रविवार, १५ जानेवारी, २०१२




---------------------------------------------------------------------------------------------
पोस्ट अमेरिकन वर्ल्ड--२.०( सुधारित आवृत्ती-२.० )
ले: फरीद झकेरिया
नॉर्टन ऍंड कं, प्रकाशन, पाने:२८२, किं:र ११६७(फ्लिपकार्ट)


वाचाल तर वाचाल---१०
अमेरिकेनंतरचे विश्व
    आपल्या टीव्हीवरची भांडणे ऐकून भंडावल्या गेल्यासारखे होते व त्या पार्श्वभूमीवर सीएनएन वरचा रविवारचा फरीद झकेरिया ( आपल्या महाराष्ट्र सरकारचे मंत्री, औरंगाबादचे, असलेले श्री. रफिक झकेरिया ह्यांचे धाकटे चिरंजीव ) ह्यांचा जीपीएस ( ग्लोबल पब्लिक स्क्वेअर, म्हणजेच वैश्विक चावडी ) नावाचा कार्यक्रम फार सुखद व वैचारिक थोरवीचा असतो. ह्या कार्यक्रमात ते नोबेल विजेते, हार्वर्डसारख्या प्रसिद्ध विद्यापीठाचे प्रोफेसर्स, राजकीय पुढारी वगैरेंशी संवाद साधतात व जो कोणता विषय असतो त्याची सांगोपांग चर्चा, शिरा न ताणता, करतात. शिवाय एक महत्वाचे पुस्तकही ते दर आठवडयाला सुचवतात. ही पुस्तके मोठी विद्वत्तापूर्ण व वाचनीय असतात. त्यांनी सहा वर्षांपूर्वी लिहिलेले व नुकतीच सुधारित आवृत्ती काढलेले वरील पुस्तक अर्थातच, त्यांनी स्वत: सुचवलेले आहे.
    जगाच्या राजकारणात अमेरिकेचे वर्चस्व किती आहे, ते आपण जाणतोच. पण जॉर्ज बुश ह्यांच्या फसलेल्या इराक युद्धानंतर व अमेरिकेतल्या आर्थिक संकटानंतर, त्यांची जी दाणादाण झाली व जगात अमेरिका सोडून इतर राजकीय सत्ता कशा आता पुढे येत आहे त्याचे सविस्तर व विश्लेषणात्मक विवेचन ह्या पुस्तकात फरीद झकेरिया ह्यांनी केले आहे. एकेकाळी अमेरिकेला नुसती शिंक आली तर सगळ्या जगाला कशी हुडहुडी भरायची, तेथपासून आता चीनची अर्थव्यवस्था कशी अमेरिकेला आव्हान देते आहे, त्याचबरोबर भारताची प्रगतीही कशी भरभराट आणते आहे व हळूहळू जगाच्या आर्थिक वजनाच्या गुरुत्वाकर्षणाचा मध्यबिंदू कसा आशियात सरकतो आहे हे ह्या पुस्तकात "ब्रेकिंग-न्यूज" च्या थरारात सांगितले आहे. उदा: जगातल्या मुख्य २५ कंपन्या कोणत्या असणार आहेत ते सांगताना ते सांगतात:ब्राझील, मेक्सिको, साउथ कोरिया व तैवान ह्यांच्या चार-चार कंपन्या, तीन भारताच्या, चीनच्या दोन, व प्रत्येकी एक अर्जेंटिना, चिली, मलेशिया व साउथ-आफ्रिकेतल्या. असेच नाटयपूर्ण सांगणे आहे की जगातली सगळ्यात उंच इमारत आता अमेरिकेत नसून दुबईला आहे, जगातला सर्वात मोठा मॉल चीनमध्ये, सर्वात श्रीमंत माणूस मेक्सिकन, सर्वात मोठी पब्लिक कंपनी चीनमध्ये, सर्वात मोठे विमान रशियात, तर सर्वात मोठी रिफायनरी भारतात. अर्थात हे सगळे प्रतिपादन अमेरिकेच्या दृष्टिकोनातून, आता अमेरिकेने कसे वागावे, ह्या नीतीतून होणे साहजिकच आहे. कारण झकेरिया आता अमेरिकन नागरिक आहेत.
    झकेरियांच्या टीव्ही कार्यक्रमामुळे त्यांच्या प्रतिपादनात एक प्रकारचा मोघमपणा आलेला दिसतो, जो पांडित्यपूर्ण व सत्यशोधनाच्या दृष्टीने पुस्तकाचे चारित्र्यच बदलून टाकतो. झकेरिया भारतीय वंशाचे असल्याने भारत व चीन संबंधांबाबत त्यांनी इतिहासाची उजळणी करावी हे साहजिकच आहे. ते करीत असताना ते नेहरूंचे चीन बद्दलचे मत हे कसे वास्तवापेक्षा भावनेवर अवलंबून होते असे ते दाखवतात . सुधारित आवृत्तीत त्यावर टिप्पणी करताना ते असा उल्लेख देतात की शशी थारूर ह्यांनी त्यांच्या पुस्तकात नेहरूंनी अमेरिकेची संयुक्त राष्ट्रसंघातली सेक्युरिटी कौंसिलची देऊ केलेली सीट कशी अव्हेरली ह्याचा दाखला दिलेला आहे. ह्याबाबतीत झकेरियांसारखेच एक तरुण भारतीय लेखक, श्री. ब्रह्मा छेलानी ह्यांनी त्यांच्या "द एशियन जगरनॉट" ह्या पुस्तकात नेहरूंचे सविस्तर वाभाडे काढले आहेत. त्यात नेहरूंची ही घोडचूक कशी होती हे सांगून झाल्यावर त्यांच्याच "सिलेक्टेड वर्क्स ऑफ नेहरू " ह्या ग्रंथातील खालील उतारा दिला आहे : "अमेरिकेने अनधिकृतपणे सांगितले आहे की चीनला संयुक्त राष्ट्रसंघात स्थान द्यावे, पण सेक्युरिटी कौंसिल मध्ये नाही. आणि त्याऐवजी भारताला त्याजागेवर सेक्युरिटी कौंसिलची सीट द्यावी. आम्ही हे मान्य करू शकत नाही कारण असे करण्याने आम्ही चीनपासून दुरावले जाऊ व चीन सारखा महान देश कौंसिलमध्ये नसावा हे अन्यायाचे ( अनफेअर ) होईल.". हे मत कसे नुसते भावनेवर नाही, तर दुराग्रहाचे होते हे दाखवताना छेलानी, ग्लोबल-टाईम्स ह्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या मुखपत्राचा ( २००९ सालच्या ६०व्या वर्धापन-दिनानिमित्ताच्या प्रकाशनात ) दाखला देऊन सांगतात की ज्या ६० विदेशी व्यक्तींमुळे चीनला फायदा झाला त्यात जवाहरलाल नेहरू आहेत, हे खुद्द त्यांची कम्युनिस्ट पार्टीच अभिमानाने सांगत आहे. त्यानंतर छेलानी नेहरूंच्या "पंचशील" चे चीनने कसे हसे उडवले त्याचा इतिहास सांगतात. राजकारणात भले एखाद्या व्यक्तीबद्दल, आदरामुळे मोघम बोलणे सोयीचे असेल, पण रोखठोक व परखड विश्लेषण करताना जर दाखले कोणाची चूक दाखवीत असतील तर ती त्यांच्या पदरात घालावीच लागते, तरच ते प्रांजळ मत म्हणता येईल. हे अर्थातच झकेरियांना परवडले नसते.
    तसेच चीन-भारत संबंधात कसे बदल होत आहेत व कसे होतील हे दाखवताना झकेरिया जपान-चीनच्या बिघडलेल्या संबंधांमुळे भारताला कसा फायदा होतो आहे त्याचा उल्लेखही करीत नाहीत. हे त्यांच्या वैश्विक राजकारणाचे वरकरणीचे समज, दाखवणारे आहे. उदाहरणार्थ जपान-चीन ह्यांच्या संघर्षानंतर जपानने भारताबरोबरचे आर्थिक संबंध कसे सुधारले आहेत हे काही आकडयांवरून कळणारे आहे. लिप्पर ह्या रायटर्स ग्रुपच्या कंपनीने म्हटले आहे की २००५ साली जपानने भारतीय स्टॉक मार्केट मध्ये ५०० बिलियन येन गुंतवले, जे एकूण विदेशी गुंतवणुकीच्या ४० टक्के एवढ्या विपुल प्रमाणात भरते. सखोल संशोधनांती केलेल्या लिखाणात अशी सर्वांगीणता अपेक्षित असते. त्यामानाने नुसत्या मोघम समजावर झकेरिया वाचकाची बोळवण करतात.
    मागे वळून पहात ( हिंड-साईटने) गतेतिहासाचे विश्लेषण करणे ही एक मोठीच आरामदायी बाब असते व त्यात उल्लेखनीय वेल्हाळपणा आणणे कुठल्याही पंडिताला सहजी जमण्यासारखे आहे. त्यामुळे ढोबळ घटना व त्यावर आधारित भाकिते ह्यात झकेरियांना मोहक कसब प्राप्त झालेले आहे. पण राजकीय घटना ह्या अनेक वेळा अनाकलनीय असतात. जसे रशियाची घसरण, अमेरिकेचा २००८ सालचा आर्थिक राडा, अरब राष्ट्रात पसरत चाललेली लोकशाहीची चाहूल वगैरे. अशा माहोलात माणसाच्या जीवीतात मूलगामी निकषांना महत्व येते व तेच अशा काळी कामी यावेत. जसे निरनिराळ्या प्रगत राष्ट्रात असलेले लोकांचे वैयक्तिक प्राप्तीतले असुंतलन ( इन-इक्वालिटी इंडेक्स ). संयुक्त राष्ट्रसंघाचा ह्युमन डेव्हलमेंट रिपोर्ट मध्ये एक जिनी इंडेक्स ह्यासाठी वापरतात. ० म्हणजे सगळ्यांची समान सुधारणा तर १०० म्हणजे अगदी पराकोटीची असुंतलित सुधारणा. अशा इंडेक्स मध्ये चीनचा इंडेक्स ४२ आहे. कम्युनिस्ट विचारसरणी व एकाच पक्षाची सत्ता असूनही कमाईत लोकांची इतके असुंतलन असावे हे भयावह आहे. सिंगापूर सारख्या वरवर आलबेल असलेले छोटेखानी राज्य ही ४२.५ वर आहे, तर सगळ्यात संतुलित राज्ये आहेत : डेन्मार्क ( २४.७); स्वीडन ( २५); नॉर्वे ( २५.८); फिनलॅंड ( २६.९). ह्या क्रमवारीत कुपोषणाची समस्या अजूनही भारताच्या बालकांना भेडसावत असतानाही भारतासाठी हा इंडेक्स ( ३६) चीनपेक्षा बरा असावा ह्यावरून पुढचे भाग्य कोणालाही सहज दिसावे. एकपक्षीय राजवटीत असूनही चीनमध्ये त्यांच्याच आकड्यावरून भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की एकूण १ लाख ७०हजार पार्टीच्या सभासदांवर खटले भरलेले आहेत व त्यापैकी फक्त ३ टक्के लोकांवर त्यांनी कारवाई केलेली आहे. पोलादी पडद्यामागे काहीही करता येते हेच ह्यावरून दिसून येते. चीनच्या ऑलिंपिंकमध्येही हे दिसून आलेले आहे ( जसे एका छोट्या मुलीने म्हटलेले गाणे हा नुसता देखावा होता.). भव्य पूल, लांबरुंद रस्ते, टोलेजंग इमारती ह्या प्रगतीच्या खुणा भल्या आहेत पण त्यामागे केलेली दडपशाही, मध्ये येणारी घरे एका रात्रीत पाडणे वगैरे सोपे प्रकार राजवटीचा खरा चेहरा कधी ना कधी दाखवतातच. अमेरिकेत एका स्वतंत्र संस्थेने ( फंड फॉर पीस ) ह्यांनी १७७ देशांचा एक फेल्ड स्टेट इंडेक्स तयार केला आहे ज्यात कोणत्या देशात संघर्षाचे परिणाम किती खोलवर होऊ शकतात त्याची क्रमवारी दिलेली आहे. त्यात अपेक्षेप्रमाणे सगळ्या खालचा नंबर सोमालियाचा आहे तर सगळ्यात स्थिर देश नॉर्वे आहे असे आढळले. ह्या क्रमवारीत अस्थैर्यात पाकिस्तानचा क्रमांक ७वा आहे तर भारताचा ८७वा ( म्हणजे आपले स्थैर्य चांगले आहे.). ह्या क्रमवारीत चीनचा नंबर १७७ देशात ५७ वा आहे तर रशियाचा ७१ वा आहे. कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्यामागे ही जी मूलभूत वैषम्ये दडलेली आहेत त्यामुळे आज भले चीनचा उदो उदो होत असला तरी वैगुण्ये अनेक आहेत. तसेच पर्यावरणाला पायदळी तुडवणे, अनेक देशांची कदर न करता जगातली मोठी धरणे बांधणे हा उद्दामपणा चीनला एकना एक दिवस भोवणाराच आहे.
    अमेरिकेला आता आपले लक्ष्य आशियात करावे लागणार आहे ह्या झकेरियांच्या निष्कर्षाबाबत मात्र कोणाचेच दुमत होणार नाही. आजच एक बातमी आली आहे की अमेरिकेचे एक अर्थशास्त्रज्ञ ( ज्यांनी २००८ सालच्या आर्थिक घसरणीचे भवितव्य वर्तवले होते), रुबीनी, हे आता भारतात त्यांची संशोधन संस्था काढत आहे. हे त्यांनी सिंगापूर, हॉंगकॉंग, व चीनचे पर्याय डावलून केले आहे त्यावरून कोणत्या देशाचे काय मोल आहे ह्याचा पडताळा येतोच. खैर आशियाचे परत एकदा चांगले दिवस आले आहेत ह्या झकेरियांच्या प्रतिपादनाबद्दल कोणालाही अभिमानच वाटेल. त्यासाठी तरी हे पुस्तक अवश्य वाचनीय आहे.

------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

--------------------------------------------------------------------

 

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

वाचाल तर वाचाल----

"डिक्टेटर्स हॅंडबुक ( व्हाय बॅड बिहेवियर इज ऑलमोस्ट ऑलवेज गुड पॉलिटिक्स )"
लेखक:ब्रूस ब्यूनो डी मेस्क्विटा
पब्लिक अफेअर्स, पेरसेयस बुक्स ग्रुप, अमेरिका, पाने:४६० किंमत:३० डॉलर

"राजकारणी असे का वागतात"
    आपल्या डॉक्टर रफिक झकेरियांचा मुलगा, सिएनएन वर "फरीद झकेरिया--जीपीएस" नावाचा एक दर्जेदार कार्यक्रम ( शनि/रवीवारी) पेश करत असतो. ग्लोबल पब्लिक स्क्वेअर म्हणजे वैश्विक चौक/कट्टा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असून त्यात जगाच्या राजकारणाची मोठमोठ्या विद्वानांशी चर्चा केलेली असते. तसेच दर कार्यक्रमात फरीद झकेरिया एका पुस्तकाची ओळख करून देतात. त्यामुळे पुस्तक-प्रेमी लोकांसाठी ही खास मेजवानीच असते. पंधरवाड्यापूर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांनी वरील पुस्तकाची माहीती दिली व लेखकाची मुलाखत घेतली. गणितात व अर्थशास्त्रात गेम थियरी नावाचे प्रकरण आहे. त्यात दिलेल्या प्रसंगी, दोन लोक, कसे वागतील व का त्याचे गणिताच्या सहाय्याने विश्लेषण केलेले असते. नोबेल विजेते नॅश ह्यांचे नॅश इक्विलिब्रियम हे ह्यात खूप प्रसिद्ध आहे. राजकारण्यांच्या वागण्यात त्यांचा काय स्वार्थ असतो त्याप्रमाणेच ते वागतात हे त्यातले मुख्य सूत्र असते. तर ह्या गेम थियरीचा उपयोग करून अमेरिकेतल्या ब्यूनो ह्या प्राध्यापकाने केलेले हे विवेचन असून त्याने ते सध्याच्या राजकारण्यांच्या, विशेषत: हुकुमशहांच्या वागण्याला लागू केलेले आहे. कौटिल्य चाणक्याची आठवण करून देणारे हे विवेचन आहे.
    पुस्तकात जी गृहीतके धरलेली आहेत त्याला पुस्ती देणारी सध्याच्या हुकुमशहांची उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे हे नुसतेच पुस्तकी विवेचन न राहता त्याला एक वस्तुस्थितीची चौकट लाभलेली आहे. गंमत म्हणजे लोकशाहीत ज्या व्यक्ती सत्ता काबीज करतात व टिकवितात त्यांनाही ह्या पुस्तकातली प्रमेये लागू पडतात. त्यामुळे पुस्तक वाचताना आपल्याला आजूबाजूची राजकीय परिस्थिती कळत जाते व हे लोक असे का वागतात त्याचा उलगडा व्हायला लागतो. लॉस एंजेलेस ( अमेरिका) जवळच्या एका बेल नावाच्या छोट्या नगरपालिकेतले सत्ताधारी आपल्याला अनुकूल असे नियम करून कसे प्रचंड पैसे कमावतात हे उदाहरण देऊन लेखक एक नियम आपल्याला सांगतो की ज्याच्या हाती सत्ता असते तो ती टिकविण्यात त्याला सोयीस्कर व फायद्याचे काय आहे असेच नियम करतो. आपल्याला ते किती जाचक आहेत हे कळून घेण्याचे त्याचे काम नसते. इथे कोणालाही आपल्याकडच्या जनलोकपाल बिलाची पटकन्‌ आठवण यावी. सत्ताधार्‍यांवर वचक बसविणारा लोकपाल कोणाच सत्ताधार्‍याला नकोसा आहे. त्यामुळेच ते आता त्याबद्दल नाना कारणे निर्माण करून देत आहेत. तसेच अण्णा हजारेंच्या आंदोलनाने लोकसभेच्या खासदारांवरच गदा येत असल्याने ते ह्या लोकपालाविरुद्ध एक होत आहेत.
    कोणताही सत्ताधीश हा एकटा सत्ता हाकू शकत नसतो. त्याला सहाय्याला लागतात विश्वासू माणसे. सत्तेच्या ह्या खेळात महत्वाचे असतात (नावाचे) निवडून देणारे, खरे निवडून देणारे, व चौकडीत सामील होणारे विश्वासू सहकारी. भारतातल्या वाचकांना तात्काळ समजेल की जरी आम जनता ही निवडून देणारी असली तरी खरी निवडून देणारी जनता ही वेगळीच व मोजकीच असते. जसे काही ठिकाणी दलितांचा जोर असतो, काही ठिकाणी मुसलमानांचा जोर असतो तर काही ठिकाणी मराठा समाजाचा. तमाम जनतेचे समर्थन घेण्यापेक्षा ह्या मोजक्याच एकगठठा मतदारांचे म्हणूनच सत्ताकांक्षींना लांगूलचालन करावे लागते व नंतरही सत्ता टिकवण्यासाठी ह्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले की ते सोयीस्कर ठरते. तसेच सत्तेत राहण्यासाठी तमाम लोकांच्या फायद्याचे बघायचे तर ते एक मोठे जिकिरीचे काम असते. त्याऐवजी जे मोजके आमदार, खासदार आहेत त्यांना हाताशी ठेवले की सत्ता हवी तशी वापरता येते. ह्यामुळेच तर भाववाढ होत असताना, लोकांच्या फायद्याचा विचार करण्या ऐवजी सत्ता नेहमी कर कसे लादता येतील त्याचाच विचार करते कारण सरकारगाडा चालायला पैसा हवाच असतो व त्यातूनच आपले पैसे वेगळे काढून ठेवायचे असतात. बरोबरच्या आमदार, खासदारांसाठी थोडी शिते जरा फेकली की झाले. हे आपल्याला मोघम व शास्त्रीय वाटेनासे वाटू नये म्हणून लेखक मग प्रत्यक्ष घडलेली लायबेरीया सारखी उदाहरणे देतो.
    हुकुमशाही किंवा लोकशाहीत करांचे महत्व कसे व किती असते त्यावर लेखक विदारक प्रकाश टाकतो. सरकार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच व त्याच उत्पन्नासाठी कर लादणे आवश्यकच असते. खरे तर सत्ता टिकण्यासाठी कर कमी केले तर जनता सुखी व्हावी पण मग ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला पैसे कमी पडणार. त्यासाठी सत्ताधीशांचा नियम असा की कर बिनधास्त लादायला हवेत व त्यातून आपला मलिदा मिळायला हवा. इथे लेखक पाकीस्तानच्या झरदारींचा दाखला देताना म्हणतो की तिथली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली असली तरी झरदारींची वैयक्तिक मालमत्ता ४ बिलियन डॉलरची झाली आहे. आत्ता आपल्या ध्यानात येईल की महागाई वाढत असताना आपला कॉंग्रेस पक्ष पेट्रोलचे भाव सारखे का वाढवत असतात. कारण त्यातूनच सरकारी तिजोरी भरत असते. आता तिजोरीतून पैसे कसे व केव्हा काढायचे त्यात तर हातखंडा हवाच.
    ज्यांना सत्ता टिकवून ठेवायची आहे त्यांना आपले स्वास्थ्य कसे अबाधित ठेवायला लागते त्याची अनेक उदाहरणे लेखक देतो. त्यात कित्येक उदाहरणात सत्ता हडप करणार्‍याला सध्याच्या सत्ताधीशाच्या तब्येतीची माहीती असणे कसे फायद्याचे होते ह्याची मोठी मजेशीर उदाहरणे दिली आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या ध्यानात येईल की नुकत्याच झालेल्या कॅंन्सरच्या आजाराची सोनिया गांधींनी किती बेमालूमपणे गुप्तता बाळगली होती. कारण त्या आजारी आहेत असे कळते, तर बंडखोरांना आयतेच फावले असते. इथे हिंदुस्थान टाईम्सचे एक संपादक विनोद शर्मा ह्यांचे नुकतेच झालेल्या दूरदर्शनच्या चर्चेची आठवण येते. ते सांगत होते की त्यांनी मनमोहनसिंगांच्या तिसर्‍या बायपास ऑपरेशनची सविस्तर हकीकत पेपरात दिली खरी, पण त्याबद्दल त्यांना भयंकर तंबी देण्यात आली होती. ह्याच पार्श्वभूमीवर सोनियांजींच्या आजारपणाबद्दल अजूनही कोणी ब्र का काढत नाही ते लगेच समजते.
    ज्या देशांत नैसर्गिक संपत्ति भरपूर आहे त्यांची जीडीपी वाढ कशी बेताची होते व ज्यांच्याकडे काही नसते त्यांची वाढ कशी ज्यास्त होते हे विरोधाभासात्मक उदाहरण लेखक एका प्रकरणात छान रंगवून सांगतो. तसेच भ्रष्टाचार हा सत्ता टिकवून ठेवायला कसा उपयोगी पडतो, हे वाचल्यावर तर कौटिल्यीय अर्थशास्त्राची महती पटून आपल्याला सगळे कसे लख्ख दिसायला लागते. ह्या असल्या वैचारिक आतंकवादाने सध्याचे हुकुमशहा हे कसे यशस्वी होत आहेत व त्यातले किती रण सोडून पळताहेत हे लेखकाने अप्रतीम विवेचन करून दाखवले आहे.
    हे सगळे आतल्या गाठीचे राजकारण असे उघड झाल्यावर आपण कसे जागरूक रहायला हवे व सत्तालोलुपांची खरी चाल आपण कशी ओळखली पाहिजे असे कळीचे आवाहन लेखक करतो ते खूप भावणारे आहे. लबाडांची लाज काढणारे हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे व ते लिहिलेले आहे अतिशय मनोरंजक शैलीत.

--------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------


वाचाल तर वाचाल---१०
"डिक्टेटर्स हॅंडबुक ( व्हाय बॅड बिहेवियर इज ऑलमोस्ट ऑलवेज गुड पॉलिटिक्स )" लेखक:ब्रूस ब्यूनो डी मेस्क्विटा पब्लिक अफेअर्स, पेरसेयस बुक्स ग्रुप, अमेरिका, पाने:४६० किंमत:३० डॉलर

"राजकारणी असे का वागतात"

आपल्या डॉक्टर रफिक झकेरियांचा मुलगा, सिएनएन वर "फरीद झकेरिया--जीपीएस" नावाचा एक दर्जेदार कार्यक्रम ( शनि/रवीवारी) पेश करत असतो. ग्लोबल पब्लिक स्क्वेअर म्हणजे वैश्विक चौक/कट्टा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असून त्यात जगाच्या राजकारणाची मोठमोठ्या विद्वानांशी चर्चा केलेली असते. तसेच दर कार्यक्रमात फरीद झकेरिया एका पुस्तकाची ओळख करून देतात. त्यामुळे पुस्तक-प्रेमी लोकांसाठी ही खास मेजवानीच असते. पंधरवाड्यापूर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांनी वरील पुस्तकाची माहीती दिली व लेखकाची मुलाखत घेतली. गणितात व अर्थशास्त्रात गेम थियरी नावाचे प्रकरण आहे. त्यात दिलेल्या प्रसंगी, दोन लोक, कसे वागतील व का त्याचे गणिताच्या सहाय्याने विश्लेषण केलेले असते. नोबेल विजेते नॅश ह्यांचे नॅश इक्विलिब्रियम हे ह्यात खूप प्रसिद्ध आहे. राजकारण्यांच्या वागण्यात त्यांचा काय स्वार्थ असतो त्याप्रमाणेच ते वागतात हे त्यातले मुख्य सूत्र असते. तर ह्या गेम थियरीचा उपयोग करून अमेरिकेतल्या ब्यूनो ह्या प्राध्यापकाने केलेले हे विवेचन असून त्याने ते सध्याच्या राजकारण्यांच्या, विशेषत: हुकुमशहांच्या वागण्याला लागू केलेले आहे. कौटिल्य चाणक्याची आठवण करून देणारे हे विवेचन आहे. पुस्तकात जी गृहीतके धरलेली आहेत त्याला पुस्ती देणारी सध्याच्या हुकुमशहांची उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे हे नुसतेच पुस्तकी विवेचन न राहता त्याला एक वस्तुस्थितीची चौकट लाभलेली आहे. गंमत म्हणजे लोकशाहीत ज्या व्यक्ती सत्ता काबीज करतात व टिकवितात त्यांनाही ह्या पुस्तकातली प्रमेये लागू पडतात. त्यामुळे पुस्तक वाचताना आपल्याला आजूबाजूची राजकीय परिस्थिती कळत जाते व हे लोक असे का वागतात त्याचा उलगडा व्हायला लागतो. लॉस एंजेलेस ( अमेरिका) जवळच्या एका बेल नावाच्या छोट्या नगरपालिकेतले सत्ताधारी आपल्याला अनुकूल असे नियम करून कसे प्रचंड पैसे कमावतात हे उदाहरण देऊन लेखक एक नियम आपल्याला सांगतो की ज्याच्या हाती सत्ता असते तो ती टिकविण्यात त्याला सोयीस्कर व फायद्याचे काय आहे असेच नियम करतो. आपल्याला ते किती जाचक आहेत हे कळून घेण्याचे त्याचे काम नसते. इथे कोणालाही आपल्याकडच्या जनलोकपाल बिलाची पटकन्‌ आठवण यावी. सत्ताधार्‍यांवर वचक बसविणारा लोकपाल कोणाच सत्ताधार्‍याला नकोसा आहे. त्यामुळेच ते आता त्याबद्दल नाना कारणे निर्माण करून देत आहेत. तसेच अण्णा हजारेंच्या आंदोलनाने लोकसभेच्या खासदारांवरच गदा येत असल्याने ते ह्या लोकपालाविरुद्ध एक होत आहेत. कोणताही सत्ताधीश हा एकटा सत्ता हाकू शकत नसतो. त्याला सहाय्याला लागतात विश्वासू माणसे. सत्तेच्या ह्या खेळात महत्वाचे असतात (नावाचे) निवडून देणारे, खरे निवडून देणारे, व चौकडीत सामील होणारे विश्वासू सहकारी. भारतातल्या वाचकांना तात्काळ समजेल की जरी आम जनता ही निवडून देणारी असली तरी खरी निवडून देणारी जनता ही वेगळीच व मोजकीच असते. जसे काही ठिकाणी दलितांचा जोर असतो, काही ठिकाणी मुसलमानांचा जोर असतो तर काही ठिकाणी मराठा समाजाचा. तमाम जनतेचे समर्थन घेण्यापेक्षा ह्या मोजक्याच एकगठठा मतदारांचे म्हणूनच सत्ताकांक्षींना लांगूलचालन करावे लागते व नंतरही सत्ता टिकवण्यासाठी ह्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले की ते सोयीस्कर ठरते. तसेच सत्तेत राहण्यासाठी तमाम लोकांच्या फायद्याचे बघायचे तर ते एक मोठे जिकिरीचे काम असते. त्याऐवजी जे मोजके आमदार, खासदार आहेत त्यांना हाताशी ठेवले की सत्ता हवी तशी वापरता येते. ह्यामुळेच तर भाववाढ होत असताना, लोकांच्या फायद्याचा विचार करण्या ऐवजी सत्ता नेहमी कर कसे लादता येतील त्याचाच विचार करते कारण सरकारगाडा चालायला पैसा हवाच असतो व त्यातूनच आपले पैसे वेगळे काढून ठेवायचे असतात. बरोबरच्या आमदार, खासदारांसाठी थोडी शिते जरा फेकली की झाले. हे आपल्याला मोघम व शास्त्रीय वाटेनासे वाटू नये म्हणून लेखक मग प्रत्यक्ष घडलेली लायबेरीया सारखी उदाहरणे देतो. हुकुमशाही किंवा लोकशाहीत करांचे महत्व कसे व किती असते त्यावर लेखक विदारक प्रकाश टाकतो. सरकार चालवण्यासाठी पैसा हा लागतोच व त्याच उत्पन्नासाठी कर लादणे आवश्यकच असते. खरे तर सत्ता टिकण्यासाठी कर कमी केले तर जनता सुखी व्हावी पण मग ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला पैसे कमी पडणार. त्यासाठी सत्ताधीशांचा नियम असा की कर बिनधास्त लादायला हवेत व त्यातून आपला मलिदा मिळायला हवा. इथे लेखक पाकीस्तानच्या झरदारींचा दाखला देताना म्हणतो की तिथली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली असली तरी झरदारींची वैयक्तिक मालमत्ता ४ बिलियन डॉलरची झाली आहे. आत्ता आपल्या ध्यानात येईल की महागाई वाढत असताना आपला कॉंग्रेस पक्ष पेट्रोलचे भाव सारखे का वाढवत असतात. कारण त्यातूनच सरकारी तिजोरी भरत असते. आता तिजोरीतून पैसे कसे व केव्हा काढायचे त्यात तर हातखंडा हवाच. ज्यांना सत्ता टिकवून ठेवायची आहे त्यांना आपले स्वास्थ्य कसे अबाधित ठेवायला लागते त्याची अनेक उदाहरणे लेखक देतो. त्यात कित्येक उदाहरणात सत्ता हडप करणार्‍याला सध्याच्या सत्ताधीशाच्या तब्येतीची माहीती असणे कसे फायद्याचे होते ह्याची मोठी मजेशीर उदाहरणे दिली आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या ध्यानात येईल की नुकत्याच झालेल्या कॅंन्सरच्या आजाराची सोनिया गांधींनी किती बेमालूमपणे गुप्तता बाळगली होती. कारण त्या आजारी आहेत असे कळते, तर बंडखोरांना आयतेच फावले असते. इथे हिंदुस्थान टाईम्सचे एक संपादक विनोद शर्मा ह्यांचे नुकतेच झालेल्या दूरदर्शनच्या चर्चेची आठवण येते. ते सांगत होते की त्यांनी मनमोहनसिंगांच्या तिसर्‍या बायपास ऑपरेशनची सविस्तर हकीकत पेपरात दिली खरी, पण त्याबद्दल त्यांना भयंकर तंबी देण्यात आली होती. ह्याच पार्श्वभूमीवर सोनियांजींच्या आजारपणाबद्दल अजूनही कोणी ब्र का काढत नाही ते लगेच समजते. ज्या देशांत नैसर्गिक संपत्ति भरपूर आहे त्यांची जीडीपी वाढ कशी बेताची होते व ज्यांच्याकडे काही नसते त्यांची वाढ कशी ज्यास्त होते हे विरोधाभासात्मक उदाहरण लेखक एका प्रकरणात छान रंगवून सांगतो. तसेच भ्रष्टाचार हा सत्ता टिकवून ठेवायला कसा उपयोगी पडतो, हे वाचल्यावर तर कौटिल्यीय अर्थशास्त्राची महती पटून आपल्याला सगळे कसे लख्ख दिसायला लागते. ह्या असल्या वैचारिक आतंकवादाने सध्याचे हुकुमशहा हे कसे यशस्वी होत आहेत व त्यातले किती रण सोडून पळताहेत हे लेखकाने अप्रतीम विवेचन करून दाखवले आहे. हे सगळे आतल्या गाठीचे राजकारण असे उघड झाल्यावर आपण कसे जागरूक रहायला हवे व सत्तालोलुपांची खरी चाल आपण कशी ओळखली पाहिजे असे कळीचे आवाहन लेखक करतो ते खूप भावणारे आहे. लबाडांची लाज काढणारे हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे व ते लिहिलेले आहे अतिशय मनोरंजक शैलीत. --------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-------------------------------------------------------

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

वाचाल तर वाचाल---९

-------------------
"स्टीव्ह जॉब्स" ले: वाल्टेर आयझॅक्सन
सिमोन ऍंड शुस्टर प्रकाशन, पाने ६००, किंमत र ७९९ ( फ्लिपकार्ट: र ५६०)
-------------------------------
आयझॅक्सनचा स्टीव्हला ई-मान
------------------------------------------
वाल्टेर आयझॅक्सन ही फार थोर असामी आहे. ते सीएनएन चे सर्वेसर्वा होते. तसेच सध्या एस्पेन संस्थेचे मुख्य आहेत. ( ही संस्था जगातल्या विद्वानांची शोध-संस्था आहे ). ह्यांनी आत्तापावेतो आइनस्टाइन, बेंजामिन फ्रॅंकलिन व हेन्‌री किसिंजर ह्यांची चरित्रे लिहिली आहेत. आयझॅक्सन ह्यांनी स्टीव्ह जॉब्सचे चरित्र लिहावे ह्यातच स्टीव्हचा मोठेपणा सिद्ध व्हावा इतका ह्या लेखकाचा दबदबा आहे. लेखक कबूलच करतो की चरित्र लिहिण्याचा लकडा स्टीव्ह जॉब्सनेच त्याच्यामागे लावला होता. पण त्याचबरोबर लेखक हेही सांगतो की त्याने एका अक्षरानेही पुस्तकात बदल केला नाही की काही दबाव आणला नाही. ( फक्त मरताना पुस्तकावरचे चित्र जरा त्याच्या इच्छेप्रमाणे बदलले तेव्हढेच.). ह्या लेखकाचा असा बोलबाला आहे की हे प्रत्यक्ष प्रमाण पाहूनच लिहितात. त्यामुळे स्टीव्ह जॉब्सच्या नाना आख्यायिकांना ह्या पुस्तकात फाटा मिळतो व जे पुराव्यावरून, मुलाखतीतून सिद्ध झाले तेच ह्यात उतरले आहे.
स्टीव्ह जॉब्स हा नाना विसंगतींचा मेळ असलेला गृहस्थ होता. ह्याचे सर्वच अगदी टोकाचे असे. यश मिळाले तेही इतक्या टोकाचे की अजून कित्येक दशके त्याचे नाव संगणक क्षेत्रात मानानेच घेतल्या जाईल. त्याच्या ऍपल कंपनीत सध्या जी रोख शिल्लक आहे ती सबंध अमेरिका देशाची सध्याची तूट भरून काढील इतकी प्रचंड आहे. स्वत:च्या कंपनीतून ज्याला कंपनीने काढून टाकले त्यानेच दहा वर्षानंतर ह्या कंपनीला यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन बसविले. ज्याने एवढे प्रचंड यश कमावले तो वृत्तीने इतका अपरिग्रह करणारा होता की त्याने आपले स्वत:चे घर कैक वर्षे बिना-फर्निचर ठेवले होते व कंपनीचा मुख्याधिकारी म्हणून तो केवळ एक डॉलर वार्षिक पगार घेई. भारतात येऊन त्याने बौद्ध धर्माचा प्रभाव स्वीकारला होता व त्याचविरुद्ध तो राजरोसपणे ड्रग्जही घेत असे. फुकट मिळते म्हणून मंदिरातून त्याने जेवणही घेतलेले आहे. व्यक्तिगत जीवन तर त्याचे इतके नाट्यमय घटनांनी भरलेले होते की त्यावर सहजी कित्येक कादंबर्‍या लिहाव्यात. वयाच्या २७ व्या वर्षी त्याला आपण दत्तक घेतल्या गेलेलो आहेत ते कळते व मग तो खर्‍या आई-वडिलांचा शोध घेतो व तितक्याच निष्ठेने दत्तक आईवडिलांचे ऋण मानतो.त्याच्या मैत्रिणीही पाचसहा असतात. त्यापैकी एकीकडून त्याला वयाच्या २३ व्या वर्षी एक मुलगी होते, पण तिला तो नाकारतो. कारण त्याच्या मैत्रिणीचे इतरांशीही संबंध असतात. जेव्हा कौंटी तिच्यातर्फे त्याच्यावर खटला भरते तेव्हा तो तिची सोय करतो व केवळ नवीन वैज्ञानिक चाचणी आली आहे म्हणून डिएनए टेस्ट करून घेतो.( इथे अमेरिकेतल्या कौंटींचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे). पितृत्व सिद्ध झाल्यावर मुलीचा तो स्वीकार करतो, एवढेच नाही तर पुढे चालून नवा संगणक करतो त्याचे नावही मुलीचे ( लिसा ) ठेवतो. तिची काळजी घेतो. स्वत: अतिशय प्रामाणिकपणे निरंहकारी, विनयशील जीवनशैली स्वीकारत व्हेजिटेरियन राहतो, उपास तापास करतो त्याच भरात प्रचंड पैसेही कमावतो. स्वत: शिक्षण अर्धवट सोडूनही स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्यांना भाषण देताना एका मुलीच्या प्रेमात पडतो व तिच्याशी लग्नही करतो. एखाद्या रोमॅंटिक सिनेमात शोभावे असे हे जीवन. एरव्ही मृदू असणारा हा स्टीव्ह जॉब्स एखाद्या विषयासंबंधी टीका करताना अजिबात दयामाया न ठेवता वाभाडे काढीत असे व कठोर टीका करताना शिव्याही घालीत असे.
बुद्धीच्या हुशारपणाचे मोजमाप करणे हे भारीच जोखमीचे काम असते. ते करताना पारंपारिक रीत म्हणून आपण शैक्षणिक हुशारीलाच महत्व देतो पण संगणक क्षेत्रात जेव्हढे पुस्तकी पढीक आहेत त्यापेक्षा ज्यास्त शिक्षण सोडलेले लोक दिसून येतात. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्‌, फेसबुकचे झुकरबर्ग, ओरॅकलचे लॅरी एलिसन व ऍपलचे स्टीव्ह जॉब्स ह्यांच्यात हुशार कोण हे ठरवणे फारच अवघड आहे. बरे यशस्वी कोण झाले ह्यावरून हुशारी ठरवावी तर सगळेच प्रचंड यशस्वी झालेले आहेत. नवनवीन उत्पादनांचे पेटंटस्‌ ज्याच्या नावावर अधिक त्यावरून हुशारी जोखायची तर ह्याबाबतही सगळे तुल्यबळच म्हणावे लागतील. पण स्वत:ला कॅन्सर झालेला असताना, व हा विषय वैद्यकीय ज्ञानाचा, नवखा, असताना स्टीव्ह जॉब्स त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांची जी मीटींग घेऊन उपचाराचे दिशादिग्दर्शन करतो व त्याचे समर्थन देतो ते त्याच्या बुद्धिमत्तेच्या लांब पल्ल्याची चुणूक दाखविणारे आहे. त्यात कॅंसरवर तो मात करू शकत नाही व त्यातच त्याचा दु:खद शेवट होतो ही एक मोठीच शोकांतिका ठरते.
सृजनाच्या क्षेत्रात हटके विचार करण्याचे इतके अप्रूप आहे की सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करणे ( आउट ऑफ द बॉक्स ) हे अपार मोलाचे ठरते. आजकाल व्यवस्थापन शास्त्रातही ह्याला महत्व आले आहे. त्यामुळेच स्टीव्ह जॉब्सचे कंपनीतले वागणे, सतत नवनवीन उत्पादने शोधून काढणे, ती फटाफट नेमून दिलेल्या वेळेत बाजारात आणणे आणि बाजाराने त्यांना उस्फूर्त प्रतिसाद देणे ह्या योगायोगामागे केवळ काही दैवी असण्यापेक्षा त्याच्या यशाचे काही गमक असणारी रीत असावी असे वाटणे साहजिक आहे. एकेकाळी संगणक क्षेत्रात सगळे नेमून दिलेल्या रीतीने करण्याची, कॅटलॉगप्रमाणे उत्पादने वापरण्याची परंपराच निर्माण झालेली होती. पण स्टीव्ह जॉब्सने ह्याविरुद्ध गोष्टी इतक्या सोप्या व सहज करण्याचा हातखंडा बांधला की ह्याची आयपॉड, आयफोन व आयपॅड ही उत्पादने विना-कॅटलॉग कोणीही वापरू शकतो. केवळ जादू सारखे हे कसब ऍपल कंपनीची ही उत्पादने आपल्याला दाखवतात तेव्हा थक्क व्हायला होते. माझा आठ वर्षांचा अमेरिकेतला नातू पहिल्यांदाच आयपॅड हातात घेऊन जेव्हा मला सांगू लागतो की आजोबा, हे बघा इथे जर एखादा शब्द आपल्याला अवघड असला तर त्यावर फक्त बोट ठेवा व लगेच ते डिक्शनरीमधला त्याचा अर्थ आपल्याला सांगते, तेव्हा स्टीव्ह जॉब्सच्या अपार कल्पकतेची चुणूक दिसून येऊन दिपायला होते. आणि हे सार्‍या जगाला दिपवणे, ऍपलची ही उत्पादने अजून कैक वर्षे करीत राहणार आहेत. सृजनाच्या ह्या यशाला दाद द्यावी तितकी कमीच आहे. व ह्या यशामुळे त्याच्या अमानुष वागण्याच्या तर्‍हांना माफीच द्यावी लागते.
एखाद्या कल्पनेला ती चुकीची आहे असे ठामपणे म्हणणे हे कोणाला सृजनतेच्या दृष्टीने अमानुषतेचे वाटू शकते व ह्या निकषावर स्टीव्ह जॉब्सचे कंपनीतले वागणे खूप जणांना न पटणारे व अतिउद्धटपणाचे वाटणे साहजिक आहे. पण हे केवळ कल्पनेच्या स्तरावर तो करीत असे, वैयक्तिक स्तरावर तो अपार सहानुभूतीचाच रक्षक राहत आलेला आहे असे दाखविणारा एक किस्सा अपार महत्वाचा आहे. त्याच्या टीकेने घायाळ झालेल्या संशोधकांनी त्यांच्यातले सर्वोत्तम जसे दिले तसेच त्यामुळे त्यांना अगणित वेदना होत असत हे तर एव्हाना सर्वपरिचितच झालेले आहे. त्याचा एक संशोधक सहकारी तर शेवटी वेडा होतो. रस्त्याने नागडा हिंडू लागतो. तो स्टीव्ह जॉब्सच्या घरी येऊन दगडे मारू लागतो. एकदा तो बरेच दिवस परागंदा होतो. बर्‍याच दिवसांनी सहकार्‍यांना खबर लागते की तो पोलीस-स्टेशनात बंदिस्त आहे. मग स्टीव्ह जॉब्सवर त्याचे सहकारी त्याला सोडवण्याचे दडपण आणतात. मग स्टीव्ह जॉब्स ओळखी वापरत त्याला सोडवितो. ह्यावर तो त्यांना म्हणतो की कदाचित पुढे मागे मी जर असाच वेडा झालो तर तुम्ही मलाही अशीच मदत कराल ना ? सह-संवेदनांचे माणूसपण इथे स्टीव्ह जॉब्सच्या ह्या कृतीत व उक्तीत जे दिसते ते त्याच्या उद्धटपणाइतकेच मोहकही वाटू लागते.
धुमच्छक्रीचे जीवन जगत असताना स्टीव्ह जॉब्स एखाद्या तत्ववेत्त्यालाही लाजवेल अशा तत्वज्ञानाचे आपल्याला दर्शन देतो, हे ह्या पुस्तकात आयझॅकसनसारखा लेखक अपार कौशल्याने रेखतो. संगणकीय उत्पादनात स्टीव्ह जॉब्सला ऑन-ऑफ स्विचेस आवडत नसत, हे सांगताना त्यामागचे तत्वज्ञान लेखक आपल्याला समजून सांगतो. त्याअगोदर हे ऑन-ऑफ स्विच प्रकरण थोडे उदाहरणाने समजून घेण्यासारखे आहे. जसे गाडीचा दरवाजा उघडला की आतले लाईट लागतात व दरवाजा बंद केला की ते मिटतात, हे साधे उदाहरण घ्या. आतल्या लाईटला ऑन-ऑफ करणारे स्विच असतेच पण ते न वापरता आपण ही सोय अवलंबितो व ते किती सोयीचे होते, ते आता आठवा. स्टीव्ह जॉब्सच्या विचारांनुसार प्रत्येक माणूस जीवनात जे प्रयत्नांती कमावतो, त्याचे हे संचित, ते त्याच्या स्विच-ऑफ होण्याने, मृत्यूने, नुसतेच मिटले जाणे हे न्यायाचे नाही. इथे आपल्याला वाटते स्टीव्ह जॉब्स त्याच्या बौद्ध जाणीवांनी पुन:र्जन्माबद्दल तर बोलत नाही ना ? तर तो एखाद्या व्यवस्थापनशास्त्राच्या थाटात सांगतो की कंपनीच्या कर्त्याधर्त्याच्या मृत्यूनंतर, नवनवीन कल्पक उत्पादने येतच राहिली पाहिजेत अशी, ऑन-ऑफ स्विच विनाची व्यवस्था असली पाहिजे. मग तो ऍपल कंपनी एकापाठोपाठ नवनवीन कल्पक उत्पादने कशी करू शकतात, त्यामागच्या व्यवस्थेची आपल्याला उकल करून देतो. ह्यात कल्पक विचारांना सहानुभूती हवी, हे गृहितक तर आहेच पण त्याचबरोबर चुकीच्या कल्पनेवर, रोखठोकपणे कठोर प्रहार हवा हे तत्वही तो सांगतो. असल्या व्यवस्थेचे आदर्श असलेली डिस्ने ही कंपनी जे सिनेमा क्षेत्रात करू शकली नाही ते स्टीव्ह जॉब्स पिक्सार ह्या त्याच्या कंपनीमार्फत टॉय-स्टोरी, फाईंडिंग नेमो, ए बग्ज लाईफ, टॉय-स्टोरी-२, असे एकापेक्षा एक व्यावसायिक यशाचे व मनोरंजनात अत्युच्च कोटीचे असलेले सिनेमे तयार करतो. असेच त्याच्या मृत्यूनंतर नुकतेच बाजारात आलेले आयफोन ४-एस हे उत्पादन ह्याच निकषावर दाखवून देते की कल्पकतेला मरण नसलेलीच ही ऍपल कंपनी आहे.
जनरीतीप्रमाणे ह्या पुस्तकाच्या उलटही अनेक मते आली आहेत. पण ती स्टीव्ह जॉब्सच्या विचित्र वागण्याने दुखावलेल्यांची असण्याची शक्यता ज्यास्त आहे. किंवा त्याचे तत्वज्ञान मंजूर नसलेल्यांची . एका कसलेल्या लेखकाला स्टीव्ह जॉब्सचे जीवन इतके समृद्ध भासावे व त्यातले रोमांचक क्षण व त्यामागचे दुवे नीट आपल्यासाठी उलगडून दाखवावेत, त्याच्या विचित्रतेच्या मागची तत्वे सांगावीत, हे क्वचितच आढळणारे निरपेक्ष निवेदन मोठे मनोहारी आहे, हे तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावरच कळेल. अवश्य वाचा व एका अवलियाला ई-मान द्या !.

-----------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

---------------------------------------------------------------------------------------------

सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

---------------------------------------------------------------------
वाचाल तर वाचाल---८

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"द नाईव्ह ऍंड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट"
लेखक: ओरहान पामुक ( नोबेल पारितोषिक, २००६)
पेनग्विन बुक्स, २००९,( भारतात २०११), पृ.२००, किं: १५ डॉलर,
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाबडा व बेरका कादंबरीकार ( ले: ओरहान पामुक, नोबेल विजेता,२००६)
आज इतकी वर्षे झाली दरवर्षी नोबेल पारितोषिके दिली जात आहेत, पण त्यांचा वकूब, मान, चांगलाच राखलेला आहे. त्यात वरील शीर्षकाचे पुस्तक असेच एका टर्किश लेखकाचे असून ते त्याने आपल्या आवडत्या कसबावर, कादंबरी लेखनावर, लिहिलेले आहे. नोबेल मिळाल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठाने नॉर्टन लेक्चर्ससाठी २००९ साली पामुक ह्यांना बोलावले होते. तीच ही भाषणे पुस्तकबद्ध केली आहेत.
द व्हाइट कॅसल; द ब्लॅक बुक; द न्यू लाइफ; माय नेम इज रेड; स्नो; इस्तंबूल:मेमरीज ऍंड द सिटी; आणि द म्युझियम ऑफ इनोसन्स ही ह्या लेखकाची पुस्तके प्रसिद्ध झालेली असून ह्या लेखकाला उदंड यश लाभलेले आहे. ( ७० लाख प्रती, ५० भाषात भाषांतरे, सिनेमे वगैरे). अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात लेखक तौलनिक वाङमयाचे प्राध्यापक असून वरील पुस्तक ज्या मॅन बुकर विजेत्या किरण देसाई ह्यांना अर्पिले आहे, त्यांजबरोबर ( २०१० पासून) शरीर-संबंध ठेवून आहेत. लेखकाने आजवर भरपूर विवाद भोगलेले आहेत. त्याच्यावर वाङमय-चौर्याचा आरोप झालेला आहे, आर्मेनियन व कर्डस्‌ लोकांची पूर्वी ओटोमन साम्राज्यात कशी कत्तल झालेली होती ह्या पामुक ह्यांच्या विधानावरून खटले दाखल झाले होते, आणि टर्कीच्या युरोपियन युनियन मध्ये प्रवेश देण्याच्या काळातच पामुक ह्यांना नोबेल मिळालेले होते. ह्या विवादांच्या झाकोळांतून अंमळ दूर सरूनच आपल्याला कादंबरीवरच्या एका कादंबरीकाराच्या मतांना सामोरे जाणे भाग पडते.
पामुक ह्यांचे एक लाडके तत्व आहे की दोन प्रकारचे कादंबरीकार असतात. एक उस्फूर्तपणे झपाटून भावनेच्या भरात लिहिणारा व दुसरा जीवनाचे तत्व जणू सापडल्याप्रमाणे त्या तत्वांबरहुकूम लिहिणारा ( बेरका). स्वत: पामुक एक प्राध्यापक, क्रिटिकल थियरी शिकलेले व शिकवणारे. तशात विषय एका प्रमुख साहित्यप्रकाराचा. नोबेलच्या मरातबाने अभ्यासपूर्ण असण्याची जबाबदारी पेलणारी ही भाषणे. त्यामुळे पुस्तकाकडून अपेक्षा भरमसाठ असतात. त्यामुळे सबंध भाषणभर लेखक जाणत्या व्यक्तिमत्वांच्या समर्थनाआडून आपली मते मांडतो आहे. जसे त्यात शिलरची मते आहेत तशीच टॉलस्टॉय, फ्लॉबर्ट, फॉर्स्टर, बोर्जेस, इलियट,फॉकनर, फूको, हाबरमास, डोस्टोव्हस्की, नॅबोकोव्ह, प्राउस्ट, लुकास, वगैरे दांडग्या मातब्बरांची तत्वेही समर्थनार्थ घेललेली आहेत. आपण कादंबरी वाचत असताना त्यातल्या मनोहारी देखाव्यांची जरूर दखल घेतो पण त्यापलीकडे कादंबरीचे काही केंद्र आहे का ह्याचा शोध घेत असतो असे लेखकाचे म्हणणे आहे. वाचकवादाचा पुरस्कार करीत लेखक म्हणतो की शब्दांना मूर्त चित्रे आपण वाचकच करीत असतो व ह्या कादंबरीच्या केंद्राकडे आपणच कादंबरीला नेत असतो. कादंबरीतल्या घडामोडी वास्तवाच्या निकषावर आपणच तर्काने पडताळून पहात असतो. तर्क कुतर्काच्या निबिड वास्तवात आपणच एका आशावादाने कादंबरीत मार्ग काढीत असतो. कादंबरीतली पात्रे जी वागतात त्यासंबंधी वा एकूणच नैतिकतेविषयी कादंबरीत नैतिक निवाडे जरूर असावेत पण ते एखाद्या देखाव्यासारखे कादंबरीतच असावेत. त्यांनी वाचक प्रभावित होऊन त्याने ते नैतिक निवाडे पात्रांना लागू करू नयेत असे पामुक ह्यांचे म्हणणे आहे. इथे अशाच एका प्राध्यापकाने व लिटररी थियरीवर बेतून कादंबरी लिहिणार्‍या नेमाडेंची हमखास आठवण होते. ते त्यांच्या "हिंदू" या कादंबरीत ज्ञानेश्वर, रामदास, बुद्ध, गांधी वगैरे मान्यवरांवर त्यांच्या पात्रांकरवी, निरनिराळ्या मतलबापोटी, यथेच्छ नैतिक फतवे काढतात व त्यात वाचकालाही आवाहन करतात. इथे पामुक ह्यांचा सल्ला बराच रास्त वाटतो तो असा की पात्रांनी त्यांचे नैतिक फतवे जरूर ठोकावेत पण लेखकाने त्यांचे समर्थन करीत वाचकांनाही त्यात गुंतवण्याचे प्रयोजन नव्हते. त्यामुळे कादंबरी हिणकसाकडे झुकते. कादंबरीच्या संहितेत उत्तम साहित्यिक गुण असतील तर त्यामुळे वाचकाला काही अप्रतीम सापडल्याचे भान येते व त्यामुळे तो कादंबरीतल्या इतर अनाकलनीय वा फसलेल्या भागांकडे दुर्लक्ष्य करू शकतो. हे पामुक ह्यांचे निरिक्षणही हिंदूत छान लागू होते कारण नेमाडेंचे त्यात काही हातखंडा असलेले साहित्यप्रकार असल्याने वाचकांना ते सुखावतात हे आपण पाहतोच.
पामुक ह्यांनी असाही एक सल्ला दिलेला आहे की कादंबरीच्या कथात्मकतेत इतके माफकच घटक असावेत की त्यामुळे वाचकाला पात्रांची सरमिसळ, त्यांची नाती वगैरेंची अडचण येऊ नये. तसेच ह्या कथात्मकतेमुळेच कादंबरीची व्याप्ती ठरते. उत्तर आधुनिकतावादाशी हे मत बरेच अनुकूल असून नेमाडेंच्या हिंदूत आपल्याला हे पडताळता येते. प्रचंड व्याप्ती असलेल्या ह्या कादंबरीत कथानक कसे व का जुजबी आहे, त्याचा आपल्याला आता उलगडा होईल. पामुक ह्यांच्या मते ही कथात्मकता बेताचीच/नेमकीच ठेवल्याने कादंबरीचे केंद्र वाचकाला चाचपडता येते.
पामुक ह्यांच्या मते जीवनाचा अर्थ शोधणे वाचकाला कादंबरीच्या केंद्राकडे घेऊन जाते. हे पामुक ह्यांच्या मते वाचकाने आपल्या विवेकाने करावे व त्यावर तत्वज्ञानाचा वा धर्माचा धाक पडला न पाहिजे व एकप्रकारे लोकशाहीच्या नीतीने हे व्हायला हवे. आता हा निकष आपण जर नेमाडेंच्या हिंदूला लावून पाहिला तर दिसते की त्यांच्या कादंबरीचे केंद्र त्यांच्या देशीवादाभोवती व वर्णव्यवस्थेच्या सततच्या जाणीवेभोवतीच घोटाळत राहते.ई.एम.फॉर्स्टर ह्यांचे एक वचन लेखक वाखाणतो ते असे: कादंबरीने आपल्या जीवनाविषयीच्या कल्पना व जाणीवा ह्या प्रत्यक्षात असल्याप्रमाणेच जाणवून द्याव्यात व वाचकालाही त्या तशाच जाणवाव्यात. ह्या पार्श्वभूमीवर सध्याच्या जीवनात वर्णव्यवस्थेचे भूत आपल्याला निवळलेले दिसत असले तरी त्याचेच स्तोम नेमाडे माजवीत आहेत हे त्यांच्या कादंबरीत सहजी दिसते व ह्या निकषावर ती कादंबरी वाखाणणे अवघड होऊन बसते.
स्वत: एक यशस्वी पटकथा-लेखक असल्याने पामुक ह्यांनी शब्दांनी कसे प्रतिमांचे साक्षात चित्र उभे करावे ह्या कसबाचे जे कौतुक मांडले आहे ते कोणाही होतकरू कादंबरी लेखकाला मोलाचे ठरावे. ह्या उहापोहात लेखक भाषाशास्त्राच्या अनुषंगाने जी कोलेरिज, टॉलस्टॉय ह्यांची साक्ष काढतो ते व्यासंगपूर्ण आहे. तो स्वत:चे अनुभवही कथन करतो ज्यात तो रेडीओवरून फुटबॉलच्या खेळाची कॉमेंट्री ऐकण्याचे उदाहरण देतो. असेच मला आठवते ते आम्ही लहानपणी इंग्रजी फारसे येत नसताना तल्यारखान, विझी व विजय मर्चंट ह्यांचे इंग्रजीतले रेडीओवरचे धावते वर्णन ऐकून प्रत्यक्ष खेळ पहात असल्याचे जाणवत असू. शब्दांनी चित्रे रेखाटण्याचे हे कसब मात्र दाद देण्यासारखे असून कादंबरीकाराच्या पदरी हे असायलाच हवे.
पामुक ह्यांची द इनोसन्स ऑफ म्युझियम नावाची कादंबरी एका खरोखरच्या वस्तुसंग्रहावर आधारलेली असून पामुक ह्यांचे म्हणणे माणसांच्या सहवासातल्या वस्तूही बरेच काही महत्वाचे सांगून जातात. ह्या लेखकाने पुराणकाळातल्या वस्तूंचे संग्रहालय केले व त्याचीच कादंबरी केली हे कल्पकतेचे चांगलेच परिमाण म्हणायला हवे. आणि ह्या उलट जमा झालेल्या वस्तूंना नेमाडे ह्यांनी हिंदू त त्यांना समृद्ध अडगळ म्हणून कमी लेखावे हे त्यांच्या कल्पकतेचे दुर्भिक्षच म्हणावे लागेल.
पामुक हे स्वत: तौलनिक वाङमयाचे प्राध्यापक असल्याने त्यांनी वरील विवेचन हे वाचकवादाच्या समीक्षेच्या सिद्धान्ताने केले आहे हे सहजीच ध्यानात येते. पण वाचकवादाची जी मूलभूत तत्वे आहेत त्यातली महत्वाची तत्वे इथे लेखकाने सपशेल दुर्लक्षली आहेत अस जाणवते. जसे: आयझर ह्यांचा अध्याहृत वाचकाचा सिद्धान्त इथे विचारातच घेतलेला नाही.तसेच थॉमस कुन्ह ह्यांच्या पॅरेडाईम-शिफ्टच्या महत्वाच्या प्रतिपादनाकडेही लेखक कानाडोळा करतो. उत्तर आधुनिकतावादात सांस्कृतिक कथनांचा र्‍हास, व रूपहीनतेचा गौरव करतात व इथे तर बाळबोध जीवनाचा अर्थ वगैरे लेखक बघण्याचे सांगतो आहे, हे व्यासंगाचा उथळपणाच दाखविते व आधीच वादग्रस्त असलेल्या पण नोबेल पारितोषिक मिळालेल्या ह्या लेखकाचे वरील प्रतिपादन किती प्रामाण्याने घ्यावे ह्याचा वाचकाला संभ्रम पडतो. बरे ज्या होमी भाभा ह्यांनी त्यांना ह्या भाषणांना आमंत्रित केले होते, ते गृहस्थही असेच वादग्रस्त ठरलेले आहेत व आता हार्वर्ड विद्यापीठात नाहीतही.( त्यांना न कळणार्‍या संज्ञा वापरून "वाईट लिखाणाचे" पारितोषिकही देण्यात आलेले आहे. ) . अर्थात केवळ त्यांनी आमंत्रण दिलेले आहे म्हणून आपण पामुक ह्यांना कमीपणा देऊ शकत नाही, हे खरे असले तरी भाषणात जे सर्वत्र सुलभीकरण प्रकर्षाने जाणवते त्याने संभ्रम अधिकच वाढतो.

--------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

------------------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, ३१ मे, २०११

------------------------------------------------------------------------------------
वाचाल तर वाचाल----७

एंपरर ऑफ ऑल मॅलडीज
लेखक: सिद्धार्थ मुखर्जी
स्क्रिबनर प्रकाशन, (नोव्हेंबर २०१०),
पृ.५५०, किंमत: र ४९९/२९९(फ्लिपकार्ट)

सर्व रोगांचा बादशहा : कर्क-रोग
ह्याच महिन्यात ह्या पुस्तकाला कोलंबिया विद्यापीठाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. शिवाय एका भारतीय डॉक्टराने लिहिलेले, अशा दुहेरी आकर्षणामुळे, हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे झाले आहे.
कर्क-रोग आताशा कमी भयकारी वाटत असला तरी त्याच्या नुसत्या कल्पनेने अजूनही आपला थरकांप होतोच. आपण आजूबाजूला प्रत्यही अनेक माणसे ह्याने बाधित होऊन लढताना पाहतो. त्यांचे वेडेवाकडे झालेले चेहरे, डोक्याला बांधलेले फडके, त्यांचे वारंवारचे केमोथेरपी प्रकरण, रेडियेशन थेरपीचे छळ, होणार्‍या भयंकर वेदना, उलटया, व एकंदरीतच त्रस्त करण्याने, हा रोग आपल्याला तर नाहीच पण जगातल्या कोणालाच होऊ नये, असे पसायदान मागवणारा हा रोग, सर्व रोगांचा बादशहा कसा आहे ह्या कल्पनेने लिहिलेले हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकात कर्करोगाचे जणु चरित्रच रेखाटलेले आहे. आणि ही माहीती अगदी तांत्रिक असली तरी, थोडयाशा चिकाटीने, सामान्यांना समजेल अशा इंग्रजीत वाचताना एखादे ललित वाङमयच वाचतो आहोत असा भास होतो.
गेली शंभर वर्षे अत्यंत हुशार डॉक्टरांना व शास्त्रज्ञानांना चकमा देणारा हा रोग आहे. आज जरी बहुतेक सर्व कर्करोगांवर औषधोपचार उपलब्द असले तरी हा समूळ नष्ट करणे किंवा होऊच नये अशी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अजूनही दुरापास्तच. त्यामुळे अशा हटटी रोगावरचे एक पुस्तक वाचून सगळे ज्ञान होईल हे जरी संभवनीय नसले तरी असे प्रयत्न आजतागायत कसे झाले व त्याला कसे यशापयश येत गेले, आणि हा रोग कसा चोर पावलांनी शरीर काबीज करतो हे खुद्द एका डॉक्टराने, अतिशय सजग भावनेने लिहिलेले आहे. ह्यात रोग्यांच्या कळवळ्यापेक्षा ह्या रोगाचे वागणे, पसरणे, त्यावरचे उपाय, वगैरे तांत्रिक बाबी एक प्रकारच्या उत्तरदायीत्वाच्या भावनेने लेखकाने ठळक केल्या आहेत. त्यात संशोधकाच्या माहीतीचे अवडंबर माजवण्यापेक्षा मूलभूत विचार कसा करावयाचा ह्याचे लेखक प्रत्यंतर आणतो.
ह्या रोगावर अथक परिश्रम करून मेहनतीने व हुशारीने औषधे शोधून काढणार्‍या डॉक्टरांच्या गाथा ( कधी यशाच्या तर कधी अपयशाच्या ) वाचताना जसे नोबेल प्राइज मिळवणार्‍या फार्बर ह्यांची माहीती वाचताना रोमांचित व्हायला होते, तसेच १९२० साली अमेरिकेत गेलेल्या श्री.येल्ला सुब्बाराव ह्या डॉक्टराने रक्तक्षयावरचे फॉलिक ऍसिडवाले औषध कसे शोधले हे वाचताना ( पृ.४१), आपल्याला भारतीय असण्याची धन्यता वाटते.
ह्या रोगाने माणसाला व डॉक्टरांना कसे चकवले हे वाचताना वाचकांचा धीरच सुटावा अशी पाळी येते व त्यावर लेखक फार मूलभूत असे जे हिपोक्रॅटसचे भाष्य आहे त्याची आपल्याला ओळख करून देतो. औषधोपचारावर हिपोक्रॅटस ( पृ. ३५२) म्हणतो, "आर्स लॉंगा, व्हिटा ब्रेव्हिस" ( औषधोपचाराची कला लंबीचौडी, वेळखाऊ आहे, व जीवन छोटे आहे; संधी सारखी निसटती असते; प्रयोग फसतात; व निर्णय चुकतात. ). तसेच ऑंकॉलॉजी ह्या नावाचा उलगडाही मोठा मनोज्ञ वाटतो. ऑंकस ह्या ग्रीक मूळ शब्दाचा अर्थ होतो, एक ओझे, बोजा, जे कर्करोग झालेल्याला कायमच वागवावे लागते. ह्या तांत्रिक मूलभूत माहीतीमुळे हा बोझा थोडा पेलवल्यासारखा तरी भासतो.
सिगरेट मुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो हे आता आपल्याला चांगलेच पटलेले आहे. पण अमेरिकेत ह्यावर तेव्हा कसे जंग छेडावे लागले व त्यावर कसे उपचार शोधले गेले, ह्याची मनोरंजक माहीती ( २८३-३१८) ह्या प्रकरणात वाचून थक्क व्हायला होते. हे वाचताना परळच्या टाटा कर्करोग इस्पितळात त्यांनी जे फलक लावले आहेत, (गुटखा सेवनाने घशाचा कर्करोग कसा होतो त्यासंबंधी), त्याचे स्मरण होते. गुटखा खाणे, तयार करणे ह्यावर अशीच चळवळ करून बंदी आणायला पाहिजे, हे तीव्रतेने जाणवते. सिगरेट उत्पादकांची बाजू जशी तत्कालीन सरकारे घेत, त्याच प्रमाणे सध्याचे आपले सरकार किती बेफिकीरीने गुटखा उत्पादकांची बाजू घेते आहे हे पाहिल्यावर माणसांच्या नशीबी ही दुर्दशा का येते ह्याचे वैषम्य वाटते.
गुंतागुंतीची माहीती अगदी सुगम करण्यात ह्या तरुण लेखकाला चांगलीच हातोटी लाभलेली दिसते. निरनिराळ्या विषारी रसायनांचे मिश्रण ( कॉकटेल) करून करायच्या केमोथेरपीचे विवेचन करताना, ओव्हर-डायग्नोसिस व अंडर-डायग्नोसिसचे संतुलन कसे सांभाळावे लागते हे विशद करताना लेखक ( पृ.३२९-३४८) कोळ्याच्या जाळ्याची उपमा देतो. कोळ्याने जाळे जर फारच बारीक ( दाट ) विणले तर माशीच काय लहान चिलटे, कचरा, धूळही जाळ्यात अडकेल व जाळे फारच दूरदूर ( विरळ ) विणले तर माशाही सटकून जातील. असेच योग्य प्रमाणात औषधांचा डोस डॉक्टरला प्रत्येक पेशंटच्या केसप्रमाणे योजावा लागतो. व म्हणूनच हे प्रकरण खूपच अवघड होते.
प्रतिबंधक उपाय योजना, लसी, कमी साईड-इफेक्टची औषधे, संशोधन, रोग्यांचा पाठपुरावा, अशा कितीतरी तरकीबी अजूनही कर्क-रोगाशी लढताना करायच्या बाकी आहेत हे कबूल, पण ह्या शत्रूशी लढताना आता हा कसा ओळखीचा वाटतो व त्याच्या सगळ्या लहरी, गनीमी लढाया, आता आपल्याला अवगत झालेल्या आहेत असेच हे पुस्तक वाचल्यानंतर वाटायला लागते व ही मोठीच उपलब्धी आहे हे नि:संशय !

------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव *( सोबत चित्र मुखपृष्ठाचे )
arunbhalerao67@gmail.com

१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडिया नगर, घाटकोपर ( पूर्व), मुंबई : ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, ११ मे, २०११

वाचाल तर वाचाल----८
"परत मायभूमीकडे"
लेखक: डॉ.संग्राम पाटील
समकालीन प्रकाशन (मार्च,२०११), पृ.१०७, किं:१२५र
एक वेगळा प्रवास
आजकाल वेगळेपण दिसणं हे फार कष्टाचं झालं आहे. जिकडे पाहावे तिकडे "जनांचे प्रवाहो" घोळक्याने व एकाच दिशेने घोंघावत चाललेले दिसतात. त्यात कोणाचे वेगळेपण टिपणे, थोडे थांबून त्यांचे कौतुक करणे हे फार अगत्याचे असते, हेही आपण ह्या धुमश्चक्रीत विसरतो. इंजिनियर, डॉक्टर मंडळींनी परदेशी जाणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्यात त्यांचे परत येणेही ( प्रमाणाने कमी असले तरी ) निरनिराळ्या कारणाने नजरेत भरते. बर्‍याच जणांच्या परत येण्यामागच्या खंता न लपता स्पष्ट दिसून येतात, तर ह्या पुस्तकातल्या तरुण डॉक्टर दांपत्याचे असेच परत येणे, आवर्जून खेडे गावात प्रॅक्टीस सुरू करणे, थोडे आपल्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणीवेचे भान दाखवणे हे खासे वेगळे तर आहेच, पण बरेच सुखावणारेही आहे. ह्या बद्दल ह्या दांपत्याचे व समकालीन प्रकाशनाचे कौतुक करायलाच हवे. हे पुस्तक वाचायलाच हवे.
खेडेगावातून, गरीबीतून एक मुलगा, संग्राम पाटील, शिक्षणाची कास धरतो, मेहनत करतो, डॉक्टर होतो, नूपूर ह्या डॉक्टर जोडीदारीणीबरोबर पुढील शिक्षणासाठी अनुभवासाठी व जरा कर्ज फेडण्यासाठी चार पैसे मिळविण्यासाठी ब्रिटनला जातो व मायदेशाच्या ओढीने दोघेही परत येऊन एरंडोल येथे एक सुसज्ज हॉस्पिटल व शाळा सुरू करतात अशा ह्या वेगळ्या प्रवासाची ही कहाणी आहे. ती मनोरंजक तर आहेच पण ह्या डॉक्टर दांपत्याचे सत्चरित्र दाखवते व वाचकाला त्यांच्या मोहात पाडते. त्यांच्या ह्या वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाला आपण अभिष्ट-चिंतन द्यायलाच हवे, कारण त्याने नवीन समाजाचे चित्र निश्चितच सुखकर होणारे आहे.
अगदी अडचणीत राहून इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व नोकरी करताना डॉक्टर संग्राम पाटील एक आदर्श राहणीमानाची आपल्याला जाणीव करून देतात. त्यापैकी मुतारीचे पैसे वाचविण्यासाठी ते थंडीत लघवी रोकून ठेवतात, टपालपेटीची वेळ साधण्यासाठी एवढ्या थंडीत मैल दोन मैल पळत जातात वगैरे मनोनिग्रहाचे नमूने वाचकांना आदर्श साधकाचे पाठच देऊन जातात. डॉक्टर अभय बंग ह्यांच्या प्रभावाखाली हे डॉक्टर दांपत्य सेवाव्रताची जाणीव बाणतात, हेही वाचताना अजूनही चांगल्या लोकांचा बराच प्रभाव समाजात पडू शकतो हा दिलासा मिळतो. तसेच हे डॉक्टर दांपत्य समाजातल्या, डॉक्टरी व्यवसायातल्या अनिष्ट प्रथांना बळी पडत नाही हे वाचून चांगुलपणावरचा विश्वास हमखास वाढतो व आजकालच्या वातावरणात ह्याची अत्यंत गरज भासते.
पण पुस्तकाच्या मांडणीत जरा गफलत झाल्यासारखे वाटते. पुस्तकाचा रोख शीर्षकाप्रमाणे ( परत मायभूमीकडे ) मायभूमीतल्या कामावर असावयास हवा होता. पण पारंपारिक आत्मचरित्राच्या थाटात तो इंग्लंडमधल्या आरोग्यव्यवस्था, तिथला समाज, त्यांचे आचार-विचार, तिथले भ्रष्टाचार-मुक्त व्यवहार, ह्याचेच चित्रण करण्यात जातो. त्याने लेखकाला अजूनही तीच ओढ खुणावतेय की काय असा संशय चाटून जातो. पुस्तकाच्या आवाक्यात एकच शेवटचे ( ते ही छोटे-खानी ) प्रकरण मायभूमीतल्या प्रयत्नांसंबंधी असावे हे खटकते अशासाठी की पुस्तकाचा मुख्य रोख ( फोकस ) त्यामुळे बदलतो. इंग्लंडमधल्या अनुभवात लोकांना वेगळेपण दिसणे तितके लोभावत नाही, जितके ते मायभूमीच्या मनसुब्यांवर ठासून वेगळे दिसले असते. तसेच डॉक्टर दांपत्य आता एरंडोल येथे जो दवाखाना चालवताहेत त्यात किती फीस घेतात, मोफत इलाज किती जणांना देतात, तसेच सामाजिक उत्तर-दायित्वाच्या कल्पनेने मलेरियावर काय सार्वजनिक उपाययोजना आखतात, हे विस्ताराने वाचायला वाचकाल आवडले असते. शिवाय त्याने इतर डॉक्टरांनाही मोलाचे दिशादर्शन झाले असते. खैर, ह्या तरुण डॉक्टर दांपत्याचा प्रवास नुकताच कुठे सुरू झालेला असल्याने ते लवकरच वेगळ्या प्रवासातले मैलाचे दगड आपल्या नजरेत आणून देतील अशी आशा करू या व त्यांना शुभेच्छा देऊया.


----------------------------------------------------------------
अरूण अनंत भालेराव * सोबत: पुस्तकाचे मुखपृष्ठाचे चित्र
arunbhalerao67@gmail.com