काय वाटते हे सुद्धा काव्याचे एक महत्वाचे अंग आहे. किंवा हे काव्याच्या मुळांवरचे गद्य आहे असे म्हणता येईल. हे पुस्तक गद्यात, ललित निबंधाने अवतरले तरी ते काव्याच्याच विश्वासंबंधी आहे. त्यामुळे प्रथम जरा आश्चर्याचे वाटले तरी एका कवीला त्याच्या गद्य लिखाणासाठी पुरस्कार मिळावा ह्यात साहित्य अकादमीच्या खुल्या मनाची प्रचीती येते व त्याला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.
    चित्रकाराला "तुम्हाला चित्रे कशी सुचतात", किंवा कवीला "तुम्हाला कविता कशा सुचतात" असे विचारण्याची आपली एक साहजिकच परंपरा आहे. हे आपल्याला कलेच्या निर्मितीच्या कुतुहूलापोटी वाटत असते व ते आपण प्रत्यही कलाकाराला विचारत असतो. ह्या कुतुहूलाचे निराकरण वेळ प्रसंगी अनेकांनी आपल्या मगदूराप्रमाणे केलेले आहे. जसे तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत की, "आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥ साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥ तुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥". हे सांगणे थोडे देवभोळेपणाचे आपणास वाटत असेल, तर नुकतेच "महाराष्ट्र-काव्यभूषण" किताब मिळालेले कवी मंगेश पाडगावकर निर्मितीचे रहस्य उलगडताना सांगतात की, एखादी ओळ अचानकच सुचते व मग ती अनेक दिवस रुंजी घालते व मग त्या विषयानुरूप ते त्याची कविता करतात. आता हा रहस्यभेद सुलभ भाषेत सांगितलेला असला तरी निर्मितीची नेमकी प्रक्रिया आपल्याला कळतच नाही. हलणार्‍या राना कडे पाहताना ह्या रानाला हलवणारा जो वारा आहे ( निर्मिती ), त्या वार्‍याला पकडता येईल का , म्हणजे कार्यकारण भावाने  निर्मितीचे आदी अंत पकडता येतील का ह्या प्रयत्नातून प्रस्तुत पुस्तक कवी ग्रेस लिहीत आहेत, असे ते आरंभीच सहीशिक्क्यानिशी घोषित करीत आहेत.
    कवीने कवितेतून एखादा विचार मांडला तर त्याला एरव्ही गद्य निबंधांत जे विचारांचे, तर्कसंगतीचे नियम लागू होतात, ते लागू करता येत नाहीत. कारण त्याची कविता ही एक भावभावनांचे अविष्करण असते, ते काही एखादा तार्किक विषय मांडणे नसते. "सौंदर्यमीमांसा" ह्या सौंदर्यशास्त्रावरच्या गंभीर अभ्यासात श्री.रा.भा.पाटणकर ( पृ.३५१) म्हणतात की ऍरिस्टॉटलने सांगितल्याप्रमाणे, "अनुकृती व ती जिची अनुकृती आहे ती गोष्ट यांच्यात निश्चित साम्य असते. कलाकृती ही अनुकृती असली, आणि तिच्यात व मूळ गोष्टीत साम्य असले, तरी त्यांच्यात एक महत्वाचा भेद आहे. कलाकृतीचा संबंध मूळ गोष्टीच्या केवळ ऐंद्रीय स्वरूपाशी असतो." पुढे पाटणकर बुचर ह्यांची साक्ष काढीत म्हणतात की "कलाकृती आपले लौकिकतेपासून विमोचन करते". ह्याचे सोपे उदाहरण घ्यायचे झाले तर कै.अरूण काळे ह्यांनी एका कवितेत शहरातल्या पॉश अशा मॉल मध्ये एका मोळी-विक्याला जागा मिळत नाही, त्यावरच्या दु:खावर एक कविता केलेली आहे. आता समाजशास्त्राच्या अगर पर्यावरणाच्या शास्त्रीय निरिक्षणांनी पाहिले तर शहरात मोळी-विक्या असणे दुरापास्त व गॅस ऐवजी लाकडांचे सरपण वापरणे नुकसानकारक, हे कोणीही मानील. पण मोळी-विक्याचे दु:ख ( कवितेतले ) तितकेच मनोहारी व प्रभावी आहे, हेही आपण नाकारू शकत नाही. कवी ग्रेस ह्यांना कलेविषयी व निर्मिती प्रक्रियेविषयी खरेच काही गहन लिहायचे असते तर त्यांनी ते सौंदर्यशास्त्रीय लेखनाच्या पठडीत लिहिलेही असते. ते स्वत: फाइन आर्टस्‌च्या वर्गाला सौंदर्यशास्त्र शिकवीतही असत. पण त्यांनी ह्या पुस्तकात ललित-निबंधांच्या अंगाने किंवा एका प्रकारे काव्याच्या माध्यमातच आपले भाव मांडले आहेत. इथे सय होते ती विंदा करंदीकरांच्या ज्ञानपीठाची. ते दिले गेले होते "अष्टदर्शने" ह्या तत्वज्ञान्यांची ओळख करून देणार्‍या काव्याला. त्या पुस्तकाचे माध्यम जरी कविता असले तरी ते होते तत्वज्ञानाचे. विंदा करंदीकरांनी "ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र"ही लिहिले आहे. काव्याबद्दलची मते ते चाहते तर कवितेनेच व्यक्त करू शकले असते. पण ते त्यांनी रीतसर निबंधातून केले. इथे ग्रेस ह्यांनी त्यांचे मनोगत लालित्यपूर्ण अशा ललित निबंधातून केले असल्याने त्यात त्यांच्या भावभावनापेक्षा इतर तर्कविषयक बाबी शोधणे किंवा त्यांचे वैगुण्य दाखवणे अप्रस्तुतच होते.  
    कवी ग्रेस हे एक अवघड कवी आहेत. त्यांचे ललित निबंधही तितकेच अवघड असतात. तशी वाक्ये सोपीच असतात, पण अर्थ क्वचितच हाती लागतो. आता निर्मिती संबंधी त्यांनी ह्या पुस्तकात ठिकठिकाणी काही भाष्ये केली आहेत ती पाहून काही उलगडा होतो का ते पाहू, किंवा वर म्हटल्याप्रमाणे निर्मितीविषयी त्यांच्या भावनांना दाद देऊ :
१) ( पृ.२) "कलाकृतीची निर्मितीपूर्व अवस्था आणि निर्मिती झाल्यानंतरची रूपचर्या, एकातून एक निघावे म्हटले तरी त्यांच्यात खरे तर कुठलेही दिलाशाचे किंवा संशयाचे साम्य आढळूनच येत नाही. असे का व्हावे ?"
आता हे काही स्पष्टीकरण नसून केवळ एक निरिक्षण आहे व ते कवीला पडलेले एक कोडे आहे, असेच वाटते. एरव्हीच्या कलावंत नसलेल्या सामान्य माणसाने "करायला गेलो गणपती आणि झाले माकड" म्हणावे, तसेच हे भाष्य वाटते. ह्यातून एवढेच प्रतीत होते की निर्मिती ही एक गूढ प्रक्रिया असून त्यात आधीचे रूप व नंतरचे रूप ह्यात अभावानेच साम्य आढळते. ह्या प्रांजळ जाणीवेचे कौतुकच करायला हवे.
२) ( पृ.३) "एखाद्यावेळी शब्दाला थोडासा स्पर्श केला की त्याच्या आतील रक्तवाहिन्या एकदमच थरारून उठाव्यात आणि आपल्याला श्वास घ्यायची मुभा न देताच त्यांनी आपल्या पेशीचा तुकडा, चिमुकला तुकडा, तोडून त्याची बालकवीय, बोन्साय, प्रतिमा तयार करावी, तसे काहीसे ?"
शब्दांच्या लोभावण्याचे कर्तब अनेक कवींनी ह्या अगोदर वाखाणलेले आहे. जसे तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग: "आह्मां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥ शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥तुका ह्मणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥". कवी ग्रेस ह्यांचे वैशिष्टय असे की ते सध्या प्रचारात नसलेले अनेक शब्द वापरतात. हे भाषेच्या संवर्धनासाठी खासच महत्वाचे व प्रसंशनीय आहे. शिवाय ग्रेस ह्यांचे काही आवडते शब्द आहेत. जसे "वाकणे". ते इतक्या ठिकाणी वापरतात की कित्येक ठिकाणी हे लौकिकातले वाकणे, वाचकाला असंभवनीय वाटावे. जसे ( पृ.१८) वरच्या ह्या ओळी पहा:
"हले काचपात्रातली वेल साधी
निनादून घंटा तशा वाकल्या,"
आता घंटा वाकवण्याचे कवीचे कसब वाखाणावे का पुढच्या ओळींशेवटी त्याने "खिळ्यांना दिसेना कुठे क्रूस न्यावा / प्रभूने अशा पापण्या झाकल्या..." ह्या योजनेला "वाकल्या" चांगले जुळते, ही निकड महत्वाची मानावी ? खैर, शब्दांत अनेक अर्थ दडलेले असतात व ते कवीला प्रसंगी सादावतात ही निर्मितीतली प्रक्रिया मात्र आपण इथे सहजी ( वाकून ? ) मान्य करू शकतो.
ग्रेस ह्यांच्या शब्दकळेत काही फार गोजिरे शब्द वास करून असतात. जसे: पडशाळा, स्मरणशाळा, साऊल, सारणी, अन्वयरीत,गोंदणगाव, गोंदणधून, सृजनगंध, वाळवीची कुळे, स्पर्शभुलीचे हुंकार, वगैरे. त्यांची ही निर्मिती-घनता नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
३) ( पृ.३) "प्रत्येक अनुभवाला अंतर्रचनेच्या बांधणीचे एक सूत्रनाते असावे, असा माझा अंदाज आहे. आणि ह्या सूत्रनात्याची संघटना निव्वळ सेंद्रीय गुणधर्म अंगानेच होत असावी."
हे मोठे प्रांजळ व सरळ कथन आहे. जात्यावर बसल्यावर ओवीच सुचते असे आपण म्हणतो, तेव्हा ह्याच तत्वाने ते होत असते. आता अर्थात कोणी जात्यावर "कोलावेरी, कोलावेरी...डी" म्हटले तर तेही खपेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. पण सामान्यत: जसा भाव असेल त्याच अंगांच्या रचनेची कविता होते हे सार्थच म्हणावे लागेल. ह्याचसाठी तर सात्विक भावांसाठी अजूनही आजचे कवी अभंगांचा वापर करतात. प्रेमाला ग़जलच चांगली ठरते. इथे पु.ल.देशपांडेंचे एक वाक्य आठवते. ते म्हणत की कधी काळी जर वाघ माणसांच्या भाषेत बोलला तर तो उर्दूतच बोलेल. इतका उर्दूचा लेहेजा आहे. कदाचित ह्याच कारणाने असेल निर्मितीच्या, कलेच्या विश्लेषणासाठी, कवी ग्रेस ह्यांनी सौंदर्यशास्त्रीय निबंधाची निवड न करता ललित निबंधाची निवड केली असावी.
४) ( पृ.४) "कलाकृती जीवनातूनच निर्माण होते, हे खरे आहे. पण कलाकृतीत व्यक्त झालेले जीवन हे साक्षात जीवनाशी निगडित असले, तरीही त्याचे ते कुठल्याही सबबीवर बांधील नसते."
( पृ.९५) "कला ही जीवनाची पुनर्निर्मिती आहे. थेट निर्मिती सदोष असणारच. पुनर्निर्मिती सदोष राहणार नाही, तर तिचा कल अपर्यायी, परिपूर्णतेकडे झुकणारा असेल, म्हणून रेम्ब्रां, रिल्के, टॉलस्टॉय, व्हिन्सेंट या रंगशब्दपुत्रांना कुर्निसात करताना कुणीतरी सूफी फकिराच्या बाण्याने ओरडलेच आहे. जीवन हे निर्माण आहे, निर्मिती नाहीच, पुनर्निर्मिती तर मुळीच नाही. "
ऍरिस्टॉटल व बुचर ह्यांच्या सौंदर्यशास्त्रीय मतांनुसार हे विधान एकदम तार्किकतेचे आहे व ते कुठल्याही गंभीर विवेचनात मान्य व्हावे असेच आहे. सामान्यांना "कवी तो होता कसा आननी" हे कुतुहूल खूप दाट असते खरे, व कदाचित म्हणूनच आपल्याकडे म्हण तयार झालेली असावी की "नदीचे मूळ व ऋषीचे कूळ शोधू नये". आता प्रत्यक्ष जीवन व कवीचे काव्यजीवन हा विषय निघालाच आहे तर काही गोष्टींचा निर्देश करायला हरकत नाही. पहिले म्हणजे कवी ग्रेस हे एकमेव असे कवी आहेत की जे आपले काव्यजीवन व प्रत्यक्ष जीवन टोपणनावानेच जगतात. फार थोडयांना त्यांचे नाव--माणिक गोडघाटे--आहे हे माहीत असते. हे बेमालूमपणे प्रत्यक्षात काल्पनिकता मिसळणे, हे कसब कवी ग्रेस अगत्याने जोपासतात. त्यांच्या कवितांतून, ललित-निबंधातून भेटणारी नावे, ( जसे: रामदास ( भटकळ), केशव ( जोशी ), मधुकर ( केचे), विराणी, मिथिला, ह्रदयनाथ ( मंगेशकर), दुर्गा ( भागवत), जी.ए.( कुलकर्णी), लता मंगेशकर, राघव, वेल्लोरचे हॉस्पिटल वगैरे ) ही नावे प्रत्यक्षात असलेल्या व्यक्तींची असतात व ती त्यांच्या काव्यात मुक्तपणे येत असतात. शिवाय ते ह्रदयनाथांबरोबर एक अनोखा कार्यक्रमही पेश करतात. ह्या सरमिसळतेत मग वाचकांना काही प्रत्यक्षातल्या गोष्टीही कळत जातात. जसे त्यांना नुकताच झालेला कॅंसर व त्यावरचे मंगेशकर हॉस्पिटलातले उपचार. कवीच्या कलाकृतींवर कदाचित ह्या आजाराचा परिणाम नसेल होत, पण वाचकांना ते कळल्यावर जी साहजिक करुणेची सहानुभूती निर्माण होऊ शकते, त्याचे काय होत असावे हा प्रश्न राहतोच. पुरस्कारांचेही एक वेगळेच जग असते. जेव्हा तरुण कवीची निर्मितीक्षमता व कल्पना भरार्‍या घेणारी असते, तेव्हा हे पुरस्कार मिळत नसतात तर अगदी अंत:काळीच बरसतात. विंदांनी जेव्हा कविता करणे सोडून दिले, त्यानंतर त्यांना ज्ञानपीठ मिळाले. ऑलिंपिक असे एकच क्षेत्र आहे जिथे तरुणांना तिथल्या तिथच्या कामगिरीवर सुवर्णपदके देतात. एरव्हीच्या जगात त्यासाठी कवीचे संचित गोळा व्हावे लागते.
५) ( पृ.४) "कला अशा जीवनाची पुननिर्मिती करते. आणि या प्रक्रियेत तो अनुभव, जीवनाची जी आकृती कलारूपात साकार होते ती निर्दोष आणि परिपूर्ण असते. तेव्हा कलारूपातील जीवन, हा साक्षात जीवनापुढचा मोठा भयावह दंडक, आणि चिरकालिक आदर्श असतोच. कारण जीवनाच्या फटी आणि उणिवा बुजविण्याचे कार्य करणे, हेच कलाकृतीचे धर्म असतात. "
कलेवर हे धर्म लादणे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने विवादास्पद आहे. कांटच्या म्हणण्याप्रमाणे कलेत हेतुरहित हेतूपूर्णता असते असे मानले तर मग जीवनाच्या फटी व उणीवा बुजविणे हे कलेचे धर्म कसे मानता येतील ? तर्काने इथे विवाद उत्पन्न होत असला तरी जीवनाच्या फटी आणि उणीवा बुजविणे हे कलाकृतीत घडतच नाही असेही आपण म्हणू शकत नाही इतके ते हरघडी होत असते.
६) ( पृ.८) "अस्पष्टता, धुकेपण, संदिग्धता, गूढता या सर्व अनुभवसिद्धीच्या मालिका म्हणजे वास्तवाच्या विरोधात ठाकलेल्या कैदाशिणी आहेत असे आपण समजून बसलो आहोत. आणि मग गूढसंमोहनमार्गातील या कैदाशिणीच्या, हडळींच्या नग्ननृत्यापेक्षा, वास्तवातील शामियान्यात सुरू असलेला नजरबंद अप्सरांचा नाच, ( इट बीइंग फुल ऑफ क्लॅरिटी ), उत्तमच राहणार."
गूढतेचे, ग्रेस ह्यांच्या कवितेत पदोपदी भेटणार्‍या दुर्बोधतेचे इथे कवी उत्तम समर्थन करीत आहे. त्यांचे टोपण नाव, कवितेत प्रत्यक्षातल्या व्यक्तींचे उल्लेख, खर्‍या घटनांचे उल्लेख, अफलातून शब्द, हे त्यांचे गूढता वाढवण्याचे हमखासचे हातखंडे आहेत. त्यात अनवधानाने मुद्राराक्षसाच्या चुकाही त्यांना मदत करतात. जसे: ( पृ.९३) "हर मुद्दई के वास्ते दारो रसन नही", इथे "दारो रन" हवे होते. त्याचे "रसन" केल्याने ते दुर्बोध होते. किंवा "कोनाडयात विंचू आणि तिथे निरांजन / नांगीसाठी ज्योत झाली विधात्याचे घन" ही मूळ पुस्तकातली छपाई ते आता सुधारून "घन"ची "धन" करतात. जे मूळ पुस्तकाबरहुकूम "घन"शी झटत राहिले त्यांची अवस्था विचारूच नका. म.वा.धोंडांनी तर ह्या धुकेपणाचे कौतुक केल्याने धुकेच वास्तव शिल्पापेक्षा विलोभनीय ठरले आहे, असा ह्या दुर्बोधतेचा महिमा आहे.
७) ( पृ.१७) "निर्मितीच्या क्षेत्रात अशी कुठलीच सोय नाही. कारण इथे व्युत्पत्ती, व्याकरण, सुबोधता, आणि लौकिकाची सभ्यता यांचा मागमूसही नसतो. भाषा इथे कार्यकारी असते. ती लौकिकातलीच भाषा असते; पण तिच्या मांडणीचे, सर्व विभाव, अनुभाव, लौकिकातील जगण्याच्या जीवनविनिमयाशी संबंधित निर्मितीतील भाषा प्रतिमांच्या संभवामुळे आणि कलावंताच्या कल्पक सृजन उद्‌भवामुळे, आपले स्वत:चे सौंदर्यसन्मुख, अबाधित, पुननिर्माण करीत असते. त्यामुळे तिचा अनुक्रम, तिची प्रतवारी लावताना व्याकरण, व्युत्पत्ती, यांच्या नियमाप्रमाणे जीवनासक्तीचा क्रियावंत आग्रहही धरता येत नाही. ती प्रतिमांच्या द्वारे सतत सौंदर्यबंधांचे जोडपूल निर्माण करीत जाते. म्हणून जितकी ती जीवनाशी सलगी करत जाते तितकीच ती जीवनाशी लगटही टाळत जाते ."
( पृ.४६) "ही संभाव्य, असंभाव्य, कलावंताच्या निर्मितीतील तरलता पकडण्यासाठी खरेच का जीवाला मृतांच्या धर्मांची शाल पांघरूनच वावरावे लागते ? आणि ही तरलता संतांच्या, महंतांच्या, प्रेषितांच्या कुडीत संभवत नाही. ती फक्त कलावंताच्या निर्मितिशील आत्म्याची कायम, कायमची माहेरवाशीण असते."; "कलावंताच्या निर्मितीप्रक्रियेत, या विदग्ध लहरीत, तरलतेला एकाकीपणाचे वरदान लाभले आहे. वादच नाही. पण या एकाकीपणाला एकट, एकाकी होण्याची अभेद्य अटळ जोड देण्याशिवाय ही तरल लहर चिमटीत पकडताच येत नाही."
कदाचित कलावंतांना भोवणारी एकाकी पणाची जाणीव ही ह्याच "जीवनाशी लगटही टाळत" जाण्याने होत असावी. आणि समाजाचा भाग म्हणून कलावंताला जीवनाशी सलगी करावी लागते त्यामुळे ह्या द्वंद्वाने एक प्रकारचा लहरीपणाही कलावंतांना येत असावा. तशात तरलतेचा शाप कलावंतांना असतो हे आपण प्रत्यही पाहतोच. ह्या तरलतेपायी परत एकाकीपण कसे येते हे सांगणे हा मोठाच आत्मानुभव मानावा लागेल. हे निरिक्षण कलावंताची अडचण सांगणारे नक्कीच आहे.
८) ( पृ.२३) "सृजनभाषा गवसली तर तेवढयाने खरोखरच सृजनाचा ठाव घेता येतो ?"; "कुठलाही सृजनगंध लाभलेला अनुभव पाठीचा नसतो आणि पोटाचा नसतो. तो मुळात निरंगी आणि निराकार असतो. त्याला एखाद्या झाडाला फांद्या फुटाव्यात , सजीव गर्भाला अवयव फुटावेत त्याप्रमाणे त्या अनुभवाचे चित्र, कृती आणि आकारबंधामध्ये रूपांतर होत जाते आणि हा निरंगी अनुभव स्वत:च आकाराचा निराकार स्वामी आहे, असा भास होऊ लागतो."
( पृ.७३) "कलावंत आपल्या निर्मितीतून कोणत्याच शक्तीची शक्यता गोंजारत नाही. शक्ती वेगाने येते आणि वेगानेच कोसळत निघून जाते. कलावंताचा बाणा शक्तीवर नाही तर क्षमतेवर अवलंबून असतो. अनंत क्षमतांची शक्यता निर्मित जाणे, हेच कलेचे कार्य आहे. क्रिएटिव्हिटी नेव्हर डिमान्डस द स्ट्रेंग्थ बट ओन्ली कॅपॅसिटी."
इथे कवीने स्वत:चे भाव मोठ्या स्पष्टतेने प्रगट केले आहेत. आलेला विचार कसा आकार घेईल त्याचे नेमके वर्णन पाटणकर एके ठिकाणी फार मार्मिकतेने करतात. ते "उर्मी"ला वा संकल्पनेला झाडातून स्त्रवणार्‍या डिंकाची उपमा देतात. काही अनामिक वेदनेने हे स्त्रवणे होत असते व ते कसा आकार घेईल त्याचे काहीच सांगता येत नाही. कधी डिंकाची लांबट तार निघेल तर कधी घट्ट गोळा आकारास येईल. वरील ग्रेस ह्यांचे प्रकटन ह्याच अर्थाचे आहे व ते अगदी पटणारे आहे.
९) ( पृ.५९) "संकल्पना हे माझ्या जीवनव्यवहाराचे आणि निर्मिती व्यवहाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे, हे आता जणू काही ठरून गेल्यासारखेच आहे.";
( पृ.६१) "मी माझ्या तथाकथित निर्मितीसंकुलात असताना, वावरत असताना, बांधणी तत्वांच्या मागे असलेली व्यवस्था कधीही भेदाने, वेधाने नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला नाही.";
( पृ.७२) "भूतकाळाचा त्याग करणे ही माझी जीवनप्रेरणा नाही. ती माझी निर्मिती प्रक्रियाही नाही."
( पृ.३७) "कलाकृतीची निर्मिती अशी होत असते. त्याचप्रमाणे अतीव सावधानतेने कलावंत जीवनाची पुनर्मांडणी करीत नसतो. आणि पुनर्मांडणीच्या रूपाने तो जीवनाची नीतिसंपन्न मांडणीच केवळ करीत नसतो तर त्याची अंतिम सौंदर्यसंपन्नता प्रस्तावित करीत असतो. जीवनाला हा साक्षात्कारी चमत्कार कधीच साधत नसतो. पण अशा साक्षात्कारी चमत्कारांची मांडणी करीत जाणे, हेच कलेचे अधिष्ठान असते."
सगळ्याच माणसांच्या मनात विचार येत असतात. पण इथे ग्रेस त्याला संकल्पना असे संबोधून सांगत आहेत की आलेले विचार त्यांनी प्रामाणिकपणे अमलात आणले आहेत. आणि हे कलावंताचे व्यवच्छेदक लक्षण आहे हे आपण त्यांच्या हेकेखोरपणावरून सहजी मान्य करू. तसेच त्या विचाराला लौकिक भेदाभेदाचे निकष त्यांनी लावले नाही, हेही कोणाही कलाकाराबाबत आपल्याला पटण्यासारखेच आहे. मात्र ते जेव्हा म्हणतात की मी भूतकाळातच रमतो, तेव्हा ते चांगले की वाईट हे समजत नाही. त्यांचे सगळे ललित निबंध पाहिले तर त्यात सर्व ३०/३५ वर्षांपूर्वीच्या कवितांचेच जणू समर्थन सापडते. सृजनाच्या दृष्टीने विचार केला तर हे प्रतिभा संपल्यासारखेच वाटू शकते. ह्रदयनाथांबरोबरच्या कार्यक्रमातही ते जे कविता बोलत असतात त्या सगळ्या ३०/३५ वर्षांपूर्वीच्याच असतात. हे कोणाला भूतकाळात रमण्याबरोबरच प्रतिभा आटल्यासारखे वाटू शकते. स्वत: कवी ग्रेस आपल्या अर्पण पत्रिकेखाली सही करून तारीख देतात : ११ सप्टेंबर २००७ व त्याला म्हणतात : अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी...अस्तपर्वाचे हे त्यांचे प्रांजळ जाण असणे मोठे मोहक आहे.
असेच त्यांच्या रात्री अपरात्री होणार्‍या, कविता सुचण्याच्या साक्षात्काराचा खूप बोलबाला आहे. कविता सुचणे, तेही रात्री अपरात्री, ह्याला खुद्द दुर्गा भागवतांनी दैवी म्हटलेले आहे. आणि सृजनाच्या भाषेत ते खरेच दैवी आहेही. पण समीक्षेत सुचलेली कविता ज्यास्त मानाची व जुळवलेली कविता कमी मानाची असे काही दर्जे केलेले नसतात. त्यामुळे त्यांचे हे साक्षात्कार दैवी मानले, तरी साहित्यात ते केवळ अवेळी सुचलेले आहेत, म्हणून आपण ते मोठे ठरवणे देवभोळेपणाचे होईल. कवी ग्रेसनाही ते आवडू नये असे हे कारण आहे.
१०)  ( पृ.१०३) "कलावंताची निर्मितीप्रक्रियाही आतून केवढी घनदाट, व्यामिश्र आणि आततायी असते याचा अदमासच घेता येत नाही. निर्मितेप्रक्रियेमध्ये टाहो असतोच. पण एक प्रकारचा त्या टाहोला वरच्या वर, अधांतरी तरंगत ठेवणारा एक धा धा वो असतो. म्हणजे त्या त्या अनुभवांच्या हंबरातील धावा मुखर होत असतो."; "ही एक वाट आहे. या वाटेने जाताना, निर्मितीचा विश्वप्रदेश कितपत तुम्हाला सापडेल, हे त्या त्या कलावंताच्या भावानुभूतीच्या अदमास आवाक्यावर अवलंबून असते. आणि त्यावरूनच कलावंतांच्या परी, परिमिती, आणि परिमाणे निश्चित होत असतात."
हेच तत्व कवी ग्रेस त्यांच्या ह्रदयनाथांबरोबरच्या कार्यक्रमात मोठ्या आर्ततेने सांगतात. त्यासाठी ते तुकारामाने अंगावर कढत पाणी फेकले तेव्हा धावा केला त्याचे उदाहरण देतात. तुकाराम महाराज म्हणाले होते: जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥ पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥ घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहींहीं न चले येथें ॥ तुका ह्मणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥"
भावनेच्या उत्कटतेचा हा मरातब कवी ग्रेसना आविष्काराच्या सच्चेपणासाठी मोठा महत्वाचा वाटतो. ह्या वाटण्याच्या प्रखरतेच्या प्रमाणांवरून कलावंतांचे मोजमाप करावे असेही ते सुचवतात. कोणाही कलंदर कलावंताचे लौकिक आयुष्य पाहिले तर ते त्यातले दु:ख किंवा पीडा ह्या आविष्काराच्या सच्चेपणापोटीच सहन करतात की काय असा संशय बळावतो.
    परमेश्वराची इच्छा नसेल तर झाडाचे पानही हालत नाही, असे कधी कधी वारा नसला की आपण म्हणतो. ते देवाची महत्ता ठरवणारे असले, तरी रान कशाने हलते हा मुळचा सृजन-शोध पूर्ण होतच नाही. निर्मितीची उर्जा म्हणजे वारा, व त्या वार्‍याने हालते रान, अशी कवी ग्रेस ह्यांची कल्पना आहे व त्या वार्‍याला चिमटीत पकडण्यासाठी ते ह्या पुस्तकात एक प्रकारे "रान" उठवत आहेत, हे मात्र निर्विवादपणे वाचकाला जाणवत राहते. त्या रानात घुमलेली ही एक शीळच !
    (कवी ग्रेस ह्यांची ख्याती अशी की ह्यांचे शब्दांकडे इतके बारीक लक्ष असते की एक पुस्तक प्रसिद्ध अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिला अर्पण करताना तिच्या नावाचे स्पेलिंग ई पासून आहे की आय पासून ह्याबद्दल जी.ए.कुलकर्णींशी खल करून त्यांनी चक्क तिच्या पी.ए.लाच पत्र लिहिले होते. अशा कवीच्या व पॉप्युलरसारख्या दर्जेदार प्रकाशकाच्या इतक्या चुका ह्या पुस्तकात असाव्यात हे खेदाचे आहे. ते इतर वाचकांसाठी म्हणून कोणाला तरी एकदा सांगणे भागच आहे. म्हणून चुकांची ही यादी : ( पृ.०) "रसन"--पृ.९५वर उदध्रुत केल्याप्रमाणे "दारो रन" हवे; ( पृ.३) "झुळका" हे "झुळुका" हवे ; ( पृ.७) "तारेचे" हे "तारेने" हवे ; ( पृ. १२) "साऊलने काळाचा आधार घेऊन...." हे बोध न होणारे वाक्य ; ( पृ.१२) "अनुकंपा साकार करतो" हे "अनुकंपा साकार करते" असे हवे; ( पृ.१३) "..विचारात पडलो की,.." हे "विचारात पडतो" हवे; ( पृ.१४) "She definately" हे "definitely" हवे ; ( पृ.१५) "नेहेमीच" हे "नेहमीच" असे हवे; ( पृ.१७) "तार्किक हिरिमिरीने" हे "तार्किक तिरिमिरीने"असे हवे; ( प्रु.१९) "घंटा तशा वाकल्या" ह्यात घंटा वाकू शकत नाहीत हे खटकते ; ( पृ.२०) "तोंडीतोंडीच" ऐवजी "तोंडातोंडीच" हवे; ( पृ.२३) "गोंदण सुर्‍यांचा" ऐवजी "गोंदण सुयांचा" हवे; ( पृ.३१) "तिने कन्येला दिलेला" ऐवजी "मी तिच्या कन्येला" असे हवे; ( पृ. ३२) "...then just" ऐवजी "than just" असे हवे; ( पृ. ३२) "...मधुर अन्वयार्थ त्यांनी" ह्यात "त्यांनी" गाळावे; ( पृ.७५) "..जाहीर करून टाकला. त्याचबरोबर..." इथे पूर्ण विराम नको आहे; ( प्रु.७८) "Let the sun be over our heads.." ह्यात वाक्य पूर्ण होत नाही; ( पृ.८०) "proved" ऐवजी "proven" हवे; ( पृ.८०) "raindear" चे स्पेलिंग "reindeer" असे असायला हवे; ( पृ.८४) "देहलीवरून" इथे "देहलीजवरुन" हवे; ( पृ.८५) "पोवळेपण" ऐवजी "पोळलेपण" हवे; ( पृ.८५) "..नसताच, जिथे" इथे पूर्णविराम हवा; ( पृ. १००) "करयचा" ऐवजी "करायचा" हवे; ( पृ. १०५) "even too" ऐवजी "do" हवे; ( पृ.१०८) "fulfil" ऐवजी "fulfill" हवे; ( पृ.१०९) "तर तर ते" ऐवजी "तर ते" हवे; ( पृ.११८) "माझा प्रस्तुत" ऐवजी "माझ्या प्रस्तुत" हवे; ( पृ.१२१) "tringle" ऐवजी "triangle" हवे; ( पृ.१२२) "tombe" ऐवजी "tomb" हवे; ( पृ.१२२) "gloria" ऐवजी "glories"हवे.)

----------------------------------------------------------------------------
*"वार्‍याने हलते रान"
कवी: ग्रेस,
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन, पाने:१२२, किंमत:१५०र

--------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडियानगर, घाटकोपर ( पूर्व), मुंबई: ४०००७७
( भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२)

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२



--------------------------------------------------------------------
"वार मेड न्यू"
ले: मॅक्स बूट
गोथॅम प्रकाशन, २००६, पाने ७२१, किंमत ( फ्लिपकार्टची:र.१५५१)
----------------------------------------------------


वाचाल तर वाचाल---११
अमेरिकेची जय्यत तयारी
    सध्याच्या जगात अमेरिका हाच एक देश असा आहे की जो ह्या ना त्या कारणाने लढाया करतो आणि त्यात हमखास यश कमावतो. त्यांच्या आर्थिक सुबत्तेचे आपल्याला आकलन असतेच, पण अनेक वर्षे ते ह्या लढाईच्या क्षेत्रात आपले म्होरकेपण कसे टिकवून आहेत ह्या बद्दल आपल्याला कुतुहूल वाटते व ते साहजिकच आहे. वरील पुस्तक ह्या कुतुहूलाचे यथोचित स्पष्टीकरण देणारे असून ह्यात अमेरिकेच्या लढायांमागची तयारी, नवीन संशोधने, सैन्याची संघटना वगैरे स्थूल निकषांची उकल केलेली आहे.
    साधारणपणे "युद्धस्य कथा रम्य:" ह्या न्यायाने आपल्याला युद्धाबद्दल खूप आकर्षण असते खरे, पण त्यातल्या बारकाव्यांची कोणी इतकी उकल करुन तपशीलवार माहीती देत नाही. शिवाय ही लष्कराची गुपिते असल्याने बरेचसे देश ही माहीती गुलदस्त्यात ठेवतात. पण अमेरिकेचे लोकशाही शासन व त्यातली पारदर्शकता ह्यामुळे इथे लेखक चक्क आपल्याला लष्करांची नवीन आयुधांची माहीती देतो आहे, हे फारच आश्चर्य करण्यासारखे आहे. उदाहरणार्थ ह्या पुस्तकात अमेरिका सध्या कोणत्या आयुधांची तयारी करते आहे ही माहीती मोठी मनोरंजक व डोळे उघडणारी आहे. जसे : लेखक आपल्याला सांगतो की जगप्रसिद्ध मॅचेसुचेटस्‌ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( एम आय टी ) ह्या विद्यापीठाशी अमेरिकन लष्कराने ५० मिलियन डॉलर देऊन एक "इन्स्टिट्यूट ऑफ सोल्जर नॅनोटेक्नॉलॉजीज" नावाची शाखा काढली आहे. त्यात नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन अमेरिकन सैनिकासाठी एक युनिफॉर्म शोधणे चालू आहे. हा युनिफॉर्म असा केलेला असणार आहे की सैनिक सदैव, २४*७ , इंटरनेटद्वारे मुख्य कार्यालयाशी, वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्कात राहू शकणार आहे. त्याचे हेल्मेट हे आपोआप व्हिडीओ, ऑडिओ, व टेक्स्ट मेसेजेस देईल, घेईल, इन्फ्रारेडद्वारे रात्री दिसण्याची सोय असेल, जीपीएस द्वारे मार्ग आपोआप दिसेल, आखता येईल. ह्या युनिफॉर्मचे कापड नॅनोचे असेल. ( एक नॅनोमिटर म्हणजे मिटरचा दहा लाखावा भाग व माणसाच्या केसाची जाडी, ५० हजार नॅनोमिटर असते, त्यावरून नॅनो हे किती बारकाव्याचे प्रकरण आहे त्याचा अंदाज यावा. ). ह्या युनिफॉर्मची खासियत अशी असेल की ह्याच्या जवळपास सेंसरस्‌नी काही आहे असे सांगितले की हे कापड केव्हलर-सारखे अतिकठिण होईल व दारूगोळ्याला रोखील. एकाचे असे झाले की सगळ्या सैनिकांचे युनिफॉर्मस् असे बदलतील. एरव्ही हा युनिफॉर्म अगदी हलका असेल. ह्यात वातावरणाप्रमाणे वातानुकुलितता असेल ( एअर-कंडिशन अथवा हीटर ) आणि सैनिकाची शक्ती अनेक पटींनी वधारण्याचीही सोय असेल. ( बर्कले विद्यापीठात तर १८० फूट उंच इमारतीवरून उडी मारण्याचे यशस्वी प्रयोग केव्हाचेच झाले आहेत असे लेखक नोंदवीत आहे.).
    एअरबोर्न लेझर नावाचे एक अति-विघातक शस्त्र अमेरिका तयार करीत आहे. बोईंग ७४७ विमानात हे लेझर तयार करण्याचे साधन ठेवलेले असते. फ्लुओरीन, हीलीयम व डेरेटीयम ह्यांच्या मिश्रणाने लेझर तयार होतो. एरव्ही पॅट्रियट-३ ह्या मिसाईल विरोधी अस्त्राला एकावेळेस उडवण्याचा खर्च ३.८ मिलियन डॉलर ( दर शॉटला) येतो तिथे ह्या लेझरचा खर्च अवघा ८००० डॉलर ( दर शॉटला ) इतका कमी येतो. शिवाय पॅट्रियट-३ने काही मर्यादित मिसाईलच उडवता येतात व परत ते मॅगझीनमध्ये भरावे लागतात. त्यामानाने लेझर मिश्रण असे पर्यंत फटाफट, न थांबता, मारता येते. तांत्रिक दृष्टया लेझर प्रकाशाच्या वेगाने काम करीत असल्याने मिसाईलच्या वेगापेक्षा १६०,००० पटींनी मारा जलद होतो व पहिल्यापेक्षा किती तरी कमी पटीचा वेळ लागतो. इस्त्रायलच्या युद्धात रशियन मिसाईल पाडताना हे लेझर अमेरिकेने तावून सुलाखून वापरले आहेत व ते यशस्वीही झाले आहेत.
    आपण कधी कधी दिल्लीच्या निदर्शकांवर पोलीस कसे पाण्याच्या फवार्‍याचा मारा करतात व निदर्शकांना परतवण्याचा प्रयत्न करतात ते पाहतोच. ह्यात काही माणसे जखमीही होतात. तर अमेरिकेने ह्याहीपेक्षा परिणामकारक एक साधन विकसित केले आहे ज्याचे नाव त्यांनी ठेवले आहे: ऍक्टिव्ह डिनायल सिस्टिम ( सकारी नाकारण्याची रीत ). ह्यात एक मीटर चे मायक्रोवेव्ह तयार करून लोकांवर त्याचे झोत टाकतात. त्या झोतात लोक आले की त्यांच्या त्वचेच्या आत ( १/६४ इंच खाली ) हे मायक्रोवेव्ह जाऊन भयंकर दाह निर्माण करतात. झोताबाहेर गेले की लगेच थंड. हे आपल्याकडच्या सरकारांना कळायचा अवकाश की आपले निदर्शक चांगलेच होरपळून निघतील ( अमेरिकन मायक्रोवेव्हने ).
    आपण ह्या आधी वाचलेलेच आहे की अमेरिकेच्या प्रसिद्ध "स्टार वार्स" पद्धतीत दुष्मनाचा मिसाईल हवेतच गारद करण्याची तरकीब योजलेली आहे. आता अमेरिकेने अगदी लहान लहान सेटेलाईटस्‌ अंतराळात ठेवून त्याद्वारे एक नवीन आयुध तयार केले आहे. ह्याचे नाव आहे : "रॉडस्‌ फ्रॉम गॉडस्‌" ह्यात टंगस्टनच्या धातूचा एक रॉड, सेटेलाईटमधून शत्रूच्या मिसाईल वा लक्ष्यावर अचूक मारल्या जातो. ह्याने एवढा मोठा स्फोट होतो की कोणाला वाटावे जणू अणु-स्फोटच झाला आहे. पण ह्यात अणुचा स्फोट न करता परिणामकता मात्र अणुबॉम्बची साधली आहे.
    आजकाल अमेरिकन सैनिक पाकिस्तानात व अफगाणिस्तानात ड्रोन ह्या मानवरहित विमानातून बॉंम्ब-हल्ले करतात व त्यात नेमके अतिरेकी मरतात हे आपण वर्तमानपत्रात प्रत्यही वाचतोच. हेच ते ड्रोन म्हणजे अनमॅन्‌ड एरीअल व्हेहिकल. अशी अनेक पल्ल्याची मानवरहित विमाने अमेरिकेकडे सध्या आहेत. हे इंटरनेटमुळे जोडलेले असल्याने कुठूनही उडवून कुठूनही बॉंबहल्ले करता येतात. म्हणजे बॉंबहल्ला पाकिस्तानात व ते करणारा युवक अमेरिकेत फ्लॉरिडात बसून ते करतो आहे. तसेच सैन्यात अनेक खाती असतात. शत्रूच्या नेमक्या जागेची माहीती जर अमेरिकन गुप्त-हेर खात्याला ( सीआयए) असेल तर मग ह्या ड्रोन-हल्ल्यांचे सूत्रसंचालन ते खाते करते. बरे ह्या विमानात माणूस नसल्याने ते कित्येक दिवसच्या दिवस उडते ठेवता येते. शिवाय आत्ताचे त्यांचे नवीन ड्रोन तर ६० हजार फुटावरून उडणारे असल्याने शत्रुपक्षाला अजिबात न कळणारे आहे. फक्त त्यासाठी ढगातूनही दिसता येणे, रात्रीही दिसणे, व अचूक वेध घेता येणे ह्या तांत्रिक बाबी त्यात पुरवाव्या लागतात. आजकाल हे ड्रोन प्रकरण इतके सुळसुळाटले आहे की अमेरिकेला त्यात एक नवीन फायदा दिसतो आहे. तो असा की आता अमेरिकेला विमानांसाठी इतर देशात तळ मागायची गरज नाही. विमान वाहू  युद्धनौकावरूनही हे ड्रोन सोडता येतात. आजकाल तर ह्याचा इतका सर्रास उपयोग होतो आहे की ही चालवणार्‍या मुलांनी हे चालवण्याचे तास आमच्या "फ्लाईंग अवर्स" मध्ये मोजा व आम्हाला इतर वैमानिकाआधी बढती द्या अशी चक्क मागणीच केली आहे.
    ड्रोन सारखाच जमीनीवरून चालणारा ( एम यू एल ई ) नावाचा एक टॅंक आहे. ( मल्टीफंक्शन लॉजिस्टिक्स ऍंड एक्विपमेंट व्हेहिकल ). ह्यातही माणूस नसतो व तो सर्व पल्ल्याचे हल्ले करू शकतो. अमेरिकेने हे इराक युद्धात आधीच वापरलेले आहेत. रोबोटिक्स मध्ये नवनवीन संशोधन करून अमेरिका असे एकापेक्षा एक भारी आयुधे बनवीत आहे.
    ह्याशिवाय संगणकातले नवीन शोध वापरून कसे युद्धात वापरायचे, त्यांच्या सैन्याचे स्वत:चे कसे स्वतंत्र इंटरनेट आहे, अनेक खतरनाक जंतू ( जर्म्स ) वापरून जंतू-आयुधे कशी केलेली आहेत, वगैरे साद्यंत माहीती ह्या पुस्तकात वाचून एक लोकशाही असलेला देश इतकी संवेदनशील माहीती लोकांना कशी उपलब्द करून देतो ह्याविषयी कौतुक वाटते.
    पुस्तकाच्या समारोपात कुठल्या देशाचा वैश्विक संघर्षात वरचष्मा राहील ह्याचे भाकीत व समर्थन करताना लेखकाने एक चांगला तर्क दिला आहे. त्याच्या मताप्रमाणे जगात अनेक पुढारलेली आयुधे पुरविणार्‍या अनेक खाजगी कंपन्या आहेत व त्या प्रत्यही अनेक देशांना ही शस्त्रे पुरवीत असतातच. पण त्याने लढाईत शिरजोरी साधता येत नाही. ती साधायची असेल तर वेळप्रसंगी हवी तशी आयुधे सैन्याला संशोधित करता आली पाहिजेत. व हे करण्यासाठी त्या देशाचे सरकार व सैन्याची संघटना असे नवीन विचार जोपासणारी असायला हवी. ह्या संबंधात लेखक माजी लष्करप्रमुख डोनाल्ड रुम्सफील्ड ह्यांची जी माहीती देतो ती कोणाचेही डोळे विस्फारील अशी आहे. जसे: लष्करातून निवृत्त झाल्यावर रुम्सफील्ड ह्यांनी एक औषध कंपनी ( जी.डी.सर्ल ऍंड कंपनी ) विकत घेतली व ती भरभराटीला आणली व नंतर ती विकून जनरल इन्स्ट्रूमेंटस्‌ कॉर्पोरेशन नावाची कंपनी प्रमुख म्हणून चालवली. ज्याला तंत्रज्ञानाची खाजगी क्षेत्रातली ही महती माहीत आहे त्यालाच लष्करात तंत्रज्ञानाचे महत्व कळणार व म्हणूनच ते अमेरिकन लष्करात वरील संशोधन करवून नवीन आयुधे निर्माण करू शकले. आणि रुम्सफिल्ड ह्यांना त्यांच्या लष्कराने हे सर्व करू दिले. ( नाही तर आमचे जनरल्स बघा कसे जन्मतारखेच्या वादातच अडकून पडले आहेत. ).
    पुस्तक प्रचंड मोठे झाले आहे. त्यात लेखकाने इ.स. १४९४ पासूनच्या लढायांची प्रकरणे का घातली आहेत ते कळत नाही. प्रत्येक लढाईतून जिंकणार्‍याला व हरणार्‍याला निश्चितच शिकण्यासारखे असते हे खरे, पण त्यासाठी ह्या लढायांची इतकी साद्यंत माहीती वाचायची म्हणजे वाचकाचा अंतच पाहणे आहे. उदाहरणार्थ इंग्रजांशी मराठ्यांची जी लढाई झाली त्याचे रसभरीत वर्णन करून लेखक निष्कर्ष काय काढतो तर, मराठे संख्येने ज्यास्त असून, त्यांचे आरमार ज्यास्त बलशाली असूनही इंग्रज का यशस्वी झाले तर त्यांच्या शिस्तीमुळे व धारिष्ट्यामुळे व मराठे का हरले तर त्यांच्यातल्या दुहीमुळे, संघटना कौशल्याच्या अभावामुळे व शासनातल्या ढिसाळ कारभारामुळे. आता एवढ्या ऐतिहासिक निष्कर्षासाठी शंभर पाने खर्ची घालणे हे लेखकाचे कसब समजायचे का इतर पुस्तकातून केलेले "कट, पेस्ट"ची करामत समजायची ?
    इतरत्र कुठेही वाचायला मिळणार नाही अशी अमेरिकन लष्कराची गुपित माहीती ह्या पुस्तकाद्वारे सामान्यांना उपलब्ध होते आहे हे आपले भाग्य व त्या सरकारचे कौतुकास्पद पारदर्शकतेचे उदाहरण आहे हे मात्र नक्की. अवश्य वाचलेच पाहिजे असेच हे पुस्तक आहे. व ते २००६ साली प्रसिद्ध होऊनही फरीद झकारिया ह्यांनी त्यांच्या जीपीएस ह्या सिएनएनवरच्या कार्यक्रमात सुचविले हे अभिनंदनीय बाब आहे.

----------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
------------------------------------------------------------------------------------

  Fighting-fit USA
    War stories are always alluring and perhaps we are all “a war-mongering species” in the universe. This book published in 2006 is a tribute to these basic instincts and some of the details that it provides, make us realize as to why USA, in spite of all economic hurdles keeps herself “a fighting-fit ” nation.
    All kudos to the transparent traditions in a democratic nation when in the closing chapters, author acquaints us with all the latest armament research that USA is currently undertaking. One does not get to read such supposedly secret details at other times and it amazes us on the incredibility of creative thinking in arms research. For example, we never knew that, “In 2002 the U.S. Army provided a $50 million grant to set up the Institute for Soldier Nanotechnologies at the Massachusetts Institute of Technology.”  Here they are working on a nano-technology aided uniform which will enable them to be in contact 24X7 with others, the helmet, with night vision, would send and receive video, audio and text messages, in addition to having GPS, laser finders and sensors that will detect surroundings and will have ability to convert to a hardest protective gear like made of Kevlar. ( A nano-meter is a billionth of a meter and for sake of judgment, human hair’s width is about 50,000 nanometers wide.). In normal wear the uniform would feel as if it were made of light cotton fiber, but if the interwoven sensors detected the presence of chemical, biological, or radiation weapons, it could instantly close its “pores” to become airtight—as would the suits of other soldiers in the vicinity. If incoming bullets or shell fragments were detected, the uniform could become many times harder. This is known as “active camouflage,” in contrast to existing “passive camouflage,” which stays one color. This “battle suit” would also have built-in heating and air-conditioning and possibly electronic augmentation to boost the power of human muscles.
    They are also developing The airborne laser. Unlike a patriot missile, it is cheap ( instead of 3.8 $M per shot of Patriot 3 missile, it costs only $ 8000 per shot of laser. ) and unlike limited magazine capacity of Patriot-3 the laser can keep on firing till the fuel lasts. ( The fuel is: a mixture of fluorine, helium and deuterium.). This airborne laser is fitted on a 747 plane and because of the higher speed of lasers, it can intercept the target 160,000 times faster than the speed of bullet. This is already used and proven in the missiles bombarded in Israel.
    In democratic countries, we have seen that it is common practice to spray cold water jets on the demonstrating crowds. US marines and air force is presently developing, at a cost of 40 $M , a system called Active Denial System. In this system a meter long microwave is created and directed at the protestors and this wave goes 1/64 inch deep under the skin and causes a huge burning sensation. It can’t be traced over, once the men step out of the way of the ray. A very effective and equally secretive crowd controlling measure, which all the rulers would love to experiment soon on us.
    In the famous “Star-wars” category, along with launching of many small weight satellites, America is now engaged in a special launcher called “rods from God”. These are pieces of tungsten rods which could be hurled at enemy targets, at a super high speed from the small satellites and will create an impact as if they are hit by some nuclear weapon. But it will be less lethal and cleaner than the nuclear weapon.
    We are already witnessing the success of the American drones at various vulnerable locations. These are technically called UAV ( Unmanned Aerial Vehicle ) and can fly at very high altitudes like 60,000 feet, and can drop very precisely guided bombs and can keep flying for days on without requiring a break. These can see through the clouds, and can drop bombs with pinpoint accuracy. These have become so convenient to operate from anywhere in the world that young boys are controlling these drones from Florida and the drones are dropping bombs at given locations in Afghanistan. Already this has become so common place, that in US air force the problem is whether to consider the drone-operating boys’ hours spent in USA, as “flying experience” and whether they could be suitably promoted over the actual pilots. Their bomb dropping precision is so marvelous that there are stories of intercepted al-quaida targets reporting that they got lucky and the house is saved and only car is burning outside, and thereupon the handler gives message to the drone operators to adjust their aim and take the house next to the burning car outside. And the greatest advantage of these drones is that America does not have to negotiate terms for air-bases with rouge countries and can operate drones from a limited space. Further amazement is to be awaited when the drones would come in size of a small insect.
    Army’s version of drones is being developed by DARPA ( defence advanced research projects agency) as MULE ( multi-function logistics and equipment vehicle ) which is robotized tank and has already been tried out in Iraq war. These advances in robotics is helping the USA army to drastically reduce the soldier strength without affecting the overall effectiveness.
    Apart from above, author narrates in the book, scores of new inventions being developed by USA’s military arsenal like germs warfare, various robotics and advantages of all information available to the soldier on the ground due to their own internet and power of computers.
    Author leads a very learned argument that Middle East and other countries can afford to get various military arsenal already commercially developed and available through regular arms suppliers but the way America is developing new technology is most effective because military establishment there can think of creativity due to unique structure they have maintained and encouraged. In this regard, it was surprising to read that Donald Rumsfeld, the general who could make the military to change its thinking, had a similar experience in private sector when he was chief of G.D.Searle &co.(a pharma company ) and made it successful and then moved on to acquire General Instruments Corporation. This shows that he was capable of understanding the importance of technology in modern warfare. On this background we shudder to think of our present day generals who are more worried about their Date of Birth than improving the technical skills of the army. It is so impressing to read how their military strategists give technical presentations and how their generals make the military to think innovatively.
    Why author has started this treatise with a war in Spain in 1494 is hard to understand. Sometimes it is used to strengthen author’s arguments that a superior strategy or simple boldness and discipline wins a battle in spite of odds. Author demonstrates this by narrating the battles Maratha rulers had with British ( Welesly) and how & why they failed. Perhaps this was unnecessary and author could well have avoided the temptation of “cut & paste” tendency by making the book so bulky. But it is no denying that for a war to be won, not only technology but organization of military, that country and of course the leadership of the country plays a vital role. And it is here that author’s meticulous details about new inventions in warfare and weapons make very interesting reading. For sake of understanding the present realities of world power and especially why USA keeps its leading edge in world affairs in spite of their difficulties, this book makes a huge contribution and is worth reading.
-------------------------------------------------------------------------------------------------------

“War made new”
By: Max Boot
Gotham Books Publication, 721 pages, Flipkart price:Rs.1551
Coverpage picture

-----------------------------------------------------------------------------------------
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com


रविवार, १५ जानेवारी, २०१२




---------------------------------------------------------------------------------------------
पोस्ट अमेरिकन वर्ल्ड--२.०( सुधारित आवृत्ती-२.० )
ले: फरीद झकेरिया
नॉर्टन ऍंड कं, प्रकाशन, पाने:२८२, किं:र ११६७(फ्लिपकार्ट)


वाचाल तर वाचाल---१०
अमेरिकेनंतरचे विश्व
    आपल्या टीव्हीवरची भांडणे ऐकून भंडावल्या गेल्यासारखे होते व त्या पार्श्वभूमीवर सीएनएन वरचा रविवारचा फरीद झकेरिया ( आपल्या महाराष्ट्र सरकारचे मंत्री, औरंगाबादचे, असलेले श्री. रफिक झकेरिया ह्यांचे धाकटे चिरंजीव ) ह्यांचा जीपीएस ( ग्लोबल पब्लिक स्क्वेअर, म्हणजेच वैश्विक चावडी ) नावाचा कार्यक्रम फार सुखद व वैचारिक थोरवीचा असतो. ह्या कार्यक्रमात ते नोबेल विजेते, हार्वर्डसारख्या प्रसिद्ध विद्यापीठाचे प्रोफेसर्स, राजकीय पुढारी वगैरेंशी संवाद साधतात व जो कोणता विषय असतो त्याची सांगोपांग चर्चा, शिरा न ताणता, करतात. शिवाय एक महत्वाचे पुस्तकही ते दर आठवडयाला सुचवतात. ही पुस्तके मोठी विद्वत्तापूर्ण व वाचनीय असतात. त्यांनी सहा वर्षांपूर्वी लिहिलेले व नुकतीच सुधारित आवृत्ती काढलेले वरील पुस्तक अर्थातच, त्यांनी स्वत: सुचवलेले आहे.
    जगाच्या राजकारणात अमेरिकेचे वर्चस्व किती आहे, ते आपण जाणतोच. पण जॉर्ज बुश ह्यांच्या फसलेल्या इराक युद्धानंतर व अमेरिकेतल्या आर्थिक संकटानंतर, त्यांची जी दाणादाण झाली व जगात अमेरिका सोडून इतर राजकीय सत्ता कशा आता पुढे येत आहे त्याचे सविस्तर व विश्लेषणात्मक विवेचन ह्या पुस्तकात फरीद झकेरिया ह्यांनी केले आहे. एकेकाळी अमेरिकेला नुसती शिंक आली तर सगळ्या जगाला कशी हुडहुडी भरायची, तेथपासून आता चीनची अर्थव्यवस्था कशी अमेरिकेला आव्हान देते आहे, त्याचबरोबर भारताची प्रगतीही कशी भरभराट आणते आहे व हळूहळू जगाच्या आर्थिक वजनाच्या गुरुत्वाकर्षणाचा मध्यबिंदू कसा आशियात सरकतो आहे हे ह्या पुस्तकात "ब्रेकिंग-न्यूज" च्या थरारात सांगितले आहे. उदा: जगातल्या मुख्य २५ कंपन्या कोणत्या असणार आहेत ते सांगताना ते सांगतात:ब्राझील, मेक्सिको, साउथ कोरिया व तैवान ह्यांच्या चार-चार कंपन्या, तीन भारताच्या, चीनच्या दोन, व प्रत्येकी एक अर्जेंटिना, चिली, मलेशिया व साउथ-आफ्रिकेतल्या. असेच नाटयपूर्ण सांगणे आहे की जगातली सगळ्यात उंच इमारत आता अमेरिकेत नसून दुबईला आहे, जगातला सर्वात मोठा मॉल चीनमध्ये, सर्वात श्रीमंत माणूस मेक्सिकन, सर्वात मोठी पब्लिक कंपनी चीनमध्ये, सर्वात मोठे विमान रशियात, तर सर्वात मोठी रिफायनरी भारतात. अर्थात हे सगळे प्रतिपादन अमेरिकेच्या दृष्टिकोनातून, आता अमेरिकेने कसे वागावे, ह्या नीतीतून होणे साहजिकच आहे. कारण झकेरिया आता अमेरिकन नागरिक आहेत.
    झकेरियांच्या टीव्ही कार्यक्रमामुळे त्यांच्या प्रतिपादनात एक प्रकारचा मोघमपणा आलेला दिसतो, जो पांडित्यपूर्ण व सत्यशोधनाच्या दृष्टीने पुस्तकाचे चारित्र्यच बदलून टाकतो. झकेरिया भारतीय वंशाचे असल्याने भारत व चीन संबंधांबाबत त्यांनी इतिहासाची उजळणी करावी हे साहजिकच आहे. ते करीत असताना ते नेहरूंचे चीन बद्दलचे मत हे कसे वास्तवापेक्षा भावनेवर अवलंबून होते असे ते दाखवतात . सुधारित आवृत्तीत त्यावर टिप्पणी करताना ते असा उल्लेख देतात की शशी थारूर ह्यांनी त्यांच्या पुस्तकात नेहरूंनी अमेरिकेची संयुक्त राष्ट्रसंघातली सेक्युरिटी कौंसिलची देऊ केलेली सीट कशी अव्हेरली ह्याचा दाखला दिलेला आहे. ह्याबाबतीत झकेरियांसारखेच एक तरुण भारतीय लेखक, श्री. ब्रह्मा छेलानी ह्यांनी त्यांच्या "द एशियन जगरनॉट" ह्या पुस्तकात नेहरूंचे सविस्तर वाभाडे काढले आहेत. त्यात नेहरूंची ही घोडचूक कशी होती हे सांगून झाल्यावर त्यांच्याच "सिलेक्टेड वर्क्स ऑफ नेहरू " ह्या ग्रंथातील खालील उतारा दिला आहे : "अमेरिकेने अनधिकृतपणे सांगितले आहे की चीनला संयुक्त राष्ट्रसंघात स्थान द्यावे, पण सेक्युरिटी कौंसिल मध्ये नाही. आणि त्याऐवजी भारताला त्याजागेवर सेक्युरिटी कौंसिलची सीट द्यावी. आम्ही हे मान्य करू शकत नाही कारण असे करण्याने आम्ही चीनपासून दुरावले जाऊ व चीन सारखा महान देश कौंसिलमध्ये नसावा हे अन्यायाचे ( अनफेअर ) होईल.". हे मत कसे नुसते भावनेवर नाही, तर दुराग्रहाचे होते हे दाखवताना छेलानी, ग्लोबल-टाईम्स ह्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या मुखपत्राचा ( २००९ सालच्या ६०व्या वर्धापन-दिनानिमित्ताच्या प्रकाशनात ) दाखला देऊन सांगतात की ज्या ६० विदेशी व्यक्तींमुळे चीनला फायदा झाला त्यात जवाहरलाल नेहरू आहेत, हे खुद्द त्यांची कम्युनिस्ट पार्टीच अभिमानाने सांगत आहे. त्यानंतर छेलानी नेहरूंच्या "पंचशील" चे चीनने कसे हसे उडवले त्याचा इतिहास सांगतात. राजकारणात भले एखाद्या व्यक्तीबद्दल, आदरामुळे मोघम बोलणे सोयीचे असेल, पण रोखठोक व परखड विश्लेषण करताना जर दाखले कोणाची चूक दाखवीत असतील तर ती त्यांच्या पदरात घालावीच लागते, तरच ते प्रांजळ मत म्हणता येईल. हे अर्थातच झकेरियांना परवडले नसते.
    तसेच चीन-भारत संबंधात कसे बदल होत आहेत व कसे होतील हे दाखवताना झकेरिया जपान-चीनच्या बिघडलेल्या संबंधांमुळे भारताला कसा फायदा होतो आहे त्याचा उल्लेखही करीत नाहीत. हे त्यांच्या वैश्विक राजकारणाचे वरकरणीचे समज, दाखवणारे आहे. उदाहरणार्थ जपान-चीन ह्यांच्या संघर्षानंतर जपानने भारताबरोबरचे आर्थिक संबंध कसे सुधारले आहेत हे काही आकडयांवरून कळणारे आहे. लिप्पर ह्या रायटर्स ग्रुपच्या कंपनीने म्हटले आहे की २००५ साली जपानने भारतीय स्टॉक मार्केट मध्ये ५०० बिलियन येन गुंतवले, जे एकूण विदेशी गुंतवणुकीच्या ४० टक्के एवढ्या विपुल प्रमाणात भरते. सखोल संशोधनांती केलेल्या लिखाणात अशी सर्वांगीणता अपेक्षित असते. त्यामानाने नुसत्या मोघम समजावर झकेरिया वाचकाची बोळवण करतात.
    मागे वळून पहात ( हिंड-साईटने) गतेतिहासाचे विश्लेषण करणे ही एक मोठीच आरामदायी बाब असते व त्यात उल्लेखनीय वेल्हाळपणा आणणे कुठल्याही पंडिताला सहजी जमण्यासारखे आहे. त्यामुळे ढोबळ घटना व त्यावर आधारित भाकिते ह्यात झकेरियांना मोहक कसब प्राप्त झालेले आहे. पण राजकीय घटना ह्या अनेक वेळा अनाकलनीय असतात. जसे रशियाची घसरण, अमेरिकेचा २००८ सालचा आर्थिक राडा, अरब राष्ट्रात पसरत चाललेली लोकशाहीची चाहूल वगैरे. अशा माहोलात माणसाच्या जीवीतात मूलगामी निकषांना महत्व येते व तेच अशा काळी कामी यावेत. जसे निरनिराळ्या प्रगत राष्ट्रात असलेले लोकांचे वैयक्तिक प्राप्तीतले असुंतलन ( इन-इक्वालिटी इंडेक्स ). संयुक्त राष्ट्रसंघाचा ह्युमन डेव्हलमेंट रिपोर्ट मध्ये एक जिनी इंडेक्स ह्यासाठी वापरतात. ० म्हणजे सगळ्यांची समान सुधारणा तर १०० म्हणजे अगदी पराकोटीची असुंतलित सुधारणा. अशा इंडेक्स मध्ये चीनचा इंडेक्स ४२ आहे. कम्युनिस्ट विचारसरणी व एकाच पक्षाची सत्ता असूनही कमाईत लोकांची इतके असुंतलन असावे हे भयावह आहे. सिंगापूर सारख्या वरवर आलबेल असलेले छोटेखानी राज्य ही ४२.५ वर आहे, तर सगळ्यात संतुलित राज्ये आहेत : डेन्मार्क ( २४.७); स्वीडन ( २५); नॉर्वे ( २५.८); फिनलॅंड ( २६.९). ह्या क्रमवारीत कुपोषणाची समस्या अजूनही भारताच्या बालकांना भेडसावत असतानाही भारतासाठी हा इंडेक्स ( ३६) चीनपेक्षा बरा असावा ह्यावरून पुढचे भाग्य कोणालाही सहज दिसावे. एकपक्षीय राजवटीत असूनही चीनमध्ये त्यांच्याच आकड्यावरून भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की एकूण १ लाख ७०हजार पार्टीच्या सभासदांवर खटले भरलेले आहेत व त्यापैकी फक्त ३ टक्के लोकांवर त्यांनी कारवाई केलेली आहे. पोलादी पडद्यामागे काहीही करता येते हेच ह्यावरून दिसून येते. चीनच्या ऑलिंपिंकमध्येही हे दिसून आलेले आहे ( जसे एका छोट्या मुलीने म्हटलेले गाणे हा नुसता देखावा होता.). भव्य पूल, लांबरुंद रस्ते, टोलेजंग इमारती ह्या प्रगतीच्या खुणा भल्या आहेत पण त्यामागे केलेली दडपशाही, मध्ये येणारी घरे एका रात्रीत पाडणे वगैरे सोपे प्रकार राजवटीचा खरा चेहरा कधी ना कधी दाखवतातच. अमेरिकेत एका स्वतंत्र संस्थेने ( फंड फॉर पीस ) ह्यांनी १७७ देशांचा एक फेल्ड स्टेट इंडेक्स तयार केला आहे ज्यात कोणत्या देशात संघर्षाचे परिणाम किती खोलवर होऊ शकतात त्याची क्रमवारी दिलेली आहे. त्यात अपेक्षेप्रमाणे सगळ्या खालचा नंबर सोमालियाचा आहे तर सगळ्यात स्थिर देश नॉर्वे आहे असे आढळले. ह्या क्रमवारीत अस्थैर्यात पाकिस्तानचा क्रमांक ७वा आहे तर भारताचा ८७वा ( म्हणजे आपले स्थैर्य चांगले आहे.). ह्या क्रमवारीत चीनचा नंबर १७७ देशात ५७ वा आहे तर रशियाचा ७१ वा आहे. कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्यामागे ही जी मूलभूत वैषम्ये दडलेली आहेत त्यामुळे आज भले चीनचा उदो उदो होत असला तरी वैगुण्ये अनेक आहेत. तसेच पर्यावरणाला पायदळी तुडवणे, अनेक देशांची कदर न करता जगातली मोठी धरणे बांधणे हा उद्दामपणा चीनला एकना एक दिवस भोवणाराच आहे.
    अमेरिकेला आता आपले लक्ष्य आशियात करावे लागणार आहे ह्या झकेरियांच्या निष्कर्षाबाबत मात्र कोणाचेच दुमत होणार नाही. आजच एक बातमी आली आहे की अमेरिकेचे एक अर्थशास्त्रज्ञ ( ज्यांनी २००८ सालच्या आर्थिक घसरणीचे भवितव्य वर्तवले होते), रुबीनी, हे आता भारतात त्यांची संशोधन संस्था काढत आहे. हे त्यांनी सिंगापूर, हॉंगकॉंग, व चीनचे पर्याय डावलून केले आहे त्यावरून कोणत्या देशाचे काय मोल आहे ह्याचा पडताळा येतोच. खैर आशियाचे परत एकदा चांगले दिवस आले आहेत ह्या झकेरियांच्या प्रतिपादनाबद्दल कोणालाही अभिमानच वाटेल. त्यासाठी तरी हे पुस्तक अवश्य वाचनीय आहे.

------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

--------------------------------------------------------------------

 

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

वाचाल तर वाचाल----

"डिक्टेटर्स हॅंडबुक ( व्हाय बॅड बिहेवियर इज ऑलमोस्ट ऑलवेज गुड पॉलिटिक्स )"
लेखक:ब्रूस ब्यूनो डी मेस्क्विटा
पब्लिक अफेअर्स, पेरसेयस बुक्स ग्रुप, अमेरिका, पाने:४६० किंमत:३० डॉलर

"राजकारणी असे का वागतात"
    आपल्या डॉक्टर रफिक झकेरियांचा मुलगा, सिएनएन वर "फरीद झकेरिया--जीपीएस" नावाचा एक दर्जेदार कार्यक्रम ( शनि/रवीवारी) पेश करत असतो. ग्लोबल पब्लिक स्क्वेअर म्हणजे वैश्विक चौक/कट्टा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असून त्यात जगाच्या राजकारणाची मोठमोठ्या विद्वानांशी चर्चा केलेली असते. तसेच दर कार्यक्रमात फरीद झकेरिया एका पुस्तकाची ओळख करून देतात. त्यामुळे पुस्तक-प्रेमी लोकांसाठी ही खास मेजवानीच असते. पंधरवाड्यापूर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांनी वरील पुस्तकाची माहीती दिली व लेखकाची मुलाखत घेतली. गणितात व अर्थशास्त्रात गेम थियरी नावाचे प्रकरण आहे. त्यात दिलेल्या प्रसंगी, दोन लोक, कसे वागतील व का त्याचे गणिताच्या सहाय्याने विश्लेषण केलेले असते. नोबेल विजेते नॅश ह्यांचे नॅश इक्विलिब्रियम हे ह्यात खूप प्रसिद्ध आहे. राजकारण्यांच्या वागण्यात त्यांचा काय स्वार्थ असतो त्याप्रमाणेच ते वागतात हे त्यातले मुख्य सूत्र असते. तर ह्या गेम थियरीचा उपयोग करून अमेरिकेतल्या ब्यूनो ह्या प्राध्यापकाने केलेले हे विवेचन असून त्याने ते सध्याच्या राजकारण्यांच्या, विशेषत: हुकुमशहांच्या वागण्याला लागू केलेले आहे. कौटिल्य चाणक्याची आठवण करून देणारे हे विवेचन आहे.
    पुस्तकात जी गृहीतके धरलेली आहेत त्याला पुस्ती देणारी सध्याच्या हुकुमशहांची उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे हे नुसतेच पुस्तकी विवेचन न राहता त्याला एक वस्तुस्थितीची चौकट लाभलेली आहे. गंमत म्हणजे लोकशाहीत ज्या व्यक्ती सत्ता काबीज करतात व टिकवितात त्यांनाही ह्या पुस्तकातली प्रमेये लागू पडतात. त्यामुळे पुस्तक वाचताना आपल्याला आजूबाजूची राजकीय परिस्थिती कळत जाते व हे लोक असे का वागतात त्याचा उलगडा व्हायला लागतो. लॉस एंजेलेस ( अमेरिका) जवळच्या एका बेल नावाच्या छोट्या नगरपालिकेतले सत्ताधारी आपल्याला अनुकूल असे नियम करून कसे प्रचंड पैसे कमावतात हे उदाहरण देऊन लेखक एक नियम आपल्याला सांगतो की ज्याच्या हाती सत्ता असते तो ती टिकविण्यात त्याला सोयीस्कर व फायद्याचे काय आहे असेच नियम करतो. आपल्याला ते किती जाचक आहेत हे कळून घेण्याचे त्याचे काम नसते. इथे कोणालाही आपल्याकडच्या जनलोकपाल बिलाची पटकन्‌ आठवण यावी. सत्ताधार्‍यांवर वचक बसविणारा लोकपाल कोणाच सत्ताधार्‍याला नकोसा आहे. त्यामुळेच ते आता त्याबद्दल नाना कारणे निर्माण करून देत आहेत. तसेच अण्णा हजारेंच्या आंदोलनाने लोकसभेच्या खासदारांवरच गदा येत असल्याने ते ह्या लोकपालाविरुद्ध एक होत आहेत.
    कोणताही सत्ताधीश हा एकटा सत्ता हाकू शकत नसतो. त्याला सहाय्याला लागतात विश्वासू माणसे. सत्तेच्या ह्या खेळात महत्वाचे असतात (नावाचे) निवडून देणारे, खरे निवडून देणारे, व चौकडीत सामील होणारे विश्वासू सहकारी. भारतातल्या वाचकांना तात्काळ समजेल की जरी आम जनता ही निवडून देणारी असली तरी खरी निवडून देणारी जनता ही वेगळीच व मोजकीच असते. जसे काही ठिकाणी दलितांचा जोर असतो, काही ठिकाणी मुसलमानांचा जोर असतो तर काही ठिकाणी मराठा समाजाचा. तमाम जनतेचे समर्थन घेण्यापेक्षा ह्या मोजक्याच एकगठठा मतदारांचे म्हणूनच सत्ताकांक्षींना लांगूलचालन करावे लागते व नंतरही सत्ता टिकवण्यासाठी ह्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले की ते सोयीस्कर ठरते. तसेच सत्तेत राहण्यासाठी तमाम लोकांच्या फायद्याचे बघायचे तर ते एक मोठे जिकिरीचे काम असते. त्याऐवजी जे मोजके आमदार, खासदार आहेत त्यांना हाताशी ठेवले की सत्ता हवी तशी वापरता येते. ह्यामुळेच तर भाववाढ होत असताना, लोकांच्या फायद्याचा विचार करण्या ऐवजी सत्ता नेहमी कर कसे लादता येतील त्याचाच विचार करते कारण सरकारगाडा चालायला पैसा हवाच असतो व त्यातूनच आपले पैसे वेगळे काढून ठेवायचे असतात. बरोबरच्या आमदार, खासदारांसाठी थोडी शिते जरा फेकली की झाले. हे आपल्याला मोघम व शास्त्रीय वाटेनासे वाटू नये म्हणून लेखक मग प्रत्यक्ष घडलेली लायबेरीया सारखी उदाहरणे देतो.
    हुकुमशाही किंवा लोकशाहीत करांचे महत्व कसे व किती असते त्यावर लेखक विदारक प्रकाश टाकतो. सरकार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच व त्याच उत्पन्नासाठी कर लादणे आवश्यकच असते. खरे तर सत्ता टिकण्यासाठी कर कमी केले तर जनता सुखी व्हावी पण मग ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला पैसे कमी पडणार. त्यासाठी सत्ताधीशांचा नियम असा की कर बिनधास्त लादायला हवेत व त्यातून आपला मलिदा मिळायला हवा. इथे लेखक पाकीस्तानच्या झरदारींचा दाखला देताना म्हणतो की तिथली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली असली तरी झरदारींची वैयक्तिक मालमत्ता ४ बिलियन डॉलरची झाली आहे. आत्ता आपल्या ध्यानात येईल की महागाई वाढत असताना आपला कॉंग्रेस पक्ष पेट्रोलचे भाव सारखे का वाढवत असतात. कारण त्यातूनच सरकारी तिजोरी भरत असते. आता तिजोरीतून पैसे कसे व केव्हा काढायचे त्यात तर हातखंडा हवाच.
    ज्यांना सत्ता टिकवून ठेवायची आहे त्यांना आपले स्वास्थ्य कसे अबाधित ठेवायला लागते त्याची अनेक उदाहरणे लेखक देतो. त्यात कित्येक उदाहरणात सत्ता हडप करणार्‍याला सध्याच्या सत्ताधीशाच्या तब्येतीची माहीती असणे कसे फायद्याचे होते ह्याची मोठी मजेशीर उदाहरणे दिली आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या ध्यानात येईल की नुकत्याच झालेल्या कॅंन्सरच्या आजाराची सोनिया गांधींनी किती बेमालूमपणे गुप्तता बाळगली होती. कारण त्या आजारी आहेत असे कळते, तर बंडखोरांना आयतेच फावले असते. इथे हिंदुस्थान टाईम्सचे एक संपादक विनोद शर्मा ह्यांचे नुकतेच झालेल्या दूरदर्शनच्या चर्चेची आठवण येते. ते सांगत होते की त्यांनी मनमोहनसिंगांच्या तिसर्‍या बायपास ऑपरेशनची सविस्तर हकीकत पेपरात दिली खरी, पण त्याबद्दल त्यांना भयंकर तंबी देण्यात आली होती. ह्याच पार्श्वभूमीवर सोनियांजींच्या आजारपणाबद्दल अजूनही कोणी ब्र का काढत नाही ते लगेच समजते.
    ज्या देशांत नैसर्गिक संपत्ति भरपूर आहे त्यांची जीडीपी वाढ कशी बेताची होते व ज्यांच्याकडे काही नसते त्यांची वाढ कशी ज्यास्त होते हे विरोधाभासात्मक उदाहरण लेखक एका प्रकरणात छान रंगवून सांगतो. तसेच भ्रष्टाचार हा सत्ता टिकवून ठेवायला कसा उपयोगी पडतो, हे वाचल्यावर तर कौटिल्यीय अर्थशास्त्राची महती पटून आपल्याला सगळे कसे लख्ख दिसायला लागते. ह्या असल्या वैचारिक आतंकवादाने सध्याचे हुकुमशहा हे कसे यशस्वी होत आहेत व त्यातले किती रण सोडून पळताहेत हे लेखकाने अप्रतीम विवेचन करून दाखवले आहे.
    हे सगळे आतल्या गाठीचे राजकारण असे उघड झाल्यावर आपण कसे जागरूक रहायला हवे व सत्तालोलुपांची खरी चाल आपण कशी ओळखली पाहिजे असे कळीचे आवाहन लेखक करतो ते खूप भावणारे आहे. लबाडांची लाज काढणारे हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे व ते लिहिलेले आहे अतिशय मनोरंजक शैलीत.

--------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------


वाचाल तर वाचाल---१०
"डिक्टेटर्स हॅंडबुक ( व्हाय बॅड बिहेवियर इज ऑलमोस्ट ऑलवेज गुड पॉलिटिक्स )" लेखक:ब्रूस ब्यूनो डी मेस्क्विटा पब्लिक अफेअर्स, पेरसेयस बुक्स ग्रुप, अमेरिका, पाने:४६० किंमत:३० डॉलर

"राजकारणी असे का वागतात"

आपल्या डॉक्टर रफिक झकेरियांचा मुलगा, सिएनएन वर "फरीद झकेरिया--जीपीएस" नावाचा एक दर्जेदार कार्यक्रम ( शनि/रवीवारी) पेश करत असतो. ग्लोबल पब्लिक स्क्वेअर म्हणजे वैश्विक चौक/कट्टा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असून त्यात जगाच्या राजकारणाची मोठमोठ्या विद्वानांशी चर्चा केलेली असते. तसेच दर कार्यक्रमात फरीद झकेरिया एका पुस्तकाची ओळख करून देतात. त्यामुळे पुस्तक-प्रेमी लोकांसाठी ही खास मेजवानीच असते. पंधरवाड्यापूर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांनी वरील पुस्तकाची माहीती दिली व लेखकाची मुलाखत घेतली. गणितात व अर्थशास्त्रात गेम थियरी नावाचे प्रकरण आहे. त्यात दिलेल्या प्रसंगी, दोन लोक, कसे वागतील व का त्याचे गणिताच्या सहाय्याने विश्लेषण केलेले असते. नोबेल विजेते नॅश ह्यांचे नॅश इक्विलिब्रियम हे ह्यात खूप प्रसिद्ध आहे. राजकारण्यांच्या वागण्यात त्यांचा काय स्वार्थ असतो त्याप्रमाणेच ते वागतात हे त्यातले मुख्य सूत्र असते. तर ह्या गेम थियरीचा उपयोग करून अमेरिकेतल्या ब्यूनो ह्या प्राध्यापकाने केलेले हे विवेचन असून त्याने ते सध्याच्या राजकारण्यांच्या, विशेषत: हुकुमशहांच्या वागण्याला लागू केलेले आहे. कौटिल्य चाणक्याची आठवण करून देणारे हे विवेचन आहे. पुस्तकात जी गृहीतके धरलेली आहेत त्याला पुस्ती देणारी सध्याच्या हुकुमशहांची उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे हे नुसतेच पुस्तकी विवेचन न राहता त्याला एक वस्तुस्थितीची चौकट लाभलेली आहे. गंमत म्हणजे लोकशाहीत ज्या व्यक्ती सत्ता काबीज करतात व टिकवितात त्यांनाही ह्या पुस्तकातली प्रमेये लागू पडतात. त्यामुळे पुस्तक वाचताना आपल्याला आजूबाजूची राजकीय परिस्थिती कळत जाते व हे लोक असे का वागतात त्याचा उलगडा व्हायला लागतो. लॉस एंजेलेस ( अमेरिका) जवळच्या एका बेल नावाच्या छोट्या नगरपालिकेतले सत्ताधारी आपल्याला अनुकूल असे नियम करून कसे प्रचंड पैसे कमावतात हे उदाहरण देऊन लेखक एक नियम आपल्याला सांगतो की ज्याच्या हाती सत्ता असते तो ती टिकविण्यात त्याला सोयीस्कर व फायद्याचे काय आहे असेच नियम करतो. आपल्याला ते किती जाचक आहेत हे कळून घेण्याचे त्याचे काम नसते. इथे कोणालाही आपल्याकडच्या जनलोकपाल बिलाची पटकन्‌ आठवण यावी. सत्ताधार्‍यांवर वचक बसविणारा लोकपाल कोणाच सत्ताधार्‍याला नकोसा आहे. त्यामुळेच ते आता त्याबद्दल नाना कारणे निर्माण करून देत आहेत. तसेच अण्णा हजारेंच्या आंदोलनाने लोकसभेच्या खासदारांवरच गदा येत असल्याने ते ह्या लोकपालाविरुद्ध एक होत आहेत. कोणताही सत्ताधीश हा एकटा सत्ता हाकू शकत नसतो. त्याला सहाय्याला लागतात विश्वासू माणसे. सत्तेच्या ह्या खेळात महत्वाचे असतात (नावाचे) निवडून देणारे, खरे निवडून देणारे, व चौकडीत सामील होणारे विश्वासू सहकारी. भारतातल्या वाचकांना तात्काळ समजेल की जरी आम जनता ही निवडून देणारी असली तरी खरी निवडून देणारी जनता ही वेगळीच व मोजकीच असते. जसे काही ठिकाणी दलितांचा जोर असतो, काही ठिकाणी मुसलमानांचा जोर असतो तर काही ठिकाणी मराठा समाजाचा. तमाम जनतेचे समर्थन घेण्यापेक्षा ह्या मोजक्याच एकगठठा मतदारांचे म्हणूनच सत्ताकांक्षींना लांगूलचालन करावे लागते व नंतरही सत्ता टिकवण्यासाठी ह्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले की ते सोयीस्कर ठरते. तसेच सत्तेत राहण्यासाठी तमाम लोकांच्या फायद्याचे बघायचे तर ते एक मोठे जिकिरीचे काम असते. त्याऐवजी जे मोजके आमदार, खासदार आहेत त्यांना हाताशी ठेवले की सत्ता हवी तशी वापरता येते. ह्यामुळेच तर भाववाढ होत असताना, लोकांच्या फायद्याचा विचार करण्या ऐवजी सत्ता नेहमी कर कसे लादता येतील त्याचाच विचार करते कारण सरकारगाडा चालायला पैसा हवाच असतो व त्यातूनच आपले पैसे वेगळे काढून ठेवायचे असतात. बरोबरच्या आमदार, खासदारांसाठी थोडी शिते जरा फेकली की झाले. हे आपल्याला मोघम व शास्त्रीय वाटेनासे वाटू नये म्हणून लेखक मग प्रत्यक्ष घडलेली लायबेरीया सारखी उदाहरणे देतो. हुकुमशाही किंवा लोकशाहीत करांचे महत्व कसे व किती असते त्यावर लेखक विदारक प्रकाश टाकतो. सरकार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच व त्याच उत्पन्नासाठी कर लादणे आवश्यकच असते. खरे तर सत्ता टिकण्यासाठी कर कमी केले तर जनता सुखी व्हावी पण मग ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला पैसे कमी पडणार. त्यासाठी सत्ताधीशांचा नियम असा की कर बिनधास्त लादायला हवेत व त्यातून आपला मलिदा मिळायला हवा. इथे लेखक पाकीस्तानच्या झरदारींचा दाखला देताना म्हणतो की तिथली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली असली तरी झरदारींची वैयक्तिक मालमत्ता ४ बिलियन डॉलरची झाली आहे. आत्ता आपल्या ध्यानात येईल की महागाई वाढत असताना आपला कॉंग्रेस पक्ष पेट्रोलचे भाव सारखे का वाढवत असतात. कारण त्यातूनच सरकारी तिजोरी भरत असते. आता तिजोरीतून पैसे कसे व केव्हा काढायचे त्यात तर हातखंडा हवाच. ज्यांना सत्ता टिकवून ठेवायची आहे त्यांना आपले स्वास्थ्य कसे अबाधित ठेवायला लागते त्याची अनेक उदाहरणे लेखक देतो. त्यात कित्येक उदाहरणात सत्ता हडप करणार्‍याला सध्याच्या सत्ताधीशाच्या तब्येतीची माहीती असणे कसे फायद्याचे होते ह्याची मोठी मजेशीर उदाहरणे दिली आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या ध्यानात येईल की नुकत्याच झालेल्या कॅंन्सरच्या आजाराची सोनिया गांधींनी किती बेमालूमपणे गुप्तता बाळगली होती. कारण त्या आजारी आहेत असे कळते, तर बंडखोरांना आयतेच फावले असते. इथे हिंदुस्थान टाईम्सचे एक संपादक विनोद शर्मा ह्यांचे नुकतेच झालेल्या दूरदर्शनच्या चर्चेची आठवण येते. ते सांगत होते की त्यांनी मनमोहनसिंगांच्या तिसर्‍या बायपास ऑपरेशनची सविस्तर हकीकत पेपरात दिली खरी, पण त्याबद्दल त्यांना भयंकर तंबी देण्यात आली होती. ह्याच पार्श्वभूमीवर सोनियांजींच्या आजारपणाबद्दल अजूनही कोणी ब्र का काढत नाही ते लगेच समजते. ज्या देशांत नैसर्गिक संपत्ति भरपूर आहे त्यांची जीडीपी वाढ कशी बेताची होते व ज्यांच्याकडे काही नसते त्यांची वाढ कशी ज्यास्त होते हे विरोधाभासात्मक उदाहरण लेखक एका प्रकरणात छान रंगवून सांगतो. तसेच भ्रष्टाचार हा सत्ता टिकवून ठेवायला कसा उपयोगी पडतो, हे वाचल्यावर तर कौटिल्यीय अर्थशास्त्राची महती पटून आपल्याला सगळे कसे लख्ख दिसायला लागते. ह्या असल्या वैचारिक आतंकवादाने सध्याचे हुकुमशहा हे कसे यशस्वी होत आहेत व त्यातले किती रण सोडून पळताहेत हे लेखकाने अप्रतीम विवेचन करून दाखवले आहे. हे सगळे आतल्या गाठीचे राजकारण असे उघड झाल्यावर आपण कसे जागरूक रहायला हवे व सत्तालोलुपांची खरी चाल आपण कशी ओळखली पाहिजे असे कळीचे आवाहन लेखक करतो ते खूप भावणारे आहे. लबाडांची लाज काढणारे हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे व ते लिहिलेले आहे अतिशय मनोरंजक शैलीत. --------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-------------------------------------------------------

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

वाचाल तर वाचाल---९

-------------------
"स्टीव्ह जॉब्स" ले: वाल्टेर आयझॅक्सन
सिमोन ऍंड शुस्टर प्रकाशन, पाने ६००, किंमत र ७९९ ( फ्लिपकार्ट: र ५६०)
-------------------------------
आयझॅक्सनचा स्टीव्हला ई-मान
------------------------------------------
वाल्टेर आयझॅक्सन ही फार थोर असामी आहे. ते सीएनएन चे सर्वेसर्वा होते. तसेच सध्या एस्पेन संस्थेचे मुख्य आहेत. ( ही संस्था जगातल्या विद्वानांची शोध-संस्था आहे ). ह्यांनी आत्तापावेतो आइनस्टाइन, बेंजामिन फ्रॅंकलिन व हेन्‌री किसिंजर ह्यांची चरित्रे लिहिली आहेत. आयझॅक्सन ह्यांनी स्टीव्ह जॉब्सचे चरित्र लिहावे ह्यातच स्टीव्हचा मोठेपणा सिद्ध व्हावा इतका ह्या लेखकाचा दबदबा आहे. लेखक कबूलच करतो की चरित्र लिहिण्याचा लकडा स्टीव्ह जॉब्सनेच त्याच्यामागे लावला होता. पण त्याचबरोबर लेखक हेही सांगतो की त्याने एका अक्षरानेही पुस्तकात बदल केला नाही की काही दबाव आणला नाही. ( फक्त मरताना पुस्तकावरचे चित्र जरा त्याच्या इच्छेप्रमाणे बदलले तेव्हढेच.). ह्या लेखकाचा असा बोलबाला आहे की हे प्रत्यक्ष प्रमाण पाहूनच लिहितात. त्यामुळे स्टीव्ह जॉब्सच्या नाना आख्यायिकांना ह्या पुस्तकात फाटा मिळतो व जे पुराव्यावरून, मुलाखतीतून सिद्ध झाले तेच ह्यात उतरले आहे.
स्टीव्ह जॉब्स हा नाना विसंगतींचा मेळ असलेला गृहस्थ होता. ह्याचे सर्वच अगदी टोकाचे असे. यश मिळाले तेही इतक्या टोकाचे की अजून कित्येक दशके त्याचे नाव संगणक क्षेत्रात मानानेच घेतल्या जाईल. त्याच्या ऍपल कंपनीत सध्या जी रोख शिल्लक आहे ती सबंध अमेरिका देशाची सध्याची तूट भरून काढील इतकी प्रचंड आहे. स्वत:च्या कंपनीतून ज्याला कंपनीने काढून टाकले त्यानेच दहा वर्षानंतर ह्या कंपनीला यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन बसविले. ज्याने एवढे प्रचंड यश कमावले तो वृत्तीने इतका अपरिग्रह करणारा होता की त्याने आपले स्वत:चे घर कैक वर्षे बिना-फर्निचर ठेवले होते व कंपनीचा मुख्याधिकारी म्हणून तो केवळ एक डॉलर वार्षिक पगार घेई. भारतात येऊन त्याने बौद्ध धर्माचा प्रभाव स्वीकारला होता व त्याचविरुद्ध तो राजरोसपणे ड्रग्जही घेत असे. फुकट मिळते म्हणून मंदिरातून त्याने जेवणही घेतलेले आहे. व्यक्तिगत जीवन तर त्याचे इतके नाट्यमय घटनांनी भरलेले होते की त्यावर सहजी कित्येक कादंबर्‍या लिहाव्यात. वयाच्या २७ व्या वर्षी त्याला आपण दत्तक घेतल्या गेलेलो आहेत ते कळते व मग तो खर्‍या आई-वडिलांचा शोध घेतो व तितक्याच निष्ठेने दत्तक आईवडिलांचे ऋण मानतो.त्याच्या मैत्रिणीही पाचसहा असतात. त्यापैकी एकीकडून त्याला वयाच्या २३ व्या वर्षी एक मुलगी होते, पण तिला तो नाकारतो. कारण त्याच्या मैत्रिणीचे इतरांशीही संबंध असतात. जेव्हा कौंटी तिच्यातर्फे त्याच्यावर खटला भरते तेव्हा तो तिची सोय करतो व केवळ नवीन वैज्ञानिक चाचणी आली आहे म्हणून डिएनए टेस्ट करून घेतो.( इथे अमेरिकेतल्या कौंटींचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे). पितृत्व सिद्ध झाल्यावर मुलीचा तो स्वीकार करतो, एवढेच नाही तर पुढे चालून नवा संगणक करतो त्याचे नावही मुलीचे ( लिसा ) ठेवतो. तिची काळजी घेतो. स्वत: अतिशय प्रामाणिकपणे निरंहकारी, विनयशील जीवनशैली स्वीकारत व्हेजिटेरियन राहतो, उपास तापास करतो त्याच भरात प्रचंड पैसेही कमावतो. स्वत: शिक्षण अर्धवट सोडूनही स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्यांना भाषण देताना एका मुलीच्या प्रेमात पडतो व तिच्याशी लग्नही करतो. एखाद्या रोमॅंटिक सिनेमात शोभावे असे हे जीवन. एरव्ही मृदू असणारा हा स्टीव्ह जॉब्स एखाद्या विषयासंबंधी टीका करताना अजिबात दयामाया न ठेवता वाभाडे काढीत असे व कठोर टीका करताना शिव्याही घालीत असे.
बुद्धीच्या हुशारपणाचे मोजमाप करणे हे भारीच जोखमीचे काम असते. ते करताना पारंपारिक रीत म्हणून आपण शैक्षणिक हुशारीलाच महत्व देतो पण संगणक क्षेत्रात जेव्हढे पुस्तकी पढीक आहेत त्यापेक्षा ज्यास्त शिक्षण सोडलेले लोक दिसून येतात. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्‌, फेसबुकचे झुकरबर्ग, ओरॅकलचे लॅरी एलिसन व ऍपलचे स्टीव्ह जॉब्स ह्यांच्यात हुशार कोण हे ठरवणे फारच अवघड आहे. बरे यशस्वी कोण झाले ह्यावरून हुशारी ठरवावी तर सगळेच प्रचंड यशस्वी झालेले आहेत. नवनवीन उत्पादनांचे पेटंटस्‌ ज्याच्या नावावर अधिक त्यावरून हुशारी जोखायची तर ह्याबाबतही सगळे तुल्यबळच म्हणावे लागतील. पण स्वत:ला कॅन्सर झालेला असताना, व हा विषय वैद्यकीय ज्ञानाचा, नवखा, असताना स्टीव्ह जॉब्स त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांची जी मीटींग घेऊन उपचाराचे दिशादिग्दर्शन करतो व त्याचे समर्थन देतो ते त्याच्या बुद्धिमत्तेच्या लांब पल्ल्याची चुणूक दाखविणारे आहे. त्यात कॅंसरवर तो मात करू शकत नाही व त्यातच त्याचा दु:खद शेवट होतो ही एक मोठीच शोकांतिका ठरते.
सृजनाच्या क्षेत्रात हटके विचार करण्याचे इतके अप्रूप आहे की सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करणे ( आउट ऑफ द बॉक्स ) हे अपार मोलाचे ठरते. आजकाल व्यवस्थापन शास्त्रातही ह्याला महत्व आले आहे. त्यामुळेच स्टीव्ह जॉब्सचे कंपनीतले वागणे, सतत नवनवीन उत्पादने शोधून काढणे, ती फटाफट नेमून दिलेल्या वेळेत बाजारात आणणे आणि बाजाराने त्यांना उस्फूर्त प्रतिसाद देणे ह्या योगायोगामागे केवळ काही दैवी असण्यापेक्षा त्याच्या यशाचे काही गमक असणारी रीत असावी असे वाटणे साहजिक आहे. एकेकाळी संगणक क्षेत्रात सगळे नेमून दिलेल्या रीतीने करण्याची, कॅटलॉगप्रमाणे उत्पादने वापरण्याची परंपराच निर्माण झालेली होती. पण स्टीव्ह जॉब्सने ह्याविरुद्ध गोष्टी इतक्या सोप्या व सहज करण्याचा हातखंडा बांधला की ह्याची आयपॉड, आयफोन व आयपॅड ही उत्पादने विना-कॅटलॉग कोणीही वापरू शकतो. केवळ जादू सारखे हे कसब ऍपल कंपनीची ही उत्पादने आपल्याला दाखवतात तेव्हा थक्क व्हायला होते. माझा आठ वर्षांचा अमेरिकेतला नातू पहिल्यांदाच आयपॅड हातात घेऊन जेव्हा मला सांगू लागतो की आजोबा, हे बघा इथे जर एखादा शब्द आपल्याला अवघड असला तर त्यावर फक्त बोट ठेवा व लगेच ते डिक्शनरीमधला त्याचा अर्थ आपल्याला सांगते, तेव्हा स्टीव्ह जॉब्सच्या अपार कल्पकतेची चुणूक दिसून येऊन दिपायला होते. आणि हे सार्‍या जगाला दिपवणे, ऍपलची ही उत्पादने अजून कैक वर्षे करीत राहणार आहेत. सृजनाच्या ह्या यशाला दाद द्यावी तितकी कमीच आहे. व ह्या यशामुळे त्याच्या अमानुष वागण्याच्या तर्‍हांना माफीच द्यावी लागते.
एखाद्या कल्पनेला ती चुकीची आहे असे ठामपणे म्हणणे हे कोणाला सृजनतेच्या दृष्टीने अमानुषतेचे वाटू शकते व ह्या निकषावर स्टीव्ह जॉब्सचे कंपनीतले वागणे खूप जणांना न पटणारे व अतिउद्धटपणाचे वाटणे साहजिक आहे. पण हे केवळ कल्पनेच्या स्तरावर तो करीत असे, वैयक्तिक स्तरावर तो अपार सहानुभूतीचाच रक्षक राहत आलेला आहे असे दाखविणारा एक किस्सा अपार महत्वाचा आहे. त्याच्या टीकेने घायाळ झालेल्या संशोधकांनी त्यांच्यातले सर्वोत्तम जसे दिले तसेच त्यामुळे त्यांना अगणित वेदना होत असत हे तर एव्हाना सर्वपरिचितच झालेले आहे. त्याचा एक संशोधक सहकारी तर शेवटी वेडा होतो. रस्त्याने नागडा हिंडू लागतो. तो स्टीव्ह जॉब्सच्या घरी येऊन दगडे मारू लागतो. एकदा तो बरेच दिवस परागंदा होतो. बर्‍याच दिवसांनी सहकार्‍यांना खबर लागते की तो पोलीस-स्टेशनात बंदिस्त आहे. मग स्टीव्ह जॉब्सवर त्याचे सहकारी त्याला सोडवण्याचे दडपण आणतात. मग स्टीव्ह जॉब्स ओळखी वापरत त्याला सोडवितो. ह्यावर तो त्यांना म्हणतो की कदाचित पुढे मागे मी जर असाच वेडा झालो तर तुम्ही मलाही अशीच मदत कराल ना ? सह-संवेदनांचे माणूसपण इथे स्टीव्ह जॉब्सच्या ह्या कृतीत व उक्तीत जे दिसते ते त्याच्या उद्धटपणाइतकेच मोहकही वाटू लागते.
धुमच्छक्रीचे जीवन जगत असताना स्टीव्ह जॉब्स एखाद्या तत्ववेत्त्यालाही लाजवेल अशा तत्वज्ञानाचे आपल्याला दर्शन देतो, हे ह्या पुस्तकात आयझॅकसनसारखा लेखक अपार कौशल्याने रेखतो. संगणकीय उत्पादनात स्टीव्ह जॉब्सला ऑन-ऑफ स्विचेस आवडत नसत, हे सांगताना त्यामागचे तत्वज्ञान लेखक आपल्याला समजून सांगतो. त्याअगोदर हे ऑन-ऑफ स्विच प्रकरण थोडे उदाहरणाने समजून घेण्यासारखे आहे. जसे गाडीचा दरवाजा उघडला की आतले लाईट लागतात व दरवाजा बंद केला की ते मिटतात, हे साधे उदाहरण घ्या. आतल्या लाईटला ऑन-ऑफ करणारे स्विच असतेच पण ते न वापरता आपण ही सोय अवलंबितो व ते किती सोयीचे होते, ते आता आठवा. स्टीव्ह जॉब्सच्या विचारांनुसार प्रत्येक माणूस जीवनात जे प्रयत्नांती कमावतो, त्याचे हे संचित, ते त्याच्या स्विच-ऑफ होण्याने, मृत्यूने, नुसतेच मिटले जाणे हे न्यायाचे नाही. इथे आपल्याला वाटते स्टीव्ह जॉब्स त्याच्या बौद्ध जाणीवांनी पुन:र्जन्माबद्दल तर बोलत नाही ना ? तर तो एखाद्या व्यवस्थापनशास्त्राच्या थाटात सांगतो की कंपनीच्या कर्त्याधर्त्याच्या मृत्यूनंतर, नवनवीन कल्पक उत्पादने येतच राहिली पाहिजेत अशी, ऑन-ऑफ स्विच विनाची व्यवस्था असली पाहिजे. मग तो ऍपल कंपनी एकापाठोपाठ नवनवीन कल्पक उत्पादने कशी करू शकतात, त्यामागच्या व्यवस्थेची आपल्याला उकल करून देतो. ह्यात कल्पक विचारांना सहानुभूती हवी, हे गृहितक तर आहेच पण त्याचबरोबर चुकीच्या कल्पनेवर, रोखठोकपणे कठोर प्रहार हवा हे तत्वही तो सांगतो. असल्या व्यवस्थेचे आदर्श असलेली डिस्ने ही कंपनी जे सिनेमा क्षेत्रात करू शकली नाही ते स्टीव्ह जॉब्स पिक्सार ह्या त्याच्या कंपनीमार्फत टॉय-स्टोरी, फाईंडिंग नेमो, ए बग्ज लाईफ, टॉय-स्टोरी-२, असे एकापेक्षा एक व्यावसायिक यशाचे व मनोरंजनात अत्युच्च कोटीचे असलेले सिनेमे तयार करतो. असेच त्याच्या मृत्यूनंतर नुकतेच बाजारात आलेले आयफोन ४-एस हे उत्पादन ह्याच निकषावर दाखवून देते की कल्पकतेला मरण नसलेलीच ही ऍपल कंपनी आहे.
जनरीतीप्रमाणे ह्या पुस्तकाच्या उलटही अनेक मते आली आहेत. पण ती स्टीव्ह जॉब्सच्या विचित्र वागण्याने दुखावलेल्यांची असण्याची शक्यता ज्यास्त आहे. किंवा त्याचे तत्वज्ञान मंजूर नसलेल्यांची . एका कसलेल्या लेखकाला स्टीव्ह जॉब्सचे जीवन इतके समृद्ध भासावे व त्यातले रोमांचक क्षण व त्यामागचे दुवे नीट आपल्यासाठी उलगडून दाखवावेत, त्याच्या विचित्रतेच्या मागची तत्वे सांगावीत, हे क्वचितच आढळणारे निरपेक्ष निवेदन मोठे मनोहारी आहे, हे तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावरच कळेल. अवश्य वाचा व एका अवलियाला ई-मान द्या !.

-----------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

---------------------------------------------------------------------------------------------